तेंडुलकर यांच्या पटकथा लेखनाची उपेक्षा झाली!


_VIjay_Tendulkar_Screenplay_1.jpgनाटकवेड्या महाराष्ट्राने आणि तेंडुलकरप्रेमी नाटकवाल्यांनीही विजय तेंडुलकर यांचे चित्रपटलेखन कधी गांभीर्याने लक्षात घेतले नाही. महाराष्ट्रानेच जर तेंडुलकर यांच्या चित्रपटकथालेखनाची दखल घेतली नाही तर उर्वरित हिंदुस्तान ती कशाला घेईल? एकाच कलावंत माणसाबद्दल त्याच्या नाटक लिहिण्यासाठी आदर आणि चित्रपटकार्यासाठी अनुल्लेख हे पाहून मला आश्चर्यच वाटले! तेंडुलकर यांनी पैसे कमावण्याच्या हेतूने चित्रपटलेखन केले असेल. तेंडुलकर म्हणत असत, की त्यांच्या डोक्यात नाटक लिहिताना पैसे कमावावे हा विचार नसे. चित्रपट लिहिताना मात्र धन मिळवावे एवढाच हेतू असे. तेंडुलकरांचा कदाचित तो विनयही म्हणता येईल. पण मग मनात प्रश्न असा येतो, की त्यांची पटकथा-संवाद असलेला ‘अर्धसत्य’ पाहिल्यानंतर राजकपूरने त्याच्यासाठी पटकथा लिहिण्यास तेंडुलकर यांना बोलावले; तेव्हा त्यांनी राजकपूरच्या नावे होत्या त्या प्रकारच्या लोकप्रिय, बाजारू धर्तीच्या लेखनास नकार का दिला? तेंडुलकर यांनी चित्रपटांचा कला-अभ्यास सूक्ष्मतेने केला होता. तेंडुलकर ‘प्रभात’चे चित्रपट प्रकाशित झाले त्या काळात शाळकरी विद्यार्थी होते. पण त्यांनी ‘माणूस’, ‘कुंकू’, ‘तुकाराम’, ‘ज्ञानेश्वर’ हे चित्रपट त्या माध्यमाची आवड व ओढ आहे म्हणून पाहिले. त्यांनीच मला तसे एकदा सांगितले होते. तितकेच नव्हे तर ‘प्रभात’च्या चित्रपटांच्या डीव्हीडी पुढे आल्या तेव्हा त्यांनी सर्व अभिजात चित्रपटांच्या डीव्हीडींचा संच खरेदी करून ठेवला होता. त्यांनी ‘प्रभात’च्या ‘ज्ञानेश्वर’ या चित्रपटावर रसपूर्ण लिहिलेदेखील आहे.

तेंडुलकर ‘मराठा’ दैनिकाच्या रविवार पुरवणीचे संपादक म्हणून 1962 साली आले, तेव्हा मी तेथे सिनेमाचा कॉलम लिहीत होतो. त्यामुळे तेंडुलकर यांच्याशी गप्पा सिनेमावर व्हायच्या. ‘फिल्म फोरम’ ही फिल्म सोसायटी 1964 साली सुरू झाली, तेव्हा ‘फिल्म फोरम’चे खेळ वरळीच्या रॅमनॉर्ड लॅबोरेटरीत व्हायचे. ‘मराठा’चे कार्यालय रॅमनॉर्डच्या मागील रस्त्यावर होते. मी ‘फोरम’चा सदस्य असल्याने त्यांच्या खेळांना जात असे. तेंडुलकरही स्वतः सभासदत्वाचा फॉर्म भरून सभासद झाले होते. रशियन दिग्दर्शक चुखराय यांचा गाजलेला ‘क्लियर स्काय’ हा चित्रपट होता. ते मला खेळ सुटल्यावर भेटले तेव्हा म्हणाले, “मला काय ठाऊक तुम्ही पण इकडे येणार आहात?” तो रशियन चित्रपट पाहून मी तर मंत्रमुग्ध झालो होतो. तेंडुलकरही त्याच मनोवस्थेत होते. तेंडुलकर बस स्टॉपवर बस येईपर्यंत चित्रपटाविषयी बोलत होते. मी ‘मराठा’त इंग्रजी सिनेमावर साप्ताहिक कॉलम लिहिण्यास सुरुवात केली. तेंडुलकर एके दिवशी मला म्हणाले, ‘काय हो, मी तुमचा तो कॉलम लिहिला तर चालेल का?’ मी उत्तरलो, ‘अवश्य!’ पुढील आठवड्यापासून तेंडुलकर यांनी तो कॉलम लिहिण्यास सुरुवात केली. असे त्यांचे चित्रपटप्रेम होते. त्यात अर्थव्यवहार गुंतलेला मला जाणवला नव्हता.

त्यांचा हेतू विदेशी चित्रपटाच्या पटकथांचा अभ्यास करणे हा त्यामागील होता हे मला नंतर कळले. तेंडुलकर यांचा तो कॉलम चांगल्यापैकी लोकप्रिय झाला. ‘गन्स ऑफ नॅव्हारोने’ हा चित्रपट ‘रेक्स’ थिएटरमध्ये चाळिसाव्या आठवड्यात जोरात सुरू होता. म्हणून त्याची बातमी टाकताना तेंडुलकर यांनी हेडिंग दिले, ‘नॅव्हारोनेच्या तोफा अजून धडाडतच आहेत!’ त्याच काळात अनंत माने दिग्दर्शित ‘मानिनी’ हा चित्रपट प्रकाशित होणार होता. ‘मानिनी’ हा चित्रपट महादेवशास्त्री जोशी यांच्या लघुकथेवर बेतलेला आहे. त्याची पटकथा व्यंकटेश माडगूळकर यांची आहे. ‘मानिनी’ चित्रपटही तुफान यशस्वी झाला. तेंडुलकर मला म्हणाले, ‘मला तो बघायचा आहे.’ मी माझे आणि त्यांचे अशी दोन तिकिटे सिनेमाची मागवली. आम्ही ‘मानिनी’ पाहण्यास सेंट्रल सिनेमाला गेलो. ‘मानिनी’ची (जयश्री गडकर) आई मरण पावते आणि मानिनीचा अपमान बहिणीच्या लग्नात होतो आणि ती तिच्या नवर्‍याच्या घरी निघून जाते. तेथे इंटरव्हल होते.
तेंडुलकर मध्यंतरात मला म्हणाले, ‘आता ‘मानिनी’ची मृत आई तिला भेटण्यास येणार. झाले तसेच. मध्यंतरानंतर मानिनीला तिची आई भूत होऊन भेटते. आई भूत होऊन येणे ही मराठीतील प्रेक्षकांना खेचून घेण्याची लोकप्रिय क्लृप्ती. तेव्हा एक गोष्ट माझ्या ध्यानी आली, की तेंडुलकर पटकथा सूक्ष्मतेने अभ्यासतात.

तेंडुलकर यांना चित्रपट माध्यम प्रिय होते. आम्ही मुंबईचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मामी) 1997 साली सुरू केला. तेव्हा तेंडुलकर वर्गणी भरून प्रतिनिधी व्हायचे आणि पहिल्या दिवशी माझ्याकडे यायचे. महोत्सवाचे टाइम टेबल माझ्यासमोर ठेवून म्हणायचे, कोणते महत्त्वाचे चित्रपट आहेत त्यावर खुणा करा. मी महोत्सवाचा आर्टिस्टिक डायरेक्टर होतो. त्यामुळे मी सर्व चित्रपट आधी निवड समितीत पाहिलेले असत. त्यामुळे तेंडुलकर शिफारस करण्यास सुचवायचे. एकदा, त्यांनी माझे कौतुक केले. ‘अहो, तुमच्यामुळे जगातील उत्तमोत्तम चित्रपट आम्हाला येथे पाहण्यास मिळतात.’

मी ‘मामी’मध्ये महोत्सवाला दहा वर्षें होईपर्यंत (2008) होतो. ‘मामी’मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांची स्पर्धा सुरू केली होती. त्यासाठी दरवर्षी ज्युरी निवडायचे आणि ज्युरी चेअरमन जाहीर करायचा असा प्रघात होता. गिरिष कर्नाड, अदूर गोपालकृष्णन इत्यादी ज्युरी चेअरमन झाल्यावर नवव्या वर्षी मी तेंडुलकर यांच्याकडे गेलो आणि त्यांना त्या वर्षी ज्युरीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. तेंडुलकर यांनी ती मान्य केली. तेंडुलकर यांनी चेअरमनपद स्वीकारल्यानंतर मी सर्व वृत्तपत्रांना बातमी पाठवून दिली, पण एकाही मराठी वृत्तपत्राने ती बातमी छापली नाही. कारण उघड आहे. चित्रपट महोत्सव हा अजूनही मराठी माणसाला त्याच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग वाटत नाही आणि त्याहीपेक्षा तेंडुलकर यांचे चित्रपटातील लेखनकर्तृत्व किती मोलाचे आहे याबद्दल मराठी माणसास व मीडियासही माहीत नाही, तत्संबंधी औत्सुक्यही नाही. ‘कान्स’ महोत्सवात ज्युरी चेअरमन कोण आहे याची बातमी युरोपातील दैनिके सहा महिने आधी छापतात!

आम्ही तेंडुलकरांना साठ वर्षें झाली त्यानिमित्त ‘प्रभात चित्र मंडळा’तर्फे त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले, ते त्यांच्या अविस्मरणीय चित्रपटांमुळेच. त्यांनी सत्कार स्वीकारण्याचे मान्य केले. मी सत्कारानिमित्त तुमचा कोणता चित्रपट दाखवावा असे त्यांना विचारताच ते म्हणाले, ‘सामना’! त्याचे कारण असावे, त्यांनी तो चित्रपट जसा लिहिला तसाच चित्रित झाला आहे. सकाळी ‘सामना’चा खेळ आणि संध्याकाळी सत्कार! सत्काराचा कार्यक्रम हारतुरे व भाषणे असा पारंपरिक नव्हता तर तेंडुलकर यांची मुलाखत आणि त्यांच्या चित्रपट कारकिर्दीवर प्रकाश टाकणे हा मुलाखतीचा विषय होता. तेंडुलकर त्या मुलाखतीत म्हणाले, “लेखकापेक्षा दिग्दर्शक हा चित्रपटाचा कर्ताकरविता मानला जातो. स्वाभाविकच, दिग्दर्शक लेखकाची पटकथा जशीच्या तशी स्वीकारतो असे होत नाही. चर्चेच्या वेळी जर दिग्दर्शकाने बदल सुचवले तर ठीक आहे, पण अनेकदा, चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शक स्वतःहून बदल करतो. त्यातील काही बदल लेखकाच्या मूळ संहितेशी सुसंगत नसतात. पण एकदा चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे हे मान्य केल्यावर त्याविषयी तक्रार करण्यात काही अर्थ नाही.”

सत्यजित राय एके ठिकाणी लिहितात, अमेरिकन दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांचे चित्रपट बुचमन हा लेखक लिहायचा. त्यामुळे पन्नास टक्के यश लेखकाचे का मानू नये? त्याचप्रमाणे चित्रपटातील यश निश्चितपणे पन्नास टक्के तेंडुलकर यांचे मानण्यास हवे.

_VIjay_Tendulkar_Screenplay_2.jpgतेंडुलकर यांनी पहिली पटकथा लिहिली, ती हिंदी सिनेमा ‘प्रार्थना’ची. त्याचे निर्माता-दिग्दर्शक होते, वसंतराव जोगळेकर! वसंतराव मराठी असूनही त्यांची कारकीर्द हिंदी सिनेमात अधिक आहे. तसे असूनही हिंदी सिनेमा लिहिण्यास ते मराठी लेखकाला निमंत्रित करायचे. तसेच, त्यांनी विजय तेंडुलकर यांना ‘प्रार्थना’साठी बोलावले होते. पण ‘प्रार्थना’ सिनेमा पूर्णतः विसरला गेला आहे. तो काही श्रेष्ठ सिनेमा नव्हता. तेंडुलकर यांनी सिनेमाची दुसरी पटकथा लिहिली ती ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या सिनेमाची. दिग्दर्शक होते सत्यदेव दुबे आणि छायालेखक - गोविंद निहलानी. तो तेंडुलकर यांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या लोकप्रिय नाटकाचा रुपेरी पडद्यावरचा आविष्कार होता. कलावंतही नाटकातीलच होते.

‘सामना’ ही तेंडुलकरांची पहिली स्वतंत्र पटकथा! निर्माते - रामदास फुटाणे आणि दिग्दर्शक - जब्बार पटेल. पटेल यांचा तो पहिलाच चित्रपट. तेंडुलकर यांनी लिहिलेल्या पटकथालेखनात जराही बदल न करता तो चित्रित करण्यात आला. येथे एक महत्त्वाची नोंद करायला हवी. वास्तविक नाटककार तेंडुलकर ‘सामना’च्या कथेवर नाटक लिहू शकले असते. पण तेंडुलकर यांना नाटकासाठी कोणता विषय योग्य, चित्रपटासाठी कोणता याचे तारतम्य होते. तेंडुलकर यांच्या प्रतिभेला कोणते कथानक शब्दमाध्यम नाटकासाठी घ्यायचे आणि कोणते प्रतिमामाध्यम सिनेमासाठी घ्यायचे याची जाण होती. म्हणून त्यांनी ‘सामना’च्या कथानकावर नाटक न लिहिता चित्रपट लिहिला. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर (1960 ) महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू झाले आणि पुढील दहा-बारा वर्षांत सहकार चळवळीने पैशांच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकला. ‘सामना’चा नायक हिंदुराव पाटील (निळू फुले) हा साखरसम्राट पैसा आणि सत्ता यांच्या मिळकतीतून विरोधकांना सफा करतो, पण तरीही तो खलनायक नाही. त्याची इच्छा काही चांगले त्यांच्या हातून घडावे अशी आहे आणि योगायोगाने, गांधीवादी मास्तर (डॉ. लागू) त्याला भेटतात. अल्पशिक्षित हिंदुरावला बौद्धिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असणाऱ्या मास्तरांचे सहकार्य हवे असते. त्यांचा एक संवाद गमतीदार आहे.

हिंदुराव : मास्तर आपण एक कॉलेज काढू. त्या कॉलेजची लायब्ररी इतकी मोठी करू की पुण्या-मुंबईचे लोक अभ्यासासाठी तेथे यायला पाहिजेत.

मास्तर : हे सगळं ऐकून माझं डोकं गरगरायला लागलं आहे.

साखरसम्राट हिंदुरावचे व्यक्तिचित्रण या संवादातून तेंडुलकरांनी अचूक साधले आहे. मास्तर आणि हिंदुराव यांची जुगलबंदी अशा तिरकस संवादांतून चालते. ‘सामना’द्वारा तेंडुलकरांनी साखर कारखानदारांनी सहकारातून जमवलेली संपत्ती आणि सत्ता यांचे यथार्थ चित्रण केले. तोपर्यंत मराठी साहित्यात साखरसम्राटांचे वास्तव चित्रण झालेले नव्हते.

तेंडुलकर यांनी त्यांचा दुसरा चित्रपट ‘सिंहासन’ अरुण साधू यांच्या दोन कादंबऱ्यांवर बेतला. तेंडुलकर त्यात साधू यांच्या कादंबऱ्यांच्या पुढे कितीतरी गेले आहेत! महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यातील पांढरे बगळे यांचे चित्रण सिनेमात पहिल्यांदाच आले. त्या चित्रपटाचेही दिग्दर्शक पटेलच होते.

_VIjay_Tendulkar_Screenplay_3.jpgतेंडुलकर यांनी लिहिलेला आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला तिसरा चित्रपट - ‘उंबरठा’. तो शांता निसळ यांच्या ‘बेघर’ कथेवर आधारित होता. वास्तविक, ‘उंबरठा’च्या आधीच ‘बेघर’वर आधारित वसंत कानेटकर यांनी ‘पंखांना ओढ पावलांची’ हे नाटक लिहून रंगभूमीवर आले होते. ती एका महिलेची कहाणी आहे याचा बोध नाटकाच्या नावातूनच होतो. तेंडुलकर यांनी त्या व्यक्तिगत कथेला स्त्रीमुक्ती चळवळीची डूब देऊन कथा सार्वकालिक केली. ‘उंबरठा’ 1982 साली प्रकाशित झाला. त्याआधी, म्हणजे 1980 च्या आसपास स्त्री-मुक्ती चळवळीसाठी अनेक महिला संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्या होत्या. स्त्री-मुक्तीचा आवाज सर्वसामान्य सुशिक्षित माणसापर्यंत पोचलेला होता. तेंडुलकर यांनी ते सामाजिक परिमाण मूळ कथेला जोडल्यामुळे ‘उंबरठा’ व्यक्तीकडून समष्टीकडे गेला. स्मिता पाटील यांनी रंगवलेली सुलभा महाजनची व्यक्तिरेखा मराठी चित्रपटात अविस्मरणीय ठरली. कानेटकर यांचे ‘पंखांना ओढ पावलांची’ हे नाटक नंतर विस्मृतीत गेले, पण ‘उंबरठा’ मराठी सिनेमातील मैलाचा दगड बनून राहिला आहे.

मराठीत व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘कुंकू’पासून महिलांचे प्रश्न मांडण्यास सुरुवात झाली. ‘कुंकू’ एकांगी नव्हता, तसाच ‘उंबरठा’ हादेखील सामाजिक समस्येला स्पर्श करणारा असला तरी काळाच्या पुढे होता. पुण्याला ‘उंबरठा’चे उद्घाटन करताना पु.ल. देशपांडे भाषणात म्हणाले होते, “एक सामाजिक समस्या जेव्हा संपुष्टात येते तेव्हा त्यांतून नवी समस्या उभी राहते. त्याच्याशी सामना करावा लागतो.” ते चित्रण ‘उंबरठा’मध्ये प्रकर्षाने प्रत्ययाला येते. सुलभा महाजन जेव्हा नवरा व मुलगी यांना सोडून घरातून बाहेर पडते, तेव्हा इब्सेनच्या नोराप्रमाणे ती बंडखोरी नसते तर ती तिची स्वतःचे वेगळेपण टिकवण्याची, ‘स्वत्व’ जपण्याची धडपड असते.

तेंडुलकर यांनी लिहिलेल्या एवढ्या तीन पटकथांचा विचार केला तरी तेंडुलकर किती श्रेष्ठ पटकथाकार होते त्याचा अनुभव येतो. फ्रान्समध्ये त्रुफाने सिनेमातील ‘न्यू वेव्ह’ ही चळवळ जन्माला घातली आणि सिनेमात ‘ऑतेअर थिअरी’ प्रचलित झाली. त्रुफाची ती आवडती थिअरी होती. त्या थिअरीचा अर्थ असा, की चित्रपटाचा दिग्दर्शक हाच सिनेमाचा लेखक (Author) असतो. जगातील श्रेष्ठ दिग्दर्शकांनी स्वतःच्या चित्रपटांच्या पटकथा स्वतः लिहिल्या. त्रुफाची ती ‘ऑतेअर थिअरी’ मराठीत कोणा दिग्दर्शकाने अवलंबली नाही, पण तेंडुलकरांच्या प्रतिभेने पटकथा लेखक सिनेमाला कलात्मक श्रेष्ठत्व बहाल कसे करू शकतो हे दाखवून दिले. तेंडुलकर यांच्या लेखनाने या नव्या माध्यमाच्या कक्षा रुंदावल्या. मराठीत नवे विषय मांडले गेले. ते तेंडुलकर यांचे पटकथा लेखक म्हणून श्रेष्ठत्व आहे. ते समजून घेतले गेले पाहिजे.

तेंडुलकर यांचा त्यांच्या हयातीत महाराष्ट्राने नाटककार म्हणून गौरव केला, पण त्यांच्या पटकथालेखनाकडे उपेक्षेने पाहिले. ती चूक आता सुधारावी. तेंडुलकर यांच्या पटकथा लेखनाचा अभ्यास अधिक डोळसपणे व्हावा.

- सुधीर नांदगावकर, cinesudhir@gmail.com

(‘रूपवाणी’ या ‘प्रभात चित्र मंडळा’च्या नियतकालिकातून उद्धृत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.