पळसाला पाने तीन
पळस हे रानातील झाड आहे; ते वसंत ऋतूच्या आगमन काळात नेत्रदीपक बनून जाते. इतर वेळी ते सर्वसामान्य झाड असते.
वसंत ऋतू आला, की त्याची पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल-शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते. ते संपूर्ण रानात लक्षवेधक ठरते. पळसाची फुले पाण्यात टाकली असता फुलांचा रंग पाण्यात उतरतो. आदिवासींची रंगपंचमी त्या नैसर्गिक रंगाने साजरी होत असते.
पळसाला बहुतेक नावे त्याच्या फुलांवरूनच पडली आहेत. पळसाला इंग्रजीत ‘प्लेम ऑफ फॉरेस्ट’ तर संस्कृतमध्ये ‘अग्निशिखा’ असे म्हणतात. वाऱ्यावर हलणाऱ्या लाल-शेंदरी फुलांमुळे जणू काही त्या झाडाने पेट घेतलाय आणि ते ज्वालांनी घेरलेय, असे लांबून दिसते. संस्कृतमध्ये पळसाला ‘किंशुक’ असेही नाव आहे. ती फुले पाहून पोपटाच्या चोचीची आठवण होते – ‘किंचित शुक इव’ वाटणारे ते किंशुक अथवा हा पोपट तर नव्हे? अशी शंका मनात निर्माण होते, म्हणून किंशुक. बहिणाबाईंनी त्यांच्या काव्यात पळसाच्या त्याच वैशिष्ट्याचे समर्पक वर्णन केले आहे.
पाहा पयसाचे लाल फूल हिरवे पान गेले झडी
इसरले लाल चोची मिठ्ठू गेले कुठे उडी
बाबा आमटे यांच्या ‘या सीमांना मरण नाही’ या कवितेत ‘ते मोहोर येतील, तेव्हा अंगार भडक होतील पळस; त्या आगीने दिपून जातील प्रासादांचे सारे कळस’ अशा ओळी आहेत. त्या वाचून बाबांना ‘ज्वाला आणि फुले’ या पुस्तकाचे नाव पळसफुलांवरून सुचले असेल, असे वाटते.