विंदा - दा ऽ दीड दा ऽ (Vinda Karandikar)


विंदा करंदीकर हे मराठी साहित्यातील, विशेषत: कवितेतील एक कोडे. ते अवघड जाणवे. त्यांच्या वर्तनविषयक कथा विचित्र वाटत. ते सरळ साधेपणाने समाजात वावरत,  पण सर्वसामान्य भासत नसत. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि ते मराठी साहित्यात अत्युच्च स्थानी जाऊन बसले. वि.स. खांडेकरांनी, कुसुमाग्रजांनी तशा जागा आधी मिळवल्या होत्या. पण त्यांची जातकुळी वेगळी, विंदांची अगदीच वेगळी. तेवढ्यातच त्यांनी त्यांची साहित्यातील निवृत्ती जाहीर केली, त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या रकमांची व्यवस्था सामाजिक कार्यासाठी लावली. सुधीर गाडगीळने चित्पावन ब्राह्मणांसंबंधीच्या लेखात म्हटले आहे, की ते लोक आयुष्यभर चिकटपणे पै पैचा हिशोब करतील, परंतु जमा केलेला सर्व पैसा उत्तरायुष्यात केव्हातरी समाजकार्यासाठी देऊन टाकतील! विंदा हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी त्यापुढे जाऊन त्यांच्या कवितेतून मानवतावादी मूल्यांची उधळण केली. त्यांच्या साहित्यातून प्राचीन भारतीय आणि आधुनिक पाश्चात्य मूल्यांचा सुरेख संगम घडवला. हे सारे मनी उजळले गेले ते ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’ने सादर केलेल्या ‘स्वच्छंद’ कार्यक्रमातून. मी तो कार्यक्रम रविंद्र नाट्यगृहात पाहिला.

_VindaDa_DidDa_1.jpgकार्यक्रमात विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने विंदांच्या समग्र साहित्याचे दर्शन दोन तासांत घडवले गेले – म्हटले तर ती झलक होती, परंतु ती इतकी सखोल व दूरदर्शी होती, की जणू दोन डोळ्यांना दुर्बिणीतून अवघ्या विश्वाचा पसारा दिसावा! विद्याधर करंदीकर यांचे वेचे आणि पाच कसदार कलावंतांचे मन:पूर्वक सादरीकरण यांमधून तो योग जुळून आला. एकाद्या लेखक-कवीला अशी आदरांजली क्वचित केव्हा साधली गेली असेल. ‘स्वच्छंद’ कार्यक्रमाची संकल्पनाच मनात साठली जाणारी आहे. वाचक-श्रोत्यांचा आवडता कवी-लेखक त्याच्याच शब्दांतून प्रेक्षकांसमोर सादर करणे! त्याला उचित अशा संपादन-संकलन आणि भाष्य यांची जोड देणे.

विद्याधर करंदीकर यांनी ते काम केले. त्यांनी विंदांच्या पहिल्या स्वातंत्र्योत्कट कवितेपासून अखेरच्या निर्वाणीच्या गझलांपर्यंतच्या काव्यलेखन प्रवासाचा वेधक आढावा घेतला आहे. त्यांनी विंदांच्या लेखनातील गांभीर्य, तत्त्वचिंतन, मूल्यभान जपले आहे आणि त्याच वेळी त्यामधील उत्कटता व आवेगही प्रकट केला आहे. विद्याधर यांचे ते लेखन ‘आचरेकर प्रतिष्ठान’च्या कलाकारांनी उत्कटपणे सादर केले आहे. वामन पंडित, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर, विद्यागौरी दीक्षित, जाई फराकटे यांचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या शैलींतील निवेदन आणि माधव गावकर यांनी सादर केलेली कवितांची गाणी यामुळे विद्याधर यांनी लिहिलेले शब्द प्रेक्षकांच्या कानात थेट व अर्थपूर्ण रीत्या पोचत होते. ‘स्वेदगंगा’मधील क्रांतीच्या कवितेपासून सुरू झालेला तो प्रवास मिसिसिपीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचा शोध घेऊन मानवतेच्या उदात्त भावनेपर्यंत पोचतो तेव्हा प्रेक्षकश्रोत्यांची मने उदात्त भावनेने भरून गेलेली असतात.

निवेदन ‘स्वच्छंद’ या कार्यक्रमाच्या नावापासूनच सुरू होते. ते विंदांची स्वच्छंदी वृत्ती दर्शवते, त्यांचा तालमीचा नाद व्यक्त करते; तशीच त्यांची प्रयोगशीलता जाणवून देते. विंदांनी वृत्ताला बांधून घेतले नाही, की ते मुक्तछंदातही स्वैरतेने वावरले नाहीत, त्यांनी स्वच्छंदाचा प्रवाह स्वीकारला. त्यांनी प्रयोगशीलता सतत अंगीकारली आणि ती  जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रदर्शित केली. त्यामधूनच त्यांचे अर्वाचिनीकरण, तालचित्रे/स्वरचित्रे, मुक्तसुनीत, गझल असे प्रयोग घडून आले. परंतु ते केवळ रचनातंत्रात रमले नाहीत तर त्यांनी तत्त्वचिंतन व सिद्धांतवर्णन यांमध्ये प्रत्ययकारी लेखन केले. तेथे ते दैनंदिन जीवनातील अनुभवातून ‘अष्टदर्शना’पर्यंत पोचतात. ते त्यांना पसंत असणारी चार्वाकाची भूमिका ठामपणे मांडतात. विद्याधर करंदीकर यांनी विंदांचा तो ‘ताल’ अचूकपणे कमी शब्दांत व योग्य उदाहरणांसह पकडला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे ‘ताल से ताल मिला’ असे होऊन जाते.

त्यांतील निवेदकांची, विशेषत: वामन पंडित व माधव गावकर यांची कामगिरी प्रेक्षकश्रोत्यांच्या हृदयांपर्यंत थेट पोचते. गावकरांचे गाणे वाटते साधे; ते फक्त हार्मोनियमच्या साहाय्याने तर गात असतात, पण आशय प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याची क्षमता त्यांच्या आवाजात आहे. तशी लवचिकता त्यांच्या गाण्यांतून वेळोवेळी व्यक्त होते व गीतगायनही एकूण गद्य निवेदनांचा स्वाभाविक भाग बनतो. पंडित यांची नाट्यमयता, आवाजातील चढउतार व त्यातून साधणारी धीरगंभीरता चिरकाल लक्षात राहणारी आहे. ‘किंग लियर’च्या विंदा यांनी केलेल्या अनुवादातील सशक्त शब्द असोत वा ‘फाउस्ट’मधील ‘समर्पणा’तील भाषावैभव असो, पंडित त्यांच्या निवदेनातून विंदांचे ते गुणविशेष कसलेल्या नटाप्रमाणे भावाभिनयासहित सादर करतात व ‘तितक्याच’ सहजतेने ‘ट्रंक’मधील गूढ उलगडून दाखवत हलकाफुलका मूड तयार करतात.

_VindaDa_DidDa_2.jpgअनिल व जाई फराकटे आणि प्रसाद घाणेकर यांच्याकडे मुख्यत: गद्य निवेदने आणि कवितावाचन होते. त्यांनी एकूण कार्यक्रमातील नाट्यमयता व संगीत यांना पूरक अशीच पण भरीव कामगिरी केली. त्यांच्या छोट्या छोट्या लकबी व त्यांनी पकडलेले निवेदनातील बारकावे लक्षात राहतात. ते नुसते ‘वाचत’ नव्हते. विद्याधर करंदीकर यांनी जी संहिता रचली तीमध्ये त्यांचाही जीव आहे हे जाणवत होते; त्याहून अधिक, त्यांना विंदा कळले आहेत! विंदांनीच म्हटले आहे, की कवीची जाणीव वाचकांपर्यंत कशी पोचते यांवर कवितेचे आकलन अवलंबून असते. त्या मंडळींनी त्यांना विंदांच्या कवितेचे जे आकलन झाले ते ‘स्वच्छंद’मध्ये मांडले; म्हणजे आणखी एक जबाबदारी पत्करली आणि ती समजदारीने व संवेदनेने निभावली. उदय, अनिल आणि प्रसाद हे तिघे मिळून ‘माझ्या मना बन दगड’ आणि ‘पुन्हा तेच ते’ या दोन वरकरणी साध्यासोप्या वाटणाऱ्या परंतु अर्थगर्भ आणि भेदक कविता परिणामकारक रीत्या सादर करतात. माधव गावकर ‘चेडवा’चे मालवणी गीत गातात व त्या पाठोपाठ गौरी ‘मुक्तीमधले मोल हरवले’मधील सखोल जाणिवेकडे घेऊन जातात. गौरीच आंबा कसा खावा याचा अनुभव कथन करतात तेव्हा तर हसावे की एकूण अनुभवाला स्मरून आक्रंदन आरंभावे असा प्रश्न मनासमोर उभा राहतो. विंदांचा मिस्कीलपणा, चहाटळपणादेखील असा अर्थाकडे जात असतो. निवेदक मंडळी तो अनुभव गडद करत असतात. विंदा रिकामपणी, उत्स्फूर्त असे काही लिहीत नाहीत. त्यांनी ओळ न् ओळ विचारपूर्वक लिहिली. त्यांना काही सांगायचे आहे, ते पूर्ण प्रभावाने कसे पोचेल याची कसोशी विंदा घेतात. विंदा कविता वा लेखन वाचकांसमोर नुसते ठेवत नाहीत, ते त्यांच्या मनात प्रश्न निर्माण करतात. ते प्रश्न नैतिक, तात्त्विक, वर्तनविषयक, कलाविषयक असे सर्व प्रकारचे असतात. आचरेकर प्रतिष्ठानची मंडळी त्यापुढे जातात. ती तो अनुभव पूर्णतेने रसिकांपर्यंत पोचवतात. त्यांच्या ‘अभिवाचना’ने प्रेक्षक-श्रोते समाधान पावतात; अस्वस्थही राहतात – पण ते कर्तृत्व विंदांचे व माध्यम म्हणून त्या मंडळींचे.

विंदांचे आयुष्य व साहित्य संगीत, ताल, लय आणि शब्द यांनी फुललेले आहे. त्यामुळे त्यांचे सार्थ वर्णन दीडदा या शब्दात यथार्थ होते. आचरेकर प्रतिष्ठानच्या कलावंतांनी ‘स्वच्छंद’ कार्यक्रमात तो मूड अचूक पकडला आहे.

‘स्वच्छद’चा हा कार्यक्रम विंदांच्या हयातीत घडला होता. त्यांनी तो पाहिला होता व त्यांना तो आवडलाही होता. कार्यक्रमास निमित्त झाले ते ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे सावंतवाडी येथील 1997 चे संमेलन. तेथे विंदाच अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीवर कार्यक्रम हवा अशी टूम निघाली. तेव्हा ‘कोमसाप’ची कणकवली शाखा जोरात होती. तेथे विद्याधर करंदीकर, प्रसाद घाणेकर असे साहित्यवीर उत्साहात होते. त्यांनी वि.स. खांडेकर यांच्या साहित्यावर आधारित ‘अमृतधारा’ कार्यक्रम बसवल्याचा इतिहास होता. त्यामुळे कणकवलीकरांनी विंदांच्या कार्यक्रमाची जबाबदारी उचलली. विद्याधरांसारखा रसिक सिद्धहस्त समीक्षक त्यांच्या चमूत होता. संहिता तयार झाली. ‘स्वच्छंद’ने ती संमेलनात सादर केली. विंदा, मंगेश पाडगावकर असे प्रेक्षक-श्रोते होते. तेदेखील एका प्रतिभावान माणसाच्या आयुष्याच्या कामाचा पसारा दोन तासांत मांडलेला पाहून थक्क झाले. वामन पंडित, प्रसाद घाणेकर यांच्याही अंगावर थोडे मांस चढले. परंतु त्या संहितेचे आणखी एक-दोन कार्यक्रम झाल्यावर ती बासनात गेली. तिला पुन्हा जीव लाभला तो विंदांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मराठी राज्यभाषा विकास संस्थेने ‘स्वच्छंद’ला अनुदान दिले म्हणून. चमूवर जबाबदारी होती की त्यांनी 6 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर (2017) दरम्यान ठाणेनाशिक या दोन महसूल विभागांत वीस कार्यक्रम करायचे. चमूने वामन पंडित यांच्या नेतृत्वाखाली ती कामगिरी पार पाडली. तेवढेच नव्हे तर इचलकरंजी, पुणे व मुंबई असे तीन जादा प्रयोग केले.

‘स्वच्छंद’च्या या उपक्रमाची सांगता खरोखरीच सफल झाली! विंदांचे मुळगाव धालवली. विंदांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण कोर्ले गावी झाले. दोन्ही गावे देवगड तालुक्यातील अगदी जवळ जवळ आहेत. कोर्ले येथील ग्रंथालयास विंदांचे नाव देण्यात आले व तेसुद्धा विंदांच्या जयश्री, आनंद व उदय या तीन मुलांच्या उपस्थितीत. त्यांच्या या तिन्ही मुलांचे गावी येणे कधी झाले नव्हते. त्यामुळे त्या तिघांनाही धन्य वाटले. अ.सो. शेवरे नावाचे कवी कोर्ले येथील वाचनालय निष्ठेने चालवत होते. त्या संस्थेस विंदांच्या नावाची झळाळी लाभली आहे.

- दिनकर गांगल

लेखी अभिप्राय

superb

Sandhya joshi27/05/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.