भाद्रपद महिन्यातील व्रते


-bhadrapad-vrateभाद्रपद महिन्यात येणारी 'धार्मिक व्रते' हा श्रावण महिन्याच्या जोडीने समाजमनाच्या आस्थेचा विषय बनतो. ती क्रमाने एकापाठोपाठ येणारी स्वतंत्र व्रते आहेत. परंतु, ती पाठोपाठ येत असल्याने त्यांचा एकमेकांशी कार्यकारणभाव संबंध जोडला जाणे स्वाभाविक आहे. 

हरितालिका तृतीया -  भाद्रपद शुक्ल तृतीयेला 'हरितालिका व्रत' करतात. त्या व्रतात स्त्रियांनी शिव आणि भवानी अर्थात पार्वती यांचे पूजन करावे. त्या व्रताचे वर्णन निर्णयसिंधु, व्रतार्क यांसारख्या ग्रंथात आढळते. पार्वतीला तिच्या सख्यांनी त्या व्रतासाठी घरातून नेले म्हणून त्या व्रताला 'हरितालिका’ असे म्हटले जाते. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली, म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हटले जाते. ती कथा भविष्यपुराणातील हरगौरी संवादात आलेली आहे. ती(व्रतराज) पूजा शिव होवुनी शिवाला भजावे या भावनेतून करावी. ते व्रत कुमारिकांनी करणे विहित आहे. शिवपार्वती हे जगाचे माता-पिता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मीलनातून विश्वाची निर्मिती झाली, म्हणून त्या तत्त्वाचे पूजन भारतीय लोक या व्रतात करतात.

गणेश पार्थिव पूजाव्रत - ते गाणपत्य संप्रदायाचे महत्त्वाचे व्रत मानले जाते. व्रताचे प्रकार दोन आहेत-

1. ते व्रत श्रावण शुक्ल चतुर्थीपासून भाद्रपद चतुर्थीपर्यंत महिनाभर करावे. श्रावण शुक्ल चतुर्थीला सकाळी स्नानादी कृत्ये झाल्यावर चांगली चिकणमाती घेऊन गणेशाची मूर्ती तयार करावी. ती सर्व अवयवांनी युक्त, चार भुजांनी सुशोभित, परशू इत्यादी आयुधांनी युक्त, रमणीय अशी असावी. तिची यथाविधी पूजा करावी. साधकाने त्याच्या इच्छेनुसार जप करावा. ऋषिपंचमीला गणेशयाग करावा. मूर्ती विसर्जन षष्ठीला वाजत-गाजत मिरवणुकीने करावे.

2. श्रावण शुक्ल चतुर्थीस सकाळी नदी वा तळे यावर स्नान करून, शुभ्र वस्त्र नेसून घरी यावे. गणपतीची मूर्ती करून सोळा उपचारांनी तिचे पूजन करावे. स्वत: एकभुक्त राहवे किंवा उपवास करावा. आर्थिक दृष्ट्या शक्य असल्यास गायन, वादन इत्यादी महोत्सव करावा.  ब्राह्मणभोजन करावे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला यथाविधी विसर्जन करावे.

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला 'महासिद्धीविनायकी चतुर्थी' असे म्हणतात. तिला 'वरदचतुर्थी' किंवा 'शिवा' असेही म्हणतात. गणपतीच्या मातीच्या रंगीत किंवा सोन्यारूप्याच्या मूर्तीची पूजा करावी. पूजा सोळा उपचारांनी सिध्द असावी. एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा. धूपारती सायंकाळी करावी. घरोघरी त्या त्या घराच्या प्रथेप्रमाणे दीड, पाच, सात, नऊ व दहा दिवसापर्यंत यांप्रमाणे गणपती ठेवावा.

ऋषीपंचमी -  व्रत भाद्रपद शुक्ल पंचमीला करावे. त्या दिवशी ऋषींचे पूजन करावे आणि न नांगरलेल्या जमिनीत उत्पन्न झालेल्या भाज्या त्या दिवशी खाव्या असे ते व्रत आहे. हेमाद्री या धर्मशास्त्रकाराने त्या व्रताचे वर्णन केले आहे. त्या व्रतात कश्यप, अत्री, भरद्वाज इत्यादी ऋषी आणि अरुंधती यांची पूजा करतात. भविष्योत्तर पुराणात त्यासंबंधी आलेली आख्यायिका अशी - वृत्राचा वध केल्याने इंद्राला ब्रह्महत्येचे जे पातक लागले ते त्याने अग्नी, नद्या, पर्वत आणि रजस्वला स्त्रिया यांच्या ठिकाणी विभागून दिले. त्यामुळे मासिक धर्माच्या काळात स्त्रियांच्या हातून झालेल्या संपर्काचे प्रायश्चित्त घेण्यासाठी स्त्रियांनी ते व्रत करावे असे त्याबद्दल सांगितले आहे. (अर्थात ती आख्यायिका आहे.) 

ज्येष्ठागौरी - गौरी ही शिव परिवारातील एक देवता आहे. तिच्याविषयी आख्यायिका अशी आहे, की सर्व स्त्रिया असुरांच्या त्रासाला कंटाळून महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी देवीला प्रार्थना केली. त्यानुसार गौरीने असुरांचा संहार केला. महिलांनी त्यांना सुख महालक्ष्मीच्या आशीर्वादाने लाभले म्हणून तिचे पूजन सुरू केले. देवीचे ते व्रत भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठा नक्षत्र प्रधान असेल तेव्हा करावे. ते व्रत अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन असे आहे.

त्यासाठी काही कुटुंबांत पाच, सात, नऊ खडे पाणवठा किंवा नदी येथून आणले जातात आणि त्यांचे पूजन केले जाते. काही ठिकाणी धातूचे मुखवटे धान्याच्या कोथळीत उभे केले जातात. देवीना साडी नेसवून सजवले जाते. कोकणात व आदिवासी समाजात तेरड्याच्या रोपाला गौरी मानून त्यांचे पूजन केले जाते.

हे ही लेख वाचा - 
सूचनाफलकातून जागा झाला समाजभाव!
दसरा - विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक (Dasara)

ग्रामीण भागात मातीची पाच नवीन लहान मडकी आणतात. त्यात हळदीने रंगवलेला दोरा, खोब-याच्या पाच वाट्या आणि खारका घालून त्यांची उतरंड रचतात. त्याच्यावर देवीचा मुखवटा बसवून तिची पूजा करतात. महिला प्रसादाचे ते दोरे पूजनानंतर गळ्यात घालतात. ते दोरे कालांतराने गळ्यातून काढून शेतात पुरतात.

दक्षिण भारतात भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो. प्रत्येक गावात गौरीची पीठाची  प्रतिमा तयार केली जाते. तिची पूजा मखरात बसवून होते. गौरी म्हणजे कुमारिका पृथ्वी असेही मानले जाते. त्यामुळे पृथ्वीच्या सुफलनाशी त्या व्रताचा संबंध आहे अशी मांडणी ही काही अभ्यासक करतात.

अनंत चतुर्दशी – ते विष्णूशी संबंधित व्रत आहे. ते व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशी या दिवशी करतात. त्यामध्ये अनंतरूपात विष्णुपूजन केले जाते आणि पवित्र कंकण हातात बांधले जाते. कंकण कापसाचे अथवा रेशमाचे केले जाते आणि त्याला चौदा गाठी मारलेल्या असतात. अग्निपुराण या ग्रंथात अनंताच्या दर्भाच्या प्रतिमेची पूजा करण्यास सांगितले आहे.

ती शाक्त, गाणपत्य आणि वैष्णव यांची व्रते. त्यांचा मूळ अर्थ समजून घ्यावा आणि त्यानुसार त्यांचे आचरण करावे. त्या व्रतांमुळे मानवी शरीराला विकलता यावी पण शरीर मन आणि बुद्धी सतेज होऊन त्याला सत्कार्याची प्रेरणाही मिळावी ही शुभेच्छा असते!

- आर्या जोशी jaaryaa@gmail.com 
9422059795

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.