सायबरवर्ल्डमध्ये ‘नाशिकचा’ ठसा

प्रतिनिधी 06/06/2017

_bhagyashree_kenge_2.jpgअनुराग व भाग्यश्री केंगे यांनी नाशिकची पहिली वेबसाईट www.nashik.com डिसेंबर १९९७ मध्ये उभी केली. इंटरनेट नव्याने येत होते, त्यामुळे ‘नाशिक इंटरनेटवर’ ही बातमी नाशिककरांसाठी नवीन व अचंबित करणारी वाटली. बहुसंख्यांना तिचा अर्थदेखील समजत नव्हता- परदेशात असलेले नाशिककर मात्र त्यांचे शहर इंटरनेटवर पाहून ’नॉस्टॅल्जिक’ व आनंदित झाले. ‘नाशिक डॉट कॉम’वर अनेक विभागांचा समावेश केला गेला होता. जुने तर हवेच, पण नवीनही सामावून घ्यावे असे ठरवून त्यावरील ‘नॅव्हिगेशन’, ‘लिंक्स’ ठरवल्या गेल्या. नाशिक हे केंगे पती-पत्नींचे गाव. ती दोघे म्हणतात – आमच्याच गावाचा शोध घेऊ लागल्यावर गोदावरीचा काठ, काळाराम, सुंदरनारायण, नारोशंकर मंदिर यांचा इतिहास आणि सौंदर्य नव्याने जाणवले. नाशिकच्या अनेक गल्ल्या, जुने वाडे, खाण्याची ठिकाणे, शहराच्या वेशी अशा गोष्टी वेबसाईटवर देण्यात आल्या. वि.दा. सावरकर, अनंत कान्हेरे यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देण्यात आली. दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा आढावा घेण्यात आला.

अनुराग हे सॉफ्टवेअर इंजिनीयर, तर भाग्यश्री या मेकॅनिकल इंजिनीयर. त्या दोघांची मानव संसाधन (HR) आणि ERP सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी आहे. तेथे वेबसाईटस आणि मोबाईल अ‍ॅप तयार केले जातात. भाग्यश्री यांनी त्यांच्या व्यावसायिक कामाचा अनुषंगिक भाग म्हणून मुख्यत: हौसेपोटी ‘नाशिक डॉट कॉम’ व मग ‘मराठीवर्ल्ड डॉट कॉम’ या वेबसाइट तयार केल्या. त्या म्हणाल्या, की “त्यांचा खर्च कंपनीच्या मोठ्या कामात निघून जातो.” साइटवर विविध विभागांत नाशिक शहर आणि परिसर यांची माहिती छायाचित्रांसह देण्यात आली आहे. नाशिक भटकंती विभागात शहराचा परिसर आणि आजुबाजूच्या ठिकाणांची माहिती छायाचित्रांसह देण्यात आलेली आहे. कुंभमेळा ह्या महत्त्वाच्या सोहळ्याची छायाचित्रे माहितीसह देण्यात आलेली आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे तेथे भारतातून नित्यनेमाने येणारे भाविक आहेत. ते त्यांच्या ठरलेल्या पुरोहितांकडून धार्मिक कर्मकृत्ये करवून घेत असतात. तशा भाविकांची पिढ्यान् पिढयांची नोंद प्रत्येक पुरोहिताकडे असते. त्यालाच ’नामावली’ म्हणतात. त्याची रंजक माहितीही ‘नाशिक डॉट कॉम’वर वाचण्यास मिळते. त्याच प्रमाणे भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथे केल्या जाणा-या ’नाग-नारायणबली’ आणि ’कालसर्प’ ह्या विधींचीही माहिती तेथे वाचता येते. अशा अनेक विषयांना स्पर्श करणारी ही वेबसाईट आहे. भाग्यश्री त्यासंबंधात दोन हृद्य अनुभव उदाहरण म्हणून सांगतात.

प्रवीण नावाचा नाशिककर अमेरिकेत ‘कोमा’त अत्यवस्थ होता. त्याच्या घरच्यांविषयी त्याच्या मित्रांना काहीच माहिती नसल्यामुळे त्यांनी www.nashik.com वर आम्हाला ई-मेल लिहिली. आम्ही ती बातमी प्रवीणच्या घरचा पत्ता शोधून, त्याच्या बहिणीपर्यंत पोचवू शकलो. दुसरे म्हणजे कवी कुसुमाग्रजांचे निधन झाले तेव्हा ती बातमी ‘नाशिक डॉट कॉम’ने अर्ध्या तासात वेबवर आणली. त्यामुळे जगभरच्या अनेक रसिकांनी त्यांना ‘नाशिक डॉट कॉम’वरच श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अंतिम प्रवासाची छायाचित्रे साईटवर प्रकाशित करण्यात आली होती. त्यामुळे इंटरनेटवरील ‘फास्ट कम्युनिकेशन’ व ‘नेटवर्किंग’ यांचा प्रत्यय नाशिककरांना आला व त्यांनी केंगे यांच्या प्रयत्नांची नोंद कौतुकाने केली. भाग्यश्री म्हणाल्या, आम्ही ‘ऑनलाईन गिफ्ट शॉपही’ सुरू केले आहे. अनिवासी नाशिककर त्यांच्या नाशिकमधील नातेवाईकांना ‘भेटवस्तू’ त्या साईटवरून निमित्ता निमित्ताने पाठवून जिव्हाळा जपत असतात.

_bhagyashree_kenge_1_0.jpgभाग्यश्री सांगतात, ‘मराठीवर्ल्ड’ची रूपरेषा सहा महिन्यांच्या संशोधनानंतर निश्चित झाली. मराठी आणि महाराष्ट्र म्हणजे काय? नऊवारी साडी, तमाशा, कुस्ती, मल्लखांब, पिठलं-भाकरी, आमरस-पुरणपोळी, गुढीपाडवा-गणेशोत्सव, कुसुमाग्रज-पु.ल. देशपांडे, आशा-लता यांची अवीट गाणी... यादी लांबत जाणारी आहे. www.marathiworld.com ची मुहूर्तमेढ ‘मराठी दिना’च्या दिवशी, २८ फेब्रुवारी १९९९ रोजी रोवली गेली. त्या रोपटयाचा वटवृक्ष झाला आहे. भाग्यश्री म्हणाल्या, “आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो आमचा मित्र आणि माजी सहकारी विनय हिंगे ह्याचा. ह्या दोन्ही वेबसाईटच्या उभारणीत त्याचा सिंहाचा वाटा आहे.” दोन लाखांहूनही अधिक युजर्स मराठीवर्ल्डच्या भेटीला दर महिन्याला येत असतात.

कुसुमाग्रजांनी स्वत: केंगे यांच्या कार्यालयात येऊन त्यांची वेबसाइट, त्यावरील विविध दालने पाहिली. तो उत्कट क्षण भाग्यश्री व अनुराग यांना सतत स्फुरण देत असतो. भाग्यश्री म्हणतात, की “कुसुमाग्रज पीसीसमोर बसले, आम्ही त्यांना नाशिकचे एकेक दालन स्क्रीनवर दाखवू लागलो व ते आधुनिक तंत्रज्ञानाने थक्क होत गेले. त्यांना इंटरनेटमुळे जगभर असलेला ‘कनेक्ट’ जाणवला. त्या प्रत्ययामुळे ते भारलेच गेले. आम्ही कुसुमाग्रज यांच्या त्या कार्यालय भेटीमुळे पावन झालो अशीच आमची भावना आहे. जणू अवघ्या नाशिक शहराने आमच्या कार्यालयास भेट दिली” भाग्यश्री वर्णन करून सांगतात.

‘मराठीवर्ल्ड डॉट कॉम’ची विविध दालने: १. संस्कृती - विविध सणवार, लग्नविधी, व्रत-वैकल्ये, दाग-दागिने, रांगोळ्या, पारंपारिक गाणी आणि पेहराव ह्यांची माहिती देणारा हा विभाग. त्या विभागाला एक लक्ष चोवीस हजार नऊशे वाचकांनी (युजर्सनी) भेट दिली आहे;

२. साहित्य - थोर साहित्यिकांची ओळख, नव्या दमाच्या लेखकांच्या मुलाखती आणि मराठी भाषेवरील लेख त्या दालनात आहेत. ‘मराठी कोश वाङ्मय’ आणि ‘मराठी साहित्य परीक्षा’ ह्यावरील माहितीपूर्ण लेखही तेथे आहेत. नवीन पुस्तकांची दखल व परीक्षणे तेथील उपविभागात आहेत. पाच हजार त्र्याण्णव मराठी रसिकांनी त्याचा लाभ घेतला आहे; आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत ‘मराठीवर्ल्ड’ने साहित्याचा प्रसार होण्यासाठी मराठी ई-पुस्तक निर्मितीचा मान प्रथम मिळवला. ‘मराठीवर्ल्ड’ने ‘हितगुज लेकीशी’ हे पौगंड वयाच्या मुलींशी संवाद साधणारे पहिले ई-पुस्तक २००० साली प्रकाशित केले. त्यांनी ई-साहित्याला लाभलेल्या वाचकांच्या प्रतिसादामुळे 'सय', 'सावळ्या रे' ही ई-पुस्तके आणि ई-दिवाळी अंकांचे प्रकाशन सातत्याने केले. ‘हमखास चुकणारे शब्द’ हे वेगळे आणि उपयुक्त सदर त्या विभागात आहे. ऱ्हस्व-दीर्घचा योग्य वापर सांगणारे ते सदर. वाचकांनी जास्तीत जास्त शुद्ध मराठी भाषेचा वापर करावा असा त्यामागील उद्देश आहे. साहित्य संमेलने हा मराठी साहित्याचा सोहळाच जणू. देश-विदेशातील त्या सोहळ्याची माहिती ‘मराठीवर्ल्ड’ने वेळोवेळी वाचकांना उपलब्ध करून दिली. अखिल भारतीय साहित्य संमेलने, कोकण मराठी साहित्य संमेलने, बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन, विश्वसेतू अमेरिका संमेलन, युरोपीयन मराठी संमेलन ह्यांसारख्या विविध संमेलनांची माहिती साइटवर उपलब्ध आहे;

३. कला-क्रीडा - महाराष्ट्रात खेळले जाणारे मल्लखांब, कुस्ती, हॉकी, खोखो, कबड्डी हे खेळ, काळाच्या ओघात विस्मरण झालेले सुरपारंब्या, पिदवणी, गोटया, सागरगोटे, गंजिफा हे खेळ यांची माहिती त्या विभागात आहे. अंजली भागवत, अजित आगरकर, दीपा मराठे ह्या खेळाडूंच्या मुलाखतीही आहेत. चित्रपट कलाकार, गायक, वादक, संगीतकार, चित्रकार-शिल्पकार, नाटककार अशी अनेक क्षेत्रांतील मंडळी त्या विभागात दिसतात. नॉस्टॅल्जिया जागवणारी ‘बिनाका गीतमाला’ ही १९५० ते १९८०च्या सदाबहार गीतांचा खजिना आहे. एकोणचाळीस हजार पाचशेसत्त्याऐंशी वाचकांनी त्या माहितीचा लाभ घेतला आहे;

४. उद्योग - ‘मराठीवर्ल्ड’वर मराठी उद्योजकांच्या मुलाखती, नवीन पिढीला मार्गदर्शक ठरतील अशा मान्यवरांच्या लेखमाला, व्यवस्थापनावर खास लेखमाला उपलब्ध आहे. ह्या विभागाला चौतीस हजार नऊशेतेहत्तीस वाचकांनी भेट दिलेली आहे;

५. बालनगरी - तीन ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मराठीतून सदर. गोष्टी, कविता, गाणी, श्लोक, बुद्धिमत्ता, ऑनलाईन भेटकार्डे, मुलांसाठीच्या खास पाककृती वगैरे मजकूर आहे. पंच्याहत्तर हजार चारशेअकरा आई-बाबांनी त्यांच्या मुलांना ते दाखवले आहे;

६. भ्रमंती - महाराष्ट्रातील समुद्रकिनारे, गडकिल्ले, लेणी, तीर्थक्षेत्रे, अष्टविनायक, ज्योर्तिलिंग अशा वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांची माहिती आहे. पंच्याण्णव हजार तीनशेएक लोकांनी त्याला भेट दिली आहे;

७. सृष्टिरंग - निसर्गाची विविधता आणि वैशिष्ट्ये. छपन्न हजार तीनशेपंच्याहत्तर निर्सगप्रेमींनी त्या सदराला भेट दिली आहे;

८. अन्न हे पूर्ण ब्रह्म - मटकीची उसळ, थालीपीट, घावन-घाटले, अंबाडीची भाजी, डिंकाचे लाडू, कारळ्याची चटणी... अशा अस्सल मराठी विविध पाककृती आहेत. दोन लक्ष एकसष्ट हजार तीनशेतेवीस वाचकांनी त्यांचा स्वाद घेतला आहे;

९. करमणूक - नाटयपरीक्षण, चित्रपटपरीक्षण, कलाकारांच्या मुलाखती. त्याशिवाय ‘मराठीवर्ल्ड’ने अनेक मराठी चित्रपटांसाठी 'ऑन लाईन मिडिया पार्टनर' म्हणून काम केले आहे. 'देवराई', 'श्यामची आई', 'गैर', 'साने गुरुजी', 'द इंडियन मुरळी', 'मुक्ताई'... अशा काही चित्रपटांच्या 'मायक्रो वेबसाईटस' ‘मराठीवर्ल्ड’वर आहेत. दोन लक्ष तेवीस हजार आठशेएकोणचाळीस रसिकांनी ह्या सदराला भेट दिली आहे;

१०. मुक्तांगण - वाचकांचे व्यासपीठ व लेखन. त्रेसष्ट हजार पाचशेचव्वेचाळीस वाचकांनी वाचले आहेत;

११. ई-दिवाळी अंक – ‘मराठीवर्ल्ड’ने २००२ साली इंटरनेटच्या जगतातील पहिला ई- दिवाळी अंक प्रकाशित केला. तेरा हजार पाचशेचाळीस वाचकांनी वेगवेगळ्या वर्षीचे दिवाळी अंक डाऊनलोड केले आहेत;

१२. ‘मराठीवर्ल्ड’च्या सेवासुविधा - जगभरातील मराठी माणसांना ‘मराठीवर्ल्ड’चा जास्तीत जास्त माहितीपूर्ण उपयोग व्हावा ह्या उद्देशाने सेवा-सुविधा हे सदर चालू केले गेले आहे.

अमेरिका, युरोप, न्युझीलंड ते इंदूर, सातारा, रत्नागिरी, बीड, नागपूर, डोंबिवली, दादर, गिरगाव, बंगलोर, हैदराबाद अशा जगभर विखुरलेल्या मराठी माणसांना ‘मराठीवर्ल्ड’ ही 'त्यांची' ‘साईट’ वाटते. कतारमध्ये राहणा-या संदीप कुलकर्णी यांचा अनुभव बोलका आहे. त्यांनी त्यांच्या मुलींपर्यंत मराठी संस्कृती पोचवण्याच्या ध्यासापायी त्यांचा मुलींचा भोंडला मुस्लिम मुलींसोबत साजरा केला. त्यांना त्यासाठी गाणी ‘मराठीवर्ल्ड’वर मिळाली. तसाच आणखी अनुभव म्हणजे लंडनमध्ये सावरकर भक्त पंच्याहत्तर वर्षीय श्री. ------ गोडबोले राहतात. त्यांनी भारतातून येणा-या पर्यटकांसाठी सावरकर व इतर स्वातंत्र्य सैनिक यांच्या वास्तव्य असणा-या स्थळांविषयी सहल आखली होती. भारतीय पर्यटकांनी ती आवर्जून पाहवी असा त्यांचा प्रयत्न होता, परंतु त्यांना यश येत नव्हते. ‘मराठीवर्ल्ड’ने त्या सहलीविषयी माहिती साईटवर दिली. आणि काय आश्चर्य, त्या माहितीमुळे गोडबोल्यांकडे पर्यटकांचे लक्ष जाऊ लागले!

‘मराठीवर्ल्ड’ने अनेक तांत्रिक प्रयोग दहा वर्षांच्या ह्या काळात यशस्वी करून दाखवले आहेत. ई-शुभेच्छापत्रे, ई- दिनदर्शिका, संगीतविषयक ई-मासिक, ई-बुक, तीन हजारांहून अधिक गाणी-अभंगांचा संग्रह, ई-खरेदी-विक्री, मराठी चित्रपटांचे ऑनलाईन प्रमोशन, युनिकोड फाँट आणि बरेच काही... त्यामुळे ‘मराठीवर्ल्ड’ने जुन्या संस्कृतीला जपत नव्या तंत्राचे स्वागत केले आहे. केंगे यांच्या कंपनीचे वैशिष्टय मनुष्यबळ म्हणजेच web-based HR सॉफ्टवेअर्स हे आहे. पण केंगे दांपत्य सांगते, की त्या क्लिष्ट ’कोडिंग’ कामात आम्हा सर्वांनाच ‘मराठीवर्ल्ड डॉट कॉम’ आणि ‘नाशिक डॉट कॉम’वर काम करताना आगळे समाधान मिळते.

काही उल्लेखनीय पुरस्कार -

१. भाषा आणि संस्कृती जतनासाठी राष्ट्रीय स्तरावर ’मंथन’ पुरस्कार.

२. भाग्यश्री यांना Outstanding Lady Engineer Award by Institute of Engineers

३. ‘देशदूत’ पुरस्कार

४. अनुराग ह्यांच्या मानव संसाधन सॉफ्ट्वेअरला एशियन बँकेचा मानाचा पुरस्कार.

५. अनुराग ह्यांना Outstanding Engineer Award by Institute of Engineers.

- भाग्यश्री केंगे, ९७६३७२४५६४, अनुराग केंगे ९८२२५०१८४०

वेब-संपादक, 'मराठीवर्ल्ड डॉट कॉम'

लेखी अभिप्राय

केंगे दाम्पत्याने दिलेले योगदान अभूतपूर्व आहे..शुभेच्छा..

Swati Pachpande09/06/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.