साडेसात लाख पाने तय्यार!
नाशिकमधील दिनेश वैद्य यांचे नाव सलग नवव्या वेळी ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवले गेले आहे. जुन्या पोथ्यांच्या छायांकनासाठी त्यांनी हा विक्रम केला.
दिनेश वैद्य यांच्या नावाचा समावेश ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये एक लाख साठ हजार पानांचे डिजिटायजेशन केल्याबद्दल २०१० साली प्रथम करण्यात आला. त्यानंतरच्या वर्षी दिनेशच्या पानांचा आकडा दोन लाख एकोणीस हजारांवर पोहोचला आणि ‘लिम्का’ने त्याची नोंद घेतली. दिनेशचे नाव २०१२ साली दोन लाख नव्वद हजार पानांसह ‘लिम्का बुक’मध्ये पुन्हा झळकले आणि २०१३ साली दिनेशने तीन लाख साठ हजार पानांचे डिजिटायजेशन पूर्ण करून स्वतःच स्वतःचा विक्रम मोडीत काढला. गंमत म्हणजे, ती बातमी प्रसिद्ध होईपर्यंत दिनेश पोथ्यांच्या चार लाख पानांचे स्कॅनिंग करून मोकळाही झाला होता! आता दिनेशने सलग नवव्यांदा ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये स्थान मिळवण्याचा विक्रम केला आहे.