मक्ता घेणे


'मी घरातील सगळी कामे एकटीनेच करण्याचा मक्ता नाही घेतला.' किंवा 'दरवेळी आभार प्रदर्शन मीच का करायचे? मी काय त्याचा मक्ता घेतलाय?' गृहसंस्था आणि सार्वजनिक संस्था अशा दोन्ही ठिकाणी वेळोवेळी कानी पडणारी ही वाक्ये.

दोन्ही वाक्यांत 'मक्ता घेणे' हा वाक्प्रचार वापरला आहे. 'मक्ता' याचा अर्थ विशिष्ट अटींवर काम करण्याचा किंवा काही पुरवण्याचा हक्क व जबाबदारी असा आहे.

ठेका, बोली, कंत्राट, इजारा किंवा हमी घेणे यासाठी 'मक्ता घेणे' असा शब्दप्रयोग केला जातो.

ठेकेदार, कंत्राटदार, मक्ता घेणारे खंडकरी यांना 'मक्तेदार' असे म्हणतात. शब्दकोशांत मक्तासंबंधात असे वेगवेगळे शब्द सापडले, पण मक्ता शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झाला, ते कळले नाही.

मध्यंतरी कविवर्य सुरेश भटांचा 'एल्गार' हा संग्रह वाचत होतो. त्यातील सुरुवातीची कैफियत वाचताना गजलेसंबंधी विशेष माहिती मिळाली. तिथे मक्ता हा शब्दही भेटला.

'गजले'च्या शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव गुंफलेले असते. या शेराला 'मक्ता' असे म्हणतात.

पूर्वीच्या काळी छापखाने नव्हते, त्यामुळे गजला कागदांवर हातानेच लिहाव्या लागत. तसेच वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके किंवा आकाशवाणी, दूरदर्शन यांसारखी प्रसारमाध्यमेही नव्हती. त्यामुळे 'गजल' कोणाची आहे हे कळण्यासाठी मक्त्यात म्हणजेच शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव नमूद करण्याची प्रथा होती. कवीचे टोपणनाव म्हणजेच 'तखल्लुस', मक्त्यात गुंफलेले असे. थोडक्यात मक्त्यामुळे कवीचा गजलेवरील हक्क शाबीत होत असे. त्यावरूनच 'एखाद्या गोष्टीचा हक्क मिळणे' ह्या अर्थी 'मक्ता घेणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.

पण तसे पाहिले तर काव्यात स्वत:च्या नावाचा उल्लेख करण्याची प्रथा आपल्याकडे प्राचीन काळापासून रूढ आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर रामरक्षेच्या शेवटी 'इति श्री बुधकौशिक ऋषी विरचितं श्री रामरक्षा स्तोत्रं संपूर्णम्।' असे म्हटले आहे. त्यातून रामरक्षा हे स्तोत्र बुधकौशिक ऋषींनी लिहिल्याचे आपल्याला समजते.

हीच प्रथा संतकवींनीही पाळलेली दिसते. समर्थ रामदासांनी मारुतीच्या आणि शंकराच्या आरतीत शेवटी आपले नाव टाकले. तुकाराम महाराजांनी तर आपल्या सर्वच अभंगांत शेवटी 'तुका म्हणे' असे म्हटले आहे. अर्थात, त्यामुळे अभंगाच्या शेवटी 'तुका म्हणे' असे टाकल्याने ती रचना तुकाराम महाराजांचीच आहे; याची सर्वसामान्य भाविकाला खात्री पटेल असा विचार करून नंतरच्या काळात अनेकांनी स्वत:च्या रचना तुकारामांच्या नावावर खपवल्या. अशा अभंगांना प्रक्षेपित किंवा क्षेपक अभंग म्हणतात. असे प्रक्षेपित अभंग बाजूला काढण्याचे काम संत वाङ्मयाच्या अभ्यासकांनी केले आहे. विष्णू नरसिंह जोगमहाराजांनी संपादित केलेल्या गाथेत क्षेपक अभंगांची संख्या 410 आहे. गंमत म्हणजे त्यात 'तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत ॥’ हा दत्तावरचा प्रसिद्ध अभंगही आहे.

सांगायचा मुद्दा हा, की काव्याच्या शेवटी स्वत:चे नाव गुंफण्याचा 'मक्ता' फक्त गजलकारांचाच आहे असे नाही, संतकवींचाही तितकाच आहे.

- उमेश करंबेळकर

('राजहंस ग्रंथवेध' एप्रिल 2018 वरून उद्धृत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.