गाथासप्तशती : शतकारंभातील महाराष्ट्राची लोकगाथा !


_gatha_saptashati‘गाथासप्तशती’ म्हणजेच ‘गाथासत्तसई’ हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ! तो इसवी सनाच्या पहिल्या शतकात निर्माण झाला. तो महत्त्वाचा प्रमाणग्रंथ आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीच्या सांस्कृतिक इतिहासाचा मागोवा घेता येतो. महाराष्ट्र संस्कृती, मराठी भाषेची जडणघडण, तिचा उगम व विकास, भाषेची प्राचीनता आणि मौलिकता या गोष्टी त्या काव्यग्रंथामधून सिद्ध होतात. ‘अभिजात मराठी भाषा समिती’ने मे 2013 साली तो अहवाल शासनाकडे सुपूर्द केला आहे. ती समिती महाराष्ट्र शासनानेच नियुक्त केली होती. तिनेही मराठी भाषेच्या अस्तित्वाचे लिखित पुरावे दर्शवण्यासाठी त्या ग्रंथाला प्रमाणभूत मानले आहे. ‘नाणेघाट’ (तालुका जुन्नर) येथे इसवी सनपूर्व दोनशेवीसमधील शिलालेख सापडला आहे. अशा मराठी भाषेच्या खुणा सातवाहन राजवटीपर्यंत सापडतात. 
सातवाहन राजवट इसवी सनपूर्व 250 ते इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत महाराष्ट्रात होती.

‘गाथासप्तशती’ हा ग्रंथ पहिल्या शतकात ‘हाल सातवाहन’ या राजाने सिद्ध केला. सातवाहन राजांनी त्यांचा राज्यविस्तार थेट उत्तरेपर्यंत नेला. त्यामुळे तो ग्रंथ भारतातील विविध ठिकाणी प्रसारित झाला. संस्कृत कवी बाणभट्ट, राजशेखर यांनी त्यांच्या काव्यग्रंथात ‘गाथासप्तशती’ ग्रंथाचा उल्लेख आणि गौरव केला आहे, तर पाश्चात्य जर्मन पंडित ‘वेबर’ यांनीही त्या ग्रंथाचा परिचय पाश्चात्य जगताला करून दिला आहे. अशी ती ‘लोकगाथा’ जागतिक परिमाण लाभलेली आहे.

‘गाथासप्तशती’चे स्वरूपही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘हाल सातवाहन’ या राजाने त्याच्या राज्यातील कवींना आवाहन करून त्यांच्याकडून काव्य मागवून ते संकलित केले. त्याला अनेक कवींनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यातील दर्जेदार काव्य निवडून, त्यातील सातशे गाथा त्या संग्रहात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ‘हाल सातवाहन’ स्वतः कवी होता. त्याची ती कृती महाराष्ट्री भाषेच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची पायाभरणी करणारी ठरली. त्याने द्विपदी स्वरूपातील ‘गेय’ अशा सातशे गाथा संपादित करून तत्कालीन महाराष्ट्राचे समाजजीवन, कृषिजीवन, ग्रामीण जीवन आणि मानवी मनातील भावभावनांचा आविष्कार असणारे आद्यकाव्य संकलित केले असे म्हणता येते. त्याने मुद्रणकला अस्तित्वात नसताना केलेले हस्तलिखित स्वरूपातील ते प्रकाशन हा प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ ठरतो! तसाच, तो पहिलाच संपादित ग्रंथ असल्याने ‘हाल’ राजास महाराष्ट्रातील पहिला संपादक असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. ते काव्य गोदावरीच्या तीरावर घडले. त्यामुळे ‘गोदावरी’ नदीला संस्कृतिवाहिनीचेही महात्म्य लाभते. 

प्रतिष्ठान हे सातवाहनांचे राजधानीचे नगर होते. म्हणजेच आजचे ‘पैठण’. ‘हाल राजा’ने प्राकृत भाषेला त्या नगरीत राजमान्यता दिली. ती भाषा म्हणजेच आजची मराठी भाषा. त्याने त्या भाषेतील माधुर्य, गेयता, काव्यानुकूलता जोखली आणि अवीट गोडीचे अमृतमधुर असे काव्य आस्वादकांच्या ओंजळीत टाकले. त्याने संस्कृत भाषेतील आर्षकाव्याची थोरवी आणि त्यातील शृंगार यांचा गोडवा गाणाऱ्या तत्कालीन वाचकांच्या अभिरुचीला नवे वळण दिले. त्यानंतर तो इतिहास पुनरावृत्त तेराव्या शतकात झाला. संत ज्ञानदेवांनी ‘इये मराठीचिये नगरी’ असे म्हणत ‘अमृतातेही पैजा’ जिंकणाऱ्या या भाषेची थोरवी त्याच भूमीत गायली. तोपर्यंत मराठी भाषा समृद्ध झालेली होती. ‘ज्ञानेश्वरी’सारखे अभिजात ग्रंथ निर्माण होण्याची पार्श्वभूमी म्हणून ‘गाथासप्तशती’ या अभिजात काव्याचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो.

‘गाथासप्तशती’ या काव्यात ग्रामीण जीवनाचे चित्रण आले असले तरी ते वर्णन ग्राम्यता टाळून केले गेले. अभिजातता आणि सौंदर्य यांचे सुरम्य साहचर्य त्या काव्यात  दिसते. त्यातील ‘शृंगार’ आणि ‘कामजीवन’ यांचे चित्रणही सूचकतेने, संयतपणे, कलात्मक वृत्तीने अभिव्यक्त झाले. त्यात अश्लीलता, बीभत्सता आढळत नाही. निसर्गातील विविध प्रतिमा-प्रतीकांचा वापर आणि विशेष म्हणजे तो शृंगार दैनंदिन व्यवहारातील अनेक घटना- प्रसंगाच्या माध्यमातून आविष्कृत झाला. त्यातील प्रणयप्रसंग उत्कट आणि कल्पनारम्य आहेत. गाथेत स्त्रियांचे चित्रण नवयौवना, नवविवाहिता, गृहिणी, प्रौढा, कुमारिका अशा विविध वयोगटांतील आले आहे. मानवी मनातील प्रेमभावना आहे. त्यातील अलवारता, तरलता, उत्कटता, विरह या संवेदना हृदयस्पर्शी व मनोहारी आहेत. हे रसरशीत सौंदर्य कोणाही आस्वादकाला प्रभावित करेल असेच आहे. उदाहरणार्थ, एक प्रेयसी आणि तिचा प्रियकर यांच्यातील हा प्रसंग पाहा - ‘गोला –विसमोआर –च्छलेण अप्पा उरम्मी से मुक्को | अणुअंपा -णिद्दोसं तेण वि सा गाढमुवउढा |’ (म्हणजेच गोदावरीचे उतार उंचसखल आहेत, असा बहाणा करून तिने तिचे अंग त्याच्या छातीवर लोटून दिले आणि त्यानेही तिला दयेच्या उजळपणाने सावरून धरण्याच्या मिषाने कडकडून मिठी मारली.) तर एक सखी  नवविवाहितेला म्हणते, ‘तुझ्या उरोजावर कुसुंब्याचे फूल, की गं लागले आहे’ ! सखीने तसे म्हणताच, ‘ती भाबडी नववधू तेथील नखशिते झटकू लागली; ते पाहून त्या हसू लागल्या.’ अशी कितीतरी शृंगारिक वर्णने त्या काव्यात येतात. विशेष म्हणजे, काव्यातील नायिका नागर नाहीत; त्या ग्रामीण आहेत, शेतीभातीशी सबंधित आहेत. त्यांचा प्रणय रानाशिवारात, निसर्गाच्या कुशीत फुलतो-बहरतो. त्यांचे शेत-शिवारातील मिलन कितीतरी जागांवर झाले होते. तेथे महानोरांच्या ‘आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबेला, घन होऊन बिलगला’ या ओळींची आठवण येते. साळीचे शेत कापणीला आल्यावर त्या काव्यातील प्रेमिकेला दु:ख होते. परंतु तिला तिच्या मैत्रिणीकडून तागाचे शेत आता भरात आहे, _gathasaptashtahi_pustakeफुललेले आहे. काळजी कसली करतेस? हा आश्वासक आधारही मिळतो. एकूणच, सौंदर्यवादी काव्याचे गुणधर्म आणि त्या विशेषांचा आढळ त्या काव्यात जाणवतो. या अर्थाने त्या काव्यास ‘रोमॅण्टिक’ काव्य असे निःसंशय म्हणता येईल. सौंदर्यवादी साहित्याची बीजे प्राचीन भारतीय साहित्यातही दिसतात ती अशी! ईश्वराच्या अवताराचे गुणगान हा साहित्याचा विषय त्या काळात होता. तेथे हे साहित्य अत्यंत स्थितिशीलही होते. त्या पृष्ठस्तरावर सर्वसामान्य माणूस आणि त्याच्या भावभावना हा काव्याचा विषय बनला, हे त्या काव्याचे विशेषत्व होय. तो अपवाद वगळला तर पुढे आधुनिक काळापर्यंत साहित्याच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य माणूस आला नाही.

प्रस्तुत काव्यात विमुक्त स्त्रीचे दर्शन घडते हाही त्याचा विशेष होय. गाथांमध्ये स्त्रीसाठी ‘महिला’ हा शब्द वापरला गेला आहे. किमान सवत म्हणून आपल्या गुणांची पारख व्हावी म्हणून तरी इतर स्त्रीचा सहवास आपल्या पतीला लाभावा असे म्हणणारी विवाहिता तेथे दिसते, तशीच गोदावरी दुथडी भरून वाहत असताना स्त्री मनातील भीरुता सोडून, स्वतःचा जीव धोक्यात घालून काळोख्या रात्री प्रियकराला भेटण्यास जाणारी प्रियतमाही भेटते. गाथेतील त्या प्रसंगाचा सुरेख मराठी भावानुवाद असा -

‘त्याचे गुणवंत सौभाग्य आणि माझा दुर्मीळ धीटपणा स्त्रीजातीमधला, ठाऊक आहे फक्त गोदावरीच्या पुराला आणि पावसाळ्यातल्या त्या अर्ध्या रात्रीला’

पाण्याच्या या अथांग प्रवाहांप्रमाणेच सृजनाचा हा अवखळ  प्रवाह थोपवता न येणारा होता. प्रेमाची ती उत्कटता, अनिवारता आणि त्या स्त्रीचे साहस उल्लेखनीय नाही का? 

काव्यात विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासून ते गोदावरीच्या उत्तरेपर्यंतचा भौगोलिक परिसर चित्रित झाला आहे. गाथेला मराठवाडा, विदर्भ, गोदावरीचे दोन्ही तीर या परिसरातील परंपरा, भाषा, रीतिरिवाज, ग्रामीण संस्कृती असा, मराठी मातीचा अस्सल गंध आहे. त्यातील कितीतरी शब्द गोदावरीच्या तीरावर बोलीभाषेत प्रचलित आहेत. तेथे ‘महुमास’ हा शब्द चैत्रमासासाठी उपयोजला गेला तोच शब्द ‘मधुमास’ म्हणून वर्तमान काव्यातून झंकारत आहे. शेती व्यवसाय, ग्रामीण भागातील संथ आणि शांत जीवन, गावगाड्यातील ग्रामणी (गावाचा प्रमुख), त्याचे वर्चस्व, तत्कालीन ग्रामव्यवस्था तेथे दिसते. राजकीय संघर्ष अथवा अराजक याबाबतचे चित्रण त्यात आले नाही. समृद्ध ग्रामजीवन त्यात चित्रित झाले. साळी, तूर, कापूस, ऊस, ताग, हळद इत्यादी पिकांचे तर बोर, आंबे, जांभूळ, काकडी या फळांचे उल्लेख तेथे येतात. झाडे, पशू, पक्षी; तसेच गोदावरी, तापी, नर्मदा, मुळा, गिरणा इत्यादी नद्यांचे उल्लेख येतात. एकूणच, गाथा माणूस आणि त्याच्या सभोवतालचे पर्यावरण कवेत घेत सिद्ध झाली आहे. मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्र यांची दोन सहस्त्रकांतील वाटचाल कशी झाली? त्या दृष्टीने ‘गाथासप्तशती’ हा काव्यकोश म्हणजे महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित आहे.

- अशोक लिंबेकर 9326891567
ashlimbekar99@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.