‘थिंक महाराष्ट्र’: भविष्यकाळातल्या पत्रकारितेची ‘नवी तुतारी’!


     थिंक महाराष्‍ट्र - लिंक महाराष्‍ट्र वृत्तपत्रामधल्या बातम्या हा संगणक विज्ञानाच्या भाषेमध्ये ‘रॉ डेटा’ असतो. त्याच्यावरून नुसती नजर फिरवली तरी पुरते. त्याचे स्पीड रिडिंग होऊ शकते. स्पीड रिडिंगमध्ये वाचताना प्रत्येक शब्द वाचून मनामधे त्या शब्दाचे ‘व्हर्बलायझेशन’ होऊ द्यायचे नाही. खरेतर, प्रत्येक शब्द वाचत बसायचेच नाही, तर संपूर्ण ओळीतल्या सर्व शब्दांवर एकदम नजर टाकून त्या संपूर्ण ओळीमधे काय म्हटले आहे, त्याचा आशय (‘कॉण्टेण्ट’) एकदम म्हणजे एकसमयावच्छेदेकरून ध्यानात घ्यायचा. हे असे करण्याची एकदा सवय लागली, म्हणजे मग पुढे पुढे एका ओळीऐवजी पाच-सहा ओळींच्या संपूर्ण परिच्छेदावर दृष्टिक्षेप टाकून त्या परिच्छेदाचा आशय ध्यानात येऊ लागतो. आणि मग जर आपला मेंदू बर्‍यापैकी तल्लख असेल तर आपल्या नजरेने वेचलेल्या त्या ओळी-ओळींमधल्या त्या ‘रॉ डेट्या’चे रूपांतर माहितीमधे (इन्फॉर्मेशन) आपल्या मेंदूत केव्हाच होऊन गेलेले असते!

     मी पस्तीस वर्षांपूर्वी अमेरिकेत आल्यानंतर सुरूवातीची काही वर्षें ‘न्यू यॉर्क टाइम्स’ वाचायचो. वृत्तपत्र वाचण्यात घालवलेला वेळ माझ्या वेगवान वाचनामुळे कमी असला, तरी तो वाया जात आहे आणि त्यापेक्षा टीव्हीवरच्या बातम्या बघितल्या की पुरे झाले असे वाटायला लागले. (टीव्ही जेवतानासुद्धा एकीकडे बघता येतो.) याला अपवाद फक्त वृत्तपत्रातल्या रविवारच्या पुरवणीचा. रविवारची पुरवणी मात्र मला वाचायला आवडायची. ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या वीकेण्ड पुरवणीचा अर्ध्याहून अधिक भाग रविवारऐवजी शनिवारीच आलेला असायचा. त्यामुळे वाचायला भरपूर वेळ मिळायचा. शिवाय, पुरवणीदाखल असलेले काही विशिष्ट विषयांवरचे भाग त्याच्याही अगोदरच आलेले असायचे. म्हणजे साहित्य व कलाविषयक भाग मंगळवारी, विज्ञानावरचा भाग बुधवारी, वगैरे...

     एकदा, टीव्हीवरच्या बातम्या बघायची सवय झाल्यावर पेपर वाचायची सवय सुटली ती कायमची. त्यानंतर मग अमेरिकेत टीव्हीवर चोवीस तास उपलब्ध असलेल्या दोनशे-अडीचशे वाहिन्यांमधल्या केव्हा- कुठल्या बघायच्या याची कसरत सुरू झाली. पुढे पुढे, तेही नकोसे व्हायला लागले. टीव्हीचा रिमोट कण्ट्रोल हातात घेऊन फटाफट ही वाहिनी बघ, ती वाहिनी बघ, अशा सतत वाहिन्या बदलूनदेखील कुठेच काही बघण्यासारखे दाखवले जाते असे वाटेनासे झाले. भारतातल्या सर्व वाहिन्यादेखील अमेरिकेत उपग्रहाच्याद्वारे दिसू शकतात, पण आम्ही त्या कधीच घेतल्या नाहीत. एक तर त्यांच्यावरच्या कार्यक्रमांची गुणवत्ता कमी दर्जाची वाटायची आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्या कार्यक्रमांचा आमच्या अमेरिकेतल्या जीवनाशी काही संबंध नसायचा.

     पण जमाना पार बदलून गेला. टीव्हीचे वृत्तपत्रांवरचे आक्रमण तर प्रचंड आहेच, पण चोवीस तास बातम्या हे तर चक्क माणसांवर म्हणजे तुमच्या-आमच्यावर केले गेलेले आक्रमण आहे असे ध्यानी आले. हा चक्क व्यक्तिस्वातंत्र्यावर घातला गेलेला घाला होय आणि आता, त्याच्या जोडीने ‘इंटरनेट’देखील या ‘त्सुनामी’च्या लाटांमधे भर टाकत आहे.

     तरीदेखील ‘इंटरनेट’चा एक महत्त्वाचा फायदा असा की त्यावरचे नियंत्रण सदैव आपल्या हातात असते. टीव्हीच्या वाहिन्या कितीही वेळा बदलल्या, तरी प्रत्येक वाहिनीवर जो काही शो चालू असतो, तोच आपल्याला बघावा लागतो. आणि अडीचशे, तीनशे, पाचशे वाहिन्या जरी घेतल्या आणि त्यामुळे चॉइस पुष्कळ असला, तरी सरतेशेवटी तो मर्यादित ठरतो. कारण बातम्या देणा-या वाहिन्या वेगळ्या, चित्रपट दाखवणार्‍या वाहिन्या वेगळ्या आणि सोप ऑपेरा दाखवणा-या वेगळ्या असा प्रकार असतो, शिवाय, काही खास प्रकारच्या वाहिन्या म्हणजे इतिहासाची माहिती देणारी वेगळी, विज्ञानावरची वेगळी वगैरे सर्व जरी असले तरी त्यांवरच्या विशिष्ट कार्यक्रमांच्या वेळा मर्यादितच असतात.

     पण ‘इंटरनेट’ अमर्याद असते आणि त्यावर सर्फिंग करताना, त्यातल्या लाटांवर तरंगताना कुठलीच मर्यादा राहात नाही. तेव्हा वृत्तपत्राकडून टीव्हीकडे जाताना मर्यादा जशी वाढली, विस्तारली, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात ती टीव्हीकडून ‘इंटरनेट’कडे जाताना विस्तृत झाली.

     या पार्श्वभूमीवर जेव्हा ‘थिंक महाराष्ट्र’ वेबपोर्टल  वर्षापूर्वी सुरू झाली तेव्हा मला हायसे वाटले आणि माझ्या अपेक्षा उंचावल्या, कारण मग निदान मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी भाषिक या ‘माहोला’मधल्या विविध सामाजिक स्वरूपाच्या आणि इतर घडामोडी आणि एकंदरीतच सबकुछ मराठी, या सर्वांची माहिती एका ठिकाणी एकाच वेबपोर्टल वर मिळणार असे मला वाटू लागले. म्हणजे शोधत बसायची गरज नाही. तेव्हा सर्फिंग करण्यातला कालापव्यय सुटला. पुन्हा ही सर्व माहिती संपादित स्वरूपामधे म्हणजे चोखंदळपणे ‘एडिट’ केलेल्या स्वरूपामधे रेडिमेड अशी वाचायला मिळणार, असे माझ्या मनाने घेतले.

     मी रॉ डेटा व इन्फॉर्मेशन हे शब्द वापरले आहेत त्यांच्याबद्दल थोडासा खुलासा. छत्तीस वर्षें प्राध्यापक म्हणून केलेल्या माझ्या करियरमधे संगणक विज्ञानाचे कार्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर देताना मी त्यातला मूलभूत असा फॉर्म्युला सांगत आलो, शिकवत आलो, की – रॉ डेटा—ऑर्गनाझ्ड डे़टा –इन्फॉर्मेशन-  नॉलेज – विझ्डम. म्हणजे सुरूवातीला जमलेला डेटा हा फक्त रॉ डेटा असतो. त्याची व्यवस्थित मांडणी केली (याला डेटा मॉडेलिंग म्हणतात), म्हणजे तो ऑर्गनाइझ्ड डेटा होतो. मग त्यामधे ‘नॅव्हिगेशन’ करून व ‘डेटा माइनिंग’ करून आपल्याला हवी असलेली माहिती उपसून काढली की त्याची इन्फॉर्मेशन होते. त्या इन्फॉर्मेशनचा नेमका ‘मथितार्थ’ ( त्याचे ऑर्गनाइझ्ड डेट्यामध्ये इतर सर्व लागेबांधे धरून त्यांच्यासकट) आपल्या ध्यानात आला म्हणजे त्यापासून नॉलेज तयार होते आणि सरतेशेवटी त्या नॉलेजची उपयोगिता, उपयुक्तता काय, ते कुठे व कसे-केव्हा वापरायचे (किंवा केव्हा वापरायचे नाही हेदेखील) असे सर्व जेव्हा ध्यानात येते, त्याला म्हणतात विझ्डम.

     तेव्हा ‘थिंक महाराष्ट्र’ वेबपोर्टलवर वृत्तपत्रांमधे रविवारच्या पुरवणीमधे थोडीबहुत माहिती असते तशीच, पण त्याहीपेक्षा जरा अधिक खोलवरची आणि अधिक व्यापक स्वरूपाची, जिच्यामधे काही वैचारिक स्वरूपाचा ‘सब्स्टन्स’ आहे, अशी माहिती मिळायला हवी. त्यात मराठी विश्वामध्ये घडत असलेल्या विविध घडामोडींची माहिती तर असेलच, पण ती निव्वळ बातम्या या स्वरूपात असणार नाही, वर म्हटल्यासारखा ‘रॉ डेटा’ असणार नाही, ‘इन्फॉर्मेशन’ या स्वरूपात असेल. शिवाय, हीदेखील फक्त इन्फॉर्मेशन एवढ्या स्वरूपामधे असणार नाही तर त्यावर १. काही नुसते वाचक, २. काही वाचून त्याचे वैचारिक परीक्षण, निरीक्षण, अ‍ॅनालिसिस करणारे, ३. काही त्यावर अधिक खोलात जाऊन संशोधन करणारे विद्वान, अशा सर्व लोकांनी केलेली साधक आणि बाधकसुद्धा, दोन्ही प्रकारची चर्चा असेल.

     अपेक्षांची यादी मारुतीच्या शेपटासारखी वाढत चालली. तरीपण आणखी सर्वात महत्त्वाची अपेक्षा राहिलीच की! ती म्हणजे हे वेबपोर्टल समाजातल्या सर्व थरांमधल्या लोकांनी केलेल्या वैचारिक आदानप्रदानाचे ‘विमुक्त’ असे व्यासपीठ असेल! इतक्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकणे ही साधी गोष्ट नाही. ती तारेवरची कसरत आहे आणि ते प्रत्यक्ष घडवणे म्हणजे ‘सतीचे वाण’ आहे.

     माझ्या मते तरी, हे वेबपोर्टल म्हणजे नव्या युगातल्या नव्या पत्रकारितेची तुतारी ठरू शकेल. केशवसुतांनी त्यांच्या ‘तुतारी’ या कवितेमधे जे म्हटले, तेच आता हे वेबपोर्टल प्रत्यक्षात आणू पाहात आहे.  येत्या काही वर्षांनंतर वृत्तपत्रे इतिहासजमा होणार आहेत आणि टीव्ही हे माध्यम सैरावैरा धावत सुटून शेवटी, त्याचा अनिर्बंध वारू कुठेतरी भरकटणार आहे, कारण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकणारा कुणीच उरलेला नाही. किंबहुना सरकारसुद्धा त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. आणि मग (या ‘थिंक महाराष्ट्र’) वेबपोर्टलचाच घोडा ‘विन’ होणार आहे. अशी वेबपोर्टल हीच भविष्यकाळातली खरीखुरी पत्रकारिता ठरणार आहे. तेव्हा ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा’ ही केशवसुतांनी आपणा सर्वांवर टाकलेली जबाबदारी आपण पुरी पाडणार आहोत का?

- डॉ. अनिलकुमार भाटे
निवृत्त प्राध्यापक- विद्युत अभियांत्रिकी,
संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेण्ट’,
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य,
अमेरिका,
ईमेल: anilbhatel@hotmail.com

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.