गणित इंग्रजीतून शिकणे, शिकवणे थांबवा
सेमी-इंग्रजी हे फॅड मराठी शिक्षणाच्या मुळावर आले आहे. गणित, विज्ञान यांसारखे संकल्पनात्मक विषय मातृभाषा मराठीऐवजी इंग्रजीतून शिकण्याची सक्ती अनेक शाळांमधून केली जात आहे. त्याचा फायदा कोणाला किती होतो किंवा झाला आहे त्याचा विचार न करता, सरसकट तशा अशास्त्रीय संमिश्र माध्यमाची सक्ती अजाण बालकांवर करणे हा भाषिक अत्याचारच म्हणावा लागेल! सर्वांनी इंग्रजी माध्यमाकडे वळून मराठी माध्यमातील शिक्षण बंद पडू नये यासाठी निवडलेला तो मधील मार्ग आहे असे कारण त्यासाठी पुढे केले जाते. परंतु ना ते मराठी भाषेच्या हिताचे आहे ना मुलांच्या हिताचे.