आपली शिक्षणपद्धत शास्त्रज्ञ केव्हा निर्माण करेल?


जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ कोण? ते कोणत्या देशाचे आहेत?आणि त्यांच्यात भारतीय किती? त्याचे उत्तर क्लॅरिव्हेट अ‍ॅनॅलिटिक्स या, माहितीविश्लेषण क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपनीने नुकते दिले आहे. सर्वात जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये (टॉप टेन) पहिल्या क्रमांकावर अमेरिका; मग ब्रिटन, चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, कॅनडा, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि स्पेन हे देश आहेत.

भारत या यादीत का नाही? कारण या यादीत येण्यासाठी समाविष्ट देशात किमान शंभर शास्त्रज्ञ तरी असावे लागतात. अमेरिकेच्या दोन हजार सहाशे एकोणचाळीस शास्त्रज्ञांना त्या यादीत स्थान मिळाले आहे. ब्रिटनचे पाचशेसेहेचाळीस, चीनच्या चारशेब्याऐंशी शास्त्रज्ञांचा यादीत समावेश आहे आणि भारताच्या फक्त दहा शास्त्रज्ञांचा त्या यादीत नामोल्लेख आहे. म्हणजे शंभर शास्त्रज्ञांच्या किमान गरजेच्या जवळपासपण भारत नाही.

नारायण मूर्ती यांनी एक विधान केले होते, "गेल्या साठ वर्षांत भारतात असा एक तरी शोध लावला गेला आहे का, की जेणेकरून जग बदलले आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली!" काय कारण असेल त्याचे? एकशेवीस कोटी लोकांच्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या शंभर शास्त्रज्ञांची नावेसुद्धा भारताला देता येत नाहीत. त्याचे मूळ कारण भारताची शिक्षणपद्धत हे आहे असे दिसते. लॉर्ड मेकॉले यांच्यापासून चालत आलेली ती शिक्षणपद्धत ही घोका आणि ओका या तत्त्वावर चालते.

भारतात शिक्षणाचा अर्थ माहितीचा संग्रह करणे असा काढला जातो. भारतीय विद्यार्थ्यांना रेडिमेड उत्तरांची सवय झाली आहे आणि जी शिक्षणपद्धत ही उत्तरांवर अवलंबून असते ती नवे काही शोधत नाही. शिक्षणपद्धत ही प्रश्नांवर आधारित हवी. विद्यार्थ्यांना दररोज नवनवीन प्रश्न पडले पाहिजेत. तसे वातावरण प्रश्न निर्माण होण्यासाठी शाळा-कॉलेजांमध्ये हवे. विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करावा लागतो.

शास्त्र विषय शाळेत-कॉलेजमध्ये शिकवणे वेगळे आणि शास्त्रीय दृष्टिकोन बाळगणे वेगळे. त्यासाठी शिक्षणात अर्थात वर्गात जिज्ञासा, कुतूहल यांना भरपूर वाव हवा. शिक्षणामध्ये अंधश्रद्धा दूर करणारे विचार हवेत, कारण अंधश्रद्धा हे केवळ अज्ञान नाही तर ती एक प्रक्रिया आहे. तिचा देवधर्माशी संबंध नसतो. अंधश्रद्धा म्हणजे शब्दप्रामाण्य. अमुक अमुक सांगतो म्हणून ते खरे असले पाहिजे. त्याचे शब्द हे प्रमाण. असे भारतीय घराघरांतून, शाळांतून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते. तेथूनच विद्यार्थ्याची विचार करण्याची प्रक्रिया खुंटते आणि हळुहळू, त्याला किंवा तिला प्रश्नच पडेनासे होतात.

जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण होत नाही तोपर्यंत शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होत नाही. जर पुढील काही वर्षांत भारतीय शास्त्रज्ञांची यादी दहावरून शंभरवर न्यायची असेल तर प्रश्न विचारण्याची मुभा शाळांतील विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे. शाळांमध्ये तसे काही वातावरण निर्माण करावे लागेल, की विद्यार्थी सातत्याने हात व मेंदू यांचा वापर करतील. अर्थात कृतिशील उपक्रम मुलांना करण्यास मिळायला हवेत. त्यातून त्यांना प्रश्न पडतील. ते स्वतः त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नसुद्धा करतील.

सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांच्या, मुलांच्या अवतीभवती जिज्ञासा, कुतूहल वाढेल आणि प्रश्न निर्माण होतील असे वातावरण निर्माण करायचे आहे. ही इकॉसिस्टिम घरातून शाळेत, शाळेतून कॉलेज, कॉलेज ते विद्यापीठ आणि विद्यापीठातून संपूर्ण समाजात निर्माण व्हायला हवी. चला, शिक्षणात सृजनशीलतेला वाव देऊ. लहान मुलांच्या निरर्थक वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देऊ, कारण आइन्स्टाइन यांनी म्हटले आहे, की The Important things is not to Stop Questioning.

- सचिन उषा विलास जोशी, 9890002258, espaliersachin@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.