निफाडच्या वैनतेयाचे विविध ज्ञानामृत


_Vainatey_1_0.jpgन्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे नाव सर्वत्र परिचयाचे झाले ते ‘झी मराठी’ वाहिनीवर सादर झालेल्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेमुळे. रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा. रानडे यांनी अद्वितीय ज्ञानाने, धोरणाने आणि कर्तबगारीने भारताच्या अर्वाचीन इतिहासाला नवे विधायक व वैचारिक वळण दिले. रानडे यांच्या कार्याची ज्ञानज्योत तेवत ठेवण्यासाठी, त्यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला साजेसे यथोचित स्मारक असावे असा विचार निफाडच्या काही तरुणांच्या मनात आला. ती गोष्ट ऑगस्ट 1962 मधील. त्यांनी `न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळा`ची स्थापना केली. त्यांमध्ये प्रामुख्याने अॅड. लक्ष्मण उगावकर, शांतिलाल सोनी, कै. रघुनाथ कोष्टी, कै. चंपालाल राठी, कै. डॉ. कमलाकर नांदे, कै. बा.य. परीटगुरुजी, कै. पंडितराव कापसे, प्रल्हाददादा कराड आणि वि. दा. व्यवहारे हे होते.

‘न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळा’च्या वतीने ‘वैनतेय विद्यालय’, या माध्यमिक शाळेची स्थापना दोनच वर्षांत, 9 जून 1964 रोजी करण्यात आली. शाळा स्थापन होण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत, कारण एका चांगल्या शिक्षण संस्थेची गावाला आणि परिसराला गरज होती. इमारतीची उपलब्धता सुरुवातीला जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने झाली. नागरिक आणि पालक यांचे आर्थिक योगदान लाभल्याने आर्थिक निधी गोळा झाला. सार्वजनिक मंदिराच्या जागेचा उपयोग झाला. सध्याच्या इमारतीसाठी कायमस्वरूपी शासकीय जागा मंजूर झाली.  

शाळेच्या `वैनतेय` या नावाला महत्त्व आहे. निफाड गावची नदी विनिता. वैनतेय म्हणजे गरुड. तो विनिताचा पुत्र. अमृतमंथनाच्या वेळी गरुड अमृतकुंभ घेऊन आला होता. म्हणून वैनतेय शाळेचे बोधचिन्ह ‘अमृतकुंभ घेतलेला गरुड’ हे आहे. शाळेचे बोधवाक्य ‘ज्ञानम् एव अमृतम्।’ हे आहे. शाळेचे नाव आणि बोधवाक्य सुचण्यामागे एक गोष्ट आहे... विनता आणि कादवा यांची कथा आहे. या दोन नावांच्या नद्या गावाजवळून वाहतात. तेथे त्यांचा संगम होतो. संगमावर श्री संगमेश्वराचे मंदिर आहे. नैसर्गिक पार्श्वभूमी उत्तम आहे. त्यावरून `अमृतवाहक गरुड`हे बोधचिन्ह आणि `ज्ञानम एव अमृतम्` यावरून `ज्ञान हेच अमृत` या आशयाचे बोधवाक्य आणि `वैनतेय विद्यालय` हे नाव तयार झाले.   

शाळेसाठी चांगले शिक्षक निवडावे, गुणवत्ता हा एकच निकष ठेवावा, त्याबाबतीत तडजोड करायची नाही असा ठाम निर्णय झालेला होता. शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापक शांताबाई लिमये या होत्या. त्यानंतर 1967 ते 1999 पर्यंत वि. दा. व्यवहारे हे मुख्याध्यापक होते. व्यवहारे गुरुजींनी त्यांच्या बत्तीस वर्षांच्या काळात अनेक उत्तम उपक्रम राबवले. शाळा घडवली. ती नावारूपास आणली. व्यवहारे गुरुजी संस्थेचे विश्वस्त असून ते विद्यमान संचालक मंडळावर आहेत.

`वैनतेय विद्यालय` हे सुरुवातीपासून उपक्रमशील विद्यालय आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, नवनवीन उपक्रम विद्यालयात आयोजित केले जातात. प्रत्येक उपक्रमाचे उद्दिष्ट निश्चित असते. त्याचे नियोजन केले जाते. त्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली जाते. कोणत्याही उपक्रमात पालक, शिक्षक, विद्यार्थी यांचे सहकार्य मिळवणे हे व्यवस्थापकीय कौशल्य असते.

मुलींची उपस्थिती योग विषयाच्या सरावात लक्षणीय असते. मुलींची उपस्थिती बौद्धिक उपक्रमांत उदाहरणार्थ वक्तृत्व, निबंध इत्यादींमध्ये वाढू लागली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तालुका पातळीवर `बालकी स्पर्धा` आयोजित केली जाते. त्यात प्रामुख्याने मुलींची उपस्थिती विशेष आढळून आली आहे. घोषपथक आणि बँण्डपथक यांतही मुली सहभाग घेऊ लागल्या आहेत.

_Vainatey_3.jpgशैक्षणिक साहित्याची निर्मिती बौद्धिक विकास उपक्रमांतर्गत होते. वर्गवार फलकलेखन केले जाते. बालविज्ञान परिषद, विज्ञान मेळावा, विज्ञान मंचाचे आयोजन होते. दर शनिवारी चाचणी परीक्षेचे आयोजन होते. अप्रगत विद्यार्थ्यांना व प्रगत विद्यार्थ्यांना स्वतंत्र वर्ग, विद्यार्थी-शिक्षक वर्ग, दहावी व बारावीचे वासंतिक दिवाळीवर्ग इत्यादी असतात. दहावी गणित, इंग्रजी मार्गदर्शन वर्ग, स्टडी कॅम्प व पर्यवेक्षण अभ्यास, वाचन प्रकल्प, हस्ताक्षर सुधारणा, शुद्धलेखन सुधारणा व व्याकरण सप्ताह, ग्रंथप्रदर्शन, प्रज्ञा परीक्षा, संगणक प्रशिक्षण असे उपक्रम आहेत.

शारीरिक विकास उपक्रमांमध्ये आरोग्य तपासणी, लेझीमनृत्य, बर्चीनृत्य, मल्लखांब, मुलींचे बँडपथक, सूर्यनमस्कार, शालेय पोषण आहाराचा समावेश आहे. क्रीडांगणावर विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली असते. मुली विविध उपक्रमांत हिरिरीने भाग घेत असतात. आंतरशालेय क्रीडास्पर्धा, तालुका-जिल्हा-राज्य-राष्ट्रीय पातळीवरील क्रीडास्पर्धांत भाग घेतला जातो. शारीरिक शिक्षणाचे वार्षिक नियोजन, स्काऊट-गाईड-समाजसेवा, केंद्र सरकारतर्फे राबवला गेलेला चौदा ते अठरा वयोगटातील मुलींसाठी रक्तक्षय निर्मूलन शिबीर, एडस जनजागृती अभियानांतर्गत युवतीमेळावा असे उपक्रम घेतले जातात.

भावात्मक विकास उपक्रमांत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नाविन्यपूर्ण रीतीने होते. आजारी व अपंग विद्यार्थ्यांबाबत जिव्हाळा, वर्गवार गौरव तक्ता व वर्गगीत, विद्यार्थी दत्तकयोजना व गृहभेटी होतात. म्हणजे ही योजना दहावीच्या मुलांसाठी आहे. एका शिक्षकाकडे पाच-सात मुले सोपवली जातात. शिक्षक त्या मुलांच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी समजावून घेतात; त्यांच्या घरी जातात, घरच्या अडचणीही समजून घेतात. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. त्याखेरीज भित्तिपत्रिका, आदर्श विद्यार्थी योजना, छोट्या-मोठ्या सहलींचे आयोजन, चांगल्या उपस्थितीसाठी वर्गवार पुरस्कार, काम करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभिनंदनपर योजना, आदर्श उत्तरपत्रिका प्रदर्शन, क्षेत्र भेट-कृषी संशोधन केंद्र, ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना’ इत्यादी उपक्रम आहेतच. मानसिक विकास उपक्रमांची नोंद घ्यायची झाली तर `मी वैनतेय बोलतोय`(पाच-सात विद्यार्थ्यांच्या गटाला एखादा विषय देऊन, ती मुले त्या विषयांविषयी बोलतात), साने गुरुजी कथामाला, हरवले-सापडले (मुलांच्या वस्तू हरवत असतात, मुले त्याची तक्रार करतात, कोणीतरी ती वस्तू शोधतो, कोणालातरी ती वस्तू मिळते. त्या मुलाचे कौतुक केले जाते.) असे उपक्रम आहेत.

व्यवहारे गुरुजींनीच ‘मला वाटते’ हा वेगळा उपक्रम चालू केला. शाळेत दररोजच्या प्रतिज्ञा, प्रार्थना, राष्ट्रगीतानंतर रोजचा दिनविशेष सांगितला जातो. त्यातूनच पुढे ‘मला वाटते’ची सुरुवात झाली. एक शिक्षक पाच मिनिटे विद्यार्थ्यांशी अभ्यासपूर्ण संवाद साधतो. त्यात शिक्षण, विज्ञान, अध्यात्म, तत्त्वज्ञान, पर्यावरण, संस्कार इत्यादींविषयी बोलतात. आत्मिक विकास उपक्रमांतर्गत शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके, गणवेश जमा करून त्यांचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना केले जाते. सर्वधर्मसमभाव कार्यक्रम (जो सण असेल, त्याविषयी मुलांना माहिती सांगितली जाते), मातापिता स्मृतिदिन (यामधे शाळाबांधणीला सुरुवात झाली, तेव्हापासून अनेक जणांनी देणगी दिली आहे. त्या काळच्या पंचवीस रुपये देणगीपासून आता हजारांत देणगी मिळते. सर्वपित्री अमावास्येला-पितृपंधरवड्यात – सर्व देणगीदारांना, त्यांच्या नातेवाईकांना बोलावले जाते. स्वर्गवासी झालेल्यांच्या छायाचित्राला गंधफूल वाहून पूजा केली जाते. त्या निमित्ताने एखाद्या महात्म्याचे प्रवचन ठेवले जाते. जमलेल्या सर्वांना प्रसाद दिला जातो. तसेच, पितृपंधरवड्यात समारंभाच्या दोन-चार दिवस आधी मुलांनाही काही विषय देऊन निबंध लिहिण्यास सांगितले जातात. मुलांसाठी एखादे व्याख्यानही ठेवले जाते.) इत्यादी उपक्रम आहेत. सर्वांगीण विकास उपक्रमांत दैनिक परिपाठ, ॐ कार, मूल्यशिक्षण, एक वर्ग एक पुस्तक, वर्गवार हस्तलिखित प्रदर्शन, वर्गवाचनालय, पालक-शिक्षक संघ, वृक्षारोपण, रानडे जयंती उत्सव, बालआनंद महोत्सव इत्यादी राबवले जातात.

_Vainatey_2.jpgआदिवासींसाठी `आमराई` या योजनेअंतर्गत आदिवासी वस्तीत एका आदिवासीच्या घरापुढे आंब्याचे झाड लावले. अशी शंभर झाडे लावली. त्याची देखभाल आदिवासी करतात. त्याचे उत्पन्न पुढे भविष्यात येईल ते आदिवासींनीच घ्यायचे. गावातील जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धारात भरीव योगदान शाळेतर्फे दिले जाते. शनैश्वर महाराज जयंती उत्सवात योगदान असते. ते 1985 पासून चालू आहे. उत्सवाच्या एकतिसाव्या वर्षी एकतीस बदाम वृक्ष मार्केट कमिटीच्या आवारात लावले. वाचनसंस्कृती प्रकल्पांतर्गत एका पिशवीत पाच पुस्तके घालून प्रत्येक विद्यार्थ्याला घरी दिली जातात. घरातील इतर लोकही पुस्तके वाचू शकतात. पिशवी न्यायलाही सोपी पडते. योजनेतील काही पुस्तके शाळेतील वाचनालयातून व काही ‘स्वामी समर्थ केंद्रा’तून घेतली आहेत. नागरिकांसाठीही ही योजना/सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.
शिक्षण विचारमंचामध्ये परिसरातील इतर शाळांनाही समाविष्ट करून घेतले जाते. गुणवंत विद्यार्थ्यांना एकत्रित करून, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिबिरे आयोजित केली जातात. शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी योग शिक्षण शिबिर/वर्ग घेतले जातात. त्या उपक्रमास आरंभ 2003 पासून झाला. अंबिका योग कुटिर (ठाणे) यांच्या माध्यमातून योगशिक्षणाचा सार्वजनिक क्षेत्रात गावपातळीवर प्रारंभ केला. त्यानुसार शाळेतील विद्यार्थी, नागरिक, महिलांसाठी योगवर्ग सुरू केले. योगशिक्षणाचा प्रसार व प्रचार झाला. त्यातून योगशिक्षक तयार झाले. राज्य पातळीवर योगस्पर्धांचे आयोजन निफाडमधे केले गेले. ते यशस्वीपणे पार पडले. क्रांतिदिन 9 ऑगस्टला साजरा केला जातो.

`वैनतेय विद्यालया`चे पन्नास वर्षांत डेरेदार ज्ञानवृक्षात रूपांतर झाले आहे. सामाजिक व सांस्कृतिक शिक्षणाचे केंद्र म्हणून; तसेच, एक उपक्रमशील व धडपडणारी माध्यमिक शाळा म्हणून सर्व स्तरांवर संस्थेचा गौरव होत आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत आणि मान्यवर व्यक्तींनी संस्थेला भेट देऊन कामकाजाचा गौरव केलेला आहे. वि.दा. व्यवहारे यांना उत्कृष्ट शैक्षणिक, सामाजिक कार्याबद्दल राज्यपुरस्कार प्राप्त झालेला आहे. संस्थेस उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाची इन्सेटिव्ह ग्रॅण्ट प्राप्त झाली आहे. `राज्य विज्ञान शिक्षणसंस्था, नागपूर` या संस्थेच्या वतीने `ग्रामीण विज्ञान छंद मंडळा`च्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तिपत्र मिळाले आहे.

संपर्क - वि. दा. व्यवहारे, विश्वस्त
‘न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळ’- ‘वैनतेय विद्यालय’,  022550241465, 8698770565
  
- वि. दा. व्यवहारे,
022550241465 / 8698770565

– पद्मा क-हाडे

Last Updated On 4th Oct 2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.