गांधींना आगळीवेगळी आदरांजली
महात्मा गांधींचा स्मृतिदिन 30 जानेवारीला असतो. ठाण्याच्या सुरेंद्र चौधरी ह्या पुस्तकवेडया व्यावसायिकाला त्या दिवशी एक वेगळेच पुस्तक मिळाले. त्यांचा व्यवसाय बिल्डिंग सुपरवायझर व इंटिरियर डेकोरेटरचा, पण हा माणूस रमतो पुस्तकांत व नाटकांत. त्याला मिळालेल्या पुस्तकाचे शीर्षक आहे ‘द पेन इज माइटियर’ आणि उपशीर्षक, ‘ द स्टोरी ऑफ द वॉर इन कार्टून्स’. ते संपादित केले आहे जे. जे. लिंक्स यांनी. पुस्तकाच्या आरंभीच गोयाने काढलेले मार्क्सचे चित्र आहे. ते येथे प्रदर्शित केले आहे. हे पुस्तक त्यांना दादरच्या रद्दीवाल्याकडे मिळाले. पुस्तक युद्धोत्तर, 1946 साली प्रकाशित झाले.
परंतु चौधरींना पुस्तकाचा विशेष वाटला, तो म्हणजे एक -त्यात असलेले गांधीजींचे व्यंगचित्र आणि दोन - ह्या पुस्तकात डेव्हिड लो ह्या जगप्रसिद्ध व्यंगचित्रकाराचे एकही चित्र नसणे! गांधींचे व्यंगचित्र एका मेक्सिकन व्यंगचित्रकाराने रेखाटले आहे.
पुस्तकात दीडशे व्यंगचित्रे आहेत. त्यात कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानापासून दोस्त राष्ट्रांच्या युद्धातील विजयापर्यंत अनेक विषय येतात. एका व्यंगचित्रात दुस-या महायुद्धानंतरचा न्युरेम्बर्ग खटला दाखवला आहे. तेथे सर्व ठिकाणी आरोपी-न्यायाधीश-वकील वगैरे फक्त हिटलर दिसतो. शेवटचे चित्र आहे तोंडात चिरूट असलेल्या विजयी चर्चिलचे. त्याच्या डोक्यावर अनेक टोप्या आहेत, पण सर्वात वरची टोपी अर्थातच ब्रिटनच्या राणीची!
लिंक्स ह्यांनी हे पुस्तक संकलित करण्याचा उद्देश सांगताना प्रास्ताविकात म्हटले आहे, की सध्याच्या रणधुमाळीच्या काळात नीतिमत्ता व प्रामाणिकता टिकवण्याचा प्रयत्न व्यंगचित्रे करत असतात. ती नुसता उपहास करत नाहीत तर निसटून गेलेल्या काळावर आघात करतात व तो जपून ठेवतात. तो काळ हरवला जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या काळातील ही व्यंगचित्रे इथे एकत्र केली आहेत. ती पाहताना स्मितरेषा उमटेल हे खऱेच, परंतु त्या काळातील घटनांकडे गांभीर्याने बघण्याचा दृष्टिकोनही लाभेल. जीवनात अशा गांभीर्यांची नित्तांत आवश्यकता आहे.
महात्मा गांधींबद्दलच्या व्यंगचित्राचे ‘थिंक महाराष्ट्र’च्या दृष्टीने विशेष महत्त्व असे, की आपण सुरेश लोटलीकर यांची तत्संबंधीची तीन व्यंगचित्रे व त्यांची टिप्पणी ह्यापूर्वी प्रसृत केली आहे. त्यानिमित्ताने मराठी व्यंगचित्रांचा गेल्या शतकभराचा आढावा सादर केला आहे व त्यासोबत शि.द. फडणीसांच्या हास्यचित्रांचे आंतरराष्ट्रीय मह्त्त्व सांगणारा रंजन जोशी ह्यांचा लेखदेखील आहे.
चौधरी हे हुन्नरी कथालेखक आहेत. त्यांचे कुतूहल अपार आहे. ते कशाचा ना कशाचा सतत सोध घेत असतात. ते नाटके दिग्दर्शित करतात, नाटकात कामे करतात, मुलांसाठी शिबिरे घेतात. ‘वुई नीड यु’ ह्या संस्थेचे कार्यकर्ते
आहेत.
संपर्क – 022-25428478
Add new comment