नीतिमान उद्योजक! अनुभूती स्कूलचे उद्दिष्ट


_NitimanUdyojak_AnubhutiSchool_7.jpgउद्योगपती कै. भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून ‘अनुभूती निवासी शाळा’ निर्माण झाली. शाळेने २०१७ मध्ये दहा वर्षें पूर्ण केली.  ‘पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड देऊन विद्यार्थी हा नोकरी मागणारा नव्हे; तर नोकऱ्या देणारा उद्योजक, नैतिकता असलेला उत्तम नागरिक व्हावा’ हा त्यांचा शाळा-स्थापनेमागील हेतू होता. संस्थेची जडणघडण तशीच झाली आहे. भवरलाल जैन म्हणत, विद्यार्थी या शाळेतून शिकतील, संस्कारित होतील आणि ते या स्पर्धेच्या युगात तेथे मिळवलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग देशाच्या विकासासाठी सुसंस्काराने व कल्पकतेने करतील.

‘अनुभूती स्कूल’ खानदेशात जळगाव येथील पाचोरा रस्त्यावर ‘जैन इरिगेशन’च्या आंतरराष्ट्रीय शेती संशोधन व प्रात्यक्षिक केंद्रासमोर (‘जैन हिल्स’) शंभर एकरावर उभी आहे. तेथे साधारणतः एक लाख विविध वृक्षराजी आहे. स्कूलची सुरुवात 07 -07- 2007 या वैशिष्ट्यपूर्ण तारखेला झाली. स्कूलमध्ये पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. भवरलाल जैन यांनी स्कूलच्या स्थापनेपूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील, गुणवत्तेच्या दृष्टीने कीर्तिमान प्रमुख शाळांना भेटी दिल्या होत्या. तेथील नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धत भारतीय संस्कृतिसंवर्धन होऊ शकेल, अभ्यासाचा विषय आकलन होईल अशा पद्धतीने आखली आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन अभ्यासाचा भाग म्हणून अनुभवाने शिकतात. शाळेच्या आवारात शेती आहे. शाळेसाठी लागणारे धान्य, भाजीपाला हे सगळे त्या शेतीतून येते. विद्यार्थी शेतात काम आनंदाने करतात व श्रमसंस्कृतीचा वसा, वारसा जपतात आणि जोपासतात. त्यांच्या स्वत:च्या श्रमांतून निर्माण झालेला भोपळा-काकडी-भेंडी जेवणामध्ये खात असताना त्यांना लागणारी चव आणि त्यातून त्यांना मिळालेला आनंद काही औरच असतो!

_NitimanUdyojak_AnubhutiSchool_4.jpgआमिर खान यांनी ‘थ्री इडियट’ (2009) या चित्रपटात समाज व शिक्षण व्यवस्थेबद्दल मार्मिकपणे मांडले आहे. त्यातील संवाद व्यक्तीच्या यशाचे रहस्य सांगून जातो. तो संवाद असा आहे, ‘बेटा, काबील बनो, काबील! कामयाबी तुम्हारे पिछे पिछे आयेगी।’ भवरलाल जैन यांनी ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांना 2007 पासूनच काबील बनवणे सुरू केले आहे! ‘अनुभूती स्कूल’मध्ये विज्ञानाबरोबर गणित, संगणक, वाणिज्य आणि भूगोल या विषयांच्यादेखील प्रयोगशाळा आहेत. प्रशस्त, भरपूर उजेड आणि हवा असलेल्या वर्गखोल्या, असेंब्ली हॉल, अँम्पी थिएटर, योग केंद्र, प्राकृतिक उपचार केंद्र, फिटनेस सेंटर यांचादेखील त्यात समावेश आहे. विद्यार्थ्याला अभ्यासाबरोबर क्रीडाप्रकारांतही निपुणता प्राप्त व्हावी असा प्रयत्न असतो. क्रिकेट पिच (टर्फ विकेट), फूट बॉल, हॉली बॉल, बास्केट बॉल, टेनिस, स्केटरिंग रिंक, बॅडमिंटन व टेबल टेनिस यांसाठी आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करणारे हॉल तेथे आहेत. अॅथलेटिक्स, खो-खो, कबड्डी यांसाठी स्वतंत्र मैदाने आहेत. स्वतंत्र नृत्यशाळाही आहे- नृत्यशाळेचे फ्लोअर वुडनचे आहे. त्याच्या जोडीला पॉटरी, संगीत, तबला, हिंदुस्थानी वाद्ये यांची स्वतंत्र दालने स्कूलमध्ये आहेत.

शाळेत तीनशे विद्यार्थी आहेत. ते बारा राज्यांमधून येतात. महाराष्ट्राखालोखाल मध्य प्रदेश व झारखंड या राज्यातील मुले जास्त येत असतात. त्याखेरीज गुजरात, कर्नाटक, ओरिसा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांतील विद्यार्थी शाळेत आहेत. मुलांसाठी वर्षाला दोन लाख पासष्ट हजार रुपये व मुलींसाठी दोन लाख पन्नास हजार रुपये आहे. मुले दहावीसाठी - आयसीएससी आणि बारावीसाठी – आयएससी बोर्डाच्या परीक्षा देतात. त्यांच्या मुलांच्या शिक्षकांना पगार पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपये दरम्यान दिला जातो. त्यांच्यासाठी निवास व भोजनव्यवस्था ‘कँपस’वरच असते. शिक्षणाची व्यवस्था (इयत्ता पाचवी ते बारावी) देखील स्कूलच्या आवारात, तीही विनामूल्य केली जाते. या दर्ज्याच्या अन्य शाळांशी तुलनेत उत्तम सेवासुविधा फीची माफक आकारणी आहे असे ‘जैन इरिगेशन’च्या अधिकार्यांलनी सांगितले.

‘अनुभूती निवासी शाळे’चा विद्यार्थी पहाटे साडेपाच वाजता उठतो. त्याची सकाळ ते रात्री साडेदहा वाजेपर्यंतची दैनंदिनी वेळापत्रकानुसार शिस्तबद्धपणे ठरलेली असते. त्याच्याकडून  सकाळी उठल्यावर योग, पीटी, कसरत असे शारीरिक व्यायाम करून घेतले जातात. त्याचा नाश्ता झाल्यावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा असेंब्ली हॉलमध्ये होते. त्यानंतर तो शिक्षकांबरोबर अभ्यास करतो. दुपारी भोजनानंतर पुन्हा क्लास भरतात, अन्य शैक्षणिक उपक्रम चालतात. सायंकाळी खेळ, अभ्यास आणि रात्री भोजनानंतर साडेदहा वाजता झोपेपर्यंत अभ्यास असा नित्यक्रम असतो. विद्यार्थ्यांना वाटले, की बाहेर, हिरवळीवर झाडाखाली वर्ग व्हावे, तर त्या पद्धतीनेही वर्ग घेतले जातात!

_NitimanUdyojak_AnubhutiSchool_6_0.jpgभवरलाल जैन मुलांचे दादाजी म्हणून वडिलकीच्या नात्याने दर रविवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे. विद्यार्थी त्यांना जीवनातील समस्या, सामाजिक समस्या, शैक्षणिक बाबी अशा विषयांवर मनमोकळे प्रश्न विचारत, कधी निवेदन करत. भवरलाल जीवनाच्या कठीण परिस्थितीत ‘स्मार्ट’ निर्णय कसा घ्यावा याबाबतही बोलत असत. तो उपक्रम सुरू आहे. भवरलाल यांचे पुत्र अतुल जैन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. ते ‘जैन इरिगेशन’चे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. देशविदेशातील नामवंत व्यक्ती ‘जैन इरिगेशन कंपनी’स भेट देत असतात. आलेले अभ्यागतही विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यात डॉ. रघुनाथ माशेलकर, उस्ताद अमजद अली खाँ, पं. बिरजू महाराज, रोहिणी हट्टंगडी, हेमा मालिनी यांसारख्या विविध क्षेत्रांतील महनीय व्यक्तींचा समावेश आहे.

भवरलाल जैन यांचा हा ध्यास आंत्रप्रिनरशिप होता. तो ठसा त्यांच्या मृत्यूनंतरही शाळेच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांत आहे. त्यांच्यानंतर निशा जैन स्कूलच्या संचालक झाल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय संस्कार व्हावे याबाबत प्रयत्नशील आहेत. उदाहरण पुष्कर यावलकरचे देता येईल. पुष्करने ‘अनुभूती स्कूल’मध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्याने जळगावमध्ये ‘कट्टी बट्टी’ हा अफलातून ‘फूड मॉल’ सुरू केला आहे. त्याने बटाट्यापासून चवदार आणि विविध डिझाइनचे परिपूर्ण असे खाद्यपदार्थ बनवले. त्याने कॉलेज परिसरात छोट्या जागेत स्क्रॅप वूडचा चपखल वापर केला आणि छान मांडणी केली. ते केंद्र तरुण-तरुणींच्या आकर्षणाचे ठरले आहे; त्याचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहेच. त्याने तो व्यवसाय एका मित्राच्या भागीदारीत ऑगस्ट 2017 मध्ये सुरू केला. आणखी एक उदाहरण स्कूलचा माजी विद्यार्थी आणि सध्या मुंबईत शिक्षण घेत असलेला सागर नाथवाणी याचे देता येईल. त्याने ‘सेवन सिझन’ हा संगीत ग्रूप निर्माण केला आहे. त्याचा तो ग्रूप व्यावसायिक दृष्टीने प्रसिद्ध झाला आहे. त्याने शाळेच्या प्रती कृतज्ञता म्हणून संगीत कार्यक्रम सादर केला होता. सुदर्शन लाहोटी याने सुरू केलेले सामाजिक कार्य, वर्धा येथील अमेय ठाकरे, तेजस शिरोळे असे ‘अनुभूती’च्या पठडीत तयार झालेले विद्यार्थी काहीतरी अफलातून आगळेवेगळे कार्य करत आहेत. निशा जैन यांचा शाळेच्या दैनंदिन कामकाज, व्यवस्थापन, निर्णय घेणे, विद्यार्थी, शिक्षकांच्या समस्या सोडवणे, शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणे अशा जबाबदार्यात निभावतात.

_NitimanUdyojak_AnubhutiSchool_5.jpg‘अनुभूती स्कूल’ ही निवासी शाळा असल्याने, विद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षकांकडे असते. शाळेत शिक्षकांचे प्रमाण आठ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे आहे. त्यामुळे शिक्षकांचे व्यक्तिगत लक्ष विद्यार्थ्यांकडे असते. शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात चोवीस तास उपलब्ध असतात. विद्यार्थी त्यांच्या अडचणी घेऊन त्वरेने शिक्षकांना केव्हाही भेटू शकतात. स्कूलचा विद्यार्थी खाजगी ट्युशनपासून दूर आहे. तबला वाजवण्याचे ज्ञान मिळवायचे असेल तर किमान दीड-दोन वर्षें लागतात, परंतु तेथील विद्यार्थी अवघ्या आठ महिन्यांत तबला वाजवण्यात पारंगत झाले! ते स्पर्धेमध्ये अव्वल ठरले. काही विद्यार्थी सार्वजनिक कार्यक्रमात तबला जुगलबंदी सादर करून, तेथील रसिक श्रोत्यांची दाद मिळवून गेले. छोटीशी अडचण आली, तरी विद्यार्थी थेट तबलावादन शिकवणाऱ्या सरांकडे पोचत व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असत. ते सूत्र जुन्या भारतीय गुरुकुल पद्धतीतून घेतलेले आहे. त्याच पद्धतीने तेथील विद्यार्थी गायन, आर्ट अॅण्ड क्राफ्ट, संगीत, नाट्य, नृत्य, क्रीडा या बाबींमध्येदेखील अभ्यासाइतकेच सहज पारंगत झालेले दिसतात. पॉटरी विभागाचे शिक्षक विद्यार्थ्यांकडून चिनी मातीचे निरनिराळे प्रकार करून घेतात. त्यांची शिकवण्याची हातोटी, उपलब्ध सर्व प्रकारची साधने, विद्यार्थ्यांची शिकण्याची जिद्द यांमुळे विद्यार्थ्यांत झालेला आश्चर्यकारक बदल पाहता येतो. सुंदर, आकर्षक पॉटरी तेथील विद्यार्थी सहज तयार करतात. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलाकृतींचे अंतर्गत प्रदर्शन ‘कला मेळा’मध्ये भरवले जाते. शाळेतील विद्यार्थी अनुभव आणि संधी यांमुळे प्रगल्भ बनतो. त्यांना जे करायचे ते उत्तम गुणवत्तेने करायचे हा ध्यास लागतो.

भिकचंद खंबायत 9422776726, 0257 2264600
http://www.anubhutischool.in/ 

- किशोर कुळकर्णी

Last Updated On 4th Oct 2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.