देवर्षी नारद : आद्य पत्रकार


headingदेवर्षी नारद यांना आद्य पत्रकार म्हणतात, कारण त्यांचा संचार त्रिभुवनात असे आणि त्यांचे लक्ष तिन्ही लोकांमध्ये कोठे काय घडत आहे यावर बारकाईने असे. जे हानिकारक, दुष्ट शक्तींना बळ देणारे आहे त्याच्या निर्दालनाचे कार्य करण्याचे सामर्थ्य कोणाकडे आहे हे लक्षात घेऊन त्यांच्याकडील माहिती सज्जन शक्तींचे प्रतीक असलेल्या देवांपर्यंत पोचवण्याची तत्परता हेही नारदमुनी यांचे वैशिष्ट्य. पत्रकाराकडून तेच अपेक्षित असते ना! नारद यांनी त्रैलोक्याच्या भल्यासाठी जागल्याच्या भूमिकेतून सदैव केलेले कार्य पाहता त्यांना आद्य पत्रकार म्हणणे सार्थ ठरते.

नारद यांच्याकडे शोधवृत्ती, जिज्ञासू वृत्ती, चिकित्सक दृष्टी, निर्भीडपणा, स्थिरचित्त, तत्परता, कार्यनिष्ठा आदी गुणांचा समुच्चय होता. पत्रकारिता करण्यासाठी याच गुणांची आवश्यकता असते. त्यासोबत विश्वासार्हता महत्त्वाची.

देवर्षी नारद यांचा उल्लेख ‘संचारी संवादक’ असा भारतीय साहित्यात करण्यात आला आहे. नारद यांच्याकडून माहितीची जी देवाणघेवाण चालत असे त्यामागील त्यांचा हेतू समाजाचे मंगल व्हावे हा असे. देवर्षी नारद यांच्या त्या भूमिकेमागे सज्जनांचा सत्कार, अनाथांचा कैवार आणि दांभिक, दुष्ट शक्तींचा धिक्कार असे सूत्र दिसून येते. नारदमुनी यांना, सर्वत्र मुक्त प्रवेश होता, कारण त्यांच्या शुद्ध हेतूबद्दल देव, दानव आणि गंधर्व यांपैकी कोणाच्याही मनात किंतु नसे. त्यांनी त्या सर्वांचा विश्वास संपादला होता. विश्वासार्हता ही पत्रकारितेच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची असते.

हे ही लेख वाचा - 
अटलबिहारी वाजपेयी- स्वयंसेवक, प्रचारक ते पंतप्रधान!
शशिकांत सावंत - आजचा ऋषिमुनीच तो!

नारद भारतीय पुराणांमध्ये जसे प्रसिद्ध आहेत; तसे कार्य करणाऱ्या देवदेवता ग्रीक पुराणांमध्येही आहेत. ग्रीक पुराणातील ‘मर्क्युरी’ या संदेशवाहक देवतेचा उल्लेख पाश्चात्य वृत्तपत्रसृष्टी अभिमानाने करते.
नारद यांचा जन्म अक्षय तृतीयेचा. नारद यांचे जीवनचरित्र एकाच ग्रंथात समग्रपणे आढळत नाही. ते मुख्यत: ब्रह्मवैवर्तपुराण, भागवतपुराण यांमध्ये आढळते. नारद हे नाव एक असले, तरी व्यक्ती अनेक होत्या असाही उल्लेख सापडतो. त्यापैकी सात नारद कोठे काम करत त्याचीही माहिती आहे. नारद यांच्यासंबंधीच्या कथा-उपकथा ठिकठिकाणी सापडतात. मात्र त्यांवरून त्यांची ‘कळीचा नारद’ ही प्रतिमा कशी तयार झाली असावी ह्याचा उलगडा होत नाही. उलट, प्राचीन चरित्रकोशकार सिद्धेश्वरशास्त्री चित्राव असे म्हणतात, की ‘उत्तरकालीन पौराणिक साहित्यात नारद यांस चिकटवलेले ‘कळीचा नारद’ हे मिश्किल स्वभाववैशिष्ट्य त्यांच्या मूळ व्यक्तिमत्त्वाशी विसंगत वाटते.’त्यांच्या जन्मदिनानिमित्त ‘विश्वसंवाद केंद्रा’मार्फत अक्षय तृतीयेच्या सुमारास जुन्यानव्या पत्रकारांना गौरवण्यात येते. नारद यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्यांच्या नावावर नऊ ग्रंथ आहेत. नारद यांच्या नावावर ‘बृहद् नारदीय’ नावाचा पंचवीस हजार श्लोकांचा ग्रंथ आहे. तो नारद व सनतकुमार यांचा संवाद आहे. नारद यांचा दुसरा ग्रंथ ‘पंचरात्रागम’. त्यामध्ये सावर्णी मनूला उपदेश आहे. नारद यांची ग्रंथसंपदा पाहता ते विद्वान गृहस्थ असणार असे दिसते. त्यांचे वाङ्मय अध्यात्मचिंतनपर आहे. त्यात भक्तिसूत्रे, पुराणे, स्मृती, संहिता असे तऱ्हतऱ्हेचे प्रकार दिसून येतात. त्यांना मोठा शिष्यवर्ग होता. त्यामध्ये महाभारतकार वेदव्यास, रामायणकार वाल्मिकी, भक्त ध्रुव आणि भक्त प्रल्हाद यांचाही समावेश आहे.

नारद यांचे त्रिलोकातील सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते, पण त्यांचा आत्मीय संबंध श्रीकृष्णाशी होता. एकनाथांनी नारद यांचा गुणगौरव - जो श्रीकृष्णाचा आवडता - ‘ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ’ अशा शब्दांत केला आहे.

-devarshiनारद हे वीणा-चिपळ्या वाजवत नारायण – नारायण म्हणत त्रिलोकी संचार करत होते, ते त्यांचे बहिर्रंग दर्शन होय. ते अंतरंगी थोर तत्त्वचिंतक व ज्ञानोपासक होते. नारद यांना चिरंजीव (अजरामर) मानले जाते. मृत्युलोकी सात जणांना चिरंजीव (अजरामर) मानले गेले आहे. त्यांत मात्र नारदांचे नाव नाही. ते असे – अश्वत्थामा, बळी राजा, महर्षी व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य व परशुराम (अश्वत्थामा, बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषण: | कृप: परशुरामश्च सप्तै तै  चिरंजीविन: ||) त्यांचा समावेश प्रात:स्मरणीय स्तोत्रामध्ये होतो. परंतु त्या श्लोकात नारद यांचा समावेश नाही आणि तीच त्यांची थोरवी म्हणून सांगितली जाते.

- दत्ता पंचवाघ 9869020732
datta.panchwagh@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.