साहित्य संमेलनाच्या अलिकडे - पलिकडे


_SahitySamelanachya_AlikadePalikade_1.jpgबडोद्याचे 91 वे संमेलन यथास्थित पार पडले. अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख प्रागतिक बोलले. संमेलन संयोजनाला सरकारकडून दरवर्षी पंचवीस लाखांऐवजी पन्नास लाखांची कमाई हे बडोदा संमेलनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीचे यश मानले जाईल! ‘इव्हेंटवर असे खर्च करावे की स्थायी स्वरूपाच्या सांस्कृतिक कार्यावर’ अशा चर्चा झडत राहतील. अध्यक्षांची निवडणूक नववर्षासाठी पुन्हा जाहीर झाल्यावर मंद वाहणाऱ्या साहित्यप्रवाहात पाण्यात दगड फेकल्यावर उठतो तसा खंगळा उठेल! अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया, संमेलन माफियांनी हायजॅक केलेली निवडणूक, महामंडळाच्या सलग्न संस्थांची दादागिरी अशा मुद्यांवर चर्चा होईल. दरम्यानच्या काळात नेमाडे यांना एखादा पत्रकार पुन्हा तोच प्रश्न ‘लाईव्ह’ विचारील आणि नेमाडे तेच ते तडकफडक उत्तर देतील किंवा.... तेही ज्ञानपीठानंतर शांतावले आहेत. शो मस्ट गो ऑन. ती माणसाची सांस्कृतिक प्रकृती.

मी नामवंतांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते? असा प्रश्न उपस्थित करणारे टिपण संमेलनाआधी लिहिले होते. त्यावर ‘बुरा मत सुनो, बुरा मत कहो, बुरा मत देखो’वाले फार काही व्यक्त झाले नाही. मीच पुढाकार घेऊन काही लोकांशी बोललो तेव्हा काहींनी नाण्याची दुसरी (आणि तिसरी-चौथीही) बाजू सांगितली. त्यांनी साहित्य संमेलनाला जरा बरा अध्यक्ष मिळावा (लक्ष्मीकांत देशमुख यांची माफी मागून) म्हणून संमेलनाध्यक्ष निवडणुकीतील काही कंगोरे तीक्ष्ण करून दाखवले. मी माझ्या टिपणात म्हटले होते, की नरेंद्र चपळगावकर, भालचंद्र नेमाडे, रावसाहेब कसबे, ना.धों. महानोर, रंगनाथ पठारे, यशवंत मनोहर, राजन गवस, जनार्दन वाघमारे, शेषराव मोरे, राजा ढाले, जयंत नारळीकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सुरेश द्वादशीवार, दत्ता भगत, तारा भवाळकर, विद्या बाळ, अनुराधा पाटील यांपैकी एखादा अध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकेल अशी निवडणूक पद्धत असण्यास हवी. कारण ते आजच्या मराठी वाङ्मयीन दर्ज्याचे सिद्ध ठरलेले प्रतिनिधी आहेत. त्यामुळे स्त्री लेखिकांचा अनुशेष भरून काढता येणार नाही का? त्यांपैकी अनुराधा पाटील या बडोद्याच्या संमेलनात भेटल्या. त्यांच्याशी जरा सविस्तर बोलणे झाले. तीच दुसरी बाजू. कौतिकराव ठालेपाटीलही होते.

अनुराधा पाटील 1980 च्या आगेमागे लिहू लागल्या. त्या कवयित्री आहेत. त्यांच्या कवितांना व काव्यलेखनशैलीला मानणारा एक वाचकवर्ग आहे. त्या स्त्रीचा अंतःस्वर मांडणाऱ्या व्रती कवयित्री समजल्या जातात. कौतिकरावांच्या अनेक उलाढालींशी त्यांचा संबंध दुरान्वयानेही जोडला जात नाही. त्यांचा ‘दिगंत’ हा पहिला कवितासंग्रह 1981 मध्ये प्रसिद्ध झाला. दुसरा संग्रह ‘तरीही’ हा 1985 मध्ये आला. पुढे 1992 मध्ये ‘दिवसेंदिवस’  हा संग्रह प्रसिद्ध झाला. ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ हा संग्रह 2005 मधील.

त्यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करावे, अशी माझी सूचना होती. त्यावर त्या म्हणाल्या, “माझा पिंड लिहिण्याचा आणि वाचनाचा आहे. मला अध्यक्षाला कराव्या लागणाऱ्या उलाढाली करता येणार नाहीत.”

उमेदवार सहमतीने निवडता येईल का? यावर त्या म्हणाल्या, “कोणाही साहित्यिकास निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो. तो साहित्य रसिकांनी व साहित्यिकांनी मान्य केला पाहिजे. त्यासाठी सर्वदूर संपर्क असावा लागतो. तसा पिंड असणाराच निवडणुकीच्या भानगडीत पडतो. महामंडळाच्या अध्यक्षीय निवडणुकीची एक पद्धत आहे, व्यवस्था आहे. ती टाळता येणार नाही. प्रत्येक उमेदवाराला मते मागण्याचा अधिकार असतो.

इंदिरा संत अध्यक्षपदाला उभ्या राहिल्या. त्यांची योग्यता नि:संशय होती. पण बाई निवडणुकीच्या रणधुमाळीत म्हणाल्या, “मी मतांचा जोगवा मागणार नाही.” तर त्यांचा पराभव झाला. मतदारांचा अधिकार मान्य करायलाच हवा. मतदार त्या क्षणापुरता स्वतंत्र असतो. तो त्याला मिळालेल्या मताधिकाराचा वापर करणारच. त्यामुळे सहमतीचा उमेदवार कोण ठरवणार? (बडोदा येथील संमेलनाची निवडणूक विदर्भातील एक लेखक ‘आपण लढणारच’ असे बोलतो म्हटल्यावर सहमतीचा उमेदवार पुढे येऊ शकला नाही. चपळगावकर यांना त्याची जाणीव झाल्याने ते निवडणूक रिंगणात उतरलेच नाहीत. लक्ष्मीकांत देशमुख ऐनवेळी संमेलनाध्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आणि बाजी मारून गेले हे वास्तव अनुराधा पाटील यांनी न सांगता स्पष्ट झाले.)

साहित्य संमेलनाची निवडणूक हायजॅक केली जाते? मॅनेज केली जाते? घटक संस्थांची दादागिरी चालते! त्यासाठी एका उमेदवाराने मतमाफिया असा शब्दही वापरला होता, तो रोख मराडवाडा साहित्य परिषदेचे सर्वेसर्वा कौतिकराव ठालेपाटील यांच्यावर होता. अनुराधा पाटील म्हणाल्या, “साहित्य संस्थांचा मतांचा कोटा ठरलेला असतो. कोणी मतपत्रिका गोळा करा असा आदेश देऊ शकत नाही. दिला तरी काही मतदार स्वतंत्रपणे निर्णय घेऊन मताधिकारही बजावतात. संस्थेच्या चालकाला साहित्य संस्था चालवताना भल्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे चर्चा एकांगी घडते. कोणीही साहित्य संस्थेच्या बळावर निवडून येऊ शकत नाही. उमेदवाराला त्याच्या बाजूने अन्य घटक संस्थांची मते वळवून घेता यावी लागतात.

बृहन्महाराष्ट्रातील साहित्य संस्था सभासदही निवडणुकीत मतदार असतात. त्यांची मते मौल्यवान आहेत. त्यासाठी प्रचार, जनसंपर्क महत्त्वाचा असतो. निवडणूक आली, की निवडणूक हायजॅक केल्याची चर्चा होते. ठालेपाटील टीकेचे केंद्र होतात. पराभूत उमेदवार त्यांच्या नावाने हंगामा करतात. हे काही नवे नाही. महाराष्ट्रात काही झाले, की त्यात शरद पवार यांचा हात असला पाहिजे असे म्हणणारे लोक आहेत. संमेलनाध्यक्ष निवडणुकीत ते श्रेय कौतिकराव ठालेपाटील यांच्या वाट्याला येते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या या काळात प्रत्येक व्यक्तीला असणारे स्वातंत्र्य मान्य केले जाण्यास काय हरकत आहे? सांगलीच्या साहित्य संमेलनातील एका चर्चेत सहभागी होताना ठालेपाटील यांनी, यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश दिल्लीहून आणला, पण सीमाभाग तसाच राहून गेला असा उल्लेख केला. कोणाला सीमाभागातील मराठी माणसाची बाजू घेतल्याने दुःख वाटण्याची गरज नव्हती. पण ठालेपाटील यांनी यशवंतरावांवर टीका केली म्हणून एका कवीने दिवसभर माध्यमातून रण पेटवले. आमच्या घरावर लोक चालून आले. पोलिस बंदोबस्त मागवावा लागला. ठालेपाटील यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार नाही का? पुढे तेच लेखक अध्यक्षपदाला उभे राहिले आणि मत मागण्यास आले. तशा माणसाला आम्ही मदत करावी का? त्यांचा पराभव झाल्यावर ते ठालेपाटील यांच्या नावाने खडे फोडत बसले, त्याला काय म्हणावे?

कोणतीही निवडणूक लढवावी लागते, प्रचार-गाठीभेटी घ्याव्या लागतात, उमेदवाराला त्याची भूमिका मांडावी लागते. निवडणूक महामंडळाच्या घटनेप्रमाणे होते. ती व्यवस्था स्वीकारली गेली पाहिजे. त्यापेक्षा अधिक चांगली व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत आहे ती व्यवस्था स्वीकारून मार्गक्रमण करणे इष्ट आहे असे त्यांचे मत आहे. या निमित्ताने नेमाडे यांच्या ‘बिढार’ कादंबरीत कवी कुसुमाग्रजांविषयी आलेल्या शेरेबाजीचा विषय निघाला. तेव्हा त्या म्हणाल्या, ते नेमाडे यांचे मत नाही. ‘बिढार’मधील एका तरुण कवीच्या तोंडी असलेला उद्गार तत्कालीन एका तरुण तुर्क कवीचा असून लेखक समकालाचे दस्तऐवजीकरण करत असतो.

मताचा जोगवा जो मागेल, मिळवेल, जो प्रचार करेल, भूमिका मांडेल तोच संमेलनाध्यक्ष होईल हे स्पष्ट झाले! संमेलनविषयक सर्व शंकाकुशंका फिटून गेलेला मी पुढील संमेलन केव्हा असेल बरे, याची वाट पाहू लागलो.

- डॉ. शंकर बोऱ्हाडे

Last Updated On 26th Sep 2018

लेखी अभिप्राय

उत्तम मंथन

raosaheb jadhav05/03/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.