गणेशभक्ती आली कोठून?


देकार्तच्या तत्त्वज्ञानातली मेण्टल मॉडेल्स

     गणेशभक्ती ही एक संकल्पना आहे. ती आपल्या सर्व मराठी माणसांच्या मनांमधे खोलवर रुजलेली आहे. उगीच नाही मुंबईतले तमाम चाकरमाने गणेशचतुर्थीला, जी मिळतील ती वाहने भरभरून कोकणात जायला धावत असतात! पण या संकल्पनेलादेखील वेगवेगळे पैलू आहेत आणि त्यामधल्या प्रत्येक पैलूमधे अनेकविध पदर आहेत. तेव्हा मला प्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ता रेने देकार्त याने लिहिलेल्या आणि ‘कार्टेशियन मेडिटेशन्स’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ग्रंथाची आठवण झाली. हा ग्रंथ देकार्तच्या तत्त्वज्ञानाचा शिरोमणी मानला जातो. त्याच्या टायटलमधे जरी मेडिटेशन हा शब्द असला, तरी हा ग्रंथ अध्यात्मावरचा नसून तत्त्वज्ञानामधला आहे. वाटले, की गणपती या संकल्पनेकडे देकार्तच्या चष्म्यामधून काय दिसते ते बघावे.

     देकार्त मनातल्या संकल्पनांचे वर्गीकरण तीन प्रकारांमधे करतो. १. पहिल्या प्रकाराला तो ‘इन्नेट आयडियाज्’ (मूलभूत संकल्पना) असे म्हणतो. २. दुस-या प्रकाराला तो ‘अ‍ॅडव्हेण्टिशियस आयडियाज्’ (भरवलेल्या संकल्पना म्हणजे मनात भरवलेल्या) असे म्हणतो. ३. तिस-या प्रकाराला तो ‘इन्व्हेण्टेड आयडियाज्’ (संशोधित संकल्पना) असे म्हणतो. या तिन्ही प्रकारच्या संकल्पना मुळात आल्या तरी कुठून, या प्रश्नाचा शोधदेखील देकार्त घेतो.

     याचे सर्वसाधारण उत्तर असे, की आपण आपल्या पंचेंद्रियांमार्फत सभोवतालच्या जगाचे जे ज्ञान मिळवतो, त्यामधून या विविध संकल्पना आपल्या मनांमध्ये येत असतात. उदाहरणार्थ, आंबा ही संकल्पना. पिकलेल्या आंब्याचा लालसर पिवळाधमक रंग, त्याची गोड चव, ही दोन्ही दृष्टी आणि चव या इंद्रियज्ञानाच्या प्रकारांची उदाहरणे झाली. लहान बाळाला आंबा म्हणजे काय, आंबा कशाला म्हणतात हे ठाऊक नसते. पण जरा कळायला लागल्यावर, वर्षा-दीड वर्षांच्या बालकाला जेव्हा आपण पुस्तकातले आंब्याचे चित्र दाखवतो किंवा आंब्याचा सीझन असला तर खराखुरा आंबा दाखवून ‘हा बघ आंबा, खातोस का? बघ किती गोड आहे’ असे विचारतो, तेव्हा आंबा म्हणजे काय, ही संकल्पना त्या बालकाच्या डोक्यात शिरते.

     आधुनिक भाषेत बोलायचे, तर आपल्याला असलेले ‘सेन्सरी परसेप्शन’ हा आपल्या मनांमध्ये येत असलेल्या सर्व संकल्पनांचा मूलस्रोत असतो, पण हे स्पष्टीकरण पुरेसे नाही असे देकार्त म्हणतो आणि असे म्हणणारा देकार्त हा काही एकमेव पाश्चात्य तत्त्वज्ञ नव्हे. इतरही अनेक, उदाहरणार्थ लॉक, स्पिनोत्सा वगैरे तत्त्वज्ञांनीसुद्धा असेच मत व्यक्त केले आहे. म्हणजे वरील स्पष्टीकरण चुकीचे आहे असे नव्हे, तर ते ‘बाळबोध’ आणि मर्यादित स्वरूपाचे आहे. कारण आपल्या मनातल्या अनेकविध संकल्पना, त्यांचे विविध पैलू आणि त्यांच्यामधील विविध पदर, या सर्वांचे स्पष्टीकरण या बाळबोध स्पष्टीकरणाने देता येत नाही. यामुळेच देकार्त संकल्पनांचे तीन प्रकारांमधे वर्गीकरण करतो आणि त्यांच्या पाठीमागची कारणमीमांसा सांगतो.

     एखाद्या गोष्टीने दुसरी एखादी गोष्ट दर्शवणे, याला सूचकता (ऊर्फ ‘रिप्रेझेण्टेशन’) असे म्हणतात. उदाहरणार्थ, नकाशा ही एक गोष्ट भौगोलिक रचना या दुस-या गोष्टीचे सूचक आहे. एखाद्या व्यक्तीचे चित्र (पोट्रेट) अथवा फोटो हे त्या व्यक्तीचे सूचक आहे. भाषेतले शब्द हे सभोवतालच्या वास्तवातल्या वस्तूंचे किंवा त्या वस्तूंच्या बद्दलच्या माहितीचे सूचक असतात. सूचकता ही ‘अमक्याबद्दल तमके’ या प्रकारची असते. यातला ‘बद्दल’ हा शब्द महत्त्वाचा आहे. तेव्हा आपल्या मनातल्या संकल्पना यादेखील कशाच्या तरी ‘बद्दल’ असलेली सूचकेच असतात. या सूचकांच्या पाठीमागे काहीतरी हेतू असतो. त्या हेतूमधले जे ‘हेतुत्व’ (‘इण्टेन्शनॅलिटी’) असते, त्याचे (अ) मूलभूत हेतुत्व (‘ओरिजिनल इण्टेन्शनॅलिटी’) आणि (ब) प्रासंगिक हेतुत्व (‘डिराइव्हड इण्टेन्शनॅलिटी’) असे दोन प्रकार पडतात. प्रासंगिक हेतुत्व हे सर्वसाधारणपणे ‘करता, बद्दल’ अशा शब्दांनी दर्शवले जाते आणि मूलभूत हेतुत्व हे त्या शब्दाच्या अर्थामधे आणि संदर्भामधे साठवलेले असते.

     तेव्हा ‘नकाशा’ या ‘सूचका’मधले हेतुत्व भौगोलिक रचना समजण्या‘करता’ची सोय हे असते. भाषेतील शब्दाच्या सूचकतेमधले हेतुत्व आपण कशा‘बद्दल’ बोलत आहोत हे दर्शवण्याचे असते. ही दोन्ही प्रासंगिक हेतुत्वे आहेत. पण देव किंवा ईश्वर या शब्दातील सूचकतेमधील हेतुत्व प्रासंगिक नाही. ते देव या शब्दाच्या अर्थामधेच साठवलेले आहे. ते मूलभूत हेतुत्व आहे.

     तर ज्या संकल्पनांच्यामधे असे मूलभूत हेतुत्व दडलेले असते, त्या संकल्पनांना देकार्त ‘मूलभूत संकल्पना’ असे म्हणतो. या संकल्पना इतक्या मूलभूत असतात, की त्यांचा मथितार्थ आपल्या मनामधे आतपर्यंत खोल पोचलेला असतो. अशा मूलभूत संकल्पना हाच आपल्या मनामधे असलेल्या ‘श्रद्धा’ या गोष्टीचा मूलस्रोत असतो.

     देकार्तच्या मते, अशा मूलभूत संकल्पना आपल्या मनाच्या खोलवरच्या कप्प्यामधे, म्हणजे अंतर्यामामधे देवानेच घालून ठेवलेल्या असतात. प्रत्यक्ष देव हाच या मूलभूत संकल्पनांचा मूलस्रोत असतो. लहान मुलाला आंबा दाखवून आंबा ही संकल्पना शिकवता येते, तसा देव दाखवून त्या संकल्पनेचा अर्थ सांगता येत नाही. आपण लहान मुलाला फारतर देवाची मूर्ती दाखवू शकतो, नमस्कार करायला शिकवू शकतो, पण देव ही संकल्पना मुळात काय आहे, हे देवाची नुसती मूर्ती दाखवून समजावू शकत नाही. जेव्हा तो मुलगा मोठा होईल, स्वत: विचार करायला लागेल, देवाबद्दल विचार करेल आणि जेव्हा त्याचे देवाबद्दलचे विचार अधिकाधिक प्रगल्भ होत जातील, तेव्हा हळुहळू देव म्हणजे काय याचा प्रकाश त्याच्या डोक्यामधे पडू लागेल.

     देकार्तचे म्हणणे असे, की देवाबद्दलचा भक्तिभाव, देवाबद्दलची श्रद्धा ही संकल्पना खुद्द देवाने आपण जन्माला येतो तेव्हाच आपल्या अंतर्यामामधे घालून ठेवलेली असते. ती ‘लर्ण्ड कॉन्सेप्ट’ म्हणजे शिकून मिळवलेली संकल्पना असत नाही. ती ‘इन्नेट’ असते आणि आपल्या अंतर्यामातून आपसूक वर येते, प्रगट होते.

     संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी देखील असेच म्हटले आहे. ‘बहुत सुकृताची जोडी, म्हणुनी विठ्ठली आवडी’ हे त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. देकार्तसारखा पाश्चात्य तत्त्वज्ञ आणि तुकारामबुवांसारखा मराठी संत या दोघांच्या विचारांमधे मूलभूत संकल्पनांबाबतीत किती सारखेपणा आहे! तर विठोबा काय आणि गणपती काय, या देवाबंद्दलचा मराठी जनमानसामधला भक्तिभाव आणि त्या भावनेची संकल्पना हा झाला देकार्तने म्हटलेला संकल्पनांचा पहिला प्रकार. ‘करता’, ‘बद्दल’ या शब्दांनी दर्शवलेल्या सर्व संकल्पनांचा अंतर्भाव देकार्तने मांडलेल्या दुस-या प्रकारात म्हणजे ‘भरवलेल्या संकल्पना’ या विभागामधे होतो. गणपतीच्या बाबतीत आपल्याला असे शिकवले गेले आहे, की गणपती हा बुद्धीचा आणि ज्ञानाचा देव आहे. ही कल्पना लहानपणापासून आपले आईवडील, शिक्षक आणि इतर वडिलधा-या मंडळींनी आपल्या डोक्यांमधे भरवून दिलेली असते आणि ‘आप्तवाक्य’ खोटे कसे असेल? असे म्हणून आपण ते मानत असतो, त्यावर विश्वास ठेवत असतो. म्हणजे गणपती हा बुद्धी व ज्ञान यांचा सूचक मानला जातो, जसा आंबा हा शब्द खर्‍याखुर्‍या आंबा नावाच्या फळाचे सूचक असतो आणि त्याचे सूचकत्व बघणे, चाखणे वगैरे इंद्रियजन्य अनुभवांवर आधारलेले असते.

     पण याचा आणखी एक वेगळा आणि अधिक महत्त्वाचा प्रकार आहे आणि तो प्रकार इंद्रियजन्य अनुभवांवर आधारलेला नाही, कारण ढेरपोट्या गणपतीचे हत्तीसारखे सोंड असलेले रूप पाहिल्यावर त्या रूपाचा बुद्धी व ज्ञान यांच्याशी किंवा बुद्धी व सर्जनशीलता यांच्याशी काहीच संबंध दिसत नाही, जसा आंबा या शब्दाचा संबंध खर्‍याखुर्‍या आंब्याशी असतो.

     मुळात, ‘अ‍ॅडव्हेण्टिशियस’ हा शब्द मी माझ्या वडिलांच्या तोंडून ऐकला, तो वनस्पतीविज्ञानाच्या संदर्भामधे. माझे वडील मुंबईतल्या खालसा कॉलेजमधे वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी फार पूर्वी वनस्पतिविज्ञानावर पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी काही वनस्पतींना अ‍ॅडव्हेण्टिशियस रूटस् असतात, असे म्हणून वडाच्या झाडाचे उदाहरण दिले होते. वडाच्या झाडाच्या पारंब्या म्हणजे खरे तर मुळेच असतात, पण मूळ म्हणून जमिनीत जाऊन जमिनीतले पाणी शोषून झाडाला पुरवणे, हे मुळाचे कार्य करण्याऐवजी झाडाला आधार देणे, हे दुसरेच कार्य पारंब्या करतात. म्हणून त्यांना अ‍ॅडव्हेण्टिशियस प्रकारची मुळे म्हणतात.

     हे आपल्या मनातल्या अनेक संकल्पनांबद्दलही खरे आहे, अनेक संकल्पनांचा त्यांतल्या अर्थाशी किंवा कसल्याही संदर्भाशी काहीच संबंध नसतो. पण तसा संबंध आहे असे आपल्या डोक्यामधे भरवून दिले गेलेले असते. थोडक्यात, जे इंद्रियजन्य ज्ञानाने दिसत किंवा भासत नसूनही केवळ ते तसे आहे असे सांगितले गेल्याने, आपण ते तसेच आहे असे मानत असतो, म्हणून अशा संकल्पना अ‍ॅडव्हेण्टिशियस होत, हाच देकार्तने म्हटलेला ‘भरवलेल्या संकल्पना’ नावाचा प्रकार.

     देकार्तच्या ‘मेण्टल मॉडेल्स’मधला संकल्पनांचा तिसरा प्रकार म्हणजे काही विशिष्ट हेतूकरता मुद्दाम बनवलेल्या, घडवलेल्या संकल्पना. गणपतीच्या बाबतीतली सार्वजनिक गणेशोत्सव करण्याची संकल्पना ही ‘इन्व्हेण्टेड आयडियाज’ या प्रकारच्या ‘संशोधित संकल्पनां’च्या यादीमधे मोडते.

     मराठी जनमानसामधे गणेशभक्ती पूर्वीपासून होती. ती काही टिळकांनी उत्पन्न केलेली नाही. टिळकांनी फक्त त्या अगोदर असलेल्या गणेशभक्तीला सामाजिक असे नवे रूप दिले. लोकांच्या मनामधे असलेल्या गणेशभक्तीच्या श्रद्धेला सार्वजनिक परिमाण लाभले तर त्या निमित्ताने लोक एकत्र जमतील आणि त्यापासून काही समाजोपयोगी असा लाभ उठवता येईल असे ‘लॉजिक’ या मुद्दाम घडवलेल्या संकल्पनेमागे असावे म्हणून ही संशोधित संकल्पना होय.

अनिलकुमार भाटे, निवृत्त प्राध्यापक,
विद्युत अभियांत्रिकी,संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेन्ट,
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका
ईमेल : anilbhate1@hotmail.com 

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.