हसत-खेळत शिक्षणाला आधार


मी कल्याणला राहत होतो तेव्हा शहापूर तालुक्याच्या आदिवासी भागांत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किंवा त्यांना लागणाऱ्या इतर गरजेच्या वस्तू वाटप उपक्रम घ्यायचो. महेंद्र धीमतेसर यांचे मार्गदर्शन असायचे. मी नोकरीनिमित्ताने पालघर जिल्ह्यात शिफ्ट पाच-सहा महिन्यांपूर्वी झालो आहे. तेथील शाळांची परिस्थिती जाणून घ्यायची होती. महेंद्र धीमतेसरांच्या मदतीने केंद्रप्रमुख नवनाथ जाधवसरांचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यांच्याशी संपर्क करून पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस 5 जानेवारीला (2019) झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त पाड्यावरील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काही मदत करावी अशी इच्छा होती. माझे मित्र शंकर दिवटे यांची पुतणी भाग्यश्री हिचाही वाढदिवस साजरा करायचा होता. आमचे नियोजन ठरले.

भांडुपचे ‘देवामृत फाउंडेशन’ आणि मुंबईचे अतुल पडवळ यांची ‘सह्याद्री विद्यार्थी अकादमी’ यांची मदत घेऊन छोटेखानी उपक्रम योजला. तलासरी तालुक्यातील सिगलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरले. बहुतेकजण म्हणाले, की शैक्षणिक साहित्य तर जून महिन्याच्या दरम्यान देतात. ते संपूर्ण साहित्य देतात. आम्ही तसा प्रयत्न जून महिन्यात करू; पण त्या आधी तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित वस्तू भेट दिली तर त्यांच्या आजूबाजूचा परिसर आणि तेथील परिस्थिती यांची माहिती तरी होईल असे मनात आले. त्यानिमित्ताने इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण साडेतीनशे विद्यार्थ्यांना १६ मार्च, शनिवारी साहित्य वाटप केले. ते सगळे मोफत देण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही विद्यार्थ्यांकडून त्या बदल्यात काहीतरी करून घेऊया असे ठरवले. सहावी ते आठवीच्या प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचे पंचवीस गट तयार केले आणि प्रत्येक गटाला एक प्रश्न दिला. त्यात त्यांनी एक प्रकल्प तयार करून द्यायचा- इमारत कशी बांधली जाते? त्यांच्या परिसरातील बाजार, त्यांच्या परिसरातील विविध कलांत निपुण असणाऱ्या व्यक्ती (वादन, गायन, चित्रकार, इत्यादी), भूकंप का होतो?, वर्तमानपत्र कसे चालवले जाते - त्याचे महत्त्व असे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले. विषय देण्याचे कारण इतकेच, की नेहमीचे शिक्षण घेत असताना वेगळे काही मुद्दे मिळाले, की त्यांचा शोध घेण्यात वेगळाच आनंद मिळतो. एरव्ही गप्पा मारणारे, धांगडधिंगा करणारे विद्यार्थी... त्यांची गटागटांत चर्चा सुरू झाली. माहिती शोधण्यासाठी जो तो धडपडू लागला आणि विद्यार्थ्यांकडून नेमके तेच हवे असते. विद्यार्थ्यांकडून ते प्रकल्प पूर्ण झाले. त्यांनी त्यात चांगल्यापैकी माहिती लिहिल्याचे आढळले. 

 मासिक पाळी हा विषय मुलींना देण्यात आला होता. मुलींनी त्यावर मात्र लिहून दिले नाही. मासिक पाळी हा विषय ग्रामीण भागात मुलींपुढे काढला, की त्या बऱ्याचदा लाजल्यासारखे करतात. त्यावर कोणी व्यक्त होण्यास बघत नाही. ‘देवामृत फाउंडेशन’च्या प्रिया जाधव आणि स्मिता मडये यांनी विद्यार्थिनींशी अर्धा तास संवाद साधला, तेव्हा कोठे मुली हळूहळू बोलू लागल्या आणि मासिक पाळीविषयी लिहून देण्यास तयार झाल्या. त्या दोन दिवसांत लिहूनही देतील.

शैक्षणिक वस्तू वाटप झाल्यानंतर शिक्षक विणेश धोडी यांनी शाळेतील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या शोभेच्या वस्तू दाखवल्या आणि त्यांची काही चित्रेही दाखवली. अप्रतिम कला! एका मुलीने साबुदाणे रंगवून त्यांचे कबुतर कागदावर साकारले होते, तर दुसऱ्या मुलीने कागदाची रंगीबेरंगी फुले बनवून कागदाच्याच फुलदाणीत मांडली होती. त्या मागास भागात मुलांच्या हाती असे कौशल्य आणि डोक्यात वेगळी कल्पकता! त्यांची अडचण भाषेची जाणवली. आम्ही मराठीतून बोलत होतो, ते त्यांना नीटसे समजत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात अबोलपणा होता. त्यांना बोलते करण्याचादेखील प्रयत्न असेल. साहित्य वाटप करतेवेळी माझा सहकारी विलास पाटील आणि त्याचा परिवार ही मंडळी सोबत होती. विलास पाटील त्यांच्या भाषेत बोलू लागल्यावर मुले-मुली खुलली, वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागली. आमटे कुटुंबीयांनी गडचिरोलीत स्थानिक भाषेत शिकवण्याचा प्रयोग चालवला आहे तो अनुकरणीय वाटतो.

- शैलेश दिनकर पाटील  9673573148, patilshailesh1992@gmail.com

महेंद्र धीमते (शहापूर केंद्रप्रमुख) - 9011752639
नवनाथ जाधव (वाडा केंद्रप्रमुख) - 07385324453
प्रिया जाधव (देवामृत फाउंडेशन) - 07045839034
अतुल पडवळ (सह्याद्री विद्यार्थी अकादमी) - 8268883091
शंकर दिवटे (कल्याण) - 9987633133
विणेश धोडी (सिगलपाडा शाळेतील शिक्षक) - 09898350357

 

 

 

लेखी अभिप्राय

WelDon Work
Congratulations

Minakshi Madhu…22/03/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.