चोवीस लाखांतील एक! ईशा चव्हाण (Esha Chavan)


_Isha_Chavan_1.jpgईशा 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दुसरी आली तेव्हा मुंबईतील अंधेरीच्या ‘राजहंस विद्यालया’त शिकत होती. त्या स्पर्धेसाठी एकशेदहा देशांतून एकूण चोवीस लाख चित्रे आली होती. ईशा तिच्या वडिलांसोबत बक्षीस घेण्यासाठी दाएजीलोन (दक्षिण कोरिया) येथे गेली होती. तिच्या हातात परत येताना पारितोषिकाचा चषक आणि स्पर्धेत यशस्वी झालेले तिचे चित्र छापले असलेला टी-शर्ट होता. तिचे चित्र होते पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारे! त्या स्पर्धेनंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.

ईशा चव्हाणने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत काही कॉलेजांमध्ये अर्ज केले होते. त्यानंतर एकेदिवशी त्यांना फोन आला. तेथील काही रिप्रेझेन्टेटिव्ह मुंबईत आले होते. त्यांनी तिची मुलाखत घेतली. तिचे पोर्टफोलियो (तिने केलेले काम) त्यांनी पाहिले. त्याचवेळी तिची निवड झाल्याचे आणि तिच्या कामामुळे पन्नास टक्के शिष्यवृत्ती देणार आहोत असे त्यांनी कळवले. तसेच, पुढेही जर तिने त्यात सातत्य राखल्यास शिष्यवृत्ती मिळत राहील असेही सांगितले. अशाप्रकारे, तिने शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेच्या जॉर्जिया शहरातील ‘सव्हाना कला आणि डिझाइन’ या महाविद्यालयातून मेजर अॅनिमेशन आणि मायनर स्टोरी बोर्डिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिने ग्रेड चांगली राखल्यामुळे तिला ‘सव्हाना कॉलेज’कडून 2014 मध्ये शैक्षणिक ऑनर्स शिष्यवृत्ती, 2015 साली डीन्स लिस्ट शिष्यवृत्ती आणि हिअरेस्ट फाउंडेशन शिष्यवृत्ती मिळाली होती. तिला मास्टर्स करायचे आहे, परंतु अमेरिकेत वय वर्षें तेवीस पूर्ण झाल्यानंतर मास्टर्स करता येते. सध्या ती बावीस वर्षांची आहे. आता तिने तेथील कॉलेजांमध्ये अर्ज देण्यास सुरुवात केली आहे. तेथे प्रवेश फेब्रुवारीत सुरू होतात.

ईशा सध्या लॉस एंजिलिसला एकटी राहते. तेथील एका कंपनीत ‘ग्राफिक डिझाईन’चे काम करते. तिने युएसएफ स्कूलमध्ये मीडिया प्रतिनिधी, बर्नार्ड गावात स्थानिक सहाय्यक म्हणून, तर अनेक आर्टस आणि सायन्स प्रोजेक्ट्समध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी उचलली आहे. तेथे ती स्वयंसेवी संस्थेतर्फे अनाथ, अपंग, गरीब मुलांकरता फंड उभारण्याचे  कार्यही करते. अमेरिकेत शनिवार-रविवार सुट्टीमध्ये तेथील गरीब मुलांसाठी स्पर्धा आणि वर्कशॉप आयोजित केले जातात. त्यामध्ये ती लहान मुलांना शिकवते.

तिचे आईवडील भारतात मुंबईतील ‘बेस्ट’ वसाहतीत राहतात. ईशाने प्रगतीच्या ज्या कक्षा ओलांडल्या आहेत, त्या आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. तिने चित्रकलेची दोनशेपन्नासहून अधिक पारितोषिके मिळवली आहेत. त्यातील तीस आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील आहेत. ईशा इथिओपियातील आदिसबाबा येथील कला संस्थेने घेतलेल्या नव्वदाव्या वार्षिक स्पर्धेत तिसरी आली होती. ईशा इंग्लंड, नॉर्वे, अमेरिका, मॅसेडोनिया, पोलंड, इजिप्त या देशांमध्ये झालेल्या विविध स्पर्धांमध्ये चमकली आहे. आणखी एका पारितोषिकाचा विशेष उल्लेख केला पाहिजे. तो म्हणजे ईशाने काढलेल्या गणेशोत्सवाच्या चित्राला ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने घेतलेल्या स्पर्धेत मिळालेल्या पारितोषिकाचा. तिचा भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम ऑक्टोबर 2010 जो पंधरा दिवस गुवाहाटी (आसाम) येथे पार पडला त्यामध्ये देशातील युवा कलाकारांत समावेश होता. त्यावेळी ती गोरेगाव येथील गोरे स्मारक ट्रस्ट मृणाल गोरे यांच्या संस्थेत सुट्टीत लहान मुलांना मार्गदर्शन करत असे.

_Isha_Chavan_2.jpgईशाने तिचे पहिले चित्र (पालीचे) भिंतीवर रेखाटले तेव्हा ती दीड वर्षांची होती आणि तिचा जागतिक स्तरावरील पहिला सन्मान वयाच्या तेराव्या वर्षी झाला होता. मनात एखादा विषय येण्याचा अवकाश त्याला लगेच चित्रस्वरूप देण्याचा तिला जणू छंदच जडला आहे! ती चित्रे काढू लागली, की त्यात मग्न होऊन जाते, ती कला त्या मुलीला दैवी देणगी आहे. ती ज्या आत्मविश्वासाने चित्र रेखाटते, ते रंगवताना त्यात दंग होते, हे तिचे खास वैशिष्ट्य आहे. तुझे ध्येय काय आहे असे विचारले तर त्याचे उत्तर ईशा देते, “मी कलेच्या क्षेत्रात रमते आणि चित्रकार होऊन त्याच क्षेत्रात विशिष्ट योगदान द्यावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या कलेचा उपयोग पर्यावरण रक्षणासाठी आणि जगभरात शांततेचा संदेश देण्यासाठी व्हावा, असे मला मनापासून वाटते आणि म्हणूनच पर्यावरणासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जाहीर झाल्यावर मी त्यात भाग अहमहमिकेने घ्यायचा असे ठरवले. मी मनात आलेल्या विचारांनुसार चित्र रेखाटत गेले.” तेथील शिक्षण आणि भारतातील शिक्षण यात बरीच तफावत आहे. त्यामुळे तेथे गेल्यावर प्रथम सर्व सॉफ्टवेअर शिकवली जातात तेथे हातानेही काम करावे लागते. त्याकरता विशेष मेहनत घ्यावी लागते. भारतात अजूनही बाहेरच्याप्रमाणे अॅनिमेटेड फिल्मस बनत नाहीत. अॅनिमेशनमध्ये शिकून तिला भारतात कार्य करण्याची इच्छा आहे.

ईशाचे वडील नितिनचंद्र गोविंद चव्हाण आणि आई नेहा, या दोघांचाही तिच्या यशात वाटा आहे. आईने स्वत:ला मुलीच्या प्रगतीत आणि कीर्तीत समर्पित केले आहे. तिची आई ग्राफिक डिझायनर आहे. तिचे वडील ‘मोंटाज लिमिटेड’ या संस्थेत हेड आॅफ सेल्स आणि मार्केटिंग मॅनेजर आहेत. त्यांना तेथील कामासाठी दौऱ्यांवरही जावे लागते. त्यांचेही ईशाच्या सर्वांगीण प्रगतीकडे पुरेसे लक्ष असते.

नितिनचंद्र चव्हाण यांनी सांगितलेली तिच्या बालपणीची एक आगळी कथा - ‘तारे जमींपर’ या आमीर खान यांच्या चित्रपटाकरता काही बालचित्रकारांना बोलावण्यात आले होते. ईशाच्या आईने “ईशा चित्रपटात काम करू इच्छित नाही” असे सांगितले तेव्हा, “चित्रपटात भूमिका करायची नाही! परंतु त्यातील एक-दोन प्रसंगांसाठी चित्रे काढायची आहेत. त्यासाठी कृपा करून कन्येला पाठवावे” अशी विनवणी निर्मात्यांच्या वतीने करण्यात आली. ईशाने चित्रे रेखाटून दिली, परंतु चित्रे रेखाटण्यापूर्वी जमलेल्या बालचित्रकारांकडून, “आम्ही या चित्रांबद्दल कोणतीही आर्थिक मागणी करणार नाही” असे लिहून घेण्यात आले होते, मात्र चित्रपटांतील नामांकनाच्या यादीत तुमच्या नावाचा समावेश होईल असे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्या आश्वासनालाही हरताळ फासण्यात आला. नामांकन यादीत चित्रकारांची (ईशाचेही) नावे वगळण्यात आली. एवढेच नव्हे तर चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा उपस्थित राहण्याचे कोरडे आमंत्रणही देण्यात आले नाही.

त्यांनी ईशाला देशोदेशी मिळालेली शिफारसपत्रे मोठ्या अल्बममध्ये क्रमवार लावली आहेत. त्यांचे निरीक्षण हासुद्धा आनंदाचा व सुखकारक विषय आहे.

नितिनचंद्रांचा धाकटा इनेश चित्रपटांत, मालिकांत काम करत होता. पण शिक्षणाकडे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, भागणार नाही अशी जाणीव त्याच्यात निर्माण झाली. तो सध्या चेन्नईला आहे. तो एस.आर.एम युनिव्हर्सिटी मधून विद्युत अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे.

ईशा चव्हाण, echava21@student.scad.edu

– नितेश शिंदे, info@thinkmaharashtra.com

लेखी अभिप्राय

ईशाचं
मन:पूर्वक
अभिनंदन!

Shyam Pendhari21/11/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.