करवीरनगरीचा सूरज आणि युद्धकला
रस्त्यावर पंच्याऐंशी लिंबे रांगेत लावून ठेवलेली होती. उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. उत्सुकता होती. तेवढ्यात सूरजचे तेथे आगमन झाले. त्याने हातात दांडपट्टा घेऊन शरीराची लयबद्ध हालचाल करत एका मिनिटांत चौर्याऐंशी लिंबांचे प्रत्येकी दोन असे तुकडे केले. त्यांचा खच रस्त्यावर पडला. डोळ्यांचे पारणे फेडणारे ते दृश्य पाहून टाळ्या, शिट्या आणि ‘जयभवानी! जय शिवाजी!!’चे नारे सुरू झाले. सगळे थक्क करणारे होते! सूरजच्या त्या अनोख्या पराक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली! त्याचबरोबर त्याला ‘प्राइड ऑफ नेशन’ हा किताबही देण्यात आला.
सूरजने डोळ्यांवर पट्टी बांधून दांडपट्ट्याने लिंबू कापणे; मानेवर, तोंडावर, पोटावर ठेवलेल्या केळ्याचे तुकडे करणे; डोक्यावर ठेवलेला नारळ दांडपट्ट्याने अचूकपणे फोडणे अशा टीव्हीवरील लाजवाब सादरीकरणाने टीव्ही प्रेक्षकांना (आणि परीक्षकांना) आधीच जिंकले आहे. सूरज टीव्हीवरील शोजमध्ये भाग घेऊन लाखो प्रेक्षकांचे मनोरंजन करतो हे खरेच, परंतु त्याचे ध्येय मोठे आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोल्हापुरात तलवारींचा खणखणाट होतो, पण कोणाचे जीवन संपवण्यासाठी नाही; तर लुप्त होत चाललेल्या मराठ्यांच्या युद्धकलेला जीवदान देण्यासाठी! ते काम सूरज गेली वीस-बावीस वर्षें सातत्याने आणि निष्ठेने करत आहे.