कणकवलीचे भालचंद्र महाराज


-bhalchandra-maharajभालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर आणि आनंदीबाई या मातापित्यांच्या पोटी 8 जानेवारी 1904 रोजी झाला. त्यांचे आई-वडील लहानपणीच वारले. त्यांचे शिक्षण चुलते व मुंबईतील मावशी यांच्याकडे झाले. ते वसई हायस्कूलमध्ये शिकले, पण त्यांनी शिक्षण मध्येच सोडले. त्यांनी वर्षभर कोकणात भटकून, देशावर पलायन केले. त्यांचे चुलते कोल्हापूर जिल्ह्यात नितवडे गावी होते, ते तेथे हजर झाले. भालचंद्राची ती अवस्था पाहून सर्वजण चकित झाले. त्यांना वाईट वाटले. त्यांनी त्याला आंघोळ घालून, नवीन कपडे दिले. ते तेथूनही पसार झाले. ते रोज वीस-वीस मैल पायपीट करत, कोणाच्याही घरी उभे राहत, कोणी भाकरतुकडा दिला तर खात, झाडाखाली अगर मंदिरात झोपत.

भालचंद्र यांची शरीरयष्टी पार बदलून गेली. त्यांची वृत्ती ‘सकल स्वजन सजावे | दुःखामुळे ते तेणे रघु भजनी लागावे |’ अशा, रामदासांच्या तत्त्वानुसार खंबीर बनली. त्यांचे आतून नामस्मरण चालू होते. त्यांची वाटचाल त्या दिशेने होती. ते नागडे महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. ते नग्न अवस्थेत फिरत असत, परंतु ते वारकरी समाजाचे दिव्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांना कशाचीही तमा नसे. ते थंडी-वारा असताना फिरत. त्यांना मुले दगड मारत, वेडा समजत. साधू साधूला ओळखतो असे म्हणतात. एका महान साधूने त्यांना कोल्हापूरवरून सावंतवाडीला साटम महाराजांकडे जा म्हणून सांगितले. म्हणून ते तसेच पायपीट करत सावंतवाडीला आले. त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील दापोली येथे साटम महाराजांच्याकडे येऊन सेवा चालू केली. बर्या च दिवसांनी साटम महाराज म्हणाले, ‘हे भालचंद्रा, तू कणकवलीला जा.’

हे ही लेख वाचा - 
पावसचे स्वामी स्वरूपानंद
देवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास
श्रीक्षेत्र वरदपूर

त्याप्रमाणे ते 1926 साली कणकवलीला आले. पण ते विचारमग्न आणि जप करण्यात गुंग असत. ते कणकवलीच्या जुन्या मोटर स्टँडवर झाडाखाली बसलेले राहत, कोणाशी बोलत नसत. त्यांना खाण्याची-पिण्याची शुद्ध नसे. ते कोणी काही दिले आणि मनात असेल तर खात; नाही तर, कुत्र्यांना घालत. लोक त्यांना वेडा म्हणत. त्यांना मलमूत्राची क्षीती नसे. एके दिवशी, कोणीतरी त्यांना शेणाच्या गायरीत ढकलले. तेव्हा वासुदेव नावाच्या व्यक्तीने त्यांना बाहेर काढले. आंघोळ घातली. पोरांना हाकलून लावले. त्यांना चहापाणी पाजले. तेव्हा बुवा नावाचे सत्पुरुष आले आणि त्यांनी भालचंद्र यांना काशीविश्वेश्वराच्या मंदिराजवळ कामत यांच्या समाधीजवळ पडवी काढून दिली. मंदिर साफ करणारी आवडी व शेवंता या बायांकडून त्यांची सेवा चालू झाली. भालचंद्र यांची वागणूक निरासक्त आणि देहातीत होती. त्यांच्या तपश्चर्येत खंड पडला नाही. त्यांनी लोकांच्या छळाला दाद दिली नाही. कोणी भाकर दिली तर खात; नाही तर, फेकून देत. ते जपात मग्न असत. त्यांनी त्यांच्या वागणुकीमधून अविचाराने, अरेरावीने अंध झालेल्या समाजाच्या डोळ्यांत अंजन घातले.
साटम महाराजांना कणकवलीत भूक-तहान, सुख-दु:ख यांची तमा न बाळगता भगवंतांशी लय लावून बसलेल्या योग्याची विटंबना, त्यांच्या भक्ताची उपेक्षा चाललेली आहे हे कळले. साटम कणकवलीला आले आणि त्यांनी लोकांना ईश्वराशी एकरूप झालेले बाबा पुण्यशाली मुक्तात्मा आहेत. त्यांनी तीन तपे कठोर साधना केलेली आहे असे सांगितले. साटम महाराज आल्यामुळे लोक खडबडून जागे झाले. लोकांना ‘भालचंद्र महाराजांवर कृपेची धार आहे’ हे जाणवले. मग लोकांना बरेच ‘अनुभव’ आले. ते दत्त अवतार कणकवलीला वाटू लागले! कणकवलीत एक सर्कस आली. त्या मालकाने त्यांना गाडीत घालून नेले व सर्कशीत बसवले, तर त्या दिवशी त्याला म्हणे, खूप फायदा झाला! त्या सर्कशीतील धर्मराज नावाची व्यक्ती बाबांची शिष्य बनली. त्यांच्या नावाचे देऊळ व आश्रम बांधले गेले. त्यासाठी धर्मराज, फलाहारी बाबा, राज महंमद हुसेन असे शिष्य पुढे आले.

-bhalchandra-maharaj-kankavliबाबांचे भक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आहेत. सर्व जाती-धर्मांचे-पंथांचे लोक मंदिरात येतात. त्यामुळे लोकांनी परमहंस भालचंद्र महाराज संस्थान काढले. लोकांनी जमलेल्या देणग्यांतून आणि त्यात भर घालून सामाजिक, शैक्षणिक आणि भजनमंडळी असे कार्य चालू केले. त्यात वैद्यकीय, शैक्षणिक बाबींवर भर आहे.

भालचंद्र महाराजांचे अस्सल स्वरूप कळल्यावर काही मंडळी त्यांना कणकवलीहून घेऊन मुंबईला आणत. आम्ही त्यांचे दर्शन बॉम्बे पोर्ट ट्रस्टला घेतले होते. मुंबईला लालबाग येथे हनुमान मंदिरात हरिनामाचा अखंड जप 16 सप्टेंबर 1977 रोजी चालू असताना त्यांचे देहावसान झाले.

- रजनी वैद्य 8291324122

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.