ना.वा. टिळक - फुलांमुलांचे कवी (Narayan Vaman Tilak)


-fulaamulaanche-kaviनारायण वामन टिळक हे फुलांमुलांचे कवी म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाचे आणि त्यांची रचना, ‘अभंगांजली’चेही 2019  हे शताब्दी वर्ष आहे. ते ‘नाना’ या नावाने परिचित होते. ते कमालीचे मातृभक्त होते. त्यांना त्यांच्या मनमानी वडिलांचा राग येई. त्यांच्या आईजवळ नीतिकथांचे एक पुस्तक होते. ते त्यांच्या शीघ्रकोपी वडिलांनी रागाच्या भरात जाळून टाकले. तेव्हा, छोट्या नारायणाने त्यांची चुन्याची डबी विहिरीत फेकून दिली होती!

‘मी एक चालताबोलता चमत्कार आहे’ असे ना. वा. टिळक ह्यांनी त्यांच्या चरित्राविषयी एका वाक्यात लिहून ठेवले आहे. त्यांचा जन्म एका कर्मठ ब्राह्मण घराण्यात 6 डिसेंबर 1861रोजी झाला. बाळाचे नाव ‘मारुती’ ठेवण्यात आले. टिळक यांच्या आईचे वडील - बेडेकर आजोबा त्यांच्यासोबत मारुतीला जंगलात घेऊन जात. तेथे अभंग म्हणत. मारुतीला हातावर झेलताना ‘झेल्या नारायण’, ‘झेल्या नारायण’ म्हणत खेळवत. त्यामुळे ‘मारुती’ हे नाव मागे पडून ‘नारायण’ हेच नाव कायम झाले. आजोबांकडून आणि आई जानकीकडून रक्तात भिनलेला अस्तिकभाव नारायणाच्या हृदयात अक्षय वसत राहिला. मात्र त्यांची वृत्ती वाढत्या वयाबरोबर धर्म ह्या विषयाकडे डोळसपणे पाहण्याची झाली. त्यामुळे त्यांचे मन सतत अस्वस्थ असे. टिळक मनाला शांती मिळावी म्हणून साधूंसह गुहेत राहणे, कडुनिंबाचा पाला खाऊन राहणे, नदीच्या पात्रात एका पायावर तासन् तास उभे राहणे असे उपाय, कोणी सांगितले म्हणून करून पाहत असत.

टिळक मूळचे नाशिकचे होते. त्यांचे वाचन अफाट होते. ते मराठी, संस्कृत व इंग्रजी शिकले होते. त्यांना हिंदी भाषेचेदेखील ज्ञान होते. ते झटकन कविता करत. त्यांच्या शीघ्र कविता ऐकून लोक चकित होत. ते खूप चांगली भाषणे करत. लोकांवर छाप पाडत. त्यांना श्लोक व स्तोत्रे तोंडपाठ असत. त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. एकदा तर, त्यांनी कमालच केली. एक वही समोर ठेवून श्रोत्यांपुढे संपूर्ण ‘सावित्री आख्यान’ बोलून दाखवले. नंतर घरच्यांना कळले, की ती वही कोरी होती. त्यांना शिकवण्याची आवड होती. ते लहान मुलांत रमत. त्यांना छान छान कविता ऐकवत. त्यांना कविता रचण्यास प्रोत्साहन देत. त्यांच्यापाशी गोष्टींचा खजिना असायचा. त्यामुळे, मुले त्यांच्यावर खूष असत. धर्मगुरू, ईश्वरपरिज्ञान महाविद्यालयामध्ये धर्मशिक्षक, कीर्तनकार, ‘ज्ञानोदय’चे संपादक, बिसेलबार्इंच्या ‘बालबोधमेवा’मध्ये विशेष सहभाग, ‘देवाचा दरबार’चे संस्थापक अशी विविध कामे करत असताना, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही टिळक यांनी भूषवले. 

त्यांना समाजातील जुन्या रूढी व अंधश्रद्धा आवडत नसत. ते स्वत: जुने रीतिरिवाज पाळत नसत. ते सर्व माणसे समान आहेत असे म्हणत. त्याप्रमाणे ते वागत असत. ते जातपात खपवून घेत नसत. ते मुलांना समाजात ज्या रूढी चुकीच्या आहेत त्या नाहीशा झाल्या पाहिजेत हे शिकवत. ते लहान मुलांवर निरतिशय प्रेम करत. ते त्यांना मातृभाषेचे आणि मातृभूमीचे प्रेम वाटावे म्हणून झटत. ते सुंदर भजने गात; सरस्वती जणू त्यांच्या जिभेवर वास करत असे. परंतु, त्यांच्या पायाला भिंगरी होती, ते जीवनभर कोठे एका ठिकाणी राहिले नाहीत. सतत भटकत राहिले. त्यांचा संसार विंचवाच्या पाठीवरील बिऱ्हाडासारखा होता – नाशिक, जलालपूर, नागपूर, अहमदनगर, पुणे, मुंबई, वसईअशा ठिकाणी फिरत राहिले.
 

हे ही लेख वाचा-
नाट्य-अभंगाचे अप्रस्‍तुत सादरीकरण
ओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ
निसर्गकवी बालकवी

लक्ष्मीबाई टिळक या त्यांच्या पत्नी होत. त्या शिकलेल्या नव्हत्या. पण टिळक यांनी त्यांना शिकण्यास प्रोत्साहन दिले. त्या जीवनाच्या शाळेत शिकल्या. पुढे त्यादेखील कविता लिहू लागल्या. त्यांनी ‘स्मृतिचित्रे’ या पुस्तकात टिळक यांच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ते मराठीतील अजरामर साहित्य ठरले.

टिळक यांचा स्वभाव विलक्षण होता. त्यामुळे नवरा-बायकोची भांडणे होत. रुसवेफुगवे घडत. पण दोघांचे प्रेम एकमेकांवर खूप होते. त्या दोघांचा संसार दारिद्र्याचा होता. लक्ष्मीबार्इंची बेरीज व टिळक यांची वजाबाकी असा तो प्रकार होता. एकदा, लक्ष्मीबार्इंनी टिळक यांच्याकडे पैसे दिले; त्यांना बाजारात जाऊन तांदूळ आणण्यास सांगितले. पण, टिळक यांनी त्याऐवजी शाईची दौत आणली. लक्ष्मीबार्इंना राग आला.
“ही बघ दौत, किती छान आहे!” टिळक म्हणाले.
“आता काय, मी ही दौत शिजत घालू? काय म्हणावे या कर्माला?” लक्ष्मीबाई हताश होत म्हणाल्या.
टिळक यांनी ती दौत माडीवरून रस्त्यात फेकून दिली. ते ओरडून म्हणाले, “तुला मानसशास्त्र समजत नाही.”

तेव्हा लक्ष्मीबाईदेखील कडाडल्या, “ते तुकारामाच्या जिजाईलादेखील कळले नसेल. सॉक्रेटिसच्या बायकोलादेखील समजले नसेल.”

टिळक मूळ हिंदू धर्माचे होते. परंतु त्यांना हिंदू धर्मातील जुन्या कालबाह्य रूढी मान्य नव्हत्या. त्यांना जातीय भेदभाव पसंत नव्हता. ते अस्वस्थ होत गेले. एकदा त्यांनी न्यायमूर्ती माधवराव रानडे यांचे भाषण ऐकले. ‘माणसांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे, माणसाचा दृष्टिकोन व्यापक होतो. तो उदार बनतो. जगामध्ये ईश्वर एकच आहे या विचाराचा धर्म उदय पावत आहे. त्याचा विचार व्हायला हवा.’ अशी मांडणी रानडे यांनी केली. टिळक यांना ते विचार भावले. त्यांनी हिंदू, पारशी, इस्लाम या धर्मांचा अभ्यास केला, पण त्यांची तळमळ काही कमी होईना. अखेर, ते बायबलमध्ये रममाण झाले. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. तो त्या वेळच्या हिंदू समाजाला मोठा धक्का बसला. उलट, टिळक यांना गोरगरिबांसाठी काम करायचे होते.

-v,-n.tilak-‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. ते तुकारामबुवांना मानत. ते ख्रिस्ती मिशनमध्ये विनावेतन काम करत. एकदा नगरच्या मिशनमध्ये काही अनाथ मुलांना वसतिगृहातून संस्थेकडे पैसे नसल्यामुळे काढले. टिळक यांनी त्या मुलांना स्वत:च्या घरी आणले, स्वत: कर्ज काढले, पण त्या मुलांना खाण्यापिण्यास दिले. टिळक यांनी ख्रिस्ती धर्माची सेवा केली. ते त्यांच्या लेखणीतून आणि वाणीतून ख्रिस्ताचा गौरव करत. त्यांनी ‘देवाचा दरबार’ ही चळवळ सुरू केली. ते ‘ज्ञानोदय’ या ख्रिस्ती मासिकाचे संपादक होते. त्यांनी जळगाव येथे त्याकाळी पहिले कविसंमेलन भरवले होते. त्याच कविसंमेलनात बालकवी प्रथम प्रकाशात आले!

टिळक मुलांवर आईगत प्रेम करत. त्यांना मूल झाले, की ते खूप आनंदी होत. त्यांची दोन मुले देवाघरी गेली तेव्हा ते खूप व्याकूळ झाले होते. मोठा मुलगा विद्यानंद  - मरण पावला तेव्हा त्यांनी ‘बापाचे अश्रू’ हे करूण काव्य लिहिले. त्यांनी त्यांच्या घरात अनाथ मुलांना वाढवले. ते खूप मुलांचे ‘पप्पा’ बनले. बालकवी तर त्यांच्या घरी वाढले. बालकवी अहमदनगरहून पुण्याला नोकरीसाठी गेले. टिळक यांना त्यांचा विरह सहन झाला नाही. त्यांनी कविता लिहिली - ‘पाखरा! येशील कधी परतुनि...’ ती कविता खूप गाजली.  त्यांची दत्तू नावाच्या मुलासंबंधी एक कविता आहे. तीतून त्यांचा मुलांसंबंधी लळा व्यक्त होतो.

 

‘नाना नाना म्हणताचि
शरदश्चंद्र धावून आला|
घे घे घे घे म्हणूनी
बिलगे बाळ माझ्या तनूला||
आले माझे नयन भरून,
घेतला चुंबियेला|
गेला माझा श्रमभार पळे
दूर ते सर्व गेला||’

ते देशासाठी मरण्यास केव्हाही तयार होते. त्यांची देशनिष्ठा अफाट होती. ते ती वारंवार बोलून दाखवत. त्यांनी येशूवर प्रेम केले, तितकेच भारत देशावर प्रेम केले. ते सगळ्यांचे मित्र म्हणून जगले. ते गरिबीत जगले. कफन्या घालून वावरले. अखेरपर्यंत भजन करत राहिले. त्यांची ब्रह्मानंदी टाळी नेहमी लागलेली असायची. ते सतत अभंग गात असत. ते ख्रिस्तवासी 10 मे 1919 रोजी झाले. ते मृत्यूला देवाची आज्ञा मानत. देवाचे बोलावणे हे नवजीवन आहे ही त्यांची श्रद्धा होती.

भास्करराव उजगरे संपादित ‘टिळकांची कविता भाग १’ संग्रह ‘व्हिनस’तर्फे १९१४ साली प्रकाशित झाला. त्यांनीच संपादित केलेला ‘अभंगांजली’ हा टिळक यांचा दुसरा संग्रह पाच वर्षांनी (1919) प्रसिद्ध झाला. ‘अभंगांजली’मध्ये ‘पश्चात्ताप आणि शरणागती’, ‘टिळक आणि ख्रिस्तदर्शन’, ‘प्रार्थना’, ‘योग आणि योगस्पृहा’, ‘श्रद्धा आणि आत्मानुभव’, ‘वैराग्य’, ‘वियोग व उत्कंठा’, ‘निषेध’, ‘उपदेश’, ‘विशेष प्रसंग’, ‘प्रेम आणि सेवा’, ‘आयुष्याची क्षणभंगुरता’, ‘आजार आणि मृत्यू’ ह्या तेरा विषयांच्या अंतर्गत वर्गीकरण केलेले एकूण तीनशे अभंग आहेत. परिशिष्टातील आठ, समर्पणाचा एक असे आणखी नऊ अभंग आहेत.

- जोसेफ तुस्कानो 9820077836
vasai.joe@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.