शिंदखेड मोरेश्वर येथील सतिशिळा


_ShindakhedVarkhedYethil_Satishila_1.jpgअकोला जिल्ह्यातील शिंदखेड वरखेड येथे सतिचा स्तंभ आहे. तो गावातील कोणा श्रीमंत घराण्यातील सौभाग्यवती स्त्री सति गेल्यानंतर कोरवून घेतला गेला असावा असा अंदाज अाहे. त्या शिलालेखात एक हात वंदन स्वरूपात असून तो सूर्याला नमन करत आहे. त्या हातात चुडा आहे. बाजूला चंद्रकोरही आहे. म्हणजे जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत तुझी कीर्ती अबाधित राहील असा त्याचा संदेश! जर स्त्री सूर्यवंशी असेल तर तेथे सूर्याला वंदन दर्शवतात व चंद्रवंशी असेल तर चंद्राला वंदन दर्शवतात. म्हणून ती सतिशिळा आहे. लेखावरील कृती कुशलपणे कोरलेल्या नाहीत. जर तो कोण्या राजाने किंवा सरदाराने कोरवून घेतला असता तर तो शिलालेख अधिक कसलेल्या कारागिराकडून कोरवून घेतला गेला असता. शेजारीच, मंदिरातील काही शिल्पे हा सुंदर कलाकुसरीचा नमुना आहेत. शिलालेख मात्र तेवढा कलाकुसरीचा दिसत नाही. त्याला 'वीरगळ' असे सुद्धा म्हणतात. इतिहास अभ्यासक द.ता.कुलकर्णी यांनी सुंदर माहिती त्याबद्दल लिहिली आहे. कोकणात असे वीरगळ खूप देवस्थानांजवळ पाहण्यास मिळतात. लोणारच्या परिसरातही वीरगळ आहेत.

'वीरगळ' व 'सतिशिळा' यांत फरक असतो. 'वीरगळ' हा युद्धात धारातीर्थी पडलेल्या योद्- ध्याच्या स्मरणार्थ उभारला जातो. त्याच्यावर तो योद्धा कशा प्रकारे मृत्यू पावला याचा प्रसंग कोरलेला असतो. वीरगळाचा प्रकार तो वीर शत्रूशी लढताना मरण पावला, की चोर-लुटारूंशी लढताना मरण पावला, किंवा गोधन वन्य व हिंस्त्र पशूंपासून वाचवताना मरण पावला त्यावरुन ठरत असतो. 'सतिशिळा' ही मृत नवऱ्याबरोबर जिवंतपणी सति गेलेल्या सौभाग्यवती स्त्रीसाठी असते.

'सतिशिळे' मध्ये सतिचा उजवा हात कोपरापासून वर केलेला व हातात सौभाग्याचे प्रतीक म्हणून बांगड्या भरलेल्या दाखवतात, तर काही वेळेस हातात हळदीकुंकवाचा करंडाही दाखवतात. वरच्या बाजूला चंद्र व सूर्य कोरलेले असतात. ही माहिती लिपीतज्ञ अशोक नगरे व महेंद्र शेगावकर यांनी सांगितली. वाशीम जिल्ह्यात देवठाणा खांब नावाचे गाव आहे. तेथे तर डाकूंसोबत लढणार्‍या वंजारी समाजाच्या विधवेच्या नावे चित्रांकृत शिलालेख आहे. त्यावर प्रसिद्ध कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी 'झळाळ' नावाची कादंबरी लिहिली आहे.

सतिशिळा मोरेश्वर मंदिराजवळ आहे. तेथील मंदिराच्या संबंधितांना विचारले, तर त्यांनी मोघम व दंतकथात्मक माहिती सांगितली. औरंगजेब मंदिर पाडण्यास आला होता. मग त्याने तेथील मंदिरातील नंदिशिल्पाला चारा टाकला. त्याने तो खाल्ला नंतर शेणाचा पौटा पण टाकला. त्यामुळे बादशहाच्या सरदाराने तो चमत्कार बघून शिंदखेड मोरेश्वराचे मंदिर पाडले नाही अन् तो शिलालेख तेथे कोरवून ठेवला आहे. मी बालपणी तेथील यात्रेत नेहमी जायचो. ते माझे मामकूळ..आजोळचे गाव. त्या गावातील जुनी घरे-वाडे याबद्दल कौतुक होते. शिलालेखाचे कौतुक व उत्सुकता तेव्हाही वाटे, पण योग असा आला की; ती उत्सुकता शमली आहे... पस्तीस-चाळीस वर्षापूर्वी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे आणि मी समाधानी आहे!

- मोहन शिरसाट
mohan.shirsat@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.