वडांगळी शाळेचे – वार्षिक महानाट्य!


शालेय विद्यार्थ्यांची सर्जनशीलता व कल्पकता काय असू शकते, याची चुणूक नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी या छोट्याशा गावातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये पाहण्यास मिळते. वडांगळी गाव सिन्नरपासून वीस किलोमीटर लांब आहे. ‘मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संस्था’ ही कर्मवीरांच्या त्यागातून निर्माण झाली आहे. संस्थेचा कारभार ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदाने सुरू आहे. संस्थेमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी कुटुंबांतील मुलांना शिक्षणाची कवाडे खुली झाली. ‘न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज’चे माजी प्राचार्य रत्नाकर व्ही.एस. आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेंद्र भावसार यांनी ती किमया घडवली आहे. प्रार्थनेसाठी शिस्तीत मैदानात उभे राहिलेले विद्यार्थी, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कंटाळा अथवा थकव्याचा मागमूस नाही... ‘हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे’ ही विश्वप्रार्थना, ‘नमो मायभूमी, इथे जन्मलो मी’, ‘गुरुदेव मेरे दाता, हमको ऐसा वर दे’ अशा प्रार्थनागीतांनी शाळा भरण्याच्या वेळीच वातावरण भारावून जाते! शाळेत ‘माजी विद्यार्थी संघा’ने ‘मध्यान्ह भोजन ओटा’ बांधला आहे. विद्यालयातील विद्यार्थी भोजनाचा आस्वाद तेथे घेतात. नारळाची आकर्षक झाडे व सावली यांमुळे विद्यार्थी त्या ठिकाणी रमतात. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने त्या ओट्याला नारळबाग असे नाव दिले आहे. भिंतीवरील सुविचार व चित्रे यांमुळे नारळबाग उठून दिसते.

शाळेत पाचवी ते दहावी अशी सुमारे तेराशे पटसंख्या आहे. आजूबाजूच्या पंचवीस किलोमीटर परिसरातील बावीस गावांतून मुले तेथे येतात. शाळेत अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जडणघडणीकडे बारकाईने लक्ष दिले जाते. तेथील सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे दिमाखदार सोहळा असतो! सांस्कृतिक विभागाचे शिक्षक राजेंद्र भावसार दरवर्षी हटके विषय निवडून भव्यदिव्य कार्यक्रम सादर करतात. केवळ ठरावीक विद्यार्थ्यांना वाव न देता शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा त्या सोहळयात सक्रिय सहभाग असला पाहिजे, यासाठी शिक्षक दक्ष असतात. वडांगळी गाव व विद्यालय सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच आघाडीवर असते. गावाला सांस्कृतिक क्षेत्राचा व लोककलेचा एकशेपन्नास वर्षांचा असा मोठा वारसा आहे. गावात सात नाट्यसंस्था आहेत. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. राजा शिवछत्रपतींचा जीवनपट, कृष्णावतार, 1857 ते 1947 : स्वातंत्र्याचा महासंग्राम अशा कोणत्या तरी विषयावर आधारलेले महानाटय दरवर्षी साजरे केले जाते. महानाट्यामध्ये सहा-सातशे विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. सादरीकरणासाठी खरेखुरे हत्ती, घोडे, उंट, रथ शाळेत आणवले जातात. चार मजली रंगमंच, किल्ला, बुरूज, तोफा, मेणा, पालख्या, मावळ्यांच्या वेशात वावरणारे विद्यार्थी अशी भव्यता पाहून प्रेक्षकांचे डोळेच दिपतात. दरवर्षीच्या महानाट्याचे रेकॉर्डिंग करून ते सीडीमध्ये जतन करून ठेवण्यात आले आहे. देशातील कोणत्याही मोठ्यातील मोठ्या शहरांमधील महागड्या शाळेमध्येही अशा प्रकारचे खरेखुरे सादरीकरण होत नसावे.

शाळेचे माजी प्राचार्य रत्नाकरसर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना ‘होय, आम्ही हे करू शकतो’ (Yes, We Can) असा प्रेरणामंत्र सातत्याने दिला. विजेते वेगळे काम करत नाहीत, तर ते प्रत्येक काम वेगळेपणाने करतात असे म्हणतात ते खरे आहे. सरांच्या कारकिर्दीत शाळेने सर्व क्षेत्रांत नावलौकिक प्राप्त केला. विद्यालयाची विद्यार्थिंनी मोहिनी भुसे व ऋतुजा चव्हाण यांनी संबळ वादनात संगीत शिक्षक गणेश डोकबाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवा अध्याय सुरू केला. त्यांनी ‘मविप्र’ सांस्कृतिक महोत्सवासह अनेक कार्यक्रमांत दाखवलेल्या संबळवादनाच्या जादूने भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली. आशा भोसले या सांस्कृतिक महोत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून आल्या असताना त्यांनाही त्या वादनाची मोहिनी पडली. त्यांनी आस्थेवाईकपणे त्या दोघींची चौकशी करून कलाक्षेत्रातील वाटचालीस आशीर्वाद दिला.

शाळेत अभ्यासक्रमाला पूरक ठरणारे व पुस्तकी शिक्षणाला कृतीची जोड देणारे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवले जातात. त्यांतील काही निवडक उपक्रम म्हणजे शिक्षक तुमच्या दारी - शिक्षक आणि पालक यांना जोडणारा दुवा म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हे दोघांचे ध्येय. दहावीचा वर्ग म्हणजे महत्त्वाचा वर्ग. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व शिक्षकांकडे विभागून दिले जाते. ते विद्यार्थ्यांनी परीक्षेला कसे सामोरे जावे याचे योग्य मार्गदर्शन त्यांच्या पालकांना करतात. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन 22 डिसेंबर हा दरवर्षी विद्यालयामध्ये गणितदिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी गणितामधील छोटे प्रयोग, उपकरणे तयार करून कृतीतून रंजकपणे गणित विषय शिकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती नाहीशी होते. विद्यार्थी गणितज्ज्ञ भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट, श्रीनिवास रामानुजन, वराहमिहीर यांच्या कार्याचा अभ्यासही या निमित्ताने करतात.

विद्यार्थ्यांच्या एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर सुटीचा सदुपयोग व्हावा, विद्यार्थ्यांना त्या काळात जीवनोपयोगी कौशल्ये प्राप्त व्हावी म्हणून सरांनी संस्कारवर्गाचे आयोजन केले. संस्कारवर्गात पाढे पाठांतर, सामान्यज्ञान, ‘श्यामची आई’ पुस्तकाचे अभिवाचन, मातीचे किल्ले बनवणे, कागदापासून वस्तू बनवणे, फेटा बांधणे, महारांगोळी, व्याख्याने, भाषण-कला कार्यशाळा, संस्कारक्षम चित्रपट प्रदर्शन, क्षेत्रभेट इत्यादी उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीत सिन्नर, निफाड व अकोले तालुक्यांतील विविध ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणांना भेटी दिल्या.

महाराष्ट्र ही शूरांची भूमी आहे. शौर्याची ही परंपरा वाद्यातूनही दिसते. ढोल हे तसेच वीर वाद्य. संस्कार वर्गाच्या माध्यमातून संगीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ढोलवादनाचे धडे दिले. फेटा बांधून, आकर्षक वेषभूषा करून ढोलपथक झांजांसह सुरू होते तेव्हा सर्वांचेच लक्ष वेधले जाते. ढोलपथक विद्यालयात निर्माण करण्यात आले आहे.

विज्ञान-आकृती, रांगोळी स्पर्धा, थोर शास्त्रज्ञ डॉ.सी. व्ही. रामन यांचा जन्मदिन 28 फेब्रुवारी हा विज्ञानदिन म्हणून विद्यालयात दरवर्षी अभ्यासपूरक उपक्रमांमधून साजरा करतात. त्या निमित्ताने विज्ञान प्रात्यक्षिके, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारखे उपक्रम राबवले जातात. शालेय उपक्रमात सुबक व प्रमाणबद्ध आकृती काढणे हा महत्त्वाचा भाग आहे. अभ्यासाबरोबर आकृती काढण्याचे कौशल्य विकसित व्हावे म्हणून विज्ञान रांगोळी स्पर्धा हा उपक्रम राबवण्यात आला. एकशेचाळीस विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी हृदयाचे भाग, फुलांची अंतर्रचना, मानवी मेंदूचे भाग, उत्सर्जन संस्था या आकृत्यांसह गतीविषयक समीकरणे आणि विविध सूत्रे रांगोळ्यांतून साकारली व विज्ञान रंजकपणे समजावून घेतले. विद्यालयामध्ये हस्तलिखित व भित्तिपत्रक तयार करण्याचा उपक्रम राबवला जातो. त्यामध्ये शिक्षणविषयक विचार, संतविचार, थोर समाजसुधारकांचे कार्य, संस्कारक्षम व स्वरचित कविता, गीते यांचा समावेश असतो.

विद्यालयामध्ये प्रसंगोपात विविध उपक्रम राबवले जातात. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना इतिहास, विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र या विषयांची माहिती दिली जाते. कारगील युद्धाचा स्मृतिदिन, चीनयुद्धाचा स्मृतिदिन, मंगळयान, पीएसएलव्ही यानाचे प्रक्षेपण, ग्राहकदिन, स्वराज्याच्या प्रतिज्ञेची शताब्दी यांसारखे काही उपक्रम सांगता येतील. शाळेची स्थापना 1960 ची. त्याला जोडूनच ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीचा कलाशाखेचा वर्ग सुरू झाला. ज्युनियर कॉलेज सुरू होण्यापूर्वी तेथील मुलींचे शिक्षण दहावीनंतर थांबून जायचे. पालकांची मानसिकता पुढील शिक्षणासाठी मुलींना दूरवर पाठवण्याची नसायची. मुलींची उच्च शिक्षणाची गरज लक्षात घेऊन कलाशाखा सुरू करण्यास परवानगी मिळाली. विज्ञान विषयातील उच्च शिक्षणाची गरज ओळखून तेथे विज्ञान शाखेची सुरुवात करण्यात आली.

‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही सिन्नर तालुक्यातील ‘आय.एस.ओ.’ मानांकन मिळालेली एकमेव शाळा आहे. तेथे ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ हे ध्येय पावलोपावली पाळले जाते. पाचवीपासून संगणकाचे शिक्षण, दहावीचा आणि बारावीचा शंभर टक्के निकाल, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर, शिस्तबद्ध परिपाठ, स्काऊट-गाईडचे रीतसर प्रशिक्षण, मुलींच्या प्रगतीसाठी घेतला जाणारा विशेष पुढाकार, स्वयंस्फूर्ती वाचन कट्टा, सुसज्ज ग्रंथालय व त्याचा ग्रंथालय सप्ताह, वर्गवार पुस्तकवाटप, वृक्षारोपणाची तयारी अशा एक ना अनेकविध उपक्रमांनी शाळा नेहमी सज्ज दिसते. बदलत्या काळात पारंपरिक शिक्षणपद्धत मागे पडत आहे. ज्ञानरचनावादी शिक्षण, डिजिटल क्लासरूम या शाळेत आहेत.

शैक्षणिक प्रगती, कलागुणांना वाव याचबरोबर ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये विद्यार्थ्यांना समाजसेवेचे बाळकडूही दिले जाते. त्याचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी दुष्काळग्रस्तांना दहा पोती धान्याची मदत केली. ग्रामस्थांनी मुलांच्या या बांधिलकीस हातभार लावला. वडांगळीत दरवर्षी बंजारा समाजाची सतीदेवी सामतदादा यात्रा भरते. राज्यभरातून लाखो भाविक त्या यात्रेत हजेरी लावतात. यात्रेच्या काळात भाविकांच्या मदतीसाठी विद्यार्थी कंबर कसतात. ठिकठिकाणी मदत कक्ष उभारून प्रथमोपचार, वाहतूक सेवा, स्वस्त आणि दर्जेदार अन्न अशा विविध स्तरांवर मदतीचा हात दिला जातो. ती सेवा करत असतानाच भाविकांच्या प्रबोधनाची कासही धरली जाते. यात्रेमध्ये बोकड बळी देण्याची प्रथा आहे. त्या प्रथेविरूद्ध विद्यार्थी जनजागृती करतात. ‘स्वाईन फ्लू’बाबतही भाविकांना सजग केले जाते. शाळेला माजी विद्यार्थी संघाचा आणि ग्रामस्थांचा मदतीचा हातभार नेहमीच असतो. 

- प्रज्ञा केळकर-सिंग

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.