विठ्ठलराव विखे पाटील - सहकाराचे प्रणेते (Vitthalrao Vikhe Patil)


-vikhe-patil-विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन 2014 पासून ‘शेतकरी दिन’ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. विठ्ठलराव विखे पाटील हे कृषी-औद्योगिक व सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. त्यांचे पूर्ण नाव विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील, त्यांचा जन्म  29 ऑगस्ट 1901 रोजी, नारळी पौर्णिमेच्या दिवशी झाला. त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस हा मराठी तिथीप्रमाणे 'नारळी पौर्णिमा' या दिवशी राज्यात '‘शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तो तसा 2014 पासून मानला जातो.

विठ्ठलरावांना थोरला भाऊ शंकरराव व पाच बहिणी होत्या. त्यांचे शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत झाले होते. त्यांना ‘लहानू’ या टोपणनावाने लहानपणी ओळखले जाई. त्यांनी 23 जानेवारी 1923 रोजी लोणी ब्रुद्रुक सहकारी पतपेढी संस्थे’ची नोंदणी केली तेव्हा त्यांना ‘सुसायटीवारा अण्णा’ म्हणत. त्यांचा सामायिक लग्नकार्यातही पुढाकार असे. त्यामुळे ते ‘समायीक लग्नवाला अण्णा’ या टोपणनावानेदेखील ओळखले जात. त्यांचे वडील एकनाथराव शिकलेले नव्हते. परंतु, त्यांनी घरामध्ये भागवत पोथी पुराण वाचण्यासाठी एका ब्राह्मणाची नियुक्ती केली होती. त्यामुळे भागवतधर्माचे संस्कार विठ्ठलरावांच्या मनावर लहानपणी झाले. विठ्ठलरावांनी त्यांचे पुढील आयुष्य समाजहितासाठी वाहून घेतले. त्यांना शेतकऱ्यांच्या उन्नतीचा ध्यास लागला. त्यांनी स्वतः यंत्र आणून ‘खांडसरी’ उत्पादन 1943-44 साली सुरू केले. 

त्यांनी ‘दि बागायतदार को-ऑपरेटिव्ह शुगर प्रोड्युसर्स सोसायटी लिमिटेड, लोणी’ या संस्थेची नोंदणी 1948 मध्ये ‘1925 च्या सहकार कायद्या’खाली केली. त्यानंतर त्यांनी लोणी येथे ‘भुताचा माळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर देशातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्याची स्थापना केली. त्यांनी 23 डिसेंबर 1950 ला साखर कारखाना सुरू करून पहिल्याच हंगामात तेहतीस हजार पंचावन्न टन ऊस गाळप करून सदतीस हजार पाचशेएक पोती साखर उत्पन्न (उत्पादन) गोळा केले. त्या कारखान्याचे नामकरण ‘दि प्रवरा सहकारी साखर कारखाना लि.’ असे 1 जून 1952 रोजी झाले. त्याचे उद्घाटन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 15 मे 1961 रोजी झाले. म्हणजे कारखाना सुरू झाल्यावर नऊ वर्षांनी. 

विठ्ठलरावांनी कारखाना उभारणीसाठी गावोगाव फिरून भागभांडवल गोळा केले, ‘इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन’कडून वीस लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतले. त्यांनी झेकोस्लोव्हाकियामधील ‘स्कोज’ कंपनीची नवी फॅक्टरी बावीस लाख साठ हजार रुपयांना विकत घेतली. फॅक्टरी रेल्वेने बेलापूरला 6 एप्रिल 1950 ला पोचली. उभारणीचे काम अल्पावधीत पूर्ण झाले व साखर कारखाना सुरू झाला! त्यांनी मुंगीने डोंगर उठवावा तसे वाटणारे कारखाना उभारण्याचे काम अल्पावधीत केले. वैकुंठभाई मेहता व धनंजयराव गाडगीळ यांचे सहकार्य त्यांना उत्तम लाभले. धनंजयराव गाडगीळ हे 1949 ते 1960 असे अकरा वर्षें कारखान्याचे अध्यक्ष होते, तर विठ्ठलरावांनी 1960 ते 1964 दरम्यान कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले.

-vikhe-patil-karkhanaविठ्ठलरावांनी ‘महात्मा गांधी विद्यालया’ची स्थापना 1950 मध्ये केली. मुलींच्या शिक्षणासाठी ‘प्रवरा कन्या विद्या मंदिरा’ची स्थापना 1959 मध्ये केली; त्यांनी ‘प्रवरा एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना 1964 मध्ये करून ‘प्रवरा पब्लिक स्कूल’ ही इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी शाळा सुरू केली. त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शासनाच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमात 1976 मध्ये पुढाकार घेत लोकांना कुटुंब नियोजनासाठी प्रवृत्त करत, विठ्ठलरावांनी चार दिवसांत सहा हजार दोनशेएकतीस कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून एक विक्रम प्रस्थापित केला. त्यांचा अमृतमहोत्सवी सत्कार पंतप्रधान इंदिरा गांधी व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते 23 फेब्रुवारी 1977 रोजी औरंगाबाद येथे झाला.

हे ही लेख वाचा -
मिस्टर बिडी – किसनलाल सारडा

सुधीर रत्नपारखी - एक रिक्षा ते वीस बसेसचा ताफा!
 

त्यांना भारत सरकारने त्यांच्या कृषी औद्योगिक क्षेत्रातील अलौकिक कार्याची दखल घेत ‘पद्मश्री’ पुरस्कार 26 जानेवारी 1960 रोजी जाहीर केला. तसेच, पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी लीट’ ही मानाची पदवी  22 नोव्हेंबर 1978 रोजी पुण्यात बहाल केली. त्यांना ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी’ने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी 4 ऑक्टोबर 1979 रोजी प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. ते 27 एप्रिल 1980 रोजी अनंतात विलीन झाले. त्यांचे कार्य शेतकरीशेतीविषयी असणाऱ्या प्रत्येकास स्फूर्ती देणारे असे होते.

- विनयकुमार आवटे 9404963870
avinaykumar.30@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.