दापोली तालुक्याचा त्रिकोण व त्याची महत्ता (Dapoli Tehsil)


दापोली परिसरात भेट द्यावी अशी पालगड, मुरुड, वणंद व जालगाव ही चार गावे आहेत. दापोली हे गाव ब्रिटिशांनी त्यांच्या कारभाराच्या सोयीसाठी वसवले. दापोली गावाचा इतिहास फार तर दोनशे वर्षें मागे नेता येईल. दापोलीच्या आजुबाजूची गावे मात्र पुरातन आहेत. ब्रिटिशांनी कोकणातील किनारपट्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक ठाणी उभारली. ब्रिटिशांनी हर्णे बंदराजवळ किल्ले सुवर्णदुर्ग जिंकून घेतल्यावर, त्यांनी तेथे ठाणे 1818 साली वसवले. मुळात तो प्रदेश तालुके सुवर्णदुर्ग म्हणून ओळखला जाई. परंतु ब्रिटिशांचा शोध नेहमी त्यांना मानवतील असे थंड प्रदेश निवडण्याकडे होता. दापोली तसे त्यांनी शोधून काढले. त्याची ख्याती कोकणातील महाबळेश्वर म्हणून त्यानंतर पसरली.

ब्रिटिशांनी त्यांचा मिलिटरी कँप जालगाव, गिम्हवणे व मौजे दापोली या तीन गावांच्या हद्दीतील जागा घेऊन उभारला. तो दापोली कँप. त्याचा अपभ्रंश होऊन त्याला बोली भाषेत ‘काप दापोली’ असे संबोधले जाऊ लागले. ब्रिटिशांनी सुवर्णदुर्गमधील सर्व सरकारी कार्यालये दापोली येथे हलवली. त्यानंतर तालुके सुवर्णदुर्ग हे नाव बदलून ते ‘तालुके दापोली’ असे झाले. दापोली येथील मिलिटरी ठाणे 1857 सालानंतर उठले. मात्र दापोलीचे तालुका म्हणून महत्त्व अबाधित राहिले. ब्रिटिशांची व इतरांची होत असलेली पूर्वीची वर्दळ कमी झाली. दापोली हा पेन्शनरांचा गाव म्हणून ओळखला जाऊ लागला. तरीही दापोलीची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा खुंटली नाही. पोटाला चिमटा काढून शिकलेच पाहिजे ही जाणीव समाजात निर्माण झाली होती. शिक्षक तुटपुंजा पगार असूनही मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया पक्का करून घेत होते. मिशनरी अॅल्फ्रेड गॅडने यांनी दापोलीत माध्यमिक विद्यालय 1880 साली सुरू केले. त्यांनी ते बराच काळ चालवले. म्हणून नंतर त्यांचे नाव विद्यालयाला देण्यात आले. दापोली परिसरातील शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक जीवन त्या विद्यालयाच्या स्थापनेनंतर अधिकच बहराला येऊ लागले. हर्णे, मुरुड, आंजर्ली, मुर्डी ही गावे बंदरपट्टयांची आणि वर दापोली! या ‘त्रिकोणा’वर मी हाडामांसाच्या माणसासारखे प्रेम केले आहे...

विस्मयाची गोष्ट ही, की दापोली तालुक्यातील ज्या दिग्गज लोकांनी महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विश्वाला योगदान दिले आहे, त्यात या ‘त्रिकोणातील’ व्यक्ती संख्येने जास्त भरतील.

लाडघर येथे जन्मलेले निजानंद विष्णू बाळ हे भारतीय लष्करात 1955 साली ब्रिगेडियर झाले. ते त्या परिसरातील पहिले ब्रिगेडियर होत. भार्गव महादेव ऊर्फ बाबा फाटक (26 जानेवारी 1911 – 5 सप्टेंबर 1981) हे दापोलीतील सच्चे गांधीवादी म्हणून ओळखले जातात. त्यांनी कोणतेही काम कमी दर्ज्याचे नसते ही गांधी यांची शिकवण तंतोतंत पाळली. त्यांनी भंगिकाम करणे, मेलेली ढोरे आणून-फाडून त्यापासून कातडे कमावणे, सूतकताई करणे, कापूस पिंजून त्यापासून गाद्या-उशा तयार करणे अशा सर्व प्रकारची कामे समाजाची अवहेलना पत्करून, मानहानी पत्करून आयुष्यभर केली. त्यांनी आंतरजातीय लग्ने जुळवली. दापोलीकरांनी त्यांना ‘कोकणचा पिंजारी’ ही उपाधी दिली.

दापोलीचे सुरेंद्र चव्हाण यांनी टेल्को कंपनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते अभियंते बनले. त्यांनी लहानपणापासून गिर्यारोहणाची आवड जोपासली होती. ऋषीकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली ते ‘टाटा एव्हरेस्ट इंडिया, 98’ या गिर्यारोहणाच्या मोहिमेत सहभागी झाले. त्यांनी 18 मे 1998 रोजी जगातील सर्वोच्च अशा एव्हरेस्ट शिखरावर पहिले मराठी पाऊल उमटवले! महाराष्ट्र शासनाने त्यांचा सन्मान ‘छत्रपती पुरस्कार’ देऊन केला आहे.

दापोलीला पर्यटन स्थळ म्हणून 2000 सालापासून महत्त्व येऊ लागले. आज दापोली शहर व दापोली तालुक्यातील अनेक गावे पर्यटकांचे आकर्षण स्थाने बनली आहेत.

सानेगुरुजी यांच्या पालगड या जन्मस्थानी त्यांचे छोटे परंतु सुबक स्मारक, ते ज्या घरात राहत होते त्याच जागेत उभे आहे. त्यांचा जीवनपट उलगडणारी काही छायाचित्रे व आठवणी जाग्या करणार्‍या काही वस्तू तेथे पाहण्यास मिळतात. एका मोठ्या माणसाचे जन्मठिकाण पाहून मन भरून येते.

- डॉ. विद्यालंकार घारपुरे 9420850360 vidyalankargharpure@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.