आंबेडकर आणि मराठी नाटके


_AambedkarAani_MarathiNatke_2.jpgबाबासाहेब आंबेडकर हे मराठी नाटकांचे चाहते होते हे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रथम अमेरिकेत गेलेल्या वास्तव्य काळात प्रकर्षाने दिसून येते. त्यांनी त्यांचे आरंभीचे सहकारी सीताराम शिवतरकर मास्तर यांना गडकऱ्यांच्या नाटकांची पुस्तके पाठवून देण्यासाठी वारंवार सुचवल्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्यात जी पत्रे लिहिली त्यात  आढळतो.

बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आले तरी ते बीआयटी चाळीत राहत होते व त्यांचे कार्यालय परळच्या दामोदर नाट्यगृहाला लागून पहिल्या मजल्यावर होते. त्यांचे स्वतःचे ग्रंथालयदेखील दामोदर हॉलच्या एक तृतीयांश भागात थाटलेले होते. विशेष म्हणजे ते अर्ध्या लाकडी आणि अर्ध्या जाळीच्या पार्टीशनने मुख्य नाट्यगृहापासून विभागलेले होते. त्यामुळे बाबासाहेबांना दामोदर नाट्यगृहाच्या स्टेजवर सुरू असलेल्या नाटकांतील पदे व संवाद त्यांची इच्छा असो वा नसो त्यांच्या कानी सतत पडत असत.

बाबासाहेबांनी कोल्हटकर, खाडिलकर, गडकरी इत्यादी मान्यवरांची नाटके आवडीने पाहिली असावीत. त्यांनी ती नाटके निदान वाचल्याचे तरी दिसून येते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘खरा ब्राह्मण’ ह्या नाटकावर बाबासाहेबांनी प्रदीर्घ समीक्षण लिहिले होते असे प्राचार्य म.भि. चिटणीस यांनी त्यांच्या आठवणींत लिहून ठेवले आहे.

_AambedkarAani_MarathiNatke_1.jpgम.भि. चिटणीस ‘मिलिंद महाविद्यालया’चे प्राचार्य असताना एकदा ते बाबासाहेबांना वार्षिक सभेचा वृत्तांत कथन करत होते त्यावेळी “आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अमुक अमुक मराठी नाटक अथवा नाट्यप्रयोग सादर केले” असे सांगत होते. त्यावर बाबासाहेब त्यांना म्हणाले, “आपल्या महाविद्यालयात तीच ती अशी नाटके कसली सादर करता? आपल्या मुलांनी करण्याजोगे वेगळे नाटक नाही का मिळत? मुलांनाच त्यांच्या जीवनावर लिहू द्या नाटक आणि त्याचे प्रयोग करा.”

चिटणीस यांनी नाट्यक्षेत्राची आवड असणाऱ्या काही होतकरू विद्यार्थ्यांना पुढील वर्षी सादर होणाऱ्या नाटकांची संहिता लिहिण्यास सांगितले. पण त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांनी 14 एप्रिल 1955 च्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सादर करण्यासाठी जे नाटक लिहिले ते म्हणजे 'युगयात्रा'. त्या नाटकात त्यांनी भारतीय इतिहासातील समतेचा प्रवास चितारला आहे. ते नाटक ‘मिलिंद महाविद्यालया’च्या विद्यार्थ्यांनी रंगभूमीवर बाबासाहेबांच्या वाढदिवशी सादर केले. ‘आपल्या लोकांनी दलित -शोषितांतील अस्मिता जागी व्हावी असे काहीतरी लिहिले पाहिजे’ असे बाबासाहेब आंबेडकर चिटणीस यांच्याजवळ बोलत असत. त्यामुळे पुढील काळात नामदेव ढसाळ, दया पवार आदी दलित लेखकांनी आत्मचरित्रे लिहिली ती एक प्रकारे बाबासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नाची परिपूर्ती होती! कारण चिटणीस यांच्याशी बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, ‘... मुलांनाच त्यांच्या जीवनावर लिहू द्या नाटक.’ त्याप्रमाणे त्यांच्या अनुयायांपैकी प्रेमानंद गज्वी, दत्ता भगत, रुस्तुम अचलखांब, अविनाश डोळस यांनी यशस्वी नाटके लिहिली.

- सुहास सोनवणे

Last Updated On 28 April 2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.