आहे संदर्भहीन तरीही...


(निमित्त ‘प्रभात चित्रमंडळा’च्या सुवर्ण महोत्सवाचे)

_AaheSandarbhahin_Tarihi_1.jpg‘प्रभात चित्रमंडळा’च्या कार्यकारिणीची मीटिंग, मंडळाला पन्नास वर्षें होत आहेत म्हणून राजकमल स्टुडिओमधील किरण शांताराम यांच्या ऑफिसात चालू होती. सेक्रेटरी संतोष पाठारे याने ‘मंडळा’चा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याच्या विविध योजना सांगितल्या. हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर सल्लागारांची समिती नेमण्यात आली. तोपर्यंत मीटिंगमध्ये चहा-बिस्किटे आली होती. संतोषने आम्हा ज्येष्ठांना औपचारिकता म्हणून विचारले, ‘तुम्हीही काही कार्यक्रम सुचवा ना!’ आम्ही तिघेच ज्येष्ठ होतो – सुधीर नांदगावकर, जयंत धर्माधिकारी आणि मी. किरण शांताराम हे जरी सत्तरीपार असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व सदाबहार, हसतमुख; व्यवहाराची मार्मिक दृष्टी असलेले. आम्ही तिघे औपचारिकपणे काही बोललो, पण तरी आमच्या बोलण्यात म्हणून पाच-सात मिनिटे गेली होती. मला तो काळ एकाएकी भीषण वाटू लागला. मला आत गलबलून आले. मला सुचेना. मी गप्पांत हसून-खेळून सहभागी होतो, पण आत अस्वस्थतेने गडबडून गेलो होतो. वाटले, पूर्वी बरे होते, माणसांचे आयुष्य कमी होते. संस्थांचे रौप्य महोत्सव-सुवर्ण महोत्सव, माणसांचे जन्मशताब्दी समारोह संस्थापकांच्या पश्चात साजरे होत. नवीन लोक जे त्यांच्या जागी येत ते त्यांच्या पद्धतीने, संस्थापकांचे फोटो लावून वगैरे समारंभ साजरे करत! येथे आमची कर्तबगारी जोखण्याची वेळ आमच्यावर येऊन पडणार होती.

खरे तर, मीटिंग उत्तम चालू होती. संतोषने वर्षभराचा जो कार्यक्रम रचला होता, तो दर महिन्याला काही वैशिष्ट्ये प्रदर्शित करणारा होता. संतोषने मला तो प्रश्न विचारीपर्यंत मीटिंगमध्ये वावगे काही माझ्या मनात आलेही नव्हते.

× × ×

आम्ही ‘प्रभात चित्रमंडळा’ची स्थापना 1968 साली केली. मराठी चित्रपट प्रेक्षकांची अभिरुची संवर्धित व्हावी हा मूळ हेतू. त्याला अनुषंगिक असे अनेक उपक्रम वर्षांनुगणिक गठित होत गेले. माणसे जमा होत गेली. रसिकजनांना नवनवे व देशोदेशींचे उत्तमोत्तम, आशयसंपन्न चित्रपट पाहण्यास मिळू लागले. ती एक झिंग होती. त्यातच माझ्यापुरता वेगळा फाटा फुटला, तो ‘ग्रंथाली’चा. तिकडे साहित्य, वाचन असा बाज होता; सामाजिक डूब जास्त होती. ‘प्रभात चित्रमंडळा’मध्ये सिनेमा पाहण्याची, कलेची समृद्धी खूप मोठी होती. चित्रपट माध्यमात कला आणि विज्ञान एकात्म होऊन समोर पडद्यावर साकारतात. ती भाषाच गेल्या शतकात वेगळी विकसित होत गेली आहे. कॅमेर्‍याची भाषा! ती चित्रभाषा शब्दाक्षरांपुढे जाते. आदिमानवाला निसर्ग व सभोवताल समोर आला; आणि जितक्या स्वाभाविकपणे कळत गेला असेल, तितक्या सहजस्वाभाविकपणे मानवी डोळे आधुनिक काळात चित्रपट माध्यमात सारे जग पडद्यावर टिपत असतात. त्या दृश्यांची संगती लावताना माणसाची बुद्धिभावनाही तशीच नैसर्गिकपणे उपयोगात येत असते. माणसाला चित्रे वा चित्रपट पाहण्यासाठी, वाचन करण्याकरता जशी अक्षरभाषा शिकावी लागते तसे कोणतेही कौशल्य कमावावे (अॅक्वायर) लागत नाही. आदिमानव प्रथम चित्रभाषेतून ‘बोलू’ लागला. ते मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील चित्रे व कोकणातील कातळशिल्पे आणि जगभर सापडत असलेल्या प्राचीनतम वास्तू व कला यांमधून दिसून येते. माणसाची रुची तेथे चित्रे-चित्रपट पाहत पाहत घडत जाते; तो प्रगल्भावस्थेला पोचू शकतो. त्यामुळे फिल्म सोसायट्यांचे रसिक प्रेक्षक घडवण्याचे कार्य सद्यकाळात अनन्य महत्त्वाचे ठरते.

माणसाला चित्रपटतंत्राची किमया अक्षरभाषेचा शोध लागल्यानंतर दोन-पाच सहस्र वर्षांनी, गेल्या शतकात गवसली! दादासाहेब फाळके ती भारतदेशात घेऊन आले. ते तंत्र भाषा म्हणून गेल्या शतकभरात विकसित झाले. आम्ही ‘प्रभात’च्या माध्यमातून त्या प्रक्रियेशी जोडले गेलो होतो! आम्ही प्रेक्षक म्हणून बिंदुरूपाने, अगदी दुरून का होईना पण अभिरुची संवर्धनाचे कारण घेऊन त्यात अजाणता सामील झालो होतो! ‘प्रभात’ची स्थापना 1968 ची. ‘ग्रंथाली वाचक चळवळ’ अनौपचारिक रीत्या सुरू झाली 1974-75 साली. ते दोन्ही अनुभव एकमेकांना पूरक होते. सहभागी कित्येक माणसेदेखील दोन्हींकडे तीच होती. त्या वेळी वातावरण कसे होते? स्वातंत्र्योत्तर पंधरा-वीस वर्षांनी समाजात मोठे बदल सुरू झाले. लोकांच्या आशा-अपेक्षा वाढू लागल्या. ‘ग्रंथाली’मध्ये त्यांचे स्थानिक दर्शन होई. ‘प्रभात’मध्ये त्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिणाम कळून येत. तो काळ मोठा मौजेचा होता. ‘जुने जाऊद्या मरणालागूनी, जाळूनी किंवा पुरूनी टाका’ असे नवे काही रोज आकळत असल्याची जाणीव होती - अनेकविध माणसांच्या संपर्कातून आणि समोर जे स्थानिक व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रकट होत होते, त्यातून. लोकांच्या गाठीभेटी-बैठका-सभा ‘प्रभात’च्या तुलनेत ‘ग्रंथाली’मध्ये कितीतरी जास्त होत! बरोबरीच्या कार्यकर्त्यांची मने बैठकांमध्ये कळत. ज्येष्ठांचे विचारचिंतन डोक्यात सभांमध्ये घुसे. त्यामधून टीव्हीच्या जशा अनेक वाहिन्या असतात, तशा मनमेंदूच्या अनेकानेक वाहिन्या सतत सुरू असत/अजूनही असतात.

× × ×

या पार्श्वभूमीवर, संतोषने मीटिंगमध्ये सहज म्हणून प्रश्न विचारला आणि मी धास्तावून गेलो, कारण माझ्या नजरेसमोर गेल्या पन्नास वर्षांतील घडामोडींचा चित्रपट सरसर सरकत गेला. त्यात तंत्राची नवलाई होती. जुनी मूल्ये अस्तंगत होऊन नव्या मूल्यांचा स्वीकार नव्या माध्यमांतून आणि चळवळी-आंदोलनांतून बिंबवला गेला होता. मनात आले, माझ्यावरच  ‘प्रभात’च्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची जबाबदारी आली असती तर मी काय सुचवले असते? पाच वर्षांचा सुद्धा भविष्यवेध घेता येणे शक्य नाही अशा अस्थिर काळात मी स्थायी स्वरूपाच्या ‘सौंदर्यशोध तत्त्वा’चे ‘सेलिब्रेशन’ करू शकलो असतो का? पुढील पन्नास वर्षांसाठी झेप घेण्याचा विचार तरी माझ्या मनात येऊ शकला असता का? मला एकाएकी संदर्भहीन वाटू लागले. माझ्या नजरेसमोर गेली पन्नास वर्षें प्रेतवत पडली गेलेली दिसू लागली. सतीश आळेकरचे ‘महानिर्वाण’ नाटक आठवले. त्यामध्ये ‘भाऊराव’ हे प्रमुख पात्र, पडदा उघडत असताना प्रेत म्हणून पुढे पडलेले असते. भाऊरावाचा मुलगा नाना याच्यापुढील प्रश्न त्या प्रेताचा अंत्यविधी कसा करावा हा असतो... आणि मग खेळ सुरू होतो तो एक प्रेत आणि एक जिवंत माणूस यांच्यातील संभाषणाचा. तेच ते नाटक आहे. ब्लॅक कॉमेडी! चंद्रकांत काळे आणि स्वत: सतीश आळेकर यांनी रंगमंचावर मांडलेल्या आट्यापाट्या अजून अंगावर काटा उभा करतात. एक जमाना संपला आहे. त्यामधील मूल्यव्यवस्था हरवत आहे आणि नव्या जमान्याकडून नव्या संकेतांचा शोध चालू आहे, हे ते नाटक. आळेकरांनी ते नाटक लिहिले तो काळ परिस्थितीने अभावाचा होता – दूध कार्डावर मिळत होते, रॉकेल काळ्या बाजारात असे; पण मनात आशा होती, नवे शतक उगवायचे आहे!

लोक त्या काळात नवतेच्या, आधुनिकतेच्या शोधात वेगवेगळ्या क्षेत्रांत मुसंडी मारत होते. तरुण निर्मितीशील व संवेदनाक्षम असतात; ते सारे नव्या कशाच्या तरी शोधात होते. ‘मराठी विज्ञान परिषद’, ‘स्त्रीमुक्ती संघटना’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ यांच्या मोहिमांचे उद्दिष्ट स्पष्ट होते. त्यांना जांभेकर ते आंबेडकर या प्रबोधनकाळातून विचारसूत्र लाभले होते. त्यांना समाजातील अज्ञानांधकार दूर करायचा होता. पण बदलते जग समजावून घेण्यास उत्सुक आम्ही ‘ग्रंथाली’, ‘प्रभात चित्रमंडळ’, ‘थिएटर अॅकॅडमी’, ‘आविष्कार’ आणि तशा अनेक लहानमोठ्या संस्था, उपक्रम यांमध्ये एकत्र होत होतो. आम्हाला येथील माणसांची मने कशी घडतात/घडवता येऊ शकतात का याचे कुतूहल होते. आम्हाला नाटकांतील नवे प्रयोग, साहित्यातील बंडखोरी, चित्रपटांतील नवी लाट या गोष्टी लुभावत. तेवढेच कशाला? त्यावेळच्या, (इडियट बॉक्स समजल्या जाणार्‍या टीव्ही) दूरदर्शनवरील ‘गजरा’पासून ‘प्रतिभा आणि प्रतिमा’सारखे करमणूकप्रधान, उद्बोधक कार्यक्रमदेखील मोहात पाडत. ‘माणूस’, ‘मटा’ ही आमची नियतकालिके होती. विजय तेंडुलकर हे आमचे अग्रदूत होते. त्यांच्या पाठोपाठ आलेला अरुण साधू आम्हाला आमच्या पिढीचा कादंबरीकार जाणवत होता. जब्बार पटेल नाटक-सिनेमांच्या दृश्य रूपातील नवा आशय सुचवत होता. पण सतीश आळेकर हा जुन्यानव्याचा, पुणेरी संस्कृतीतच तयार झालेला अर्क होता. महेश एलकुंचवारसारखे ‘नवोदित’ नागपूरला डबके ठरवून मुंबई-पुण्याकडे त्याच नवतेच्या डोहात सामील होण्याच्या अपेक्षेने पाहत होते. डहाके-गणोरकर अमरावतीचे ‘कॅक्टस’ सोडून वरळी-चर्चगेटला राहण्यास येऊन मोठी स्वप्ने पाहू लागले होते. वातावरण सांस्कृतिक दृष्ट्या धगधगते होते. ते प्रक्षोभक होते – निर्मितीशीलदेखील होते. आम्ही ‘प्रभात’मधून फिल्म सोसायटीच्या कार्याची त्यामधील भूमिका लोकांच्या मनावर ठसवू पाहत होतो. आम्हाला चित्रपटाच्या नव्या माध्यमाचे ‘एक्सपोजर’ होते हा आमचा अधिकचा मुद्दा होता.

सतीश आळेकरची ‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ ही नाटके म्हणजे आमच्या चर्चांना उदंड खाद्य असे. त्या कधी संपतच नसत. आळेकर असा डोक्यात भिनलेला असतानाच, योगायोगाने, ‘थिएटर अॅकॅडमी’च्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाला परदेशात प्रयोग करण्याचे निमंत्रण आले. शिवसेनेने व विद्याधर गोखले यांच्यासारख्या नाटककारांनी त्याच्या परदेशगमनास विरोध केला. गोखले ‘लोकसत्ते’चे संपादकही होते. त्यांनी विरोधी लेख-अग्रलेख यांची आघाडीच उघडली. रस्त्यावर शिवसेना होती. त्यांनी तेंडुलकरांच्या घरासमोर राडा सुरू केला. त्यांचे म्हणणे त्या नाटकामुळे नाना फडणवीसांची अप्रतिष्ठा होते! आंदोलनकर्त्यांचा तो सारा निखालस बनाव होता. त्यामध्ये तेंडुलकर मानवी जीवनाची जी नवी मांडणी करत होते व त्यांना प्रतिसाद मिळत होता, ते ज्या कलाकृती निर्माण करत होते आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश लाभत होते; त्याबद्दलचा दुस्वास, हेवा, जलन, तिरस्कार असे सारे काही होते. त्या नव्याच्या विरोधकांनी ‘सखाराम’, ‘घाशीराम…’ यांचे प्रयोग बंद पाडलेच, पंरतु त्यांनी ‘घाशीराम…’ची नाटकमंडळी परदेशी जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोचूच शकणार नाहीत असे धमकावले. सांस्कृतिक क्षेत्रातील नव्या जाणिवांचा स्फोट ‘सेन्सॉरविरूद्धच्या लढ्या’मधून होत होता. सेन्सॉर बोर्डाची चित्रपटांवरील कात्री, राज्याच्या नाट्यपरिनिरीक्षण मंडळाची संहितांमधील अन्याय्य काटछाट व त्या पलीकडे शिवसेनेसारख्या ‘प्रतिगामी’ संस्थांची व व्यक्तींची झुंडशाही... सर्वत्र तणाव होता. वातावरण भयग्रस्त होते. ‘थिएटर अॅकॅडमी’ची मंडळी पुण्यात लपूनछपून वावरत होती. अशा वेळी दिल्लीहून इंदिरा गांधी यांनी ‘थिएटर अॅकॅडमी’च्या मंडळींना परदेशी जाण्यासाठी हिरवा कंदिल दाखवला. तरीदेखील वातावरणातील दहशत कमी झाली नाही. म्हणून ‘ग्रंथाली’च्या आम्हा तरुण मंडळींना ‘थिएटर अॅकॅडमी’च्या अडचणीत आलेल्या नाटक मंडळींच्या प्रती भ्रातृभाव दाखवून धीर द्यावासा वाटले. आम्ही ‘ग्रंथाली’त आयडिया काढली, की ‘थिएटर अॅकॅडमी’चे पुढील नाटक ‘महानिर्वाण’ याबद्दल पुस्तिका लिहून व ती प्रकाशित करून, त्या मंडळींसाठी घाईघाईने निरोप समारंभ योजावा. आमच्याकडे कुमार केतकरसारखा प्रगल्भ बुद्धीचा तरुण होता. त्याप्रमाणे कुमार केतकरने ती पुस्तिका लिहिली. आम्ही ती प्रसिद्ध केली आणि ‘फर्ग्युसन कॉलेज’च्या ‘अॅम्फी थिएटर’मध्ये नाटक मंडळींना निरोप समारंभ योजला. किती गुपचूपपणे तो सारा प्रकार घडवला गेला! आम्ही सारे नकळतपणे ‘नव्या’ला होणारा विरोध हाणून पाडण्याच्या चळवळीत उतरलो होतो. आमच्या कार्याचा आशय स्पष्ट होत होता.

कुमार केतकरने त्या पुस्तिकेचा समारोप ‘विसाव्या शतकाचे महानिर्वाण’ अशाच स्वरूपाचा केला आहे. त्याने केशवसुतांच्या ‘जुने जाऊद्या मरणालागूनी, जाळूनी किंवा पुरूनी टाका’ या ओळी उद्धृत करताना त्यापुढील 'सडत न एक्या ठायी ठाका | सावध ऐका पुढल्या हाका |’ या दोन ओळी मुद्दाम नमूद केल्या आहेत. त्यात सतर्कता, सावधानता अभिप्रेत असली तरी ‘सुबह कभी तो आयेगी’ची आशा गच्च भरलेली आहे. कुमारने पुढे म्हटले आहे, की ‘प्रचंड प्रलयी घटनांनी, संपन्न अशा या शतकात सर्वच मूल्ये, विचार, सिद्धांत कसोटीला लागले होते. काही कसोटीला उतरले तर काहींचे तीन तेरा वाजले. येणार्‍या वीस वर्षांत घटना अधिक अद्भुत घडणार आहेत. त्यांचा आपल्या जीवनावर विलक्षण खोल परिणाम होणार आहे. हा गतीचा कायदा पाळताना जो थांबेल तो संपणार आहे.’

‘ग्रंथाली’, ‘थिएटर अॅकॅडमी’ यांच्यातील ते सख्य पुण्यापुरते मर्यादित राहिले नाही. इकडे मुंबईमध्ये ‘प्रभात चित्र मंडळा’ने अमोल पालेकरची साथ देऊन त्याच्या ‘वासनाकांड’ (लेखन -महेश एलकुंचवार) या नाट्यनिर्मितीवर आलेली बंधने झिडकारून टाकली. ते नाटक ‘प्रभात’च्या वतीने ‘रवींद्र’मध्ये सादर करण्यात आले. सांस्कृतिक संस्थांचा भ्रातृभाव व्यापक होत गेला. तो संघर्षात्मक तसा विधायक रीत्याही व्यक्त होऊ लागला. त्यामुळे ‘प्रभात’ व ‘ग्रंथाली’ यांचेही संयुक्त कार्यक्रम होत. त्यामागे आविष्कार स्वातंत्र्यावर येणारे निर्बंध हटवण्याची भूमिका होती; स्वातंत्र्याचे आवाहन होते. आमच्या कार्याला अशा तर्‍हेने मूल्यभाव लाभला होता. त्यामधून सामाजिक जाण प्रकट होत होती, सौंदर्यदृष्टीचे संवर्धन होत होते आणि व्यक्तिस्वातंत्र्यास पोषक भूमिका दृढ बनत होती.

× × ×

मी ‘प्रभात’मध्ये 1990 नंतर क्रियाशील फार राहिलो नाही. ‘ग्रंथाली’चे व्याप वाढले होते. ‘मटा’तील नोकरी सोडली असल्यामुळे पोटापाण्यासाठी ‘कन्सल्टिंग’सारखे नाना उद्योग करावे लागत होते. ‘प्रभात’मध्ये सिनेमा पाहणे हेसुद्धा अत्यावश्यक तेवढेच होई. मात्र मी मंडळाचा ट्रेझरर म्हणून त्यानंतरही पाच-सहा वर्षें हिशोबाच्या कागदांवर सह्या करत राहिलो. ‘प्रभात’ने मध्येच एक घटना दुरुस्ती केली आणि ‘विश्वस्त’ या नावाचे पद तेथे तयार झाले. मला ट्रेझररशीप सोडल्यानंतर विश्वस्तपदी नियुक्त करण्यात आले. मी मंडळाचे अध्यक्ष किरण शांताराम आणि नांदगावकर यांना, ‘मला वास्तवात मी घेणार नसलेल्या त्या जबाबदारीतून मुक्त करा’ असे अधूनमधून सांगत होतो, पण ते दोघे माझे म्हणणे हसण्यावारी नेत. मी पण ज्येष्ठ ज्येष्ठ होत होतो. माझे डोंबिवलीचे एक परिचित वय वाढत असलेल्या नव्या मनुष्य समुदायाची विभागणी नववृद्ध (साठीपार), मध्यमवृद्ध (सत्तरीपार) आणि अतिवृद्ध (ऐंशीपार) अशी करत. त्यानुसार त्या त्या वयाचे म्हणून भावना-विचार, आग्रह-दुराग्रह, सत्याग्रह असतात. प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या कलाने ते निभावते. माझा कल परिस्थिती टोकाला नेण्याकडे नाही. आम्ही सिनियर ट्रस्टींनी ‘ग्रंथाली’मधून निवृत्ती घेतली होती. मी ‘प्रभात’बाबतही मनाने तसाच हल्लक होत चाललो होतो, मला त्यापुढील जनमाध्यमाचे-इंटरनेटचे वेध लागले होते आणि माझे ‘प्रभात’मधून निवृत्तीचे प्रकरण तडीला लावावे असे वाटे वाटेपर्यंत सुवर्ण महोत्सव येऊन ठेपला होता!

आम्ही सिनेमा पाहू लागलो ती परिस्थिती वेगळी होती. आम्ही सिनेमा पाहत पाहत क्लासिक सिनेमापर्यंत पोचलो होतो. वेगवेगळ्या देशांचे चित्रपट महोत्सव, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांची तिकिटे मिळवावी म्हणून आमची मारामार चाले. आम्ही सर्व तर्‍हेच्या गैरसोयी सहन करत ताराबाई हॉलला सिनेमे पाहिले. ते माध्यम आमच्या समोर विकसित होत गेले व शास्त्रीयतेच्या पातळीवर पोचले. सिनेमाबद्दलची पाश्चात्य प्रगत देशांतील समज थक्क करून टाके. त्यांची ‘साईट अँड साउंड’सारखी मासिके मिळवण्याकरता यातायात करावी लागे. मात्र जगातील सर्वांत जास्त सिनेमा बनवणार्‍या भारतासारख्या देशातील समज फारच अपरिपक्व जाणवे. तसे मुद्दे आमच्या चर्चेत पुन:पुन्हा निर्माण होत. तेच घेऊन तर आम्ही 1970 च्या दशकात महाराष्ट्राच्या रसिकांचे मेळावे घेतले, निमित्ता निमित्ताने वेळोवेळी चर्चा घडवल्या, शहराशहरांत ‘प्रभात’सारख्या फिल्म सोसायट्या स्थापन व्हाव्या म्हणून धडपडत राहिलो. मला ते सगळे त्या पद्धतीने करत राहणे आता, ग्लोबलायझेशनच्या तडाख्यात बिनगरजेचे झालेले दिसत होते. आम्ही ते केले याचे कौतुकदेखील मनी राहिले नव्हते. पण त्याच बरोबर नवी दृष्टीही लाभत नव्हती.

ती मला नव्या मुलांकडून हवी होती. पण येथे तर गाडी त्याच यार्डात अडकून पडत होती. संतोषची नवी टीम सक्षम आहे. तीमधील गणेश मतकरी त्याच्या समीक्षात्मक लेखनातून, कथांतूनसुद्धा स्थानिक व आंतरराष्ट्रीय ताणेबाणे तपासत असतो. दुसरा श्रीकांत बोजेवार स्वत: यशस्वी पटकथाकार आहे. तो परिस्थितीचे विच्छेदन करणारे व्यंगात्म लेखन वेधक व बोचरे करत असतो. तिसरा अभिजित देशपांडे मराठी भाषेचा लेखक-प्राध्यापक. त्याला ‘नव्वदी’नंतरची भाषा यथार्थ कळते आणि चौथा अमित चव्हाण हा कार्याची बैठक असलेला. तोही चित्रपटसंबंधात संयोजनाची कामे करत असतो. ही टीम नवनवे कार्यक्रम उत्साहाने करत असते. त्यांनी चित्रपट रसास्वादाचे वार्षिक वर्ग सुरू केले. तो उपक्रम प्रशंसनीय आहे. अभिजितच्या संपादनाखाली ‘रूपवाणी’ नव्या रूपात सादर करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते चित्रपट प्रदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यासाठी अन्य संस्थांशी सहयोग साधत असतात. त्यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षाचा आरंभही हृद्यतेने व एक सुरेख चित्रपट दाखवून साजरा केला. यापुढे वर्षभर काही काही घडत राहील.

तरीही सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची कल्पना मांडली गेली तर मी अस्वस्थ का? मी ‘प्रभात’मधील बैठकांत व गप्पांत गेली दोन दशके वारंवार सांगत आलो आहे, की ‘फिल्म सोसायटी’चे चित्रपट प्रदर्शनाचे काम गरजेचे राहिलेले नाही. कारण घरोघरी, दारोदारी आणि मोबाईलसह सर्व साधनांवर जगातील वाटेल तो चित्रपट पाहता येतो. अशा वेळी थिएटरमध्ये माणसे एकत्र जमवून चित्रपट दाखवण्याचे कर्मकाण्ड कशाला चालू ठेवायला हवे? ते यथाक्रम नष्ट होण्याऐवजी जाणीवपूर्वक बंद करू आणि त्याऐवजी ‘फिल्म सोसायटी’ म्हणून चित्रपटांचे अत्याधुनिक विषय व चित्रपटांची निर्मिती, त्यामधील नवनवीन शक्यता यांबद्दलच्या अभ्यासचर्चा योजू. त्यासाठी ऑनलाईन प्रयत्नदेखील करता येतील. त्यातून ‘फिल्म सोसायटी’चा मुख्य उद्देश, जो अभिरुची संवर्धनाचा, तो साधला जाईल. समानधर्मा चित्रपटप्रेमी व्यक्तींचे नेटवर्क तयार होईल. रसिकता जपणार्‍या अन्य संस्थांशी संगनमत करता येईल- आणखीही बुद्धिगम्य गोष्टी सुचू शकतील. त्यासाठी ब्रेन स्टॉर्मिंग करू. मला फिल्म सोसायट्यांसमोरील आव्हानाचा मुद्दा बदललेल्या परिस्थितीचा, उपलब्ध नवनव्या तंत्रज्ञानाचा आणि प्रेक्षकांच्या समजुतीचा वाटे. बदललेल्या परिस्थितीत ‘प्रभात’सारख्या स्थानिक प्रयत्नांना किती स्थान आहे? नव्या तंत्रज्ञानात जवळ जवळ प्रत्येक दिवशी नवी शक्यता तयार होत आहे व ती सगळ्या जगाला जोडून घेत आहे. अशा वेळी स्थानिक गोष्टी हरवून जात आहेत, जागतिक गोष्टी हाती लागतातच असे नाही. व्यक्तिस्वातंत्र्य प्रबळ होत चाललेल्या जगात व्यक्तीची समजदेखील सूक्ष्मतरल होत चालली आहे. कवितेपासूनच्या प्रत्येक कलाकृतीला व्यक्तिगत पत्राचे मोल येत आहे. अशा वेळी अभिरुचीचे दंडक निश्चित करणे – त्यांतील जागतिक व स्थानिक परिमाण जोखणे हे महत्त्वाचे ठरते. मी माझे ते म्हणणे मांडण्याचा शक्य असेल तेव्हा प्रयत्न करत असे.

आमच्या पिढीने संयुक्त कुटुंबे बरखास्त केली; छोट्या कुटुंबातही स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरला; मुलांचे संगोपन काळजी घेऊन केले - त्यांचे हक्क जपण्याकडे कल ठेवला. हे सर्व संस्कृतीला पोषक घटक होते. अशा गोष्टी नव्या समाजव्यवस्थेच्या निदर्शक होत्या. त्यामधून समाजाची नवी घडी बसेल असा विश्वास होता. परंतु झंझावात यावे तशी समाजव्यवस्था, संगणकाच्या आगमनानंतर बदलून गेली. आठ-दहा वर्षें जुन्या-नव्याच्या संघर्षात मागे पडली खरी, परंतु समाजाने नवे ते नावापुरते घेतले. त्या पाठीमागील सूत्र जाणले नाही. त्यामुळे आधीच्या पिढ्यांनी सामाजिक-सांस्कृतिक म्हणून आखलेल्या कार्यक्रमाचेदेखील कर्मकांड होऊन बसले.

त्यामुळे मी अस्वस्थ झालो का? मला भीती कसली वाटते? मी वृद्ध झालो त्याची? मी रस्त्या रस्त्यांवर प्रौढ मंडळी वाढत चाललेली बघतो. ‘सिनियर सिटिझन्स ग्रूप्स’समोर जाऊन भाषणे करतो. मी माझे काही सहकारी गेल्या दशकात गमावलेदेखील आहेत. मला माझे म्हातारपण वा या भूमीवरील संभाव्य निर्गमन बिचकावत नाही. मला भीती वाटते, की मी माझ्या पिढीपर्यंत आलेला वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोचवू शकलो असे जाणवत नाही त्याची. ना मी त्यापासून काही धडा पुढील पिढ्यांना देऊ शकलो, त्याची. आमच्या पिढीने ज्या कर्मकांडाला कडाडून विरोध केला, सतत ब्रेन स्टॉर्मिंगची कांक्षा बाळगली, आम्ही जिज्ञासा वाढावी हा ध्यास बाळगला, जीवनात आनंद असावा याकरता संस्कृतिकारण हा फंडा सुचवला, पण ते बाजूला पडून त्या जागी नवी कर्मकांडे आणून ठेवली जात आहेत का? विचारचर्चेच्या वाटा नवनव्या तंत्राच्या सहाय्याने अधिक रुंद होऊन चर्चा विशाल पातळीवर जाण्याऐवजी ती संकुचित होत आहे का? सामाजिक-सांस्कृतिक संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते समाजाला वेगवेगळ्या शक्यता व वळणे दाखवण्यासाठी कार्यप्रवृत्त होत असतात ना! त्यांनी तो वेध सतत घेत राहिले पाहिजे, तशी ध्येयधोरणे आखली पाहिजेत. त्यालाच ‘लष्करच्या भाकर्‍या’ असे म्हणतात. सामाजिक-सांस्कृतिक जीवन समृद्ध होत जावे यासाठी संस्था कार्यरत असतात. ‘प्रभात’चा तसा प्रभाव पन्नासाव्या वर्षी समाजजीवनावर आहे का? उलट, आमच्या काळी ‘प्रभात’ ही संस्था जेवढी चळवळी होती, तेवढी ती आता राहिलेली जाणवत नाही. ती व्यापक समाजजीवनात कोठेतरी 1990 नंतर हरवत गेलेली भासते.

पण ‘प्रभात’चाच दाखला, माझा व्यक्तिगत घनिष्ट संबंध असल्यामुळे का द्यावा? गेल्या पन्नास वर्षांच्या काळात वैज्ञानिक जाणिवेचा जागर झाला; अंधश्रद्धेविरूद्ध लढा पुकारला गेला - ‘मराठी विज्ञान परिषद’ आणि ‘लोकविज्ञान चळवळ’ यांचे तारे चमकू लागले. ‘ग्राहक चळवळ’ संघटित होत गेली. कामगारांना न्याय्य हक्क हवेत म्हणून सत्याग्रह-संप झाले. तळच्या वर्गांना त्यांच्या मनुष्यत्वाची ओळख पटली. साहित्याला नवे धुमारे फुटले. ‘मराठी साहित्य महामंडळ’ पाच-सात संस्थांचे मिळून घडले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्धे आकाश प्रकाशमान झाले – स्त्रीस्वातंत्र्य फळाफुला आले! ठिकठिकाणी स्त्रीमुक्ती गट निर्माण झाले. ‘मुलगी झाली हो’ या नाटकाने सर्व रेकॉर्ड्स तोडली. ते उच्चभ्रू स्त्री-पुरुषांपासून कामगार व शेतकरी स्त्रीपुरुषांपर्यंत सर्वांना त्यांचेच जीवन असल्यासारखे वाटून गेले. तो चमत्कार होता. त्या सार्‍या आधुनिक म्हणून गेल्या पन्नास वर्षांत जोपासल्या गेलेल्या जाणिवा नव्या तंत्रप्रधान वातावरणात संदर्भहीन झालेल्या जाणवत आहेत. त्या सर्वच सांस्कृतिक घटकांना नव्या संदर्भात नव्या तर्‍हेने त्यांच्या कार्यक्रमाकडे पाहण्याची गरज आहे. हा नवा संदर्भ ग्लोबलायझेशनचा आहे. त्याचे फायदे अधिक – तोटे कमी, पण तोटेच प्रबळपणे पुढे येत आहेत. कारण आव्हान स्वीकारलेच जात नाही.

ग्लोबलायझेशनने कलाजगतासमोर, एकूणच सांस्कृतिक जीवनासमोर नवे प्रश्न निर्माण केले आहेत. कलेपुरते बोलायचे तर कलेचे बाजारमूल्य प्रभावी झाले आहे. त्यामुळे त्यातील सनातनत्व, चिरंतनत्व या मूल्यांचे काय झाले? अभिजातता कशाला म्हणावे? ते सारे निकष कालबाह्य होत आहेत, परंतु चित्रपट हे असे नवमाध्यम आहे, की जे त्या सर्व कलांना कवेत घेतेच, त्याबरोबर व्यवसायाचाही अंगभूत विचार करते. चित्रपट माध्यमाने विचारचर्चेच्या अशा अनेक शक्यता तयार केल्या आहेत. साहित्यक्षेत्रात शंभर वर्षांत संमेलनांची परंपरा तयार झाली. संमेलनासंबंधात वादविवाद असले तरी राज्याचा म्हणून एक महोत्सव होऊन जातो व त्यानिमित्ताने सांस्कृतिकतेचे संस्कार होतात, साहित्यविषयक काही मुद्दे समाजासमोर मांडले जातात. तसा चित्रपट कलेचा विचार होऊ शकतो का? त्यामधून वेगळ्या वाटा दिसू शकतील का? नांदगावकर व मी मिळून ठाण्याच्या साहित्य संमेलनात चित्रपटविषयक एक दिवस साजरादेखील करवून घेतला. त्यावेळी वार्षिक मराठी चित्रपट संमेलने घेण्याचे संकल्प सुटले. अशी अनेक आवाहने व आव्हाने डोळ्यांसमोर उमटली- उभी राहिली. मी त्यांपैकी करू काही शकणार नव्हतो, म्हणून तर मी अस्वस्थ झालो होतो का?

आपण एकविसाव्या शतकात अपेक्षा ठेवून आलो खरे, परंतु या शतकाने बदलांचे आव्हान अधिकच गहिरे केले आहे. दिशा स्पष्ट होण्याऐवजी अंधुक होत गेल्या आहेत. ‘इंटरनॅशनल इंटरनेट कौन्सिल’च्या अध्यक्षांचे 1996च्या सुमाराचे भाषण अजून कानात घुमत आहे. त्यांनी म्हटले होते, की हे इंटरनेट आपल्याला कोठे घेऊन जाणार आहे याचा पत्ता नाही! त्याला वीस वर्षें झाली. अजून त्याची दिशा स्पष्ट नाही. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीतील आमचा मित्र अतुल तुळशीबागवाले गतवर्षी म्हणाला, संगणक घडला कसा? त्यामागचे तंत्रज्ञान काय? हे आम्हाला सांगता येते. परंतु आम्हाला तो पुढे कोठे जाणार आहे, त्याची पूर्णावस्था काय आहे याचा पत्ता नाही. तंत्रज्ञान संगणकाधिष्ठितच राहणार की आणखी नवे रूप घेऊन येणार? हेदेखील सांगता येणार नाही. त्याचे पुढील बोलणे सूचक होते – विज्ञान या जगाचे नेतृत्व करील, जगाची नवी मांडणी करील असे आतापर्यंत वाटत होते. ती शक्यता आता जाणवत नाही. तंत्रज्ञान एवढे ‘ओव्हर पॉवरिंग’ होऊ पाहत आहे व म्हणूनच साहित्यिक-सामाजिक-सांस्कृतिक संस्थांची जबाबदारी वाढली आहे. हा काळ अनिश्चिततेचा, संभ्रमाचा आहे. त्यात निराशा नाही, परंतु पुढे काय घडणार याबद्दल एक चिंता आहे. कोणताही सिद्धांत, विचारपद्धत स्थिर व टिकाऊ नाही. गाडी बोगद्यात शिरली असावी तशी काहीशी मनस्थिती जगभर आहे. गाडी बाहेर पडणार हे नक्की; परंतु ती कशी, केव्हा? आणि गाडी बाहेर पडेल तेव्हा प्रकाश दिसेल तो कशा प्रकारचा? अशा अनेक शंकाकुशंका आहेत. अशा वेळी ज्यांनी गेल्या पन्नास वर्षांतील घडामोडी, आंदोलने, चळवळी, जागृतीच्या मोहिमा जवळून निरखल्या आहेत, आस्थेने-संवेदनेने मनी जागवल्या आहेत, त्यांना गेल्या पन्नास वर्षांचे ‘सेलिब्रेशन’ करावे असे सहज कसे वाटेल? त्यांना वाटेल, अधिक झडझडून कामाला लागायला हवे.

× × ×

‘प्रभात’च्या पाठोपाठ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील सामाजिक-सांस्कृतिक काही संस्था येत्या दशकभरात सुवर्णमहोत्सव साजरे करत जातील. ‘मराठी विज्ञान परिषदे’चा सुवर्ण महोत्सव चालूच आहे. त्या संस्थांनी त्यांचे कार्य जेव्हा पंचेचाळीस-पन्नास वर्षांपूर्वी सुरू केले तेव्हा चित्र स्पष्ट होते. अन्यायाचे स्वरूप माहीत होते - सर्व तर्‍हेच्या शोषणावर हल्ला हा हुकमी इलाज न्याय प्रस्थापित करण्यासाठी होता. त्याच्या पाच-पंधरा वर्षें आधी तिसर्‍या जगातील अनेक देश नवस्वतंत्र होत गेले. त्यामुळे स्वातंत्र्य आणि लोकशाही हा मंत्र विलक्षण सामर्थ्याचा वाटला. लोकांना त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव झाली आणि त्यांना तेच त्यांचे भविष्य घडवू शकतात असे कळले. त्यांची लोकशाही राजवटीचा मार्ग सोपा होत जाईल अशी समजूत होती. परंतु लोकशाही राजकारणातही टोळी राज्य आले आणि प्रत्येक गट त्याचे त्याचे मागणे पुढे ढकलून, त्यासाठी दडपण आणून ते मिळवू लागला. त्यामुळे लोक लोकशाहीला झुंडशाही असेही म्हणू लागले. म. गांधींनी ब्रिटिश पार्लमेंटला उद्देशून 1909 साली ‘बटिक, वेश्या’ असे उद्गार काढले होते. तो अनुभव सर्व राष्ट्रे घेत आहेत. त्याचे मुख्य कारण सांस्कृतिक संस्था राजकारणाश्रयी व अर्थकारणाश्रयी झाल्या आणि त्यांनी त्यांचे समाजातील स्वतंत्र, स्वायत्त स्थान व महत्त्व, दोन्ही गमावले, हे आहे का?

प्रभात चित्रमंडळाच्या मीटिंगमधील एका विचारणेमधून गेली पन्नास वर्षें आणि त्यामधील सामाजिक-सांस्कृतिक घटनांची संदर्भहीनता माझ्या नजरेसमोर उभी राहिली, ती तुमच्यासमोर मांडली आहे. माझा शंभर टक्के विश्वास आहे, की ज्या तंत्रज्ञानाने मानवी जग उलटेपालटे करून टाकले आहे आणि आजची संभ्रमावस्था निर्माण केली आहे ते तंत्रज्ञानच मानवाला तारक ठरणार आहे. कारण तंत्रज्ञानाइतकी लोकशाहीवादी गोष्ट दुसरी नाही. तंत्रज्ञानच माणसाला लोकशाही अधिकार मिळवून देऊ शकणार आहे व मानवी जीवनाची नवी घडी स्थापित करणार आहे. कारण मानव जातीचा गेल्या 2017 वर्षांचा इतिहास नक्की माहीत आहे, त्या काळात माणसाने प्रगती बरीच केली – भौतिक व सांस्कृतिक. तो त्याच क्रमाने पुढे जाईल, जर हत्यार वा तंत्रज्ञान त्याच्या हाती राहिले तर... त्याची पकड त्यावरून सुटली तर? तशा धोक्यापासून माणसाला त्याची बुद्धी व संस्कृतीच तारू शकेल!

- दिनकर गांगल

लेखी अभिप्राय

Superb article

sandhya joshi26/03/2018

मनाच्या तळघरातून आलेल्या प्रामाणिक भावना,,,,salute Sir

मनिषा सुनिल घेवडे02/05/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.