श्रीक्षेत्र गाणगापूर (Ganagapur)

Think Maharashtra 20/09/2019

-gangapurश्रीक्षेत्र गाणगापूर हे तीर्थस्थान गुलबर्ग्यापासून पश्चिमेला चाळीस किलोमीटरवर आहे. ते क्षेत्र भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर आहे. तेथे यात्रेकरूंची स्नान करण्याकरता गर्दी होते. त्याचा उल्लेख गुरूचरित्रात गाणगाभवन, गंधर्वभवन, गंधर्वपूर असा येतो. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांची चोवीस वर्षांची तपश्चर्या तेथेच झाली. प्रथम ते संगमावरच (भीमा- अमरजा) राहत असत, नंतर गावातील मठात राहू लागले. मठात त्यांच्या पादुका आहेत. त्यांना 'निर्गुण पादुका' म्हणतात. मठ किंवा निर्गुण पादुकामंदिर गावाच्या मध्यभागी आहे. मठाच्या पूर्वेला व पश्चिमेला दोन महाद्वारे आहेत. पश्चिम महाद्वार प्रशस्त असून त्यावर नगारखाना आहे. मठात सात ओवऱ्या असून, त्यात सेवेकरी लोक अनुष्ठान करत बसतात. मठातील पादुकांच्या गाभाऱ्याला द्वार नाही. भक्तांना पादुकांचे दर्शन चांदीने मढवलेल्या एका लहान झरोक्यातून घ्यावे लागते. 

हे ही लेख वाचा - 
नरसिंहपूरचे ज्वाला नृसिंह मंदिर
रवळनाथ - लोकदेव व क्षेत्रपाळ

तेथील नित्योपासना पहाटेपासून सुरु होते. पादुका सुट्या व चल असून, त्या चांदीच्या दोन संपुटात ठेवल्या आहेत. त्या संपुटांतून बाहेर काढल्या जात नाहीत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झाकणे काढून पादुकांना अष्टगंध आणि केशर यांचा लेप देतात. बाकी सर्व पूजोपचार ताम्हनात सोडतात. पादुकांना जलाचा अभिषेक करत नाहीत. पालखी प्रत्येक गुरुवारी रात्री निघते. गावापासून सोळा किलोमीटर अंतरावर भीमा-अमरजा संगम आहे. त्या संगमाजवळ भस्माचा डोंगर आहे. तो कोण्या प्राचीन काळची यज्ञभूमी असावी. अनेक यज्ञांतील राख एकत्र टाकली गेल्यामुळे तो डोंगर निर्माण झाला असावा. भाविक लोक तेथील भस्म घरी घेऊन जातात व स्नान केल्यावर अंगाला लावतात. संगमेश्वराच्या देवलयापुढे श्रीनृसिंह सरस्वतीची तपोभूमी आहे.

गाणगापूराच्या उत्सव समारंभात दत्तजयंती (मार्गशीष पौर्णिमा) आणि श्री नृसिंह सरस्वतीची पुण्यतिथी (माघ कृष्ण प्रतिपदा) हे दोन उत्सव विशेष महत्त्वाचे आहेत. गुरुप्रतिपदेला विशेष पूजा असते. त्या दिवशी भक्तांची खूप गर्दी होते. 

-gangapur-mandirतेथे येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूने दत्तव्रत म्हणून पाच घरी तरी माधुकरी मागितलीच पाहिजे, असा संकेत आहे. तो भाविक पाळण्याचा प्रयत्न करतात. मठात मध्यान्हकाली महानैवेद्य झाल्यानंतर तेथील सर्व जण माधुकरीसाठी बाहेर पडतात.

-संकलन

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.