आपोआप


मानवी शरीरात काही क्रिया त्याच्या नकळत, सहजासहजी, सतत घडत असतात. त्यासाठी त्याला खास काही करावे लागत नाही. जसे की हृदयाचे ठोके, अन्नाचे पचन होण्यासाठी होणारी आतड्यांची हालचाल, श्वासोच्छ्वास, पापण्यांची हालचाल वगैरे. ह्या क्रिया आपोआप घडतात.

'आपोआप' हा शब्द कसा आला असेल, यावर विचार करताना 'ज्ञानेश्वरी'त आठव्या अध्यायात -

'आंतु मीनलेनि मनोधर्मे । स्वरूपप्राप्तीचेनी प्रेमें ।
आपेंआप संभ्रमें । मिळावया ॥ ८.९३ ॥’

ही ओवी वाचनात आली. तेथे 'आपेंआप' असा शब्द दिसला. त्या ओवीचा 'आत सर्व मनोवृत्ती एकरूप झाल्याने, स्वरूपप्राप्तीच्या प्रेमाने, स्वरूपाशी ऐक्य होण्याकरता आपोआप झालेल्या घाईने’ असा अर्थ दिला आहे.

'आपेंआप' म्हणजे 'आपोआप' हे सरळ दिसत आहे. ज्ञानेश्वरांनी 'आपेंआप' असा शब्दप्रयोग का केला असावा? एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा! नंतरच्या काळात त्याचे 'आपोआप' हे रूप रूढ झाले असावे, असे मला वाटते.

आपोआपला इंग्रजीत Automatic असा शब्द आहे. त्यावरून पुलंच्या 'हसवणूक' या पुस्तकातील 'मी आणि माझा शत्रुपक्ष' हा लेख आठवला.

शिकारी हा पुलंच्या शत्रुपक्षातील आघाडीचा शत्रू. त्याच्यानंतर शत्रू नंबर दोन म्हणजे नवीन घर बांधलेले किंवा बांधकाम चालू असताना साईट दाखवणारे लोक. असा शत्रू नंबर दोन म्हणजेच एक घरमालक त्याने त्याच्या घरात केलेल्या विविध करामती पुलंना दाखवत होता. त्याच्या घरातील प्रत्येक गोष्ट 'आपोआप' होत असे. त्याने ऑटोमॅटिक ग्राईंडर, ऑटोमॅटिक चूल अशा बऱ्याच ऑटोमॅटिक गोष्टी दाखवल्यानंतर, तो त्याच्या संडासच्या उंबऱ्यावर उभा राहून, ''आणि हा संडास'’ असे म्हणतो. तेव्हा, पुलंनी ''काहो? येथेही ऑटोमॅटिक होतं, का कुंथावं लागतं?’’ असे विचारून त्या शत्रूचा, घरातही नाही आणि परसातही नाही, खोली आहे पण रूंदी नाही अशा स्थळाच्या उंबऱ्यावर, हिरण्यकशिपूसारखा शब्दाने का होईना कोथळा बाहेर काढला.

पुलंचे विनोद हे मुद्दाम जुळवलेले किंवा ठरवून केलेले नसतात. ते असे उत्स्फूर्त असतात. विनोद ही पुलंची सहज प्रवृत्ती होती. त्यामुळे ते असे आपोआप तयार होतात, जसा 'आपेंआप’पासून 'आपोआप' शब्द तयार झाला.

- उमेश करंबेळकर

('राजहंस ग्रंथवेध' मे 2018 मधून उद्धृत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.