मंदिर जीर्णोद्धारप्रसिद्ध सुभाष कर्डिले


_Mandir_Jirnodharprasidhi_1_0.jpgसुभाष कर्डिले हे निफाडचे राहणारे. निफाडमध्ये जी मंदिरे आहेत त्यांपैकी कर्डिले यांचा सहभाग शनैश्वराचे मंदिर, विठ्ठल-रुक्मणी मंदिर, खंडेरायाचे मंदिर, मुंजाबाचे मंदिर व भद्रा मारुती मंदिर या पाच मंदिरांच्या जीर्णोद्धारामध्ये आहे. मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी गावातील लोकांनी पैसे जमवले होते. कर्डिले यांनी स्वत:च्या घरचे बांधकाम आहे असे समजून, जे पडेल ते काम त्यासाठी केले आहे. मुळात तो त्यांचा ध्यास आहे. किंबहुना त्यांना गावातील अशी छोटीमोठी सार्वजनिक कामे आकृष्ट करतात व ते त्यात खेचले जातात. 

कर्डिले हे शनैश्वर मंदिर व विठ्ठल-रुक्मणी मंदिराचे सेक्रेटरी आहेत. ते त्या दोन्ही मंदिरात रोज जातात. ते तेथील स्वच्छता व इतर व्यवस्था नीट आहे ना तेही पाहतात.

कर्डिले यांची शेती आहे. शिवाय, त्यांचे फर्निचरचे दुकानही आहे. त्यांचे शिक्षण बी.कॉम.पर्यंत झाले आहे. त्यांच्या घरी त्यांची आई, पत्नी व दोन मुलगे आहेत. मोठा मुलगा इंजिनीयरिंगला आहे. धाकटा बारावीत आहे. दोघे शिक्षणासाठी नाशिकला राहतात.

निफाड हे गाव विनता, कादवा आणि शरयू या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. विनता नदी तेथे दक्षिणवाहिनी होते. नदी जेथे दक्षिणवाहिनी होते ते श्रद्धेनुसार नित्यतीर्थ असते. निफाडला ते महात्म्य आहे.

लोकांचा विश्वास पाच मंदिरांपैकी शनैश्वर मंदिर हे जागृत देवस्थान आहे असा आहे. ग्रामपंचायतीच्या 1922 च्या नोंदीनुसार शनैश्वर मंदिराचा उल्लेख, निफाड ग्रामपंचायत घर नं.181 असा आढळतो. तेथे मंदिर छोटेखानी व कौलारू होते. मग भक्त-भाविकांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला. दुसऱ्यांदा जीर्णोद्धार 1989 मध्ये केला गेला. त्यामुळे मंदिराला नवे रूप प्राप्त झाले. तेव्हापासून जमाखर्च नियमितपणे प्रकाशित करण्याची पद्धत सुरू झाली. त्यावेळच्या जीर्णोद्धार कार्यात वि.दा. व्यवहारे, रमेशभाऊ कापसे, सुभाष कर्डिले, बाबुशेठ दायमा, किरण बागमार, कै. मोहनलालजी जैन, तुळशीदास व्यवहारे, विश्वनाथ शिरसाठ अशा भाविकांचा समावेश आहे.

मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार 2004 ते 2006 मध्ये केला गेला. मंदिरात शनीचा उत्सव गेल्या पंचवीस वर्षांपासून वैशाख अमावास्येला होत असतो. उत्सव तीन-चार दिवस चालतो. उत्सवाच्या आधीपासून व उत्सवादरम्यान भाविक लोक आपणहून पैसे देणगी रूपात देतात. उत्सवात दरवर्षी तीन-चार लाख रुपये जमा होतात. त्या पैशांतून लहान गरजू मुलांना शाळेची पुस्तके, तसेच युनिफॉर्म असे साहित्य दिले जाते. दुष्काळात चारावाटपही केले जाते.

सुभाष कर्डिले व त्यांचे समविचारी मित्र यांनी वैकुंठरथ चालू केला आहे. निफाडपासून स्मशानभूमी लांब अंतरावर आहे. त्यामुळे लोकांना मयत घेऊन जाण्यास त्रास होत असे. कर्डिले यांनी त्यासाठी गाडी खरेदी केली- मृतदेह सामावू शकेल व सोबत नातेवाईक बसू शकतील एवढी मोठी. शनैश्वर मंदिरासाठी भाविकांनी दिलेल्या पैशांतील शिल्लक रक्कम होती. टाटा कंपनीच्या गाडीची मूळ किंमत सात लाख रुपये होती. परंतु टाटा कंपनीच्या लोकांना गाडी कोणत्या कारणासाठी खरेदी करत आहेत हे समजल्यावर त्यांनी ती गाडी निम्म्या किंमतीत दिली, साडेतीन लाख रुपयांना! गाडी गावात आणल्यानंतर, तिची पूजा करायची होती. कर्डिले म्हणाले, “पूजेला बसण्यास कोणी तयार होईना, मग आम्हीच (मी व माझी पत्नी शैला) दोघे पूजेला बसलो.’  वैकुंठरथासाठी एक ड्रायव्हर ठेवला आहे. पण तो मृतदेह नेण्यासाठी एखाद्या वेळेस उपलब्ध नसेल, तर तशा वेळी कर्डिले स्वत: गाडी चालवतात. अगदी रात्री-अपरात्रीसुद्धा. चारशे लोकांनी त्या वैकुंठरथाचा वापर पहिल्या अडीच वर्षांत केला आहे. कर्डिले यांची योजना मृतदेहाच्या दहनासाठी लागणारे इतर सर्व साहित्यही जमा करण्याची आहे.

- पद्मा कऱ्हाडे

लेखी अभिप्राय

अतिशय सुंदर काम ते निफाड शहरातील अनेक मंदिरासाठी करत असता..व त्यांच्या पाठीशी ग्रामस्थ हि खंबीरपणे उभे असतात..????

mayur vyavahare09/01/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.