सिन्नरचा उद्धार सहकारी औद्योगिक वसाहतीत!


_SinnarUddharSahkari_AuyogikVasahatit_1.jpgनाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा दुष्काळी तालुका. सरकारने 1970 च्या दशकात महाराष्ट्रातील एकशेचोवीस तालुके अतिदुष्काळी म्हणून घोषित केले होते. त्यांपैकीच एक सिन्नर होता. तालुका भौगोलिक दृष्ट्या तिन्ही बाजूंनी उंचावर, घाटमाथ्यावर आहे. नद्या तालुक्यात व तालुक्याशेजारून घाटमाथ्याच्या खालच्या बाजूने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. त्यामुळे त्या बारमाही वाहत असल्या तरी त्यांचे पाणी नैसर्गिकरीत्या तालुक्यात येणे अशक्यप्राय. तालुक्याच्या शेतीसाठी जलसिंचनाचा एकही प्रकल्प उभारणे अशक्य असल्याने शेतीचे उत्पन्न अत्यल्प असायचे. विडी कारखाने हे मजुरी मिळवण्याचे एकमेव साधन. सिन्नरची अशी परिस्थिती 1983 पूर्वी होती.

माजी आमदार सूर्यभान गडाख यांनी तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी व दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी औद्योगिकीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे ओळखले आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्याकडे तालुक्यासाठी ‘एमआयडीसी’ची मागणी केली; परंतु सिन्नर येथे मूलभूत सुविधा नाहीत अन् त्या निर्माण होऊ शकतील अशी परिस्थितीही नाही. सिन्नर शहर अतिशय मागासलेले होते. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव होता; पण त्या रस्त्यावर ते गुडघ्याएवढे खड्डे, पाण्याचे दुर्भीक्ष्य, प्रवाशांना नेआण करण्याची चांगली सुविधा नाही असा तो काळ होता. ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभी करण्याचा प्रस्ताव होता, त्या भागात ‘एमआयडीसी’ची स्थापना करण्यायोग्य पूरक परिस्थिती नसल्याने ‘एमआयडीसी’ देता येत नाही असे शासनाने लेखी कळवले.

परंतु शासनाचे नकारात्मक पत्र पाहून गप्प बसतील ते नाना गडाख थोडेच. त्याच सुमारास नाशिक रोडवरील उद्योगपती नंदलाल केला यांनीही अशा प्रकारे औद्योगिक वसाहत असावी अशी इच्छा प्रकट केली व इतर काही उद्योजकांना सोबत आणण्याची तत्परताही दर्शवली. तेव्हा नाना गडाख यांनी सिन्नर येथे सहकारी तत्त्वावर औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तरुण व्यावसायिकांना एकत्र केले व मौजे मुसळगाव शिवारात संस्था स्थापण्याचे ठरवले. सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीची कायदेशीर स्थापना डिसेंबर 1982 मध्ये करण्यात आली. दरम्यान, शासनाच्या 1983च्या प्रोत्साहन योजनेत सिन्नर हा अतिदुष्काळी व औद्योगिक विकास नसलेला तालुका म्हणून ‘डी प्लस झोन’मध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे तेथे मिळणार्यान सुविधा, जमिनींचे भाव हे अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होत असत. पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील मोठे उद्योजक त्याकडे आकर्षित होणारच होते, त्याचाही फायदा घेता येईल असा विचार नाना गडाख यांनी केला. उपमुख्यमंत्री तथा उद्योगमंत्री रामराव आदिक यांच्या हस्ते 3 मार्च 1983 रोजी सहकारी औद्योगिक वसाहतीची पायाभरणी केली. त्या वेळेस सिन्नरला औद्योगिकीकरणासाठी पाणी, दळणवळण, वीज या सोयी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळेच तर शासनाने मदतही नाकारली होती, मात्र नाना गडाख हे जिद्दी होते, आक्रमक आणि अभ्यासूही होते. त्यामुळे त्यांनी आपण स्वत: सहकारी तत्त्वावर औद्योगिक वसाहत उभी करू असा आत्मविश्वास मनाशी बाळगून तसा निर्णय घेतला. नाही सरकारी तर आम्ही सहकारी तत्त्वावर औद्योगिक वसाहत उभी करू असे ठरवून ते कामाला लागले. त्याकामी नंदलाल केला यांची मदत झाली. त्यांनी जवळ जवळ चाळीस उद्योजकांना सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनीही सहभाग घेतला. त्यामुळे सहकारी औद्योगिक वसाहतीच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळाले. औद्योगिक वसाहत मुसळगाव येथे जोमाने उभी राहिली.

सुरूवातीला वीज, पाणी व दळणवळणाची साधने निर्माण करणे क्रमप्राप्त झाले. मात्र कसोशीने त्या कामास सुरूवात केली. पहिली अडीच वर्षें राबावे लागले. औद्योगिकीकरणासाठी चारशेदहा एकर जमीन संपादित केली गेली. छोटे छोटे उद्योगव्यवसाय सुरू झाले. तरूण हातांना रोजगार मिळू लागला. मात्र त्या औद्योगिक सहकारी वसाहतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला; जेव्हा, 1984-85 च्या सुमारास ‘रिंग गिअर्स इंडिया लिमिटेड’ कारखाना तेथे उभा राहिला! वसाहतीतील तो सर्वात मोठा उद्योग होता. त्या कारखान्यात एकाच वेळी दोनशेहून अधिक कागारांना रोजगार मिळाला. त्यानंतर औद्योगिक वसाहतीने मागे वळून कधीच पाहिले नाही. फायबर फोम प्रायवेट लिमिटेड, अॅटलास फाईन प्रा. लि., नीलकमल लिमिटेड, कृष्णा फिलामेण्टस प्रा. लि., कोबीट इंजिनीयरिंग प्रा. लि. अशा मोठमोठ्या उद्योगांचा सहभाग वसाहतीत वाढला.

सुरूवातीच्या टप्प्यात, उद्योजकाला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे त्यांच्या अडीअडचणी सोडवणे यासाठी संस्थेचे पदाधिकारी यांनी कठोर परिश्रम घेतल्याने एकेकाळी औद्योगिक विकासासाठी पूरक नसलेले सिन्नर शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर उत्तम विकसित झालेली उद्योगनगरी म्हणून नावारूपास आली आहे. सिन्नरची ख्याती 1990 च्या दशकात एक औद्योगिक शहर म्हणून झाली.

आजमितीस इंजिनीयरिंग, केमिकल, प्लास्टिक, फार्माशुटिकल्स, पॅकेजिंग, स्टिल एग्नोटस फूड इत्यादी विविध औद्योगिक प्रकल्प चारशेदहा एकरांवर उभे राहिले आहेत. केवळ तेवढेच नव्हे तर त्या वसाहतीमुळे परिसरात पूरक व्यवसायही सुरू झाले. सिन्नरच्या ज्या वावी वेस भागात एखाद दुसरी रिक्षा असायची, तेथे शंभर-दीडशे रिक्षाचालकांना काम मिळू लागले. टॅक्सीचालकांनाही रोजगार निर्माण झाला. वसाहतीच्या परिसरातील मुसळगाव, कुंदेवाडी, दातली, गुळवंच, बारागांव, पिंप्री, सुळेवाडी, मनेगांव या भागात राहण्याच्या वसाहती वाढल्या. त्यामुळे घरे, हॉटेले, किराणा दुकाने, भाजीपाला, व्यापारही वाढले. रोजगारनिर्मिती तेथेही अप्रत्यक्ष रीत्या झाली. विडी मजूर, हंगामी शेतमजूर, स्थलांतरित वेठबिगार यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेला सिन्नर तालुका औद्योगिक कामगारांचा तालुका म्हणून परिवर्तित झाला.

औद्योगिक वसाहतीला औद्योगिकीकरणामध्ये चांगले काम केल्याबद्दल राज्यपातळीवर राज्य पुरस्कार 1989 अखेर मिळाला. त्यामुळे कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्या कामाचा जोश वाढला. मोठमोठे उद्योग त्या क्षेत्रात आले. संस्थेला राष्ट्रीय पुरस्काराने दिल्लीत 1 मे 2002 रोजी सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते संस्थेला पुरस्कार दिला गेला. त्या पुरस्काराने सिन्नर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्यासारखा आनंद रहिवाशांना झाला.

महाराष्ट्र शासनाने याठिकाणी योग्य वातावरण नाही असे म्हणून 1982 मध्ये औद्योगिकीकरणाला मदत करण्याचे नाकारले होते. मात्र नानांची जिद्द व चिकाटी या गुणांमुळे तयार झालेले विकासाचे मॉडेल पाहून शासनाने ती औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) माळेगाव येथे नऊशे एकरांवर स्थापन केली. त्यानंतर तिची पंचतारांकीत औद्योगिक वसाहत म्हणून घोषणा झाली. त्यामुळे सिन्नर तालुक्याला सहकारी व एमआयडीसी अशा दोन्ही वसाहती औद्योगिक काळाच्या ओघात लाभल्या! त्या पाठोपाठ सिन्नर येथे राज्यातील सर्वात मोठा ‘सेझ’ निर्मिला गेला. त्यामुळे सिन्नर तालुक्याच्या औद्योगिक विकासाला शासनाची भरभक्कम साथ लाभली. गडाख नानांनी शासनाने दिलेल्या नकारात्मक उत्तराप्रमाणे सिन्नरच्या औद्योगिक विकासाचे स्वप्न 1982 मध्ये बाजूला ठेवले असते, तर सिन्नर शहराचा व तालुक्याचा जो औद्योगिक विकास झाला तो पाहण्यास मिळाला नसता.

संस्थेच्या कार्यक्षेत्रात तीन वरिष्ठ अधिकार्यां सह पंचावन्न कर्मचा-यांचे स्वतंत्र असे पोलिस स्टेशन 3 ऑक्टोबर 2015 पासून सुरू करण्यात आले आहे. उद्योजक, कामगार यांना अधिकाधिक चांगल्या सोयिसुविधा उपलब्ध करून देण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ती औद्योगिक वसाहत स्मार्ट औद्योगिक वसाहत म्हणून नावारूपास येण्याकडे वाटचाल करत आहे.

- नामकर्ण आवारे

तज्ज्ञ संचालक
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत, सिन्नर

(शब्दांकन - हिनाकौसर खान-पिंजार)

लेखी अभिप्राय

Very Strong effort & broad Vision of Aware Saheb

Rajmohan oza05/01/2018

Very Strong effort & broad Vision of Aware Saheb

Rajmohan oza05/01/2018

सामाजिक कामे करणाऱ्या व्यक्ती,प्रवृत्ती,हि ईश्वराची देणगी आहे,याचे कारण, असे काम करताना अंगात रक्त नसेल ताकद नसेल तरी हरकत नाही,परन्तु माणसाचा उत्साह कमी व्हायला नको,जी व्यक्ती अती उत्साही आहे,ती ईश्वराची देणगी आहे असे मी समजतो,कारण त्याच्याच हातून मोठी कामे होतात,गडाख नाना असो तुम्ही असो,काकासाहेब वाघ भाऊसाहेब हिरे,रयतचे कर्मवीर भाऊराव पाटील,यशवंत राव चव्हाण,अश्या समाजधुरिणी ईश्वराची देणगी आहेत ज्यांनी अनेक कुटुंबे रोजगार निर्मिती करून रोजी रोटीला लावली,तुम्हाला सुद्धा ईश्वराने असाच अमाप उत्साह दिलेला आहे,याचे कारण तुमच्याकडून अजून फार मोठी कामे व्हायची बाकी आहेत,जीवनाच्या दुसऱ्या इनिंगच्या हार्दिक शुभेच्छा....!

Pravin s shinde06/01/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.