म्हाईंभट यांचे लीळाचरित्र


-headingम्हाईंभट उर्फ महेंद्रभट नगर जिल्ह्यातील सराळे गावचा ब्राह्मण होता. तो खूप श्रीमंत व विद्वान होता. त्याला त्याच्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा गर्व होता. गणपती आपयो हे त्याचे गुरू. तो स्वतःला प्रतिसूर्य किंवा ज्ञानसूर्य म्हणून घेत असे. दिवसा दिवटी पाजळत असे. पायात गवताची वाकी घालत असे. त्यातून इतर विद्वानांची हेटाळणी करणे व स्वतः विद्वान आहोत हे सिद्ध करण्याची त्याची वृत्ती होती. चक्रधरांची भेट झाल्यानंतर त्यांच्यात अविद्यायुक्त जीवाला मोक्ष कसा मिळतो या विषयावर चर्चा झाली. तेव्हापासून म्हाईंभट बदलले. चक्रधरांनी त्यांना उपदेश केला – ‘लोकीचा श्रेष्ठ तो एथीची नष्टू : एथीचा श्रेष्ठू तो लोकीचा नष्टू’. त्याने मात्र चक्रधर स्वामींचे शिष्यत्व स्वीकारले. म्हाईंभट महानुभाव पंथात आल्यानंतर त्याची पत्नीही संप्रदायात आली. 

म्हाईंभट मराठीतील आद्य चरित्रकार मानले जातात. त्याने लिहिलेले ‘लीळाचरित्र’ व ‘गोविंदचरित्र’ ही महानुभाव संप्रदायातील महत्त्वपूर्ण अशी निर्मिती आहे. चक्रधरस्वामींच्या प्रयाणानंतर त्यांच्या लीळा (म्हणजे आठवणी) एकत्र करण्याची कल्पना म्हाईंभटास सुचली. त्या संकल्पास नागदेवाचार्य यांनी मान्यता दिल्यानंतर त्यांनी लीळा गोळा केल्या. त्यांची विश्वसनीयता पारखली. त्यासाठी त्याला हिंडा-फिरावे लागले. त्या सर्वातून त्याची चिकाटी व चक्रधरस्वामींविषयी असणारा आदर स्पष्ट होतो. लीळाचरित्र हा ग्रंथ पंधराशेनऊ लीळांचा आहे. त्याचे एकांक, पूर्वार्ध व उत्तरार्ध असे भाग आहेत. चक्रधरांचा राजधर्माचा काळ, शक्ती स्वीकाराचा काळ, सर्वांना प्रेमदान, नागदेवाचार्याचे अनुसरण आणि अखेरीस उत्तरापंथे गमन अशा घटना त्यात येतात. 

चक्रधरांच्या लीळा गोळा करण्याची व त्यांचा ग्रंथ तयार करण्याची म्हाईंभट यांची कल्पना त्या काळात रम्य होती. स्वामींच्या लीळा गोळा करण्यात त्यांचा भक्तिभाव, निष्ठा, अलिप्तपणा, वस्तुनिष्ठपणा, सत्यनिष्ठा दिसते. म्हाईंभट यांनी चक्रधरांच्या हजार इतक्या आठवणी लिहिल्या व चक्रधरांचे व्यक्तिमत्त्व प्रकट केले आहे. म्हाईंभट हा आजच्या काळातील विचारानुसार आद्य संपादक होय.

-नितेश शिंदे

info@thinkmaharashtra.com

लेखी अभिप्राय

लिळा तत्त्वज्ञान जिवाच्या मुक्तिचे साधन आहे

Suresh GODBOLE08/01/2020

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.