डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूपचे विस्तृत पर्यावरण कार्य


_Dolphin_Nature_1.jpeg‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’ ही सांगलीतील संस्था पर्यावरण संवर्धन व पर्यावरण जागृतीचे कार्य करते. संस्थेचे कार्य ‘इकोफ्रेंडली लाइफ स्टाइल’ लोकांनी स्वीकारावी यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरू आहे. संस्था युवा पिढीला निसर्गाशी जोडू पाहते. त्यासाठी ‘फ्रेंडशिप डे’सारखा दिवस निसर्गाशी मैत्री म्हणून संस्थेतर्फे साजरा केला जातो. माणूस निसर्गाला जे देऊ करतो, त्याच्या कितीतरी पटींनी जास्त निसर्ग त्याला परतफेड करत असतो. म्हणूनच संस्थेचा भर बीजारोपण व वृक्षारोपण यांच्या माध्यमातून हरित वैभव वाढवण्यावर आहे. एकूणच, ‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’चा उद्देश जैव साखळीचे संवर्धन करणे हा आहे.

‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’चे संस्थापक शशिकांत ऐनापुरे इलेक्ट्रिकल इंजिनीयर आहेत. ते रत्नागिरीमध्ये साखरपा येथे रयत शिक्षण संस्थेत ‘इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग’ हा विषय शिकवतात. त्यांनी निसर्गाचा अभ्यास छंद म्हणून आरंभला. त्यांचे वडील कै. प्रा. एस. डी. ऐनापुरे हे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. वडील अभ्यासाच्या निमित्ताने जंगलात जायचे, त्या संदर्भात लेखन करायचे. वडिलांबरोबर शशिकांतसुद्धा निसर्गाच्या सान्निध्यात जात. शशिकांत ऐनापुरे सांगतात, की “वडिलांमुळेच निसर्गाबद्दलची आस्था वाढत गेली. निसर्गाची विविध रूपे आणि मानवी हस्तक्षेप या दोन्ही गोष्टींचा जवळून अनुभव घेतला. त्यातूनच पर्यावरण संवर्धनाची तळमळ वाढत जाऊन पर्यावरण जागृतीच्या कामाला सुरुवात केली.”

‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’ या संस्थेची स्थापना 12 फेब्रुवारी 1997 रोजी झाली. प्रा. शशिकांत ऐनापुरे त्या संस्थेच्या स्थापनेमागील पार्श्वभूमी सांगतात, “पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला अाहे. ती परिस्थिती कायम राहिल्यास संपूर्ण सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येईल. यासाठी प्रशासनाला दोष देत बसण्यापेक्षा अापण प्रत्येकाने अापल्या हातून निसर्गाचा समतोल टिकवण्याचा प्रयत्न करायला हवा अाणि त्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करायला हवी या उद्देशाने ‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’ची स्थापना करण्यात अाली. सांगली जिल्ह्यामध्ये 1997 च्या काळात त्याबाबत सकारात्मक कार्य घडले नव्हते. त्यामुळे डॉल्फिन ग्रूपच्या माध्यमातून पर्यावरणवादी उपक्रमही राबवले जाऊ लागले. ग्रूपचे चाळीस निसर्गप्रेमी शिलेदार सक्रिय आहेत.”

_Dolphin_Nature_2.jpegसांगलीमध्ये ‘सागरेश्वर’ हे मानवनिर्मित अभयारण्य एक हजार सत्त्याऐंशी हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले आहे. त्या अभयारण्यात पावसाळा सोडला तर इतर दिवसांत वन्यप्राण्यांना पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा. हरणे, सांबरे पाण्याच्या शोधार्थ शेतकऱ्यांच्या शेतात घुसायची. पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून त्यांची शिकार केली जायची. वन्य प्राणिसंपदा वाचवण्यासाठी डॉल्फिन ग्रूपने 2008 मध्ये वनबंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली. पावसाचे बरेचसे पाणी वाहून जायचे. ग्रूपतर्फे श्रमदानातून सागरेश्वरमध्ये तेवीस, तर चांदोली गावामध्ये दोन वनबंधारे बांधण्यात आले. त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यासाठी बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच, अभयारण्याची हिरवळ टिकण्यासही मदत झाली आहे. ऐनापुरे यांनी ‘फ्रेंडशिप डे’ निसर्गाच्या सान्निध्यात साजरा केला जाऊ शकतो, निसर्गाशी मैत्री करता येऊ शकते ही अभिनव कल्पना मांडली व ती सत्यातही उतरवली. दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार, म्हणजेच ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी डॉल्फिन ग्रूपचे सदस्य व विविध शाळांतील हरित सेनेचे विद्यार्थी मिळून श्रमदानातून सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात वनबंधारे बांधण्याचे व संवर्धनाचे काम करतात.

डॉल्फिन ग्रूपच्या माध्यमातून वनराई वाढावी, तसेच सागरेश्वर अभयारण्यातील वन्यप्राण्यांना अन्न व निवारा मिळावा या हेतूने 2000 सालापासून दरवर्षी बीजारोपण व वृक्षारोपण करण्यात येते. दरवर्षी पावसाळ्यामध्ये अभयारण्याच्या परिसरात हजारो बिया रोवल्या जातात. परिसरात सोळा वर्षांच्या काळात चार लाखांहून अधिक वनौषधींचे बीजारोपण करण्यात आले आहे. त्यामध्ये शिकेकाई, हिरडा, बेहडा, सीताफळ यांसारख्या विविध जातींच्या झाडांचा समावेश आहे. तेथे पशुपक्ष्यांना उपयोग होईल अशी झाडे लावली जातात. स्वत: तयार केलेली रोपेदेखील लावण्यात आली आहेत. त्याशिवाय, ग्रूपमार्फत काही गावांमध्येही वृक्षारोपण करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, बामणोळी गावी दोनशेपन्नास झाडे लावण्यात आली आहेत. ऐनापुरे यांनी अभयारण्याच्या बालोद्यान मनोऱ्याच्या पूर्वेकडील दोन चौरस किलोमीटरचा भाग या प्रकल्पासाठी निवडला. विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व युवकांनी मिळून हा प्रकल्प यशस्वी केला आहे. शासनाच्या वन विभागानेही ऐनापुरे यांच्या त्या प्रकल्पाची दखल घेतली आहे.

_Dolphin_Nature_3.jpegडॉल्फिन ग्रूपने जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी गणेशोत्सवामध्ये निर्माल्य संकलनाचे काम सुरू केले. लोक गणेशमूर्तीसोबत निर्माल्य, प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल नदीत वा जलाशयात सोडतात. त्यामुळे जलप्रदूषणाचे प्रमाण वाढते. डॉल्फिन ग्रूपतर्फे गणेशोत्सवापूर्वी लोकांमध्ये रॅली, फलकांच्या माध्यमातून प्रबोधन दरवर्षी केले जाते. संकलित केलेल्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचे काम सांगली महापालिकेच्या सहकार्याने सुरू आहे. तयार खत महापालिकेच्या उद्यानांसाठी वापरले जाते.

‘डॉल्फिन नेचर ग्रूप’ जखमी प्राणी - पक्षी यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सुरक्षीत ठिकाणी सोडण्याचे काम करत अाहे. ग्रूपचे सदस्य गौतम कुलकर्णी, प्रतिक पाटील, शशिकांत ऐनापुरे, मुस्तफा मुजावर हे त्या कामी अग्रेसर असतात. ग्रूपने आतापर्यंत वेगवेगळ्या जातीचे सर्प, गरुड, घोरपड, तांबट यांसारख्या प्राणी अाणि पक्ष्यांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवले आहेत.

ग्रूपतर्फे एकदिवसीय निसर्गमैत्री कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. सांगली शहर, सागरेश्वर, तसेच कोल्हापूररत्नागिरी जिल्ह्यांत निसर्गमैत्री कार्यशाळा घेतल्या जातात. पर्यावरणीय चर्चासत्रे व व्याख्यानमाला यांद्वारे लोकांमध्ये निसर्गरक्षणार्थ व पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती केली जाते. घरोघरी पत्रके वाटून चर्चासत्रे व व्याख्यानमाला यांच्या आयोजनाची माहिती लोकांपर्यंत पोचवली जाते. अशा कार्यक्रमांतून पर्यावरणीय प्रश्न व त्याचे परिणाम, वन्यजीवन, प्रदूषणविषयक प्रश्न व उपाय, पर्यावरणीय जीवनशैली या विषयांवर प्रबोधनात्मक माहिती दिली जाते. संस्थेच्या सचिव आहेत डॉ. पद्मजा पाटील. त्यांचा अभ्यास औषधी वनस्पती व त्याचे उपयोग, आयुर्वेद व निसर्गोपचार, गाय-गोमूत्र व त्यांचे महत्त्व या विषयांत.

डॉल्फिन संस्था निसर्गविषयक चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, बिया संकलन स्पर्धा, रोपनिर्मिती स्पर्धा, वन्यजीव माहिती संकलन स्पर्धा 1997 पासून योजत आहे. ‘नेचर गेम्स’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्गाप्रती जागृत करण्याचे कामही चालू असते. तो उपक्रम पुऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राबवला जातो. विद्यार्थ्यांचा त्यास भरघोस प्रतिसाद लाभला आहे.

_Dolphin_Nature_4.jpegडॉल्फिन संस्थेकडून दरवर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरणीय प्रदर्शन भरवले जाते. त्यामध्ये वन्य जीवांची संपूर्ण माहिती, भारतीय पक्ष्यांची माहिती व वनौषधींची माहिती दिली जाते. ग्रूपतर्फे सर्व शाळांच्या सहभागातून पर्यावरणीय दिन, वन्यजीव सप्ताह यांचे पर्यावरणासाठी भरीव कार्य करणारी एक शाळा, विद्यार्थी व शिक्षकास पर्यावरण पुरस्कार कै. एस. डी. ऐनापुरे यांच्या नावे 2008 पासून देण्यात येतो.

ग्रूपच्या माध्यमातून सांगलीमध्ये आमराई व इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. तसेच 'प्लास्टिक कॅरिबॅग हटाव' मोहिमेंतर्गत लोकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावून सांगत, कापडी व कागदी पिशव्या वापरण्यावर भर देण्यात येत आहे. ग्रूपचा वन विभागाच्या शासकीय व्याघ्र गणना व वन्यप्राणी प्रगणना कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असतो. ग्रूपला त्यांच्या पर्यावरणीय भरीव कार्याची दखल घेऊन किर्लोस्कर क्लबकडून 2001 साली ‘वसुंधरामित्र’ पुरस्काराने, तर विश्व प्रकृती निधी मंडळाकडून 2003 साली ‘सर्वोत्कृष्ट निसर्ग मंडळ’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

शशिकांत ऐनापुरे यांनी ‘पुढारी’ वर्तमानपत्रातील ‘धार’ पुरवणीमध्ये ‘ओळख वन्यजीवांची’ या सदरात जवळजवळ अठ्ठ्याहत्तर लेखांचे लेखन केले. त्याशिवाय, ऐनापुरे यांचे इतर वृत्तपत्रांतून वन्यजीवन व पर्यावरणविषयक जागृतीपर अडीचशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ऐनापुरे यांची ‘आपले वन्य प्राणी’ व ‘आपले पक्षी’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शशिकांत यांनी सभोवतालच्या वनस्पतींचे औषधी उपयोग सांगणाऱ्या ‘निसर्ग संदेश’ या पुस्तिकेची निर्मितीदेखील केली आहे. त्यांच्या संस्थात्मक व वैयक्तिक पर्यावरणीय कामाची दखल घेऊन ‘रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली’कडून 2005 साली ‘लालबहाद्दूर शास्त्री युवा पुरस्कारा’ने, तर महात्मा गांधी ग्रंथालय, सांगली यांच्याकडून 2016 चा ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

'डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप' सरकारी मदतीपासून लांब आहे. संस्थेचा खर्च छोट्यामोठ्या देणगीदारांकडून चालवला जातो. संस्थेचा वार्षिक खर्च पंचेचाळीस ते पन्नास हजार आहे. ‘डॉल्फिन’ला ‘लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट’कडून पन्नास हजारांची मदत मिळाली आहे.

शशिकांत ऐनापुरे 9423580433
संकेतस्थऴ - https://dolphinnaturegroup.webs.com/
पत्ता -
अभिव्यक्ती, ९, श्री शारदा हौसिंग सोसायटी, कुपवाड  रोड, सांगली.
         ता. मिरज, जिल्हा सांगली.  –  416416

- वृंदा राकेश परब, vrunda.rane@gmail.com

Last Updated On - 29th Sep 2018

लेखी अभिप्राय

Sir,apan paryavarna baddal jante madhe khup chan prabodhanache kaam karat aahat,tyasathi hardik hardik shubhacha tasech apanas v aplya Dolfine nacture group sathi bhavi watchalis shubheshcha ???????

Amar khadake26/10/2018

खूपच चांगले काम निसर्ग आणि पर्यावरण या संबंधित होत आहे कधीकधी मला या मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे ,या कामाला सरकारी मदतीची गरज आहे तेव्हा सरकारने या कडे लक्ष द्यावे

Abhijit patil26/10/2018

सुंदर परिपूर्ण माहिती. सामाजिक जाणिवेतून केलेले कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले सुंदर कार्य

चंद्रकांत ऐनापुरे 26/10/2018

डॉल्फिन ग्रूप चे कार्य कौतुकास्पद आहे. दरवर्षी गणेश विसर्जनात डॉल्फिनचा निर्माल्य गोळा करण्यात मोलाचा वाटा असतो. त्यांचे कार्य पुढेही असेच सातत्याने चालत राहो हि सदिच्छा .

Mayur26/10/2018

हि संस्था अत्यंत नियोजनबध्द निसर्ग व पर्यावरण संबधी जागरुकतेने कार्य करते त्यना शुभेच्छा.

Shantisagar26/10/2018

फारच छान काम आहे .

Sonal 26/10/2018

Nice
Work.
Great.

Arun Kamble.26/10/2018

Best Sir,खरोखर,प्रेरणा देणारे कार्य.

किरण नाईक26/10/2018

गेली आनेक वर्ष या संस्थे मधे काम करत आहे पर्यावरण वरती काम करणारी एकमेव सांगली मधील अशी संस्था आहे जी सांगली व महाराष्ट्र हिरवा झाला पहिजे या साठी सतत काम करतं

sachin chopade 27/10/2018

It's very inspiring work

Varsharani Vij…27/10/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.