विभांडिक यांची मागील पिढीची कविता


‘ह्या एका दुअेसाठी’: दु:ख-दैन्य-दास्य यांचे संचित!’

_VibhandikYnachi_MagilPidhichiKavita_2.jpgमनोहर विभांडिक यांची कविता सर्व पुर्वसूरींना दूर सारून अभिव्यक्त झाली आहे हे त्यांचे यश. ते गेली चार दशके कविता लिहीत आहेत. मनोहर यांची कविता ग्रामीण, दलित, नागर, महानगरी, स्त्रीवादी, सामाजिक अशा कोणत्याच चौकटीत आस्वादता येत नाही. कवी ती अंशतः आत्मचरित्रात्मक आहे, ती गाव सोडून शहरात स्थिरस्थावर होऊ पाहणाऱ्या आणि मध्यमवर्गात स्थिरावलेल्या कोणत्याही माणसाचे आत्मचरित्र ठरेल एवढी प्रातिनिधीक आहे. मनोहर यांचे अनलंकृत, सुबोध भाषा हे वैशिष्टय. ते प्रतिमांच्या राशीची आरास न मांडता थेट अनुभवाला भिडतात.

बेचाळीस कवितांचा समावेश एकशेअठ्ठावीस पानांच्या कवितासंग्रहात आहे. त्या दीर्घ आहेत. काही कवितांची शीर्षके कुंकू, उत्खनन, गल्ला, पगार, देखावा, दप्तर, निरोप अशी एकाक्षरी असली तरी बहुतेक शीर्षके विधानात्मक आणि अन्वयार्थक आहेत. ‘वडिलांच्या खांद्याइतकी उंच जागा’, ‘वडील आठवतात एखाद्या प्राचीन संस्कृतीसारखे’, ‘देव आमच्या घरी वर्षभर राबायचे’, ‘आईच्या डोळयांभोवतीची काळी वर्तुळे’, ‘हिशेब दुकानदारांचा आणि वडिलांचा’, ‘हा जरीचा कपडा टोचेल तुला’, ‘मुलगा माझा शिकत आहे’, ‘मी शोधत आहे, साधू मागे वळून पाहणारा’, ‘झोपेविषयी जागेपणी केलेले चिंतन’अशी शीर्षके हे कवितासंग्रहाचे वजन आहे. एका कवितेचे शीर्षक ‘चुलीवरची मिसळ’ असेही आहे. ते प्रादेशिक आविष्कार समजावून घ्यायला उपयोगी ठरावे.

बहात्तरचा दुष्काळ, दुष्काळात झालेली स्थलांतरे, ‘गरिबी हटाव’ची घोषणा हे सारे आठवले की या कवितेतील वास्तव कळण्यास मदत होते. रोटी, कपडा और मकान यांची लढाई लढण्याचा तो काळ कवितेतून व्यक्त होतो. ते व्यक्त होणे लाऊड नाही तर संयत आहे.

‘हा जरीचा कपडा टोचेल तुला’ ही कविता आई, वडील आणि मुलगा यांचा संवाद आहे. आई दिवाळीला मुलांच्या फाटत आलेल्या कपडयांची आठवण द्यायची; अगदी वडिलांनाही स्वतःसाठी नवा कपडा घ्यायची भूणभूण लावायची. वडीलही ‘बघू बघू’ करत कपडयांच्या दुकानात पोरांना घेऊन जात. दुकानातील लालनिळे, हिरवेपिवळे, जरतारी-रंगीत धाग्यांनी भरलेले, सुंदर चित्रांनी नटलेले, रेशमी-झुळझुळीत, तलम, चकचकीत कपडे मुलांच्या अंगावर लावून पाहायचे आणि किंमती दिसल्या, की मुलांना समजावायचे, “हा जरीचा कपडा टोचेल तुला, ह्या रंगाला चिडवतील मुले, भरतकामवाला कपडा उसवून जातो आणि झुळझुळीत कपडा कमरेतून ओघळून पडतो.” वडील मुलांना कपडे रोज वापरायचे, वाढत्या अंगाचे, मळखाऊ असे घेत. दिवाळीतही गरिबीचे चटके बसलेल्या पिढीची ही आत्मकथा या कवितेतून साकारत जाते.

दुकानातून उधार आणून घर चालवणारी पिढी दुकानदाराच्या हिशेबाबाबत कुरकुर कधी करत नसे. त्यांची भावाविषयी आणि मालाविषयी तक्रार नसे. हिशोब दुकानदाराचा आणि वडिलांचा परस्पर विश्वासावर पूर्ण होत असे. कवीला हे हिशेबाचे कोडे वडिलांच्या समजदारीतून सुटत असल्याचे नंतर फार फार काळाने कळले. त्या काळात उधारीच्या वह्या असायच्या. किराणा दुकानाची अर्थव्यवस्था त्या वह्यांवर आणि महिन्याच्या पगारावर अवलंबून होती. असुरक्षित क्षेत्रातील कामगारांना आठवड्याने पगार मिळत. तो काळ त्या कवितेतून सहज डोळयांसमोर उभा राहतो. त्या दृष्टीने ‘गल्ला’ ही कविताही लक्षणीय आहे. पालक मुलांना लहानपणापासून बचतीची सवय लावणारे होते. तो काळ खाऊचे पैसे साठवून स्वप्न रंगवण्याचा. शाळेतूनही बचत खाते काढण्याची योजना राबवली जात होती. घरात गल्ला असला तर मुलांनी पैसे त्यात जमा करायचे. गल्ला फोडल्यावर त्यातील रुपये-पैसे मोजण्यातच गंमत असायची. सत्तरच्या दशकात एक पै, दोन पैसे, तीन पैसे, पाच-दहा पैसेही चलनात होते. ती तांब्या-पितळ्यांची नाणी साठीकडे झुकलेल्या किंवा साठी पार केलेल्या पिढीला आठवतील. चार आण्यांलाही मोठी किंमत होती. त्या काळात गल्ल्यातील बचतीतून मुलांची थोडी स्वप्ने पूर्ण होत.

कवीने काव्य साध्या साध्या विषयांत शोधले आहे. विभांडिक यांनी गूळ-खोबरे हा सुद्धा कवितेचा विषय केला आहे. कवी त्याच्या बालपणाच्या अनुभवातून समकालाला भिडणारी कविता लिहितो. सुर्वेमास्तरांनी भाकरीचा चंद्र मराठी कवितेत आणला. भाकरीचा संघर्ष राहिला नाही. भाकरीचे टोपले आणि भाकरीची जागा पोळ्यांच्या डब्याने घेतली. चूल गेली आणि चूलीवरील भाकरही कवितेतून हद्दपार झाली.

_VibhandikYnachi_MagilPidhichiKavita_1.jpgआई आणि वडील ‘ह्या एका दुएसाठी’ हया कवितासंग्रहात सतत भेटतात. आई-वडिलांचे अनेक अनुभव कवितेत येत राहतात. कवी ‘कुंकू’ या कवितेत आईची कुंकू लावण्यासाठीची सकाळी लगबग आणि तिचे आरसा न घेताच गोलगोल रुपया कुंकू लावणे असा अनुभव कथन करतो. फकीर महंमद शहाजिंदे या कवीनेच कुंकू हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक असल्याचे नोंदवून ठेवले आहे. काळ बदलला. कुंकू आणि कुंकवाचा करंडा यांची जागा रंगीबेरंगी टिकल्यांनी घेतली. टिकल्यांचे पाकिट पर्समध्ये आले. कवीला आईचा देवघरातील कुंकवाचा करंडा आठवतो आणि वडिलांची काळजी करणारी आई आठवते. ‘आईच्या डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे’ नांदणाऱ्या मुलींच्या काळजीतून आलेली. ती काळी वर्तळे वडील मुलींना भेटून येताच किंवा मुली सणावाराला माहेरी आल्यावर निघून जात. ‘श्यामच्या आई’सारखी सश्रद्ध आई मनोहर यांच्या कवितेत भेटते. ती मुलांना सर्दीपडसे, तापखोकला झाला तरी देवाचा धावा करते. कवीने ‘आई सत्यनारायण घालायची आणि सत्यनारायणाच्या एका पूजेनेही देव वर्षभर घरी राबायचे’ असे म्हटले आहे. कवितेतील वडील गंभीर, संयत आणि मितभाषी आहेत. ते घरात फार बोलत नाहीत, तरी घराचे गोकुळ होऊन जाते. कवीला वडील गेल्यावर वडिलांच्या खांद्यावरची उंच जागा आता मिळणार नाही याचे भान येते. ‘वडील आठवतात एखाद्या प्राचीन संस्कृतीसारखे’ अशी कविता वडिलांविषयीची कृतज्ञता व्यक्त करते. त्यासाठी कवीला कृतक अलंकारिक प्रतिमांच्या राशी रचाव्या लागत नाहीत. मराठी साहित्याने आईला मोठा अवकाश दिला, पण बापाला फार मोठी जागा दिली नाही. मनोहर विभांडिक यांची कविता वडिलांना समजावून घेते-

वडील फार बोलत नसत,
येता जाता दटावत नसत
की नसत हसत , खिदळत …
वडील फक्त असत
अवतीभोवती
ऊबदार पांघरुणासारखे ,
साऱ्या घराला ऊब पुरवत ! ( पृष्ठ14 )
किंवा
वडील उचलून घेत अलगद खांद्यावर
बसवून घेत तेव्हा
फळीवरच्या लाडवाला
साखरेच्या डब्याला, छतावरच्या दिव्याला,
मंदिरातील घंटेला , पार आभाळाला
सहज स्पर्शून घेत माझे इवलेसे हात . . . ( पृष्ठ 11 )

असे शब्दचित्र कवितेत येते. मुलाला खांद्यावर घेऊन गारुड्याचा आणि डोंबाऱ्याचा खेळ, जत्रा, देव, कुस्त्यांची दंगल दाखवणारे वडील डोंबाऱ्याच्या खेळातील भुकेची लढाईदेखील मुलांना समजावून सांगतात. ते जित आणि जेते यांच्याविषयीचे तत्त्वज्ञानही मुलांना सांगतात. कवी वडिलांचा तो वारसाच पुढे चालवतो, पण त्याला काळ बदलल्याचे भानही आले आहे. ते मुलगा आणि कवी यांच्या संबंधाचे चित्रण वाचताना स्पष्ट होत जाते. वडील घरात येताच ‘मित्र निघून जायचे, बहिणीच्या मैत्रिणी एकदम चूप व्हायच्या आणि आईही त्यांच्या आगमनाने डोलणारी फांदी व्हायची. वडील घरात येताच व्हायचे घराचे देवघर.’ ती परिस्थिती राहिली नाही. वडिलांचा काळाच्या ओघात फादर, डॅड, पप्पा झाला आणि घराचे ‘होम थिएटर’ होऊन गेले असे कवीने नोंदवून ठेवले आहे.

माझे घर, झाले आहे वस्तूंचे अभयारण्य ;
आणि त्यात मी उपरा
नामशेष होत जाणाऱ्या प्राण्यासारखा … (पृष्ठ 40 - होम थिएटर )
 
समाजाची वाटचाल वृद्धाश्रम संस्कृतीकडे चालू आहे. त्याच्या खाणाखुणा आजुबाजूला दिसत आहेत. मुले ही त्यांच्या भविष्याची गुंतवणूक असे समजणाऱ्या पालकांचा भ्रमनिरास करणाऱ्या काळात समाज वावरत आहे. एका सामान्य कुटुंबातील घडामोडी टिपणारी ही कविता समष्टीचा अनुभव मांडत जाते.

कवी-लेखकांचे प्रारंभिक लेखन हे पूर्वसुरींच्या प्रभावातून आलेले असते. वाङ्मयीन पर्यावरणाचा परिणाम लेखकाच्या लेखनावर पडलेला असतो. त्यातून मुक्त होऊन कविता लिहिता येणे हे महत्त्वाचे असते. अरुण काळे यांचे ‘रॉक गार्डन’ हे अलिकडच्या काळातील तसे प्रातिनिधीक उदाहरण, पण अरुणला त्याची स्वतःची कविता ‘नंतर आलेले लोक’मध्ये सापडली. संजय चौधरीने ‘माझे इवले हस्ताक्षर’ हा संग्रह उशिरा प्रसिद्ध केला. प्रारंभिक खर्डे प्रसिद्ध केले नाहीत. ‘कविताच माझी कबर’ हा त्याचा बहुआयामी कवितासंग्रह पूर्वसुरींच्या प्रभावातून बाहेर पडून स्वतःची पायवाट तयार करत आहे. संतोष पद्माकर पवार याची कविता अशीच स्वतंत्र बाण्याची ठरली आहे. मनोहर विभांडिक यांची या संग्रहातील कविताही स्वतःची नाममुद्रा घडवताना दिसते. ती एका काळाचे दस्तऐवजीकरण करते. त्यातील समाजविचार उच्चरवाने येत नाही, तर संयतपणे येतो. ती कविता स्वांत सुखाय स्वरूपाची नाही. ती समाजभाष्यही करते. ‘निरोप’ या

कवितेतील मुलगी वडिलांना सांगते,
महात्मा गांधी रोडने येऊ नका ;
तेथे सुरीहल्ले होतात
येऊ नका साने गुरुजी मार्गाने
तेथे लुटून घेतात
अब्दुल हमीद चौकातून
तर येऊच नये कधी ;
तेथे कायम कर्फ्यू लावलेला असतो!
येऊ नका शिवाजी रोडने लपत छपत,
सावरकर मार्गाकडे ढुंकूनही पाहू नका ,
चुकूनही गुणगुणू नका-
एखादे राष्ट्रगीत, भावगीत, भक्तिगीत
धर्म, देश, पोलिस, पुढाऱ्यांविषयी
चकार शब्दही बोलू नका …
तुम्हाला हवे तर फक्त
‘आज फार उकडते‘
एवढेच म्हणा! ( पृष्ठ 73 )

साहजिकच अशा काळात माणुसकीची भिंत सजते. तिचा इव्हेंट होतो. पाऊस हवा असतो- पण बातमीपुरता. मोर्चे, धरणे, उपोषण यासाठी बलात्कार झालेल्या स्त्रीची जात महत्त्वाची ठरते. ‘जात पण लई मेन असते साहेब ...’ ही कविता त्या दृष्टीने लक्षणीय ठरते.

जात पण लयी मेन असते
ना सायेब
नुस्तं बाई आहे म्हणून
आपण काढले मोर्चेबिर्चे
आन् उद्या निघाली बाई
दुसऱ्याच जातीपातीची तर
हायकमांड ठिईल का आम्हाला? …. ( पृष्ठ 117 )

विभांडिक यांचा मूळ पिंड समाजचिंतकाचा आहे. त्यांनी त्यांचे समाजभान ‘चाय पाव’ ही फारच संवेदनाशील कविता लिहून फार पूर्वी दाखवून दिले होते. मात्र ती समाजशीलता टिकून राहील का? याचीही चिंता कवीला आहे.

माणसाची निर्मिती पेशीच्या विघटनातून होते, त्याचा क्लोन बनवता येतो. कवीने उद्या त्याचा क्लोन त्याचाच खून तर करणार नाही अशी भीतीही व्यक्त केली आहे. कवी ‘निश्चलनीकरणानंतर चलनात द्यायची राहिलेली नोट ओशाळून बसली आहे पाकिटात’ हे सहजपणे नोदवतो. कवीला स्वच्छंदपणे बागडणारी ती नोट म्हणजे लग्न करायचे राहून गेलेली मुलगी वाटते. निश्चलनीकरणानंतरची सामान्यांची घुसमट कवितेत येते, तरी रुढार्थाने ती कविता केवळ सामाजिक कविता ठरत नाही. ती समकालाचे दस्तऐवजीकरण ठरते. माणुसकीची भिंत, जात पाहून निघणारे मोर्चे, रस्त्याने होणारी लुटालूट, दंगली ही त्याच प्रकारची ठळक उदाहरणे.

मनोहर विभांडिक यांची कविता मला भालचंद्र नेमाडे यांच्या देशीवादाचे उपयोजन वाटते. आई, वडील, देव, देव्हारा, जत्रा, डोंबाऱ्याचा आणि गारुडयाचा खेळ, गूळ-खोबरे, लाडवाचा डबा ही सारी अडगळ त्यांच्या कवितेत येत राहते. देशी भाषा हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. कवी शब्दांचा खेळ खेळत नाही. तो सुबोध भाषेत गतकाळातील दुःख, दैन्य, दास्य आणि त्यातील सांस्कृतिक संचित मांडत जातो. ते त्याच्या सांस्कृतिक संचिताचे ठेवे. कवीने मुखपृष्ठावर त्याच्या संग्रहातील कुसुमाग्रज आणि कवी गुलजार यांचा कृष्णधवल फोटो वापरला आहे. त्याचे औचित्य संग्रह वाचून झाल्यावर लक्षात येते. कमलाकर देसले यांनी कवीची पाठराखण करताना म्हटले आहे, ‘या कवितेतील अनुभव भूतकाळाशी निगडित असला तरी त्यातील प्रश्नांची आणि दुःखाची समकालीनता वर्तमानाशी फारकत घेत नाही. व्यक्ती आणि समष्टी यांना कवेत घेण्याची आणि त्याचे शुभंकर करणारी दुआ हा या कवितेचा अंतःस्वर आहे.’ कवितेत तो व्यक्त होतो आणि कविता वाचकाला खिळवून ठेवते, हे या संग्रहाचे यश आहे.

ह्या एका दुएसाठी ( कविता संग्रह )
मनोहर विभांडिक
प्रतिमा पब्लिकेशन , पुणे
प्रथमावृत्ती, 27 फेब्रुवारी 2018
पृष्ठे 128, मूल्य - 150 रुपये

- शंकर बोऱ्हाडे

shankarborhade@gmail.com

लेखी अभिप्राय

कविता ,कवितेची मिमांसा छान

लतिका चौधरी20/07/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.