अरुण साधू यांना झिप-याची आदरांजली

प्रतिनिधी 06/11/2017

_Arun_Sadhu_Ziparya_1.jpg‘झिप-या’ या अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटाने मुंबईतील ‘थर्ड आय’ या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डिसेंबरमध्ये होत आहे. ती त्या थोर मराठी लेखकाला आदरांजलीच होय. योगायोग असा, की ‘झिप-या’ चित्रपटाचा पहिला खेळ निवडक प्रेक्षकांना दाखवून साधू यांस त्यांच्या पहिल्या मासिक स्मृतिदिनी 25 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली गेली. अमृता सुभाष या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रीने साधू यांची लेखक म्हणून थोरवी सांगून, मोजक्या उपस्थितांना दोन मिनिटे शांत उभे राहण्याचे आवाहन केले व नंतर चित्रपटाचा खेळ सुरू झाला. ही कलाकृती निर्माते रणजित व आश्विनी दरेकर आणि दिग्दर्शक केदार वैद्य यांनी दोन-अडीच वर्षें झटून बनवली आहे. स्वत: अरुण साधू यांनी चित्रपटाचे पटकथा-संवाद वाचून त्यास मान्यता दिली होती. त्यांनी वाडीबंदर येथे चित्रपटाचे शूटिंगदेखील पाहिले होते. साधू त्यावेळी म्हणाले होते, की “पटकथा लेखकाने कादंबरीचा प्राण अचूक पकडला आहे. मात्र त्याचे रेल्वे प्लॅटफॉर्म व रूळ यांवरील चित्रिकरण फार अवघड आहे. ते कसे जमते ते पाहायला हवे.” ही जेमतेम वर्षापूर्वीची गोष्ट. पण ‘झिप-या’ चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक यांना मानायला हवे, की त्यांनी लोकल रेल्वेवरील वास्तव छानपैकी टिपलेले आहे. ‘झिप-या’चा गुंडदादाने केलेला पाठलाग तर विलक्षण रोमहर्षक झाला आहे. ती काही मिनिटे प्रेक्षक त्यांचा श्वास रोखून धरतात! साधू यांच्या मृत्यूच्या आधी महिनाभर चित्रपट तयार झाला. मात्र, तो ते पाहू शकले नाहीत.

साधू यांनी ‘झिप-या’ ही कादंबरी लोकलमध्ये व स्टेशनांवर बुटपॉलिश करणा-या मुलांच्या जीवनावर लिहिलेली आहे. ‘झिप-या’ योगायोगाने बुटपॉलिशवाल्या पोरांच्या गँगचा लीडर होतो आणि त्याला मनुष्यजीवन उलगडत जाते. त्याला होणारा मानवी जीवनमूल्यांचा शोधबोध हा कादंबरीचा विषय आहे. साधू यांनी त्या मुलांच्या जीवनातील संघर्ष व नाट्य अचूक पकडले आहे. ती पोरे वरकरणी बेदरकार असली, त्यांच्या हातून गुन्हेगारी कृत्ये घडत असली तरी ती आत जितीजागती, संवेदनाशील माणसे असतात. त्यांना कुटुंबांची ओढ असते आणि नातेसंबंधातील हळुवार भावभावनाही असतात हे साधू यांच्या कादंबरीत जसे व्यक्त होते, तसे चित्रपटातही जाणवते. दिग्दर्शकाचे कौशल्य असे, की त्याने तो परिणाम नाट्यमय चित्रणातून प्रभावीपणे साधला आहे. चित्रपटाला गती आहे. त्यातील कामे सच्चेपणाने साकारली गेली आहेत. सिनेमातील बुटपॉलिशवाली मुले जणू काही तळच्या वर्गात झोपडवस्तीमध्ये जन्मली असावीत आणि त्यांचे सारे आयुष्य रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेले असावे असे वाटते.

दिग्दर्शक केदार वैद्य हा अस्सल परिणाम साधू शकला याचे कारण त्यांनी ‘झिप-या’वर प्रेम केले आहे. ते म्हणाले, “मी अनेक वर्षांपूर्वी एका मित्राने सुचवली म्हणून ‘झिप-या’ वाचली. मी त्या वेळी वेगळ्या व्यवसायात होतो. कादंबरी मनात रूतून बसली होती. मी लोकलमध्ये तसे जीवन पाहत होतो. साधू यांनी त्या जीवनाची विशालता आणि सखोलता अचूक टिपली आहे असे वाटले. मी जेव्हा टीव्ही मालिका करू लागलो, तेव्हा त्या कादंबरीवर चित्रपट काढावा असे वाटले आणि पटकथा-संवाद लिहून ठेवले. दरेकर दांपत्याची भेट झाली तेव्हा मी त्यांचा स्वभावपिंड पाहून त्यांना ही कथा ऐकवली. त्यांनी ती पसंत केली. अरुण साधू यांनी, त्यांना माझी चित्रपटाची रूपरेखा मान्य आहे हे मला एका सकाळी साडेसात वाजता फोन करून सांगितले. तो क्षण माझ्या धन्यतेचा होता. मी अरुण साधू यांच्या कसोटीला उतरलो होतो! आमची पिढी ज्या लेखकाचे साहित्य वाचत वाचत घडली, त्या लेखकाने माझ्या कामगिरीबद्दल माझी पाठ थोपटली होती. साधू म्हणाले होते, ‘तुम्हाला माझ्या कादंबरीचा प्राण गवसला आहे!’”

निर्मात्या आश्विनी दरेकर म्हणाल्या, “साधू यांनी आम्हास फार सहकार्य केले. सज्जन आणि साधे गृहस्थ ते. केदार वैद्य यांची पटकथा त्यांना मान्य झाल्यावर त्यानुसार चित्रपट घडावा एवढीच त्यांची मागणी असे. विशेषत: त्यांतील ‘लोकल’ दृश्ये चित्रित करणे अवघड आहे. त्यासाठी रेल्वेची परवानगी, स्टेशनांवरील – गाड्यांतील गर्दी हे सारे सांभाळून दृश्ये टिपली कशी जाणार याची काळजी त्यांनाही वाटे, पण तो त्यांचा आग्रह होता. आम्हालाही तसेच काही घडवायचे होते. ते तसे घडले, पण ते पाहण्यास साधू नाहीत याचे फार वाईट वाटत आहे.”

_Arun_Sadhu_Ziparya_2.jpgत्यांनी सांगितले, की आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या मृत्यूपूर्वी महिनाभर एके दिवशी गेलो होतो. चित्रपट पूर्ण झाल्याचे त्यांना सांगितले. ते खूष झाले. अरुणा साधू घरी नव्हत्या. साधूसाहेबांनी अगत्याने कॉफी केली. आम्हाला पाजली. आम्ही त्यांच्या हातची कॉफी प्यायलो ही गोष्ट आता कायम मनात राहणार आहे.

दरेकर म्हणाल्या, की “‘झिप-या’ हा आमचा दुसरा सिनेमा. पहिला ‘रेगे’! खरे तर, ‘झिप-या’च प्रथम बनवायचा होता, पण रेल्वेची चित्रिकरणाकरता परवानगी मिळवण्यात काळ जाऊ लागला. तेव्हा ‘रेगे’ पुढे घेतला. आम्ही सामाजिक महत्त्वाचे चित्रपट निर्माण करायचे या भावनेने या क्षेत्रात उतरलो आहोत.”

केदार वैद्य मनोरंजन क्षेत्रात योगायोगाने येऊन पडले आहेत. त्यांनी ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. ते तशाच नोक-या करत होते, पण त्यांना टीव्ही मालिका बनवण्याची संधी मिळाली. ते यशस्वी मालिकांचे दिग्दर्शक ठरले. त्यांची ‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका सध्या सर्वोच्च लोकप्रियता अनुभवत आहे. या पूर्वीच्या त्यांच्या गाजलेल्या मालिका म्हणजे ‘कळत-नकळत’, ‘अनुबंध’ वगैरे. त्यांची प्रसंगाचे चित्रिकरण आणि कॅमेराकाम यांवर छान प्रकारे पकड जाणवते. ते पात्रांचे रेखाटन उत्तम करतात व नटमंडळींकडून अभिनयाची सुरेख अशी साथ मिळवतात. ‘झिप-या’मधील बुटपॉलिशवाली पाच प्रमुख मुले म्हणजे त्याचे आश्चर्यकारक नमुने आहेत. त्यांना भावप्रकटन तर एकदम चांगले जमले आहेच, त्यांचे चेहरेही ‘मोबाईल’ आहेत. चित्रपटातील नायक-नायिकांची जोडी बहीण-भावांची आहे हेच विलक्षण आहे व तितकेच प्रत्यकारीही. झोपडवस्तीतील त्यांचे जगणे वास्तव तर आहेच, पण प्रक्षोभक व हृदयस्पर्शीही आहे. बहिणीची भूमिका अमृता सुभाषने केली आहे. तिला पाहिले, की आठवते ‘चक्र’मधील स्मिता पाटील. तिचे त्या सिनेमातील आंघोळ करतानाचे दृश्य गाजले होते. तशा प्रकारची दृश्ये हा त्या काळच्या नवचित्रपटांचा फंडा होता. अमृता सुभाषने ‘झिप-या’मध्ये नव्या, श्रीमंती जीवनाला सरावलेल्या व चटावलेल्या झोपडवस्तीतील मुलीचा नखरा आणि तिची भावाप्रती ममता ही यथार्थ प्रकट केली आहे. बुटपॉलिशवाल्या मुलांच्या गँगची हितचिंतक म्हणून ती शोभते खरी!

सत्यजित राय यांनी ‘पाथेर पांचाली’ १९५५ मध्ये निर्माण केला. सिनेमा आतून व बाहेरून त्यानंतरच्या बासष्ट वर्षांत किती बदलला आहे त्याचे प्रत्यंतर ‘झिप-या’मध्ये येते. रे यांचा अपू मध्यमवर्गीय घरातील आहे. परंतु त्याचे जीवन अत्यंत हालाखीतील आहे. तो व त्याची बहीण दुर्गा चित्रपटात आगगाडी पाहतात तेव्हा तो आधुनिकतेचा सिंबॉल मानला गेला आहे. ‘झिप-या’ही मेट्रो शहरात घडतो. त्याच्या गँगमधील मुलेही दरिद्री आहेत. परंतु येथे पूर्ण सिनेमाच रेल्वेच्या पार्श्वभूमीवर घडतो, पण त्यामुळे त्याला विलक्षण गती आहे. ती मुले त्यांचा उत्कर्ष आधुनिक व्यवस्थेत करू पाहत आहेत. सिनेमाचा गाभा सामाजिक वास्तवदर्शनाचा असला तरी त्यातील कथेची मांडणी आणि त्याचे कॅमे-यातून सादरीकरण वेधक आहे. चित्रपट प्रेक्षकाला कोणत्याही भावनाविचाराशी रेंगाळू देत नाही, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.

- प्रतिनिधी

लेखी अभिप्राय

Just superb, fabulous & great work..
very enthusiastic to see this film

Devata Andure …07/11/2017

वा फारच छान विश्लेषण. सिनेमा पहावाच लागेल. सिनेमातील काही फोटो असते तर अधिक छान वाटले असते..

vinay samant07/11/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.