भेट अण्णांची


--  प्रभाकर भिडे

     अण्णा हजारे यांनी दिल्लीला लोकपाल विधेयकासाठी उपोषण केले. त्याला प्रसिध्दिमाध्यमांनी व जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शेवटी, त्यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता झाली.

--  प्रभाकर भिडे

 

     अण्णा हजारे यांनी दिल्लीला लोकपाल विधेयकासाठी उपोषण केले. त्याला प्रसिध्दिमाध्यमांनी व जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शेवटी, त्यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता झाली. साहजिकच, त्यांच्या टेलीव्हिजनवर अनेक मुलाखती झाल्या. अण्णा आपली जागा ओळखून प्रत्येक मुलाखतीत नम्रपणे बोलत होते. त्यांच्या या वागण्याविषयी आदर वाटला व दहा वर्षापूर्वीचा एक प्रसंग आठवला.

 

anna-hazare     आम्ही दोन मित्र आपल्या कुटुंबीयांसमवेत केरळ-कन्याकुमारीच्या ट्रिपला गेलो होतो. कन्याकुमारीच्या समुद्रात दोन-तीन समुद्रांचे पाणी येऊन मिळते. तेथील सागरातील प्रचंड प्रस्तरावर विवेकानंदांना समाजकार्यासाठी प्रेरणा मिळाली व पुढे, त्यांनी आपल्या कार्याचा शुभारंभ कन्याकुमारीत येऊन केला. त्याची स्मृती म्हणून कन्याकुमारीला ‘विवेकानंद रॉक मेमोरियल’ उभे राहिले आहे. आम्ही ते सुदंर शिल्प बघितले. तेथील वातावरण, समुद्राचा विशालपणा, खळाळणार्‍या लाटा बघितल्या की मन प्रसन्न होते. तेथे जवळच विवेकानंद केंद्राची निवास कॉलनी आहे. कॉलनीमध्ये विवेकानंदांचा सुंदर पुतळा आहे. तो बघावा म्हणून आम्ही कन्याकुमारीहून बस पकडून कॉलनीत गेलो. तो पुतळा बघून शेजारच्या समुद्रकिनार्‍यावर गेलो. तेथेही वातावरण स्वच्छ व प्रसन्न होते. माणसांची वर्दळ विशेष नव्हती. लोकांना समुद्रकिनार्‍यावर बसण्यासाठी सिमेंटची बाके होती. त्यावर धोतरवाले एक गृहस्थ शांतपणे बसून होते.

     मी त्यांच्याकडे बघितले अन आश्चर्याने बोलून गेलो, की हे गृहस्थ बरोबर अण्णा हजारे यांच्यासारखे दिसतात! त्यांनी मी मोठ्या आवाजात मित्राजवळ बोललेले ऐकले असावे.

 

     तेही उत्स्फूर्तपणे म्हणाले, की मी अण्णा हजारेच आहे! आता तोंडांत बोटे घालण्याची आमची वेळ आली. मग साहजिकच मी प्रश्न विचारला, तुम्ही येथे कसे?

     अण्णांचे उत्तर – ज्यावेळी माझे मन विषण्ण होते, बेचैन होते, त्यावेळी मी या केंद्रात येतो आणि आठ दिवस राहतो. सैरभैर झालेले मन शांत झाले की राळेगणसिध्दीला परत जातो. माझे काम सुरू करतो.

     त्यांच्या या बोलण्यामुळे मनमोकळेपणा आला व इतर गप्पा सुरू झाल्या. गप्पांमधून आम्ही त्यांना प्रश्न विचारत होतो. त्यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेत होतो.

     अण्णा म्हणाले, ‘गांधीजीं’च्याप्रमाणे ग्रामस्वच्छता, ग्रामसुधारणा करण्याचा प्रयत्न केला. गावांतील गुरांना चरण्यासाठी गावांतील लोकांनी त्यांना सांभाळले पाहिजे. त्याकरता शिस्त व नियमांचे पालन करण्याची गरज लोकांना समजावून सांगितली. दारूबंदीसाठी गुत्ते बंद झाले पाहिजेत, याकरता उपोषणे केली. मी राळेगणसिध्दीला खेडेगावातील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी केलेले कार्य सरकारने बघितले. सरकारने आश्वासने दिल्यामुळे मी वेळोवेळी केलेली उपोषणे सोडली. महाराष्ट्रात त्यावेळी तीनशे गावांत तसे प्रयत्न चालू होते. मला इतर राज्यांतही. मार्गदर्शन व अंमलबजावणी यासाठी बोलावतात.

     “सरकारने माझ्यासाठी ‘सुरक्षा व्यवस्था’ दिली होती. पण रोज सकाळी आपल्या मागे-पुढे बंदुकधारी बघून कामाचा उत्साह निघून जातो. मी सरकारला ‘सुरक्षा व्यवस्था नको, काढून घ्या’ अशी विनंती केली. कारण मी सैन्यात असताना मृत्यूला हात लावून आलो होतो. मला मरणाची भीती वाटत नाही. मी सुरक्षा व्यवस्था काढल्यावर मनासारखा भटकू शकतो. त्यामुळे मी आठ दिवस विवेकानंद केंद्रात येऊन राहतो. येथे मला मनशांती मिळते.”

 

    अण्णांच्या भेटीमुळे आमच्या केरळ-कन्याकुमारी सहलीला वेगळाच अर्थ प्राप्त झाला.

प्रभाकर शं. भिडे
0251/2443642, 9892563154
दिनांक - 31.05.2011
 

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.