थिएटर ऑफ रिलेवन्सची पंचवीस वर्षें


_Theater_of_relevance_1.jpgजागतिकीकरणाने जगातील जैविक आणि भौगोलिक वैविध्य उध्वस्त केले आहे. त्यातून माझ्या रंगचिंतनाची सुरुवात झाली आणि त्यातूनच एक नव्या रंगसिद्धांताची निर्मिती व मांडणी होत गेली. त्या रंगसिद्धांताने ‘कलेसाठी कला’ या कलात्मक भ्रमाचा निरास केला आणि मी नवे रंगतत्त्व जगासमोर मांडले. त्याचे नाव 'थिएटर ऑफ रिलेवन्स'.

‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ने जीवनाला नाटकाशी जोडून लोकांमध्ये रंगचेतना जागृत केली आहे. आम्ही या सिद्धांताने नाटक लोकांशी जोडले. आमच्या नाट्य कार्यशाळांतून सहभागींना नाटक व जीवन यांचा संबंध, नाट्यलेखन, अभिनय, दिग्दर्शन, समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा इत्यादी संबंधातील विविध कौशल्याचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मनातील कलात्मक क्षमतेचे दैवी वरदान हटवून त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळवले. चोवीस वर्षांत सोळा हजारांपेक्षा जास्त रंगकर्मींनी एक हजार कार्यशाळांत भाग घेतला आहे. ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ने त्यांच्या तत्त्वांनी व सार्थक प्रयोगांनी ‘कलेसाठी कला’ यांसारख्या उपनिवेशी व भांडवलवादी विचारांचा चक्रव्यूह भेदला आहे. हजारो ‘रंगसंकल्पना' जोपासल्या आणि अभिव्यक्त केल्या. ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ने अठ्ठावीस नाटके सोळा हजारांपेक्षा जास्त प्रयोगांतून रंगमंचावर आणली आहेत.

‘थिएटर ऑफ रिलेवन्स’च्या विचारसरणीनुसार थिएटर हा एक चैतन्यदायी अनुभव आहे. त्या अनुभवाचे कोठेही, कधीही सृजन व पुनःसृजन करता येते. थिएटरमध्ये काळ व अवकाश (स्पेस) यांना मानवी अनुभवांनी जिवंत केले जाते. म्हणूनच थिएटरमध्ये काळ व अवकाश (स्पेस) हे मौलिक पैलू आहेत. थिएटर हा एक अनुभव आहे. तो अनुभव प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळा असतो, नवा असतो. तो प्रत्येक वेळी शंभर टक्के एकसारखा नसतो, तो बदलत राहतो. त्यास काळ आणि परिस्थिती हे कारक आहेत; मनस्थिती (मनोवैज्ञानिक बदल) हीदेखील कारक आहे. त्यामुळे थिएटर ही स्थिर, जड किवा कुंठित झालेली कला असू शकत नाही.

नाटक करण्यासाठी व्यावसायिकतेच्या नावावर मोठमोठी संसाधने वा रंगदालने यांची गरज नाही. थिएटरची मूलभूत गरज आहे - एक सादरकर्ता आणि एक प्रेक्षक. ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’च्या रंगसिद्धांतानुसार रंगकर्म हे दिग्दर्शक व अभिनेता यांच्याभोवती केंद्रित होण्याऐवजी ‘प्रेक्षक आणि लेखक केंद्रित’ असावे, कारण प्रेक्षक हा सर्वात मोठा आणि प्रभावी रंगकर्मी असतो.

'थिएटर ऑफ रिलेवन्स'चे सिद्धांत -

१. 'थिएटर ऑफ रिलेवन्स' हे एक असे रंगकर्म आहे, ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवी आणि अधिक उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.

२. कला ही कलेसाठी नसून कलेने स्वतःची समाजाप्रती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ती लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनली पाहिजे.

३. कला मानवी गरजा भागवेल आणि ती अभिव्यक्तीचे एक माध्यम म्हणून उपलब्ध असेल.

४. कला व्यक्तीसाठी तिच्या स्वतःच्या बदलाचे माध्यम म्हणून शोध घेईल, ओघात ती स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे नेईल.

५. कला ही मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे माध्यम वा जगण्याची पद्धत बनेल.

‘थिएटर ऑफ रिलेवन्स' या नाट्यदर्शनाची/तत्त्वज्ञानाची रचना १२ ऑगस्ट १९९२ या दिवशी झाली. राजकीय विचारांनी भारलेल्या मंडळींनी एकत्र येऊन माझ्या सूत्रसंचालनानुसार कामास सुरुवात केली. त्यास या वर्षी पंचवीस वर्षें पूर्ण होत आहेत. तो रौप्य महोत्सव मुंबईच्या शिवाजी मंदिरमध्ये १५-१६-१७ नोव्हेंबर अशा तीन दिवशीच्या नाट्यप्रयोगांनी साजरा होत आहे. ‘गर्भ’, ‘अनाहत नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ युनिव्हर्स’ आणि ‘न्याय के भंवर में भंवरी’ ही तीन नाटके मुंबईत शिवाजी मंदिर (दादर - पश्चिम) येथे सादर केली जाणार आहेत.

डाव्या विचारांचा रशिया-चीनमध्ये झालेला पाडाव, उजव्या शक्तीचे जगभर पसरत असलेला वरचष्मा; त्यात बाजारव्यवस्थेने घेतलेला जगाचा कब्जा... अशा नाजूक काळात ‘थिएटर ऑफ रिलेवन्स' वस्त्या वस्त्यांत जाऊन नाटके करत असते.

मी प्रथम ‘दूर से किसी ने आवाज दी’ या नाटकाचे प्रयोग केले. मला तो दिवस आठवतो, जेव्हा मी आमच्या कलाकारांना सफेद कुडते देताना सांगितले होते, की ‘हे आपले कफन आहे!’ सर्व कलाकारांनी १९९२ च्या दंगलीतील द्वेष आणि घाव यांच्यावर उतारा म्हणून त्यांच्या कलेतून प्रेम व मानवी ऊब दिली. त्या यशाने आमच्या कलात्मक सिद्धांताबद्दल विश्वास प्राप्त झाला- ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ रंगसिद्धांताला जनमान्यता प्राप्त झाली.

‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ ही ‘नाटकातून बदल घडतो’ या विचाराची प्रयोगशाळा आहे. आम्ही तो बदल स्पर्शातून, मोजूनमापून पाहू शकलो ‘मेरा बचपन’ या नाटकातून. त्या नाटकाचे प्रयोग बारा हजारांपेक्षा जास्त झाले. त्या नाटकाच्या माध्यमातून पन्नास हजारांहून जास्त बालमजुरांचे जीवन बदलले. ते शाळांत शिक्षण घेत आहेत, त्यांपैकी काहीजण कॉलेजमध्ये जात आहेत, तर काही व्यावसायिक रंगकर्मी बनले आहेत.

कौटुंबिक हिंसेवरील नाटक ‘द्वंद्व’, स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात असलेल्या अर्ध्या लोकसंख्येचा आवाज असलेले नाटक ‘मैं औरत हूँ’ आणि लिंग निदानाचा विषय ‘लाडली’ या नाटकांवर तर राष्ट्रीय चर्चा होऊ शकली.

‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ने जागतिकीकरणाच्या विरूद्ध ‘बी-७’ हे नाटक केले. त्याचे प्रयोग २००० साली जर्मनीत केले गेले. मानवता आणि नैसर्गिक संसाधनांचे खाजगीकरण यांविरुद्ध २०१३ मध्ये ‘ड्रॉप बाय ड्रॉप : वॉटर’ हे नाटक युरोपमध्ये प्रस्तुत केले. ते नाटक पाण्याच्या खाजगीकरणाचा विरोध करते. ‘पाणी हा मानवाचा नैसर्गिक आणि जन्मसिद्ध अधिकार आहे’ अशी त्या नाटकाची मांडणी आहे.

‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ चुकीच्या धारणा व रूढी तोडू पाहते. मानवी गुंतागुंत सोडवू इच्छिते. पारदर्शकता निर्माण करण्याचे स्वप्न बघते. भावनात्मक स्तरावर सर्व पडदे पाडून एक भावरूप देते. तोच भाव विचारांना नव्या विचारांसाठी उत्प्रेरित करील आणि एक नवी दृष्टी, अंतर्दृष्टी देईल अशी ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ची धारणा आहे. माणसाला माणूस म्हणूनच राहू देण्यासाठी ‘गर्भ’ या नाटकाचे सादरीकरण केले गेले आहे. ते नाटक मानव जातीच्या संघर्षाची जाणीव करून देते, ते मानवाच्या जीवन जगण्याच्या आव्हानाशी संबंधित आहे.

धर्म, कला, साहित्य व सांस्कृतिक परंपरा ही सारी माणसामाणसांतील परस्पर संवाद, मिलाप व संपर्क यांची साधने आहेत. दुसर्‍या महायुद्धानंतर व्यापार हे वैश्विक संपर्काचे मूलभूत सूत्र बनले आहे. त्याचा उद्देश आहे ‘नफा’! त्यातून माणूस हा केवळ खरेदीविक्रीचे सामान बनला आहे. त्या नव्या आर्थिक धोरणाचा आधार आहे बोली, बाजार, उपभोग आणि नफा. त्या तंत्राचा बळी झालेल्या भारतीय शेतकर्‍याला आत्महत्या करावी लागत आहे. शेतकर्‍यांची आत्महत्या आणि शेतीच्या विनाशावर ‘संघर्ष शेतकर्‍यांचा’! हे नाटक केले गेले.

संस्थेने कलाकारांना कठपुतळी बनवणार्‍या नव्या बाजारव्यवस्थेपासून त्यांना त्यांच्या मुक्ततेची जाणीव करून देणारे ‘अनाहत नाद - अनहर्ड साउंड्स ऑफ युनिवर्स’ हे नाटक रंगमंचावर आणले. ते नाटक म्हणजे एक कलात्मक चिंतन आहे, ते कला आणि कलाकारांच्या कलात्मक गरजा, कलात्मक मूलभूत प्रक्रिया स्पष्टपणे मांडत जाते. कला हे उत्पादन नव्हे आणि कलाकार उत्पादक नव्हेत. जीवन म्हणजे नफा आणि नुकसान ह्यांचा ताळेबंद नव्हे. म्हणूनच ते नाटक कला व कलाकार यांना उन्मुक्त करते. त्यांना सकारात्मक, सृजनात्मक आणि कलात्मक ऊर्जेतून अधिक चांगले विश्व बनवण्यासाठी प्रेरित आणि कटिबद्ध करते.

‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ने जीवनाला नाटकाशी जोडून एक रंगचेतना जागृत केली आणि तिला लोकांशी जोडले. ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’च्या रंगमंचीय प्रस्तुती कोणत्याही खास, प्रतिष्ठित रंगस्थळांपुरत्या सीमित नाहीत. त्याचे नाट्याविष्कार रंगस्थळांच्या उपकारांवर अवलंबून नाहीत, ते प्रयोग कोणत्याही सरकारी, बिगरसरकारी, देशी-विदेशी संस्थांच्या पैशांवर पोसले गेले नाहीत. त्याचे खरेखुरे धन आहे त्याचा ‘उद्देश’ व खरेखुरे संसाधन आहे ‘प्रेक्षक’. थिएटर त्या आधारावर कठीण परिस्थितीतही माणुसकीचा आवाज बनून समोर येते. तत्त्वज्ञान व सकारात्मक प्रयोग यांनी राष्ट्रीय व वैश्विक पटलावर अधिक चांगले, सुंदर व मानवी विश्व निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक चेतना जागवून सांस्कृतिक क्रांतीसाठी कटिबद्ध झाले आहे.

- मंजुल भारद्वाज

etftor@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.