पंढरीचे बदलते स्वरूप (Pandharpur)


माझा जन्म पंढरपूरचा. आम्ही पेशव्यांचे पुराणिक. त्यांनीच आम्हाला पंढरपूर गावात नदीकाठी घोंगडे गल्लीत पन्नास खणी वाडा व नदीपलीकडे शंभर एकर जमीन दिली. माझी आई ही श्री रुक्मिणीदेवीच्या सेवाधारी उत्पात समाजातील.

मूळ पंढरपूर गाव हे चंद्रभागेच्या काठावर हरिदास, महाद्वार आणि कुंभार अशा तीन वेशींत वसलेले होते. विठ्ठल मंदिरासभोवतीचा प्रदक्षिणा रोड ही पंढरपूर गावाची सरहद्द! पंढरपूर गाव हे आदिलशाहीत असल्याने, विजापूरच्या दिशेचा नदीकाठचा भाग आधी विकसित झाला. दत्त घाट, महाद्वार घाट ते कालिका मंदिर हा रस्ता ‘विजापूर रस्ता’ म्हणून प्रसिद्ध होता. तेथेच गावचा बाजार भरत असे. त्या रस्त्यावर अहिल्याबाई होळकर, सरदार खाजगीवाले, शिंदे सरकार, जमखंडीकर, पटवर्धन राजे आदींचे वाडे आहेत. अहिल्याबाई होळकर यांचा वाडा बांधून झाला, तेव्हा तो ‘पाहण्यास या’ म्हणून इंदूरला निरोप धाडला गेला. अहिल्याबाई युद्धाच्या मोहिमेवर असल्याकारणाने, त्यावेळी त्या स्वतः येऊ शकल्या नाहीत. परंतु त्यांनी त्यांच्या संस्थानातील एक गजराज पंढरपूरला पाठवला. माहुताने त्या गजराजाला वाड्याच्या माळवदावर (गच्चीवर) फिरवून बांधकाम मजबूत असल्याची खात्री करून घेतली आणि तसा निरोप अहिल्याबाई यांना पाठवला.

पंढरपुरात दोन-अडीचशे वर्षें जुने वाडे दिमाखात उभे आहेत. तेथील वाड्यांची रचना विजापूरचा आदिलशहा, हैदराबादचा निजाम यांच्या आक्रमणाचा सततचा धोका लक्षात घेऊन करण्यात आली आहे. गावाच्या बरोबर मध्यभागी उंचवट्यावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि त्याच्या सभोवती बडवे, उत्पात, सेवाधारी आणि क्षेत्रोपाध्ये यांचे वाडे! एक मजली वाड्याला भव्य दगडी कमान, त्याखाली दिंडी दरवाजा, दोन्ही बाजूंला दगडी चौथरे, दरवाज्याला आतून लोखंडी साखळी व जाडजूड अडसर. समोर अंगण, त्यात न्हाणीघर व पाण्याचा मोठा हौद. पुढे, पायर्‍या चढून गेल्यावर मोठी ओसरी, मागे देवघर, स्वयंपाक घर, शयनगृहे इत्यादी. तेथील प्रत्येक वाड्यात ओसरीच्या खाली लपण्यासाठी सुरक्षित तळघर आहे. वाड्याच्या चोहोबाजूंला चिरेबंदी भिंती व आत लाकडी बांधकाम! तेथे वाड्याचे क्षेत्रफळ खणावर मोजले जाते. वरील छताला दोन मजबूत लाकडी खांडांमध्ये आडवे दांडे घातले जातात. त्या मधील जागेला खण म्हणतात. एक खण म्हणजे साधारण पन्नास चौरस फूट. घरभाडे त्या खणांवरच आकारले जाते. तेथे शुभ प्रसंगी, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर चित्रे काढण्याची प्रथा आहे.
पंढरपुरात वीज 1960 -62 पर्यंत नव्हती. अंधार पडल्यावर सर्व व्यवहार रॉकेलची चिमणी किंवा कंदिल यावर चालत. दुकानात पेट्रोमॅक्सच्या बत्त्या होत्या.

माझ्या शालेय वयात, 1960 च्या आधी मुंबईहून केवळ रेल्वेने पंढरपुरी जाता येत असे. रेल्वे गाड्याही फक्त दोन - मद्रास मेल किंवा एक्सप्रेस! गाडीला गुलबर्गा, वाडी, रायचूर, गुंटकळ, मद्रास आदी बोग्या लागत. तिला सोलापूरचा फक्त एक जनरल डबा असे. त्यामध्ये गर्दी प्रचंड असे. ट्रंक, वळकटी आणि फिरकीचा तांब्या घेऊन त्यात चढणे, या साध्या कल्पनेनेही अंगावर काटा येत असे. आम्हा लहान मुलांना रडतभेकत असताना, सामानाबरोबरच खिडकीतून आत फेकले जाई. गाडीत आई-मुलांची ताटातूट होत असे. कोणा प्रवाशाने दया दाखवली तर बर्थवर बसायला टीचभर जागा मिळे, नाहीतर रात्रभर संडासाच्या शेजारी सामानावर बसूनच प्रवास करायचा. पूर्वीच्या नवविवाहित स्त्रिया दूर सासरी जाताना का रडायच्या? त्याचे कारण अशा जिकिरीच्या प्रवासात सापडते.

कुर्डुवाडी स्टेशन पहाटे पाच वाजता यायचे. तेथे अर्धवट झोपेत उतरायचे. समोर मिरज-लातूर-बार्शीलाईट रेल्वे उभी असे. प्रवासी त्या गाडीत मालडब्यात, दारात, टपावर, जेथे जागा मिळेल तशी माकडासारखे चढून बसत. आमचा शीण गाडी पंढरपूरच्या रेल्वे पुलावर आल्यावर, मात्र कोठल्या कोठे पळून जात असे. पंढरपुरी टांग्यात बसण्याची मजा काही औरच होती. भीमथडीची तट्टे (छोटे घोडे) इतिहासात प्रसिद्ध होती. पुढे, कालांतराने रात्रीची पुणे पॅसेंजर सिद्धेश्वर एक्सप्रेस झाली. इतरही रेल्वे गाड्या वाढल्या. बार्शी लाईट रेल्वे नॅरोगेजची ब्रॉडगेज झाली. रेल्वे आरक्षण पद्धत आली. बर्थची सोय झाली. रेल्वे प्रवास सुसह्य झाला.

पंढरपूरच्या स्टेशन रोडला पद्मावती मंदिराच्यासमोर पत्र्याच्या शेडमध्ये चार फलाटांचा एसटी स्टँड होता. तेथून जास्तीत जास्त लांब म्हणजे पुण्यापर्यंत जाता येत असे. मुंबई-पंढरपूर-कोळे अशी थेट एसटी सेवा 1965 मध्ये सुरू झाली. त्यानंतर सोळा फलाटांचा नवीन एसटी स्टँड बांधण्यात आला. सध्या आषाढी-कार्तिकी वारीला महाराष्ट्राच्या विविध भागांतून; तसेच, इतर राज्यांतून जवळजवळ दोन हजार एसटी बसेस पंढरपुरी येतात. खाजगी बसेस वेगळ्या! गावातील वारी पूर्वी पौर्णिमेपर्यंत हलत नसे, पण रेल्वे आणि एसटीने उत्तम सोय केल्यामुळे पंढरपूर द्वादशीला रिकामे होते.

पंढरपूरच्या पूर्वेला चंद्रभागेचे चंद्रकोरीसारखे विस्तीर्ण पात्र आहे. उन्हाळ्यात रोडावलेली चंद्रभागा पावसाळ्यात दुथडी भरून वाहू लागते. आषाढीला नदीचे बहुतेक वाळवंट पाण्याखाली असते. गावातील मठांतून, धर्मशाळांतून भजन-कीर्तन-प्रवचने चालतात. पुराचे पाणी गावातून सोलापूरकडे जाणाऱ्या दगडी पुलावर येत असे. नदीवर नवीन पूल चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला. त्यामुळे पाच किलोमीटरचा वळसा पडत असला, तरी वाहतूक खोळंबत नाही. रेल्वे पूल गेल्या शतकात बांधला गेला, तो मात्र कधीही पाण्याखाली गेलेला ऐकिवात नाही!

पंढरपूरच्या इतिहासातील सर्वात मोठा पूर 1956 साली आला होता. पुराचे पाणी गावात तीन बाजूंनी घुसले होते. वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली होती, पुंडलिकाच्या मंदिराच्या कळसाला फक्त पाणी लागले नव्हते. श्री विठ्ठल मंदिर उंचावर आहे तरी नामदेव पायरीला पाणी लागले होते. त्या पुरात चार-पाचशे घरे पडली. वित्तहानी खूप झाली, परंतु मनुष्यहानी झाली नव्हती. नदीवर उजनी धरण 1970-75 च्या दरम्यान बांधण्यात आले. तेव्हापासून पुरावर नियंत्रण आहे. उजनीतून पाणी सोडले गेल्यामुळे एकदा घाटावर पाणी आले होते.

देवळासभोवतीचा परिसर अरुंद गल्ल्याबोळांनी भरलेला होता. एखाद्या बोळात गाई-म्हशी यांचा कळप घुसला तर बाजूला सरकायलाही जागा उरत नसे. सोवळे-ओवळे पाळणाऱ्यांची तशा बोळात पंचाईत होत असे. देवळाजवळ सायकल सोडून इतर कोणतेही वाहन जाऊ शकत नसे. पंढरपूरचे जिल्हा अधिकारी रमानाथ झा यांनी मास्टर प्लॅन चाळीस वर्षांपूर्वी राबवून देवळाभोवतीचे सर्व रस्ते रुंद केले, अनधिकृत बांधकामे, दुकाने, टपऱ्या पाडल्या. त्यामुळे देवळाच्या दारात कोणतेही वाहन येऊ शकते.

देवळाचे नूतनीकरण 1964 ते 1980 या काळात करण्यात आले. जुना जीर्ण झालेला लाकडी मंडप पाडून तेथे दगडी मंडप उभारण्यात आला. तेथील भिंतींवर सांगलीचे चित्रकार कल्याण शेटे यांनी ‘रुक्मिणी स्वयंवर’ या नाटकातील प्रसंग चितारले. स्त्री आणि पुरुष यांची वेगवेगळी बारी देवदर्शनासाठी होती. भाविकांना घोळक्याने एकदम आत सोडले जाई. त्यामुळे प्रचंड गडबड-गोंधळ उडत असे. सध्या फक्त एक बारी आहे. सर्वांना एकाच लायनीत उभे राहून, शिस्तीने दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे सध्या धक्काबुक्की होत नाही. लाईन पाच किलोमीटरची लागली, तरी भाविकांना पावसात उभे राहवे लागत नाही. मधील मंडपात चहापाण्याची; तसेच, प्रसाधनगृहांची सोय करण्यात आली आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असे आहे, की जेथे भक्तांना देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेता येते.

देवळात वीज नव्हती. तेलाचे दिवे सर्वत्र लावलेले असत. त्यामुळे गाभाऱ्यात काजळी धरत असे. भक्तांच्या दाटीमुळे प्रचंड उकाडाही होत असे. आता फॅन्समुळे गाभाऱ्यातही हवा खेळती राहते. तुळशीमाळांमुळे हवा शुद्ध राहते. देऊळ वर्षातून चार-पाच वेळा स्वच्छ धुतले जाते. सीसीटीव्ही सर्वत्र लावण्यात आले आहेत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. वारकरीही सुशिक्षित झाले आहेत. पंढरपूरची वारी हा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय बनत आहे. राज्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर पंढरपूरची वारी भरते. पंढरपूरची लोकसंख्या पंचवीस हजार होती, तेव्हा लाखांची वारी भरत होती. ती लोकसंख्या दीड-दोन लाखांवर पोचली, तेव्हा तीच वारी बारा-पंधरा लाखांवर पोचली. पूर्वी पायी चालत येणाऱ्या भाविकांचे प्रमाण साठ टक्क्यांवर होते. रेल्वे, एसटी व खाजगी गाड्या करून सत्तर टक्के लोक येतात. दिंडीबरोबर थोडे अंतर पायी चालणे ही सुशिक्षित मध्यमवर्गीयांत फॅशन झाली आहे.

यात्रेकरू पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत गावातच मुक्काम करत असत. यात्रेकरू देवळासभोवतीच्या उत्पात, बडवे, सेवेकरी, क्षेत्रोपाध्ये यांच्या वाड्यांत खणाला चाळीस-पन्नास रुपये प्रतिदिवस भाडे देऊन राहत. ते येताना चार दिवस पुरेल इतका भाकर-तुकडा आणत किंवा त्यांचे जेवण बरोबर शिधा आणून चुलीवर शिजवत. एकेका खोलीत वीस-बावीस लोक राहत. गावात विविध समाजांचे, जातींचे चार-पाचशे मठ व धर्मशाळा आहेत. तेथे दोन-अडीच लाख लोक राहत. गावात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी लॉज होती. तेथे सुखवस्तू लोक राहत. बाकी गोरगरीब उघड्यावर झोपडे बांधून राहत. यात्रेकरू उरलेले शिळे अन्न उघड्यावर फेकून देत. गावात भटकी डुकरे आणि गाढवे यांचा मुक्त संचार होता. जेमतेम हजार शौचालये संपूर्ण पंढरपुरात होती. ती आठ-दहा लाखांच्या यात्रेला कशी पुरी पडणार? सरकार वाळवंटात चर खणून, तात्पुरती सोय करत असे. यात्रेकरू पहाटेच्या अंधारात मिळेल त्या जागेत प्रातःर्विधी करत. अर्धेअधिक लोक चंद्रभागेच्या वाळवंटाचा आसरा घेत.

गावात सर्वत्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंला उघडी गटारे होती. घरातील लहान मुलांना प्रातर्विधीसाठी त्या गटारांवर बसवले जात असे. घरोघरी टोपली संडास होते. मैला डोक्यावरून वाहून नेला जात असे. त्या सर्व घाणीमुळे पंढरपुरात रोगराई पसरत असे. कॉलरा-मलेरियाची लागण झाल्याने दरवर्षी शेकडो लोक मृत्यूमुखी पडत. बाहेरगावच्या प्रत्येक माणसाला पंढरपूरच्या हद्दीत शिरताना कॉलऱ्याचे इंजेक्शन घ्यावे लागत असे. त्याचे सर्टिफिकेट जवळ बाळगावे लागे. वारीच्या तीन दिवसांत सफाई कामगार प्रचंड गर्दीमुळे कामच करू शकत नसत. द्वादशीला तर, पंढरपूरचे नरकपुरात रूपांतर होत असे. घरटी किमान दोन माणसे आजारी पडत.

अलिकडच्या काळात ‘मास्टर प्लॅन’मुळे देवळासभोवतीचे सर्व रस्ते रुंद झाले आहेत. उघडी गटारे बंद झाली. भूमी अंतर्गत गटारे बांधली गेली. डोक्यावरून मैला वाहणे हा क्रूर प्रकार ड्रेनेज सिस्टिममुळे बंद झाला. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उघड्या मैल्यावर, घाणीवर रासायनिक पावडर फवारण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुर्गंधी नष्ट होऊ लागली. अनेक समाजसेवी संघटना वारीनंतर साफसफाईचे काम करू लागल्या. परिणामी, पंढरपुरातून कॉलऱ्याचे उच्चाटन समूळ झाले. परंतु डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरियाची लागण पंढरपुरात अजूनही वारीनंतर होते. सध्या कोणाला कॉलऱ्याचे इंजेक्शन घ्यावे लागत नाही. अर्धी यात्रा गावाबाहेर थांबते. भाविक मुखदर्शन झाले नाही तरी कळसाचे दर्शन घेऊन घरी परततात. खेड्यापाड्यातील गरीब अशिक्षित यात्रेकरूही स्वच्छता पाळतात. गावातील डुकरे, गाढवे नष्ट झाली आहेत. गाव बऱ्यापैकी स्वच्छ झाले आहे.

महाराष्ट्रात फक्त पंढरपूरला ‘यात्रा कर’ होता. सुरुवातीला तो माणशी चार आणे होता. नंतर तो वाढत वाढत दोन रुपये झाला होता. पंढरपूरला देवदर्शनासाठी गरीब यात्रेकरू येत. त्यांना तो कर परवडत नसे. वारकरी चेष्टेने त्याला ‘जिझिया कर’ म्हणत. राज्य सरकार वारीच्या नियोजनासाठी पंढरपूर नगरपालिकेला वर्षाकाठी दोन लाख रुपयांचे अनुदान देत असे. त्यात यात्रा खर्च भागवणे नगरपालिकेला शक्य नव्हते. शेवटी, वारकरी संप्रदायाच्या मागणीला मान देऊन, वसंत दादा पाटील यांनी मध्यस्थी करून, ‘यात्रा कर’ रद्द केला व सरकारी अनुदान वाढवून दिले गेले. सध्या राज्य सरकार नगरपालिकेला एक कोटी रुपये वार्षिक अनुदान देते. ‘पंढरपूरचा उचल्या’ हा ‘मुंबईचा मवाली’, ‘पुण्याचा भामटा’ यांच्याप्रमाणे उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. चोख पोलिस बंदोबस्तामुळे तशा उचलेगिरीला आळा बसला आहे. मात्र आजही आषाढी-कार्तिकी वारीच्या आधी सात दिवस महाराष्ट्रातील जवळ जवळ दहा हजार भिकारी आणि एक हजार चोर पंढरपूर मुक्कामी हजर होतात. त्यांच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे; तसेच, शेकडो भोंदू साधू, बैरागी, महाराज लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेतात. वाळवंटाचा विकास महाद्वार घाट ते नदीपलीकडचा गुजर घाट यांना जोडणारा पूल अजून बाकी आहे. उशिरा का होईना, पण पंढरपूर आता सुधारू लागले आहे!

बा पांडुरंगा, तुझ्या पायाशी येणाऱ्या सर्व भाविकांच्या हाल-अपेष्टा दूर करून त्यांना सुखी समाधानी ठेव हीच तुझ्या चरणी प्रार्थना!

- अरुण पुराणिक, 9322218653, arun.puranik@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.