पखवाज


पखवाज हे पक्षवाद्य किंवा पक्षतोद्य या संस्कृत शब्दांचे अपभ्रष्ट रूप आहे. त्यास प्राचीन काळी पुष्करवाद्य म्हणत. पखवाज हे लाकडाचा आणि पिंपाच्या आकाराचे बनवतात. त्याचे खोड शिसवी, खैर किंवा चाफा यांचे असते. खोड कातून ते गोलाकार बनवतात व आतून आरपार पोखरतात. लाकडाची जाडी अर्धा इंच आणि लांबी सुमारे दीड हात ठेवतात. दोन्ही तोंडांचा व्यास टीचभर असतो. खोडाच्या मध्याचा व्यास तोंडाच्या व्यासाच्या सव्वापट असतो. पखवाजाची दोन्ही तोंडे कातड्याने मढवून किनारीवर अर्धा इंच दुहेरी चामडे घालतात. पखवाजाच्या दोन्ही तोंडांच्या काठाबरोबर कातड्याच्या वादीचा वेठ वळलेला असतो, त्याला गजरा म्हणतात. पखवाजाचा स्वर कमी-जास्त करता यावा म्हणून लाकडाचे पाच-सहा तुकडे वादीखाली अडकावलेले असतात, त्यांना गठ्ठे म्हणतात. उजव्या हाताच्या तोंडावर शाई चढवून ती घोटवलेली असते. डाव्या हाताच्या तोंडाला आयत्या वेळी पाण्यात भिजवलेली कणिक लावतात. पूर्वी ते वाद्य मातीचे करत असत आणि म्हणून त्याला मृदंग = मातीचे अंग असलेले, असे नाव पडले. दक्षिणेत अजूनही मातीचा माठ पालथा घालून त्याच्या पाठीवर पखवाजाचे गत, बोल, परण वगैरे प्रकार वाजवतात. त्याला घटम असे म्हणतात.

पखवाजाचे मुख्य प्रकार तीन आहेत. 1. हरितकी - हिरड्याच्या आकाराचा. 2. जवाकृती - जवाच्या आकाराचा (अर्थात मध्ये फुगवटा असलेला) व 3. गोपुच्छाकृती -गायीच्या शेपटीला केसांचा गोंडा असतो त्या आकाराचा.
पखवाजाची साथ ध्रुपद, होरी या संगीतप्रकारांना, नृत्याला; तसेच, वीणावादनाला सोयीस्कर पडते. पखवाजावर मुख्यत्वे धमार, ब्रह्म, रुद्र, विष्णू व गणेश हे ताल वाजतात. त्याची साथ पूर्वी हरदासाच्या कथेलाही असे. पर्वतसिंह, रत्नसिंह व कुब्दसिंह हे प्रसिद्ध पखवाजिये एकोणिसाव्या शतकात होऊन गेले. पखवाजाची जागा नंतर तबल्याने घेतली आहे.

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.