भूमातेच्या आरोग्यासाठी कर्बप्रयोग
सजीवाची आई ही भूमाता आहे. तिचेच आरोग्य धोक्यात आले आहे, तर माणसांचे व सर्व जीवसृष्टीचे आरोग्य का धोक्यात येणार नाही? प्रदूषणासंदर्भात पाणी, हवा यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. परंतु भूमातेचे होणारे प्रदूषण या प्रश्नापासून दूर जाऊन चालणार नाही. ती अधिक धान्योत्पादनाची गरज आहेच; परंतु तिचा मानवी स्वास्थ्याशीदेखील सरळ संबंध आहे. माणसांनी सतत अधिक धान्योत्पादनाचा हव्यास ठेवल्यामुळे जमिनीवर अत्याचार झाला आहे ना! रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा, तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावरील वापर हा जमिनीच्या आरोग्याच्या मुळावर आला आहे. जे भूमातेचे खरे अन्न, सेंद्रिय खत; त्याचा वापर घटत गेला आहे. त्यामुळे जमिनीची व म्हणून मानवाची आरोग्यसंपदा धोक्यात आली आहे. माणसांच्या मागील पिढीने आजच्या पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन दिली. त्याचप्रमाणे या पिढीची जबाबदारी पुढील पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन देणे ही नाही का? नाहीतर, पुढील पिढ्या विद्यमान पिढ्यांना माफ करणार नाहीत.