रानातल्या पाखरांचा चिवचिवाट रोजनिशींतून
नाशेरा हे ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेले आदिवासी गाव. डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेले, एका टेकडीवर आहे. त्या गावात एसटीही जात नाही! गावात कौलारू छोटी छोटी घरे आहेत. गरजेच्या वस्तूंच्या विक्रीचे एखादे दुकान आणि आजुबाजूला थोडीफार शेती व रानच रान!
मी त्या गावात मुख्याध्यापक म्हणून रूजू झालो. प्रथम, मला चिंताच वाटली, कारण तेथे कसे जावे येथपासून प्रश्न होता. पावसाळ्यात तर जाण्यायेण्याचा रस्ता, नदी भरून आल्यामुळे बंद होई. आम्ही शिक्षक सोमवार ते शुक्रवार तेथेच राहत असू. शनिवारी-रविवारी आमच्या आमच्या घरी जात असे.