अंतर्मुख करणारे आनंदवन प्रयोगवन
ही कथा आहे एका ध्येयवेड्या माणसाची. त्याने पाहिलेल्या स्वप्नाची. ती कथा त्या माणसाची (एका व्यक्तीची) न राहता, त्याच्या तीन पिढ्यांची आणि सध्या वाढत असलेल्या आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ व अशोकवन अशा चौफेर नवनिर्मित समाजाची आहे. त्या ध्येयवेड्या माणसाचे स्वप्न प्रत्येक माणसाला न्याय, निरोगी, समृद्ध आणि अर्थपूर्ण आयुष्य जगता यावे यासाठी प्रयत्न करण्याचे होते. ते सुरू झाले कुष्ठरोग्यांपासून; पण त्या कार्यात अपंग, कर्णबधिर, अंध आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांचा समावेश होत गेला आहे.
‘आनंदवन’ ही एक प्रकृती आहे. दुसऱ्याची वेदना जाणून त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणारी माणसे तेथे आहेत. त्यांचा ध्यास स्वतःच्या वेदनांवर मात करून नवनिर्माण करण्याचा आहे. ते पुस्तक वाचताना जाणवते.
बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे त्यांचे दोन्ही पुत्र डॉ. विकास, डॉ. प्रकाश आणि त्यांच्या कार्याशी तादात्म्य पावणाऱ्या सुना; एवढेच नव्हे, तर बाबांच्या डॉक्टर झालेल्या नाती व सी.ए. झालेले नातू हे सर्व त्या प्रकल्पाचे घटक झाले आहेत, होत आहेत.
हे घडले कसे आणि घडत आहे कसे त्याची ओळख व्हावी, माहिती मिळावी असे वाटत असेल तर त्याने हे पुस्तक वाचावे; नव्हे, ज्याला जीवनात कोठल्याही वेदनेला तोंड देऊन जगण्याचे सामर्थ्य हवे असेल त्याने हे पुस्तक वाचावेच वाचावे. वाचणाऱ्याला पुस्तकात वाट दिसेल असा माझा विश्वास आहे. हे पुस्तक रहस्यमय पुस्तकासारखे वाचनीय झाले आहे!