पिंपळगावची बगीचावजा स्‍मशानभूमी

प्रतिनिधी 16/08/2016

गावोगावच्या स्मशानभूमीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील लासलगावनजीक पिंपळगावची स्मशानभूमी आहे. मात्र तिच्या आजुबाजूचा परिसर स्थानिक लोकांसाठी रोज सकाळी- रात्री नैसर्गिक विधी उरकण्याचे निवांत ठिकाण बनून गेला होता. तेथे दुर्गंधी इतकी सुटे, की अंत्यविधीला येणारे लोक स्मशानभूमीपासून खूप दूर अंतरावर उभे राहत. फक्त प्रेत उचलून आणणारे खांदेकरी आणि प्रेताला अग्नी-पाणी देणारा, एवढेच लोक त्यांची नाके दाबून अंत्यविधीच्या चौथऱ्यापर्यंत कसेबसे जात, तेथे धर्मविधी आटोपत. पण एकदा, गावात एका श्रीमंत माणसाचा मृत्यू झाला, त्याच्या नातेवाईकांनी स्मशानभूमीचा परिसर जेसीपी मशीन आणून स्वच्छ करून घेतला, जेणेकरून अंत्यविधीला येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी उभे राहता येईल. तो प्रकार गावातील काही लोकांना खटकला. श्रीमंतासाठी वेगळा न्याय आणि गरिबांना वेगळा न्याय असे का? गरिबांचा अंत्यविधी चांगल्या प्रकारे करता येणार नाही का?


त्या विचाराने प्रेरित झालेल्या लोकांनी प्रा. शिरीष गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच-सात वर्षांपूर्वी स्मशानभूमी सुशोभिकरणाची सुरुवात केली. आरंभी, त्यांची काही लोकांनी टिंगलटवाळी केली, त्यांना विरोधही केला, पण ती मंडळी त्यांच्या विचारावर व कार्यावर ठाम राहिली. त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. सुहास आत्माराम ठाकरे या गृहस्थाने त्याच्या घरगुती नर्सरीतून झाडांची आणि फुलझाडांची रोपे तयार करून दिली. त्यांना चांगदेव मुरलीधर भुजबळ या ज्येष्ठ नागरिकाने मार्गदर्शन केले. सर्वजण त्यांना गंमतीने ‘ पिंपळगावचे अण्णा हजारे’ म्हणू लागले. त्याचबरोबर श्याम शहाजी मोरे, राजेंद्र निवृती कदम, भिकाजी पुंजाजी पवार, सचिन बाळू विंचू, संतोष चांगदेव भुजबळ, गोरख भास्कर वडनेरे, दिलावर रहीमुद्रीन काझी, प्रकाश पांडुरंग आंबेकर या सर्वांनी श्रमदानाने स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करून घेतला. त्या ठिकाणी सुंदर बगीचा निर्माण झाला. सामान्य परिस्थितीच्या आणि विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या ह्या लोकांनी तो चमत्कार घडवला आहे!

त्यात शिरीष गंधे यांनी एक अभिनव कल्पना तेथे राबवण्यास सुरूवात केली. ते दरवर्षी दिवाळीला त्या मंडळींच्या सहकार्याने स्मशानात आकाशकंदील लावतात! दिवाळीच्या दिवशी पणत्या लावून फटाकेही फोडतात. त्या बगीचावजा स्मशानभूमीत एक छोटेसे पेटीवाचनालयही आहे. त्याचा उपयोग अंत्यविधीच्या वेळीही आणि इतर वेळी नागरिकांना होतो.


शिरीष गंधे यांनी या प्रयोगाचे मर्म एका वाक्यात सांगितले. ते म्हणाले, की स्मशान या शब्दात शान आहे, पण वास्तवात तेथे ‘जान’ व शानही नाही! त्या स्थानास शान प्राप्त व्हावी यासाठी हा प्रयोग आहे. पिंपळगावसारखाच प्रयोग वाकी व विंचूर या गावांच्या स्मशानभूमीमध्ये सुरू झाला आहे. त्यास चालना देण्यासाठी मी व माझ्या विद्यार्थ्यांनी मिळून ‘अमरधाम विकास ग्रूप’ निर्माण केला आहे.

गंधेसर निवृत्त झाले असले तरी मराठी लेखनसंशोधनाचे त्यांचे काम चालू आहे. शाहीर अनंत फंदींबाबतचे त्यांचे काम पूर्ण झाले असून सध्या ते त्यांचे पूर्वज अंताजी माणकेश्वर गंधे यांचा शोध घेत आहेत. अंताजी पानिपतयुद्धात पेशव्यांबरोबर लढले. मराठी भाषेला तेरावे शतक ते विसावे शतक या काळात ज्या कवींनी वैभव प्राप्त करून दिले, त्यांच्या कृतींचे शिरीष गंधे यांनी संकलन-संपादन करून ठेवले आहे.           

- साहेबराव महाजन

 

लेखी अभिप्राय

हे काम खूपच कौतुकास्पद व जनहिताचे आहे

सौ.सुजला गुन्ज…20/08/2016

प्रा शिरीषजी फार स्तुत्य उपक्रम व अभिनव कल्पना तुमच्या सर्व उपक्रमांना माझ्या व पूर्ण *Global गंधे* परिवारा कडून हार्दिक सुभेच्छा
संजय गंधे

संजय गंधे20/08/2016

प्रा.शिरीष गंधे सर च आमचे आदर्श आहे नविन लेखक असो अथवा एखादी नविन कल्पना राबव्यचि असल्यास ,इतिहासतील कोणत्याही घटने बाबत माहिती विचारलि असता योग्य मार्गदर्शन सर आमच्या सारख्या नवोदिताना करतात
****** सर आम्हा लासलगांव कराना तुमचा अभिमान आहे*****
*****थिंक महाराष्ट्र आपन दखल घेतल्या बद्दल आपले आभार*****

संजय बिरार लास…20/08/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.