सूर्यकांत कुलकर्णी यांची स्वप्नभूमी
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात केरवाडी नावाचे छोटेसे गाव आहे. त्या गावात लहान मुलांचे आयुष्य फुलवणारी, घडवणारी ‘स्वप्नभूमी’ आहे. सूर्यकांत कुलकर्णी यांचा बालकांसाठीचा महत्त्वाचा असा तो प्रकल्प आहे. संस्थेचे नाव आहे ‘सामाजिक-आर्थिक विकास ट्रस्ट’ - काहीसे रूक्ष, पण त्याला फाटा देत लोकांनी ‘स्वप्नभूमी’ या कल्पकेतलाच साद घातल्याचे दिसते.
केरवाडी हे कुलकर्णी यांचे मूळ गाव. त्यांनी शिक्षणासाठी पुण्यापर्यंतचा प्रवास केला. त्यांना मनात भीक मागणाऱ्या, काम करावे लागणाऱ्या मुलांविषयी सहानुभूती वाटायची. कुलकर्णी यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी, पुण्यात ‘कायनेटिक कंपनी'त चांगल्या पगाराची नोकरी सुरू असतानाच ‘सामाजिक-आर्थिक विकास ट्रस्ट’ची स्थापना केली होती. त्यांनी धोरण ‘सोशियो-इकॉनॉमिक' मॉडेल उभे करत सामाजिक कामांना हात घालायचा हे ठरवले होते. त्यांना त्यांच्या मनात दडलेल्या मूळ प्रेरणा ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर गप्प बसू देईनात. त्यांनी बालकांसाठी काम करायचे या इरेला पेटून नोकरीचा राजीनामा दिला. त्या सुमारास त्यांचे लग्न झाले होते. ते पुण्यात राहत असलेल्या घरामागे झोपडवस्ती होती. कुलकर्णी यांनी त्या झोपडवस्तीतील तीन-चार मुलांना व बायकोला घेऊन केरवाडी गाठले आणि तेथेच स्थायिक झाले.