रावणदहन आणि रामायणातील वास्तव विचक्षण


_Ravan_Dahan_1.jpgरावणदहनाची परंपरा ही फार जुनी नाही. होळीचे संदर्भ जसे प्राचीन काळापासून संस्कृत आणि प्राकृत वाङ्मयातून येतात तसे रावणदहनाचे येत नाहीत. रावणदहन ही परंपरा मध्ययुगातील आहे. ती भारतात कित्येक प्रांतांमधून दिसत नाही. ती प्रथा प्रामुख्याने उत्तर भारतात, विशेषतः नर्मदेच्या पलीकडे आढळत होती. सोने – आपट्याची पाने लुटण्याची प्रथा महाराष्ट्रात होती.

प्रा. रामानुजम यांच्या अनेक रामायणांचा परामर्श घेणाऱ्या पुस्तकावरून काही वर्षांपूर्वी दिल्ली विश्वविद्यालयात गदारोळ माजला होता. त्यातून महत्त्वाची गोष्ट पुढे आली, ती म्हणजे भारतात प्रांतागणिक रामायणे आहेत. तशीच ती भारताबाहेर लंकेपासून कंबोडियापर्यंत आहेत. त्या विविध रामायण संहितांमधे काही ठरावीक पात्रे सोडली तर कथानकांत एकवाक्यता नाही. प्रत्येक ठिकाणी आणि जवळपास प्रत्येक संहितेत रामायणातील व्यक्तिविशेष आणि घटनाविशेष यांच्या वर्णनात फरक आलेले आहेत. जैनांच्या रामकथेत तर सीता ही रामाची बहीण मानली गेली आहे!

सीताहरण हाही विवादास्पद मुद्दा आहे. रावणाची महती त्याने सीतेला पळवून नेली पण तिच्यावर बलात्कार केला नाही अशी सांगितली जाते. तो विपर्यास आहे. रावणाने सीतेवर बलात्कार केला नाही. कारण त्याने एका साध्वीवर, वेदवतीवर बळजबरी केली असता तिने त्याल्या शाप दिला. त्याला ती भीती होती. सीताहरणाची घटना ही भारतीयांच्या मनाला न पटणारी घटना आहे. वाल्मिकी रामायणाप्रमाणे सीताहरण झाले होते, हे नंतरच्या रामायणकारांना नाकारता आलेले नाही. काही रामायण लेखकांनी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्याचे ठळक उदाहरण ब्रह्मांड पुराणाचा भाग असलेले अध्यात्म रामायण हे आहे. रावणाचा अपवित्र स्पर्श ज्या सीतेला झाला ती माया सीता होती, खरी सीता नव्हती असा स्पष्ट उल्लेख युद्धकांडात अग्निपरीक्षेच्या वेळी आला आहे – “विधाय मायाजनकात्मजां” (अ.रा. युद्धकाण्ड १३.२१). तो मुद्दा नंतरच्या पिढ्यांना अधिकच भावला. मी स्वतः सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ऐकलेल्या जवळपास सर्व कीर्तनांमधून तो आवर्जून सांगितला गेलेला माझ्या स्मरणात आहे. रामायण संहितांतील त्या बदलांचे वेगळे ऐतिहासिक विश्लेषण करता येईल. मोहम्मद बीन कासीम याने बाटवाबाटवी सातव्या शतकात जेव्हा सुरू केली, महिलांचा अपहार सुरू केला तेव्हा देवल संहितेत एक पुरोगामी विचार मांडला गेला. तो अपह्रत स्त्रियांना हिंदुधर्मात परत घेणे हा होता. हिंदू समाजाला त्या प्रागतिक विचाराचा आणि आचाराचा विसर काही शतकांनी पडला, तेव्हा त्याला ‘माया सीते’चा पर्याय अधिक स्वीकारार्ह वाटला. सीता देवस्वरूप असल्याने तिला ‘मायाशरीर’ घेता आले. ज्या महिला अपह्रत होत्या त्यांना ते शक्य होणार नव्हते. त्यांना परत घेण्याची, स्वीकारण्याची मानसिकता त्यावेळच्या हिंदू समाजाची नव्हती. सावरकर यांनी ‘इतिहासाची सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात या गोष्टीचा ऊहापोह केला आहे. तसाच प्रकार ‘तुलसी रामायणा’त दिसतो. सीतेने तिला पळवून नेण्यास रावण आला आहे हे समजल्यावर त्याला जे सडेतोड उत्तर दिले, ते ऐकून रावणाला लाज वाटली. तुलसीदास तिच्यामध्ये ईश्वरी अंश असल्याची जाणीव होऊन तिला त्याने मनोमन नमस्कार केला असे लिहितात – ‘सुनत वचन दशशीश लजाना | मन महं चरणवंदि सुखमाना ||’ (अरण्य. ३.४५.८). वाल्मिकींना जी गोष्ट आहे तशी सांगताना संकोच वाटला नाही. ती नंतरच्या पिढ्यांतील रामायणकर्त्यांना त्यांच्या काळानुरूप बदलून सांगावी अशी वाटली. एका रामकथेत सीता ही रावणाची मुलगी आहे; इतकेच नव्हे तर, रामाला रावणाने गुप्तपणे जेवण्यास बोलावले अशी कथा आहे. रामायणात सुद्धा प्रक्षिप्त भाग आहेत. त्यांची नोंदसुद्धा आहे. बडोद्याच्या प्राच्य विद्या संस्थेने त्यांचा शैली आणि कालक्रम यांनुसार विचार करून रामायणाची संशोधित प्रत प्रसिद्ध केली आहे.

_Ravan_Dahan_3.jpgरामायणाची प्राचीन विस्तृत आवृत्ती अडीच हजार वर्षांपूर्वीची उपलब्ध असावी. भासाने रामायणावर दोन नाटके लिहिली. तो इसवी सन पूर्व चौथ्या शतकात होऊन गेला. त्यातील रामकथा रामायणातील काण्डांना धरून आहे. जैन आचार्य विमलसूरी यांनी इसवी सनाच्या पहिल्या शतकात प्राकृतात ‘पउमचरीय’ ही रामकथा लिहिली.  त्यात राम; तसेच, राक्षस दोन्ही जैनमतावलंबी दिले आहेत. बौद्ध वाङ्मयात दशरथ-जातकात रामकथा आली आहे. त्या वरून सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी आर्य -अनार्य असे काही विभाजन दिसत नाही. आपल्यासमोर रामायणाची जी तिलक टिकेसह प्रत असते तीच येथे विचारार्थ घेतली आहे. कारण त्याच रामायण संहितेवर इतर सर्व रामायणे बेतली आहेत. इतर रामायणांमधील काही कथा जरी लोकमानसात रूढ झाल्या असल्या तरी त्या जर प्रचलित वाल्मिकी रामायणात नमूद केल्या नसतील तर त्या अभ्यासकांसाठी मूळ संहिता म्हणून स्वीकारार्ह नाहीत. त्याचे अगदी ठळक उदाहरण म्हणजे शबरीने चाखून श्रीरामांना दिलेल्या बोरांची जी गोष्ट आहे ती वाल्मिकी आणि तुलसी या दोन्ही रामायणांत नाही. बोरांच्या गोष्टीला धरून उद्या एखाद्या बुद्धिमंताने दक्षिण भारतीय समाजात अतिथीला उष्टे खाण्यास देण्याची प्रथा होती असे दुसऱ्या कोणत्या रामायणाधारे प्रतिपादन केले तर ते बुद्धिभेदाचे उदाहरण ठरेल. रामायणाचा आणि रामायणातील व्यक्तिमत्त्वांचा विचार करायचा असेल तर प्रचलीत वाल्मिकी रामायण संहिता हाच प्रमाणित कथाभाग म्हणून मानायचा. इतर जी रामायणे आहेत ती स्थलकालानुरुप बदलली आहेत हे स्वीकारले पाहिजे.

रावण तर लंकेत होता, मग तो भारताचा कसा या प्रश्नाला उत्तर देताना एका वक्त्याने भारत आणि लंका एकत्र होते असे विधान केले. अर्थात ही ऐकीव माहिती त्याने समोरच्या वक्त्याला निरूत्तर करण्यासाठी ठोकून दिली. वास्तवात लंकेचा वेगळा भाग भूपृष्ठ चालनामुळे अंदाजे बारा कोटी वर्षांपूर्वी, भारतापासून भौगोलिक दृष्ट्या वेगळा झाला. त्यावेळी ना संस्कृती होती, ना मानवजात. लंकेचा भारताशी सांस्कृतिक दृष्ट्या संबंध अविभाज्य होता. कारण रावणापूर्वी त्याचा सावत्रभाऊ कुबेर याचे राज्य लंकेवर होते. ते रावणाने मागितल्यावर कुबेराने त्याला संघर्ष न करता दिले.

लंका कोठे होती या विषयी मतमतांतरे आहेत. विंध्य पर्वताखालील वर्णन त्यात नसल्याने ती मध्य प्रदेशाच्या आसपास होती असे काही पुरातत्त्वविदांचे मत होते. मी स्वत: मध्य प्रदेशात विदीशाजवळच ‘रावण’ नावाच्या गावाला गेलो आहे. तेथे रावणाचा पुतळा आहे. एका पुस्तकाप्रमाणे ती ‘मादागास्कर’ बेटे होती. तेथे प्रचलित लंका घेतली आहे. तसेही, वाली-सुग्रीवाचे आणि शबरीचे पंपा सरोवर केरळात आणि रामेश्वरम प्रचलित लंकेच्या जवळ आहे. ज्यांना लंका ही प्राचीन काळी भारताचा अविभाज्य भाग होता असे वाटते, त्यांना ते स्वीकारार्ह असावे.

पितृसत्ताक व पितृवंशिक आणि मातृसत्ताक (Matriarchy) व मातृवंशिक (Matrilineal) अशा दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. भलेभले अभ्यासक आणि विद्वान तो फरक समजून घेत नाहीत. पितृसत्ताक पद्धतीत वंश पित्याच्या नावाने पुढे जातो. त्या पद्धतीत निर्णयप्रक्रिया पुरुषांच्या हातात असते. मातृसत्ताक पद्धत कधी नव्हतीच; कारण महिलांच्या हातात राज्याचा काय पण सामुहिक जीवनातील कुटुंब परिवारासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार प्राचीनच काय पण आधुनिक काळापर्यंत नव्हता. त्यांतील दोन महत्त्वाच्या गोष्टी नमूद करतो. मी स्वतः सुमारे दहा हजार गुंफाचित्रे पाहून आणि भीमबेटकासारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास केला. त्या चित्रांमध्ये स्त्रीला त्या काळात समाजातील सर्वोच्च स्थान असावे असे कोठेही दिसले नाही. ज्या काही मानवाकृती आहेत, त्यात शिकार करणाऱ्या, नाच करणाऱ्या, शस्त्रधारी, घोडेस्वार अशा चित्रांमधे पुरुषी वर्चस्व दिसते. चुकून एखाद-दोन टक्के ज्या महिला दाखवल्या आहेत त्यांचा दर्जा दुय्यम दिसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही हजारो वर्षांपूर्वीपर्यंतच्या मिळालेल्या अवशेषांत महिलांच्या अस्थींवरून त्यांचे वयोमान तीस-पस्तीसच्या वर नसावे. त्यांचे आयुष्य त्या वयात आल्यापासून ते ऐन तिशीत त्या मृत होईपर्यंत गर्भधारणा व संगोपन यांतच व्यतीत होई. त्या शिकारीला जात असतील, टोळीचे नेतृत्व करत असतील किंवा राज्यशकट हाकत असतील याची शक्यता नगण्य आहे. केरळ किंवा ईशान्य भारत या प्रदेशांत ज्या प्रथा होत्या त्या मातृवंशिक होत्या आणि केरळातील थरवाड पद्धत त्याच प्रकारची होती, त्यात सत्ता तिचा भाऊ गाजवत असे. म्हणूनच तिच्या मुलीचे लग्न भावाशी लावून देण्याची प्रथा अस्तित्वात आली. स्वत:च्या मातेचे नाव सांगणारा ऋषी एकच, सत्यकाम जाबाल होता. तो पितृसत्ताक पद्धतीचा होता.

रामायणात रावणाची ओळख पुरूषसत्ताप्रधान आहे. मयासुराला त्याची ओळख करुन देताना तो – ‘अहं पौलस्त्यतनयो दशग्रीवश्च नामत:’ (उत्तरकाण्ड, १२.१५) पुलस्त्य वंशाचा दशग्रीव नावाचा – सांगतो. अरण्यकाण्डात त्याला ‘पौलस्त्य कुलनंदन’ (३२.२३) असे म्हटले आहे. सीतेचे अपहरण करून नेताना रावण तिला स्वतःची ओळख पितृवंशात्मक, कुबेराचा भाऊ अशी करून देतो. हे सर्व संदर्भ पाहता तो पितृसत्ताक पद्धत पाळणारा होता. त्याच्या भावांच्या पत्नीदेखील पितृसत्ताक पद्धतीतील होत्या. तो मातृसत्ताक किंवा मातृवंशिक पद्धत अनुसरणारा असता तर त्याची आई कैकसीच्या नावाने त्याने त्याची ओळख करून दिली असती. रावणाची मेघनाद इत्यादी मुले; त्यांचे निर्देश मंदोदरीपुत्र म्हणून निर्देश केले गेले असते. मातृसत्ताक पद्धतीप्रमाणे मंदोदरीच्या हाती राज्यकारभार राहिला असता. तिने रावणाच्या नाकदुऱ्या काढल्या नसत्या, अधिकार गाजवला असता.

रावण त्याच्या पित्याच्या वंशावरूनच (Patrilineal) ओळखला जात होता. एका वक्त्याने सांगितले, की कैकसीचे लग्न झाले नव्हते. तो अर्धवट ज्ञानाचा अथवा खोडसाळपणाचा प्रकार आहे. कुबेराच्या ऐश्वर्याने दिपलेला कैकसीचा पिता सुमाली, ‘भज विश्रवसं पुत्रि पौलस्त्यं वरय स्वयम्’ (उत्तरकाण्ड ९.१२) - कैकसीला विश्रव्याचा पती म्हणून स्वीकार कर असे सांगतो, अंगवस्त्र म्हणून नाही. विश्रव्याने तिला स्वीकारताना अंगवस्त्र म्हणून राहवे लागेल अशी अट घातली नव्हती.

रावणाला प्रजाहितदक्ष आणि अनार्यांचा कैवारी म्हणणे या सारखा विनोद नाही. रावण बलवान होता, तसाच तो बलात्कारी होता. तो स्त्रिया पळवताना भेदभाव करत नसे. ‘उच्छेत्तारं च धर्माणां परदाराभिमदर्शनम्’ (अरण्य ३२.१२) – रावण धर्मांचा नाश करणारा, परस्त्रियांचा बलात्कारी आणि हरण करणारा होता. त्याने वासुकी आणि तक्षक यांच्या राजपत्नींना पळवले होते (अरण्य ३२). त्याने नाग, राक्षस, असुर, यक्ष आणि दानव कन्या यांना (सर्व अनार्य) पळवले होते – एवं पन्नगकन्याश्च राक्षसासुर मानुषी: |  यक्ष दानव कन्याश्च विमाने सो S ध्यरोपयत || (उत्तरकाण्ड २४.३). विलाप करणारी मंदोदरी रावण – ‘देवासुरनृकन्यानां आहर्तारं ततस्तत:’ (युद्धकाण्ड १११.५३) –‘देव, असुर (अनार्य, मूलनिवासी?), मानव कन्यांना इकडून तिकडून पळवणारा’ असल्याची कबुली देते. रावण हा स्त्रीलंपट तर होताच, पण तो त्याच्या स्वतःच्या लोकांवरसुद्धा अत्याचार करत असे. रावणाने बहिणीच्या, शूर्पणखेच्या नवऱ्याचा वध केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी शूर्पणखेने त्याला सीतेची भुरळ घालून रामाकडून त्याला मारवला असे माझे मत आहे. कारण रावणाच्या मृत्यूनंतर विलाप करणाऱ्यांमध्ये त्याच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या शूर्पणखेचे नाव नाही.

अत्याचार करणारा तो एकटाच नव्हता. त्याचे सैनिक आणि सेनापती हेसुद्धा अनार्यांवर अत्याचार करणारे होते. मंदोदरीबरोबर विलाप करणाऱ्या राक्षस स्त्रिया म्हणतात – त्यांचे नवरे देव, असुर आणि नाग यांना (दोन्ही अनार्य) भीत नव्हते (युद्धकाण्ड ११०.१४). रावणाला दुष्कृत्यात साथ देणाऱ्या राक्षसांची नावे युद्धकाण्ड सर्ग ८ मध्ये दिली आहेत. कुंभकर्णाने तेच रावणाला चुकीचा सल्ला देत होते असा आरोप केला आहे.

_Ravan_Dahan_2.jpgरावणाला मूलनिवासी लोकांचा प्रतिनिधी म्हटले जात आहे. केरळातील प्रथा पाहिल्यास बली हा त्यांचा प्रतिनिधी ठरतो. ती परंपरा गेली शेकडो वर्षें केरळात पाळली जात आहे. वाली हा वानर म्हणून मूलनिवासींचा दुसरा बलाढ्य प्रतिनिधी ठरावा. रावणाने त्या दोघांवर स्वारी केली आणि सपाटून मार खाल्ला. त्यांतील चमत्काराचा भाग सोडून दिला तर रावण हा दिग्विजयी, अत्यंत शूर राजा होता या धारणेला धक्का बसतो. रावणाने देवांना जिंकले असे अनेकदा येते. ते त्याला मिळालेल्या वरांमुळे, स्वकर्तृत्वामुळे नाही. शिवाय, त्याची सत्ता किंवा नाव याचा मागमूसही विंध्याच्या पलीकडे दिसत नाही.

रावणाचे प्रतिनिधी, राक्षसांच्या उच्छादाविरोधात श्रीरामाकडे संरक्षण मागणाऱ्या वीस तपस्वींच्या यादीतील सर्व तपस्वी हे अवैदिक, यज्ञ न करणारे होते. त्यांची यादी अरण्यकाण्ड ६.२-५ मध्ये आहे. त्याचे अवैदिक तपप्रकार तिलक टीकेत दिले आहेत. खर, दूषण इत्यादी राक्षस विंध्य ओलांडून वैदिकांच्या प्रदेशात घुसलेले दिसत नाहीत. खरे सांगायचे तर आर्य-अनार्य वाद आणि त्यात रावणाला अनार्यांचा सम्राट समजणे हे अनेक पातळ्यांवर, अगदी वैज्ञानिक संशोधनातून सुद्धा खोटे ठरलेले आहे.

कुंभकर्णाने त्याची कान उघाडणी करताना (युद्धकाण्ड ६३) रावणाला आणि त्याच्या साथीदारांना दूषणे दिली आहेत. तो रावणाला दारू पिऊन आज मजा कर – ‘रमस्व राजन्पिब चाद्य वारुणी’ – असे उपहासाने म्हणतो. रावण दारुड्या होता हे त्यातून दिसते.

रावणाने कुबेराच्या दूताचे दोन तुकडे करुन राक्षसांना खायला घातले होते (उत्तरकाण्ड १३.३३). हे राजनीतीविरुद्ध होते. अशा ‘कर्कशं निरनुक्रोशं प्रजानां अहिते रतम्| रावणं सर्वभूतानां सर्वलोक भयावहम्’ (अरण्य ३२.२१) – ‘अत्यंत कठोर, लोकांचे अहित करणाऱ्या, सर्व लोकांना भयभीत करणाऱ्या’ राजाला आदर्श ठरवणारे कोणत्या आदर्शाच्या शोधात आहेत? की त्यांना स्वत:च्या सोयीचे, हिंदुविरोधी रामायण लिहायचे आहे?

रावणाने लंका सोन्याची केली, भरभराटीस आणली आणि म्हणून तो आदर्श राजा होता, हे म्हणणेसुद्धा निराधार आहे. देवांचा खजिनदार मानला गेलेला कुबेर हा यक्ष  सोन्याच्या लंकेचा अधिपती रावणाच्या पूर्वी होता. तेव्हा लंका सोन्याची बनवण्याचे कर्तृत्व कुबेराचे होते. कुबेराने भरभराटीस आणलेली,  – ‘अविभक्तं त्वया सार्धं राज्यं यच्चपि मे वसु’ (उत्तरकाण्ड ११.३३) - तेथे असलेल्या स्थावर जंगम मालमत्तेसह आणि उत्तम नगररचना केलेली ‘धनदेन परित्यक्तां सुविभक्त महापथाम्’ (उत्तरकाण्ड १२.४८) लंकानगरी रावणाच्या हवाली केली. रावण हा आयत्या बिळावर नागोबा होता. त्याचे अनुचर राक्षस लंकेत उद्योगी नव्हे तर खुशालचेंडू आणि ऐषारामी होते. मारीच रावणाचा धिक्कार करताना लंकेच्या राक्षसांचे जीवनवर्णन करतो- ‘क्रीडारति विधिज्ञानां समाजोत्सव दर्शिनाम्| रक्षसां चैव संतापमनर्थं चाहरिष्यसि||’ (अरण्यकाण्ड ३२.२८) – खेळ आणि भोगविलास एवढ्याच गोष्टी माहीत असलेल्या, सामाजिक उत्सव पाहण्यात मग्न झालेल्या राक्षसांसाठी तुम्ही (सीताहरणाचा) हा अनर्थ आणि संताप ओढवून घेत आहात.

रावणाची जी आर्थिक संपन्नता होती ती इतर प्रदेशांवर आक्रमण करून, स्थानिक लोकांची पिळवणूक करून, लुटालूट करून कशी वाढली असेल याचा इतिहासकाळातील दाखला पाहायचा असेल तर हजरत उमर, दुसरे खलिफा यांच्या कार्यकाळात अरबस्तानात आलेल्या समृद्धीच्या वर्णनाशी तो जुळतो असे मला दिसते. त्यासाठी शेषराव मोरे यांच्या ‘चार आदर्श खलिफा’ या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक २९८ ते ३०० आणि ३१६ ते ३२५ पृष्ठांवरील वर्णन पाहवे. रामायणात लंकेचे जे वर्णन आहे ते ऐतिहासिक दृष्ट्या गुप्तकाळातील भरभराटीस आलेल्या नगरांवर आधारलेले आहे असे काही अभ्यासकांचे मत आहे. त्याच्याशी मी सहमत आहे.

भारतीयांनी त्यांचे देव दर दीड-दोन हजार वर्षांच्या अंतराने बदलले आहेत. प्राक्-वैदिक काळात द्यौसपितर, नासत्य, अपांनपात असे देव, वैदिक काळात इंद्र, वरूण, रुद्र, अग्नी इत्यादी देव, उत्तर वैदिक काळात प्रजापती, शिव इत्यादी देव आणि सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी भागवत आणि शैव विचारसरणीचा उदय झाल्यावर विष्णू व त्याचे अवतार आणि शिव व त्याचे अवतार यांची पूजा सुरू झाली. त्याच दरम्यान ऋग्वेदकाळात  रक्षक असलेले गण नरभक्षक राक्षसांसारखे रंगवले गेले. खुद्द रावण सीतेला खांडोळ्या करून तिचे मांस भक्षण करण्याची धमकी देतो (अरण्य. ५६.२५ तसेच उत्तर.१३.३३). त्यामागील सामाजिक तथ्य असे, की नव्या पिढीच्या देवतांचे उन्नयन करताना जुन्या पिढीतील देवता, खलनायक ठरलेल्या राक्षसांसमोर कशा निष्प्रभ ठरल्या होत्या याची वर्णने इतिहास व पुराण साहित्यात येतात. प्रमुख देवांना भोळे ठरवून त्यांच्या कडून निरनिराळ्या अभयांचे वर पदरात पाडून, इतर देवादिकांना जिंकणाऱ्या राक्षसांची मालिका त्या साहित्यातून दिसते. त्यांना नामशेष करण्यामध्ये शैव आणि भागवत संप्रदायातील देव कसे यशस्वी ठरले ही वर्णने लिहून त्या देवतांना उच्च स्थानी प्रस्थापित करण्याचे कार्य पौराणिक साहित्यातून झाले. पौराणिक वाङ्मयात ठिकठिकाणचे देवदेवता यांचे उन्नयन करून भागवत आणि शैव अवतारांत सामावून घेऊन सर्वसमावेशकता आणि सामाजिक सौहार्द साधले गेले.

- डॉ. प्रमोद पाठक, drpvpathak@yahoo.co.in

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.