‘श्यामची आई’ म्हणजे मधाचं पोळं


(‘श्यामची आई’ या पुस्तकास पंचाहत्तर वर्षे झाली, त्या निमित्ताने)

साने गुरुजींच्या जीवनात आचार आणि विचार यांचं सौंदर्य त्यांच्या आईनं निर्माण केलं. हळुवार भावना, निसर्गावरील प्रेम, नक्षत्रांचं आकर्षण, माणसाविषयी कणव हे सर्व सदगुण म्हणजे आईची देणगी. ती कृतज्ञ भावनेनं व्यक्त करणं हाच मनाचा मोठेपणा आहे. साने गुरूजी हे अशा आदर्शाचं मूर्तिमंत उदाहरण होतं.

त्यामुळे ‘श्यामची आई’ हे पुस्तक पाऊण शतक टिकलं. त्याच्या लक्षावधी प्रती संपल्या. ज्यांना वाचनाची आवड लागते त्या मुलांनी प्रारंभी ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचलं असावं, असं खुशाल समजावं.

हे पुस्तक वाचताना डोळ्यांतून अश्रू वाहिले नाहीत असा वाचक विरळा, अनेक प्रसंगांतून श्यामला धडा मिळतो. मात्र त्या प्रसंगात कृत्रिमता नसते. उपदेशामृत पाजण्याचा आव नसतो. गुरूजींची ही शैली वाचकाला मंत्रमुग्ध करते.

एकदा, सायंकाळी श्याम खेळून आल्यावर अंघोळीला बसला. आईनं खसखसा अंग चोळलं. उरलेलं पाणी श्यामनं भराभर अंगावर घेतलं. आईनं ओल्यानं अंग पुसलं. नेहमीप्रमाणे, आईनं त्याला देवासाठी फुलं आणायला सांगितलं.

श्याम म्हणाला, “माझे तळवे ओले आहेत. त्यांना माती लागेल. ते पुस.”

आईनं ओचे अंघोळीच्या धोंडीवर पसरले. त्यावर पाय ठेवून श्यामनं तळवे पुसले.

देवावर फुलं वाहताना आई म्हणाली, “श्याम, कशाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो!”

एका प्रसंगी, श्याम मुलांबरोबर पोहण्यास जायला घाबरत होता. श्यामच्या आईनं शिपटीनं झोडपलं. आपलं मूलं भीतीनं कोणत्याही कलेत मागे राहू नये असा त्या माऊलीचा आग्रह असायचा.

एकदा, श्यामनं आईच्या सांगण्यावरून इतरांचे शिव्याशाप घेत म्हारणीची मोळी तिच्या डोक्यावर चढवली.

अशा अनेक प्रसंगांच्या मालिकेतून श्यामवर संस्कार होत गेले. अत्यंत हलाखीच्या अवस्थेतही श्यामच्या आईनं स्वाभिमान सोडला नाही. ‘श्यामची आई’ वाचल्यापासून आचार्य अत्रे अस्वस्थ झाले होते. चित्रपटाच्या दृष्टीनं ते कथानकाचा विचार करू लागले. ‘श्यामची आई’ वाचताना हृदयाची जी कालवाकालव होते तोच भावनिक उद्रेक चित्रपटात प्रत्ययास आला पाहिजे अशी अत्रे यांची विचारसरणी होती.

गुरुजींच्या महान व्यक्तिमत्त्वामुळे आणि अत्र्यांवरील लोभामुळे हा चित्रपट आर्थिक संकटात अडकला नाही. महाराष्ट्रातील मोठमोठे कलाकार ह्या चित्रपटासाठी लाभले. पैशांसाठी कोणीही आग्रह धरला नाही. ‘श्यामची आई’ चित्रपटावर स्तुतिसुमनांचा वर्षाव झाला. ‘श्यामची आई’ चित्रपटाची 1953 सालचा उत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून निवड झाली आणि त्यास राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालं.

आचार्य अत्रे एके ठिकाणी म्हणतात, “ज्याने चित्ताची शुध्दी होते ते वाड.मय. वाड.मयाने जीवनात माधुरी उत्पन्न झाली पाहिजे. हर्ष निर्माण झाला पाहिजे. नवीन दृष्टी दिली पाहिजे. ज्ञानेश्वर, तुकाराम, विनोबा किंवा साने गुरूजी ह्याचं वाड.मय म्हणजे मधाची पोळी.”

- आदिनाथ हरवंदे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.