बजरंगदास लोहिया - अभियांत्रिकीतील अभिनव वाट!

प्रतिनिधी 11/02/2010

उद्योग, व्यवसाय हे चरितर्थाचं साधन असलं तरी ते केवळ नफा मिळवणं, पैसा कमावणं आणि आपलं-आपल्या कुटुंब-कबिल्याचं ऐहिक आयुष्य सुखी करणं; एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. या सगळ्याबरोबर आपल्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून देशहित व समाजहिता यांसाठी हातभार लावून समाजाचा एक घटक, नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्याचं पालन करता येतं. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगातही असा आदर्श घालून देणारे उद्योजक आहेत.

‘‘कॉम्पॅक्स इंजिनीयरिंग वर्क्स’’चे संचालक बजरंगदास लोहिया हे त्यांपैकी एक. कर्तृत्वशाली पण प्रसिद्धिपराङमुख उद्योजक! अंबेजोगाईसारख्या छोट्या शहरात जन्मलेल्या लोहिया यांच्या बुद्धीची चमक विद्यार्थिदशेपासून ठळकपणे दिसून आली. ते दहावीच्या परीक्षेत राज्याच्या गुणवत्तायादीत सातव्या क्रमांकावर चमकले. त्यांनी पदवीपूर्व अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी वरंगळ येथे अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आणि लोहियांच्या वडलांचा आकस्मिक मृत्यू झाला.  त्यामुळे कुटुंबाच्या कर्तेपणाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी अभियंता म्हणून नोकरी पत्करली.

तब्बल बारा वर्षं नोकरी करताना, त्यांची विद्यार्थी वृत्ती, नवनवोन्मेषशालिनी बुद्धी आणि शोधक दृष्टी कायम राहिली. ते आपल्या कामांबरोबरच  नवनवीन गोष्टी शिकत राहिले. अभ्यास, निरीक्षण आणि प्रत्यक्ष कामातून आपलं ज्ञान अद्यवात करत राहिले. त्याचवेळी त्यांनी पुणे विद्यापीठाची व्यवस्थापनशास्त्रातली पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली. आपला व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीने विविध संधी आणि  क्षेत्रांचा शोध घेत राहिले. त्या ओघातच सुभाष राठी यांच्यामार्फत  त्यांची ज्येष्ठ उद्योजक माधवराव पवार (शरद पवार यांचे बंधू) यांच्याशी ओळख झाली. कास्टिंग आणि फोर्जिंग उद्योगात आवश्यक असणारे वाळूचे ‘कोअर’ आणि ‘मोल्ड’; म्हणजेच यंत्र तयार करताना लागणारे साचे बनवण्याच्या व्यवसायात संधी असल्याचं त्यांच्याकडून समजलं. या व्यवसायासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि तांत्रिक सुविधा त्या काळी भारतात उपलब्ध नव्हत्या. सगळा भर आयातीवर होता. त्यामुळे या व्यवसायात जशी संधी मोठी होती, तसंच आव्हानही मोठं होतं. लोहिया यांनी हे आव्हान स्वीकारलं. वाहनं आणि यंत्रसामुग्री यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारे वाळूचे साचे बनवणारी भारतातली पहिली ‘कॉम्पॅक्स’ कंपनी १९८३ साली पुण्याजवळ उभी राहिली.

भारतात या क्षेत्राची ही सुरूवात होती. सगळं नवीन होतं नव्यानं घडवायचं होतं.  व्यवसायासाठी आवश्यक असणा-या यंत्रसामुग्रीच्या आरेखनापासून उभारणीपर्यंत सगळं लोहिया यांनी अभ्यास करून पार पाडलं. 'कॉम्पॅक्स'ची गाडी रुळावर आली. तेव्हापासूनच लोहिया यांनी संशोधन आणि विकासाची (R&D) कास धरली ती आजपर्यंत! मळलेल्या वाटांवरून जाणा-यांपेक्षा वेगळी वाट चोखाळणा-यांना अडचणी, अडथळे पाचवीलाच पुजलेले असतात. तसे ते लोहिया यांनाही आले. मात्र संशोधकवृत्ती, उद्योजकतेचा ध्यास आणि व्यवस्थापनकौशल्य यांच्या आधारावर लोहियांनी  मार्ग काढला आणि ‘कॉम्पॅक्स’ची घौडदौड सुरू झाली.

नवी वाट घडवणा-यांना मार्गातले अडथळे महत्प्रयासानं दूर करावे लागतात. त्यासाठी धाडस लागतं, जिद्द लागते आणि त्यागही करावा लागतो, याचा अनुभव लोहियांना लवकरच आला. अचानकपणे, एक  संकट या उद्योगावर ओढवलं. या उद्योगात त्याकाळी वापरल्या जाणा-या तंत्रज्ञानानुसार साचे बनवण्यासाठी वाळूवर विशिष्ट प्रकारच्या वायूचा दाब दिला जात असे. तसा हा वायू निर्धोक असला तरी त्याला अमोनियासारखा उग्र वास असतो. त्याच दरम्यान, भोपाळमध्ये विषारी वायू गळतीनं थैमान घातलं. हजारो जीव गेले. हजारो अपंग झाले. त्यामुळे साचे बनवण्याच्या या उद्योगावरही संशयाचं आणि भीतीचं सावट दाटून आलं. एकूण व्यवसाय धोक्यात आला. मात्र या संकटानं  डगमगून न जाता लोहिया यांनी पुन्हा नवा रस्ता शोधला. संशोधन आणि विकासावर सातत्यानं दिलेला भर त्यांच्या कामी आला. विविध उद्योगांना, विशेषत: वाहनउद्योगाला आवश्यक असणा-या चाचणी उपकरणाचं उत्पादन सुरू करून लोहिया यांनी देशभरातील नामांकित वाहन उद्योगांना ही उपकरणं पुरवली. काही काळातच साचे बनवण्याच्या उद्योगावरचं संशयाचं मळभ निवळलं आणि या उद्योगानं पुन्हा उभारी धरली. या उद्योगाच्या देश-विदेशातल्या व्यवसायवृद्धीमुळे चाचणी उपकरणांच्या आव्हानात्मक क्षेत्रात लक्ष देता येत नसल्याची खंत लोहियांच्या मनात आहे.

वाळूचे साचे बनवण्याच्या उद्योगाचा भारतात पाया घालणारी कंपनी; या मानदंडाबरोबर ‘कॉम्पॅक्स’नं विदेशातही आपला व्यवसाय विस्तारला आहे. कंपनीनं १९९७ मध्ये ‘आयएसओ ९००१’ मानांकन प्राप्त केलं आणि आता कंपनी अमेरिकेसह  सिंगापूर, सौदी अरेबिया, बहारिन, दुबई, ओमान, इजिप्त, तुर्कस्थान अशा दहा देशांमध्ये आपल्या उत्पादनाची निर्यात करत आहे. तंत्रज्ञान विकासाबाबत काटेकोर असणा-या जर्मनीमध्ये तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी ‘कॉम्पॅक्स’ला मिळाली आणि निर्यातीचा मार्ग निर्वेध झाला. सध्या कंपनीच्या व्यवसायापैकी वीस टक्क्यांहून अधिक व्यवसाय निर्यातीतून होत आहे.

लोहिया यांच्या उद्योगातलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे मनुष्यबळाचा अभाव! कोणताही अभियंता एखाद्या विशिष्ट अभियांत्रिकी शाखेत कितीही हुशार असला तरी तेवढं येथे पुरेसं नाही. अभियांत्रिकीच्या अनेकविध शाखांमधलं ज्ञान असणं आवश्यक आहे. असे ‘हरहुन्नरी’ अभियंते या उद्योगात 'घडतात'. लोहिया यांच्या कार्यपद्धतीनुसार अथवा प्रशिक्षण पद्धतीनुसार नव्या अभियंत्याला तृतीय श्रेणी कर्मचा-यांची कामंही करावी लागतात. त्यामुळे फार ‘अहं’ असलेला नवोदित अभियंता येथे फारसा टिकत नाही. मात्र जो टिकतो तो एक परिपूर्ण अभियंताच नव्हे तर परिपूर्ण ‘माणूस’ म्हणूनही घडतो! हे ‘व्हॅल्यू एँडिशन’ कितीही शुल्क देऊन कुठल्याही अभ्यासक्रमातून मिळत नाही.

लोहिया यांच्या मते, स्वातंत्र्य हे महत्त्वपूर्ण मूल्य आहे. स्वातंत्र्य आणि कार्यक्षमता यांचा अजोड परस्परसंबंध आहे. त्यामुळे ‘कॉम्पॅक्स’मध्ये प्रत्येकजण आपापली जबाबदारी मनापासून पार पाडतो. कंपनीशी त्याची ‘एँटॅचमेंट’च  होऊन जाते; हे लोहिया यांचं कौशल्य आहे. कंपनीतले सत्तर अधिकारी, कर्मचारी, कंपनीचे ‘व्हेंडर्स’ आणि त्यांचे कुटुंबीय असं पाचशे ‘कुटुंबीयांचं’ विश्व ‘कॉम्पॅक्स’नं उभं केलं आहे.

लोहिया आपल्या व्यवसायातून स्वयंपूर्ण तंत्रज्ञानाचा विकास, आयातीची गरज कमी करून निर्यातीद्वारे देशाच्या परकीय चलनात वाढ करणं; संशोधन, मनुष्यबळ विकासाद्वारे तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात देशाची मान जगात उंचावणं आणि पूरक उद्योजक (व्हेंडर्स) उभे करणं असं महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्याचबरोबर, महेश इंडस्ट्रियल ग्रूपसारखी उद्योजकांना मार्गदर्शन आणि सहकार्य करणारी संस्था, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी ही शैक्षणिक संस्था, महेश सहकारी बँकेसारखी आर्थिक संस्था यामध्येही ते उत्साहाने सक्रिय असतात.

विनयशीलता, मितभाषीपणा, प्रसिद्धीपराङमुखता आणि नम्रता हे दुर्मीळ गुण बजरंगदास लोहिया ह्यांच्याकडे आहेत.

- श्रीकांत टिळक

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.