वृंदावन बाग - काऊ क्लब आणि बरेच काही!
चंद्रकांत भरेकर, राहणार भूकुम, तालुका मुळशी. त्यांचे ‘वृंदावन फार्म’ पुणे शहरापासून जेमतेम दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. ‘वृंदावन फार्म’ म्हणजे एका छत्राखाली किती वेगवेगळे प्रयोग केले जाऊ शकतात त्याचे ते उत्कृष्ट उदाहरण आहे! त्यांनी वीस वर्षांपूर्वी सत्तावीस एकर शेती घेतली होती. त्या सत्तावीस एकरांतील प्रत्येक इंच जमीन ‘वृंदावन फार्म’ या नावाने कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वापरली जात आहे. तेथील प्रयोगाची सुरुवात देशी गायींची पैदास यापासून सुरू झाली. त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून ‘वृंदावन काऊ-क्लब’ सुरू केला आहे. देशी गायींची पैदास, संगोपन आणि प्रचार हा त्याचा उद्देश. त्यांनी थारपारकर देशी गायी नावाचे ब्रीड राजस्थानमधून पुण्याला आणले, जातिवंत बुल्स आणून त्यांच्या सहाय्याने गुणन प्रक्रिया सुरू केली. त्या बैलांचे वीर्यदेखील उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांना बैलही हवे तर दिले जातात. त्यांच्याकडे उच्च प्रतीचे तीन वळू आहेत. त्यांनी दोनशे बुल्स, दोनशे गायी व शंभर कालवडी वाटल्या आहेत.
भरेकर यांच्या वृंदावन फार्ममध्ये जनावरांत ‘सरोगसी’चा प्रयोग केला गेला आहे. तो प्रकार टेस्ट ट्यूब बेबीचा. गर्भधारणेसाठी देशी बुलचे वीर्य वापरून त्याचे फलन देशी गायीच्या गर्भाशयात केले गेले आणि मग तो गर्भ विदेशी गायीच्या गर्भाशयात वाढवला गेला. तयार झालेले बछडे आई व बाप, दोघेही देशी असल्यामुळे संपूर्ण स्वदेशी बनले.