ज्येष्ठराज जोशी – जगातील शंभर उत्कृष्ट संशोधकांतील एक


प्रा.ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचे नाव भारतातील नामवंत रसायन अभियंत्यांमध्ये सन्मानाने घेतले जाते. ज्येष्ठराज हे उत्तम शिक्षक व तसेच संशोधक आहेत. ते रासायनिक कारखाने चालवताना येणा-या अडचणी सोडवण्यासाठीचे उत्तम मार्गदर्शक आहेत आणि उत्तम व्यवस्थापकही आहेत. त्यांच्या ठायी रसायन विद्या व तिची उपयोगिता या संदर्भात एवढे गुण आहेत! स्वाभाविकच, जोशी यांच्याकडून रसायन अभियांत्रिकीमध्ये विविध स्वरूपाचे मोठे कार्य घडून आले आहे. त्याबद्दल ज्येष्ठराज यांची 'अमेरिकन केमिकल सोसायटी’ने २००७ सालापूर्वीच्या चाळीस वर्षांतील शंभर उत्कृष्ट संशोधकांत गणना केली. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ किताबाने २०१४ साली सन्मानित केले.

ज्‍येष्‍ठराज जोशी यांचा जन्म २८ मे १९४९ रोजी सातारा जिल्ह्यातील मसूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ‘जीवन शिक्षा मंदिर’ या मसूरच्या शाळेत झाले. ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी कराड या तालुक्याच्या गावी ‘यशवंतराव चव्हाण महाविद्यालया’त गेले. ते तेथून इंटर सायन्सचा अभ्यासक्रम पूर्ण करून १९६७ साली बाहेर पडले आणि मुंबईच्या ‘युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’[(युडीसीटी. आता, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी(आयसीटी)] या प्रख्यात संस्थेत पुढील शिक्षणासाठी आले. ज्‍येष्‍ठराज यांनी तेथे रसायन अभियांत्रिकीत ‘बी.केम.इंजिनीयरिंग’ ही पदवी १९७१ साली संपादन केली व नंतर तेथूनच १९७१ ते ७७ या काळात प्रा.एम.एम.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. ही पदवीही मिळवली. ज्‍येष्‍ठराज यांनी त्यांचे संशोधन आणि अध्यापनकार्य ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’मध्ये सुरू केले. ते तेथूनच १९७२ ते २००९ अशी सदतीस वर्षांची कारकीर्द संपवून बाहेर पडले. ते १९९९ ते २००९ अशी निवृत्तीपूर्वीची दहा वर्षे संस्थेचे संचालक होते.

ज्येष्‍ठराज जोशी यांनी त्‍यांच्‍या रसायन अभियांत्रिकी शास्त्रातील संशोधनातून नानाविध प्रक्रियांची कारणमीमांसा शोधून काढली. उपलब्ध संयंत्रात सुधारणा करणे, त्यांतील वीज आणि इंधन यांसारख्या ऊर्जेची बचत करून प्रक्रिया सोपी व स्वस्त करणे, उत्पादनास लागणा-या निरनिराळ्या टप्प्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करून उत्पादन प्रक्रियांचा वेळ कमी करणे आणि वेळेतील बचतीमुळे जास्त उत्पादन मिळवून आर्थिक फायदा वाढवणे, हप्त्याहप्त्याने होणारी उत्पादन प्रक्रिया सातत्याने चालू ठेवणे ही त्यांच्या संशोधनाची प्रमुख अंगे आहेत. त्यांनी रासायनिक प्रक्रियेच्या सखोल अभ्यासातून प्रक्रियेचे मूळ शोधणे आणि ते गणिताच्या स्वरूपात मांडणे यात प्राविण्य मिळवले आहे. त्यांनी केलेल्या तशा संशोधनास आंतरराष्ट्रीय मान्यता आणि प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांनी रासायनिक प्रक्रिया होत असताना निरनिराळे घटक एकमेकांत कसे मिसळतात व घटकांची मिसळण्याची ती प्रक्रिया कशा प्रकारे सुधारून प्रक्रिया अधिक परिणामकारक होईल हे गणिती पद्धतीने दाखवून दिले. ते प्रायोगिक रीतीनेही सिद्ध केले. त्यांनी द्रव, घन व वायू या तिन्ही रूपांतील रसायनांवरील प्रक्रियेत घडून येणा-या प्रवाहांबद्दल संशोधन करून तशा प्रक्रियेत येणा-या अडचणींवर उत्तरे शोधून काढली. ज्‍येष्‍ठराज यांनी त्या कामाकरता गणिताचा; तसेच, संगणकशास्त्राचा उपयोग नवीन संयंत्र रचना करण्यासाठी केला.नायट्रिक असिड,खते व नायट्रेट क्षार करताना; बॉयलर वापरून औष्णिक वीज तयार होताना; तसेच, बरेच धातू शुद्ध स्वरूपात मिळवताना NOx हा विषारी वायू तयार होतो व तो आरोग्याला हानिकारक असतो. ज्येष्ठराज यांनी तो वायू; तसेच, असे विषारी वायू ओझोन व चुनकळी यांच्या साहाय्याने वेगळे करण्याचे तंत्रज्ञान तयार केले. त्‍यांनी संशोधन करून धूर संयंत्रात आतल्या आत जिरला जाईल अशी व्यवस्था कारखानदारांना बनवून दिली. त्यांनी रासायनिक कारखानदारांच्या अनेक प्रकारच्या अडचणी सोडवल्या. त्यांच्या त्या कामात वयाच्या सदुसष्टाव्या वर्षीही खळ पडलेली नाही.

ज्येष्ठराज जोशी यांनी दोनपेक्षा जास्त पदार्थांच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये त्या पदार्थांची मिसळण्याची प्रक्रिया जलद व सुलभ होण्याकरता नवीन संयंत्र रचना शोधून काढल्या. त्यांनी रासायनिक प्रक्रियांमध्ये दाब, तापमान, मिसळण्याचा वेग इत्यादींमधील बदल अचूकपणे मोजण्याचे तंत्र विकसित केले.

ज्‍येष्‍ठराज यांना 'ऊर्जानिर्मिती' व 'ऊर्जाबचत' या विषयांतील संशोधनाबद्दल खास आस्था आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी'मध्ये सुधारित चुली, अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेतील उष्णतेची बचत, सूर्यशक्तीवर चालणारे शितीकरण संयंत्र, पवनशक्तीचा वापर इत्यादी विषयांवर अखंड संशोधन चालू असते.

‘मुंबई युनिव्हर्सिटी’ची ‘डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’ ही संस्था माटुंग्याला १९३३ साली सुरू झाली. जोशी यांनी त्यांच्या संचालकपदाच्या कारकिर्दीत संस्थेचा कायापालट केला. जोशी यांच्या संचालकपदाच्या कार्यकाळात -

 

१. संस्थेला स्वायत्तता मिळाली व तिचे रूपांतर स्वतंत्र अभिमत विद्यापीठात झाले. आता तिचे नाव ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’ झाले आहे.
२. पीएच.डी.होणा-या विद्यार्थ्यांची संख्या, जागतिक पातळीवरील शोधनिबंध आणि मानके या सर्वांची संख्या दुप्पट झाली. त्यामुळे जागतिक पातळीवर संस्थेचा क्रमांक सहावा आला.
३. संस्थेने मिळवलेले उत्पन्न (संशोधन प्रकल्प, कारखान्यांना दिलेल्या सल्ल्यातून मिळालेले उत्पन्न व देणग्या) दरवर्षी पंचवीस टक्के चक्रवाढ पद्धतीने वाढले व ते २००९ साली राज्य सरकारच्या अनुदानाच्या दसपट झाले. तो जागतिक विक्रम असावा.
४. प्रगत विषयांत सात नवीन अध्यासने निर्माण झाली.
५. संशोधनासाठी लागणा-या पायाभूत सोयी कितीतरी पटींनी वाढवल्या गेल्या, तसेच  चाळीस हजार चौरस मीटरचे नवीन बांधकाम (प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी निवासस्थाने इत्यादी) संमत करून घेऊन त्यासाठी बरीचशी आर्थिक तरतूद करून ठेवली गेली.
६. शेकडो लघुउद्योजक तयार झाले.
७. त्यांनी संस्थेला कोट्यवधी रुपयांच्या देणग्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून मिळवून दिल्या.

जोशी यांच्या संशोधनकार्यातील विविधतेसाठी व उपयुक्ततेसाठी त्यांना देश-परदेशांतून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात ‘आयसीटी’मधून उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार,१९९१ साली 'शांतिस्वरूप भटनागर' हा केंद्र सरकारचा विज्ञान संशोधनातील अत्युच्च पुरस्कार, १९९१ साली बंगलोरच्या इंडियन अकादमी ऑफ सायन्सेसची फेलोशिप, ‘विविधलक्ष्यी औद्योगिक संशोधन केंद्र’ ऊर्फ ‘वास्विक’ संस्थेचा औद्योगिक संशोधनाचा १९९२ सालचा पुरस्कार, ‘आयसीटी’च्या १९९४  व २००९ साली झालेल्या हीरक व अमृत महोत्सवांत संस्थेचा हिरा व अमृत पुरस्कार’, १९९५ साली ‘इंडियन नॅशनल अॅकेडमी’ची (इन्सा) फेलोशिप, २००४ साली ‘महाराष्ट्र शासना’चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, २००५ साली ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीयर्स’ या संस्थेचा डॉ.रेड्डी पुरस्कार व २००७ मध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीयर्स’चा ‘हिरा पुरस्कार’ यांचा समावेश होतो.

ज्‍येष्‍ठराज यांच्या मार्गदर्शनाखाली नव्वद विद्यार्थ्यांनी पीएच.डी. आणि एकोणसाठ विद्यार्थ्यांनी एम.टेक. केले आहे. जगामध्ये संशोधन करणा-या शास्त्रज्ञांकरता वेब ऑफ सायन्स आणि गुगल स्कॉलर सायटेशन यांनी मानके तयार केली आहेत. त्यानुसार एखाद्या व्यक्तीचे प्रकाशित संशोधन इतर संशोधकांना किती वेळा उपयोगी पडले ते मोजले जाते. जोशी यांच्या बाबतीत तो मानांक तेरा हजारांपेक्षा जास्त आहे!

तरुण संशोधकांनी कार्यक्षेत्र म्हणून विज्ञान संशोधन निवडावे यासाठी जे भारतीय शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत, त्यांत जोशी यांचा क्रमांक वरचा आहे. त्यांनी संस्थेतील शेकडो विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्या दृष्टीने त्यांनी शेतीतील उत्पादकता कशी वाढवता येईल हा विचार केंद्रस्थानी ठेवून ज्वारी व सोयाबीन या पिकांवर पीएच.डी.च्या एका विद्यार्थ्याला संशोधन करण्यास दिले. ते संशोधन ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या गच्चीवर चालते. सध्या जोशी यांच्या मनात शहरातील व शेतीतील घनकच-यापासून जास्तीचे मूल्य मिळणारे पदार्थ तयार करणे; तसेच, सौर ऊर्जा वापरून पाण्याचा रेणू कसा फोडता येईल व इंधनासाठी हायड्रोजन कसा मिळवता येईल हे तंत्रज्ञान सोपे आणि स्वस्त कसे होईल, ते भारतात कसे होईल, ग्रामीण जनतेला हाताळता येईल इतके ते सुलभ कसे राहील असे विचार येत असून, त्यांची वाटचाल त्या दृष्टीने चालू आहे. ते परमाणू ऊर्जा विभागाच्या ब-याच कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शक म्हणून काम करतात.

ज्येष्ठराज जोशी २०१४ साली,‘मराठी विज्ञान परिषदे’चे अध्यक्ष झाले. त्यांनी अनेक कल्पना लढवून संस्थेत नवचैतन्य निर्माण केले आहे. जोशी यांचा स्वभाव समन्वयवादी असून त्यांच्या मनाची शांती क्वचितच ढळते. ते अनेक समस्या आजुबाजूला घोंगावत असतानाही प्रयत्नवादाची कास सोडत नाहीत आणि त्यातून त्यांना यशाची धूसर किनार दिसत असतेच. ते तिचा पाठपुरावा करून संपूर्ण यश खेचून आणतात. त्यांनी ‘मराठी विज्ञान परिषदे’ला तरुणांत नवी चेतना निर्माण करण्यासाठी २०१५ साली एक नवीन कार्यक्रम दिला. मराठी समाजाला नाटकाची आवड आहे. त्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन युवकांसाठी राज्यस्तरावर विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित केली. त्या कार्यक्रमात परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हिरिरीने भाग घेतला. स्पर्धेला ‘महाराष्ट्र शासना’च्या ‘सांस्कृतिक संचालनालया’च्या सहभागाची परवानगी मिळाली. नाटयक्षेत्रातील उत्तम समीक्षकांची परीक्षक म्हणून निवड केली गेली आणि महाराष्ट्रातून त्या स्पर्धेत चौदा महाविद्यालयांनी पहिल्याच वर्षी भाग घेतला. मुंबईच्या विलेपार्ल्यातील ‘डहाणूकर वाणिज्य महाविद्यालया’च्या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले. दुस-या वर्षी एकोणीस प्रवेशिका आल्या. सर्वसामान्य लोकांत विज्ञानाची गोडी निर्माण करणे हा ‘मराठी विज्ञान परिषदे’चा उद्देश आहे आणि तो त्या स्पर्धेतील विजेत्यांनी सिद्ध करून दाखवला.

प्रा.ज्येष्ठराज जोशी यांचे वडील सातारा जिल्ह्यात मसूर येथे शेती करत. वडील आणि दोन काका हे सामाजिक व स्वातंत्र्याच्या चळवळीत होते व त्या सर्वांना ब-याच वेळा तुरुंगवास घडला आहे. त्यांच्या मसूरच्या घरावर ब्रिटिश सरकारने तीनदा जप्ती आणली होती आणि प्रत्येक वेळी गावक-यांनी ते सोडवून आणून जोशी कुटुंबाच्या हवाली केले.

ज्येष्ठराज जोशी यांचा विवाह १९७८ साली ऋजुता यांच्याशी झाला. त्या बी.एस्सी. झाल्या आहेत. ज्येष्ठराज जोशी यांना एक मुलगा असून त्याचे नाव अनिरूध्द आहे. त्याने मुंबई आय.आय.टी.मधून संगणक शास्त्रात पीएच.डी. केली आहे. त्याने भारताच्या प्राचीन अशा नाडी परीक्षा या विद्येचा सखोल अभ्यास केला असून तो त्या विद्येला जागतिक मान्यता मिळवण्याचा अथक प्रयत्न करत असतो. तसेच, त्याने आधुनिक गणित व इलेक्ट्रॉनिक्स यांच्या साहाय्याने व नामांकित वैद्यांचे मार्गदर्शन घेऊन नाडी परीक्षेचे संगणकीकरण केले आहे, त्यावर आधारित व्यवसाय सुरू केला आहे.

ज्येष्ठराज जोशी
022 24115448, jbjoshi@gmail.com

- अ.पां.देशपांडे

Updated On 3rd March 2017

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.